सन १८५२! जगातील सर्वोच्च शिखराचा म्हणजेच 'एव्हरेस्ट'चा शोध या वर्षी लागला. विश्वातील हे उत्तुंग स्थळ सापडताच, मग लगेचच त्याला सर करण्यासाठी मानवजातीचे प्रयत्न सुरू झाले.
हा काळ ब्रिटिशांचा होता. जवळपास अध्र्या जगावर त्यांचे राज्य होते. पृथ्वीवरील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांप्रमाणे 'एव्हरेस्ट'वरही 'युनियन जॅक' फडकवून जगात त्यांना आपला दबदबा निर्माण करायचा होता. यातूनच त्यांनी १९२० साली 'एव्हरेस्ट' मोहिमेचा एल्गार केला. १९२१ ते १९४९ दरम्यान ब्रिटिशांनी सलग आठ मोहिमा 'एव्हरेस्ट'वर पाठवल्या. सर्व अपयशी ठरल्या तरी २५५६० फुटांपर्यंत मजल आणि त्यातून 'एव्हरेस्ट'चा मोठा अभ्यास झाला. दरम्यान, १९५२मध्ये ब्रिटिशांना ओलांडत स्वित्र्झलडने एव्हरेस्ट मोहीम काढली आणि त्यांनी तब्बल २८३०० फूट उंचीपर्यंत मजल मारली. हा आजवरचा चढाईचा एक विक्रमच होता. पुढच्या खेपेला हे स्विस गिर्यारोहक शिखर गाठणार हे निश्चित होते. म्हणून त्यांच्यापूर्वीच ब्रिटिशांनी १९५३ साली पूर्ण तयारीनिशी आपली नवी मोहीम उघडली आणि तिने यश मिळवले.
कर्नल जॉन हंट यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या मोहिमेत डॉ. चार्ल्स एव्हान्स, एडमंड हिलरी, तेनझिंग नोर्गे, विल्फ्रेड नॉईस, जॉर्ज लोवे, अल्फ्रेड ग्रेगरी, टॉम बॉर्डिलॉन, चार्ल्स वायली, मायकेल वेस्टमकोट, मायकेल वॉर्ड, ग्रिफिथ पुघ, टॉम स्टॉबर्ट, जॉर्ज बँड आणि जेम्स मॉरिस असे पंधरा गिर्यारोहक सहभागी झाले होते. यातील हिलरी आणि लोवे हे दोघे न्यूझीलंडचे, तर तेनझिंग नोर्गे हा भारताचा होता. उर्वरित सर्व ब्रिटिश नागरिक होते.
बरोबर १० मार्च रोजी ही मोहीम नेपाळमार्गे एव्हरेस्टकडे निघाली. त्या वेळी ही मोहीम म्हणजे एखादे सैन्य हलावे त्याप्रमाणे होती. पंधरा गिर्यारोहक, चढाईसाठी सोबत पंचवीस शेर्पा, तब्बल आठ टन वजनाचे साहित्य, ते वाहून नेण्यासाठी तीनशेहून अधिक भारवाहक (पोर्टर्स) ही आकडेवारीच आज डोळे फिरवते. हा सारा काफिला २२ एप्रिलला एव्हरेस्टच्या तळावर पोहोचला. 'बेस कॅम्प' लागला. सराव सुरू झाला. यानंतर १ मे रोजी त्यांनी चढाईला सुरुवात झाली. २४ मेपर्यंत एव्हरेस्टच्या दक्षिण खिंडीपर्यंत चढाई झाली. कॅम्प लागले गेले. आता शेवटची, अंतिम शिखर चढाई. यासाठी एडमंड हिलरी, तेनझिंग नोर्गे, डॉ. चार्ल्स एव्हान्स आणि टॉम बॉर्डिलॉन यांचा संघ तयार केलेला होता. हे चौघे २६ मेपर्यंत २८७२० फुटांपर्यंत पोहोचले. शिखर अवघे तीनशे फुटांवर असताना यातील डॉ. एव्हान्स आणि बॉर्डिलॉन यांच्या कृत्रिम प्राणवायुपुरवठा यंत्रणेत बिघाड झाला. यश हाताशी आले असताना त्यांना माघार घ्यावी लागली.
हिलरी, तेनझिंगने मोहीम पुढे सुरू ठेवली. २८ मेपर्यंत ते शिखराच्या अगदी जवळ पोहोचले. ती रात्र त्यांनी जागूनच काढली. २९ मे! पहाटेच त्यांनी अंतिम चढाई सुरू केली. हिलरी म्हणतो, 'आग्नेय धारेवरची ही चढाई, बर्फात पायऱ्या खोदतच आम्ही सुरू केली.' ही वाट मानवाला नवी होती. गूढ, कुतूहल आणि आव्हानांनी भरलेली होती. पण यातही कृत्रिम प्राणवायूची ती नळकांडी, अन्य साहित्य-आयुधे सांभाळत एकमेकांना आधार देत ते वर सरकू लागले. अखेर अथक, अविश्रांत प्रयत्नानंतर, प्रत्येक पावलामागे श्वासांची अनंत आवर्तने अनुभवत हिलरी, नोर्गे शिखराजवळ आले. शेवटचे बळ एकवटून लढू लागले. सकाळचे साडेअकरा होत आले आणि चढता चढता चढ एकदम संपला. चहू दिशांना उतार दिसू लागला. अष्टदिशांची क्षितिजे उजळली. ..सर्वोच्च शिखर आले होते! गेली शंभर वर्षे मानवाने जे स्वप्न उराशी बाळगले होते, त्या तिसऱ्या ध्रुवावर आपले पाऊल उमटवले गेले.हिलरीने त्याच्या आत्मचरित्रात या वेळेचे वर्णन खूप सुरेख पद्धतीने केले आहे- 'इथे पाऊल टाकले त्याक्षणी माझी भावना केवळ श्वास मोकळा झाल्याची होती. कृतकृत्यतेची होती. आता एकही पायरी खोदायची नव्हती, की एकही उंचवटा ओलांडायचा नव्हता. आम्ही सर्वोच्च जागी होतो. सारा भवताल गूढ वातावरणाने भारलेला होता. आसमंतात अनंतापर्यंत अनेक हिमशिखरांचा जणू महासागरच उसळला होता. त्यांची टोके त्या सूर्यप्रकाशात तांबूस-पिवळी होत चमचमत होती. सारेच गूढ, स्वप्नवत होते. नेपाळ, भारत आणि ब्रिटनचे राष्ट्रध्वज फडकवत आम्ही छायाचित्रे घेतली आणि त्या पंधरा मिनिटांच्या स्मृती आमच्या आयुष्याचा चिरंतन ठेवा बनल्या.'
शेर्पा तेनझिंग नोर्गे : नेपाळमध्ये १९१४ साली जन्मलेला शेर्पा तेनझिंग नोर्गे हे पुढे भारतात स्थायिक झाले आणि इथलेच झाले. सुरुवातीच्या मोहिमांमध्ये ते एक भारवाहक (पोर्टर) होते. पुढे त्यांनी ब्रिटिशांच्या वतीने गुरखा पलटणीत काम केले. एक चांगला गिर्यारोहक म्हणून त्यांची १९५३च्या मोहिमेत अंतिम चढाई करणाऱ्यांमध्ये निवड झाली होती. १९५३च्या यशानंतर भारतात दार्जिलिंग येथे गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे पहिले संचालक म्हणून शेर्पा तेनझिंग यांची नियुक्ती करण्यात आली. १९८६मध्ये वयाच्या ७२व्या वर्षी त्यांचे निधन झाले. या संस्थेच्या आवारातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गंमत अशी, की पुढे १९९७ मध्ये जेव्हा इथे तेनझिंग यांचा पुतळा उभारण्यात आला त्या वेळी त्याचे अनावरण हिलरीच्या हस्ते झाले. दोन मित्रांची ही अनोखी भेट या संस्थेने आजही जतन करून ठेवलेली आहे.
विजयाची बातमी एव्हरेस्टच्या बातमीकडे तेव्हा सारे जग कान लावून बसले होते. या उत्सुकतेचा केंद्रबिंदू होते, काठमांडू शहर! इथल्या तार कार्यालयात जराशी टिक् टिक् झाली तरी साऱ्यांचेच कान टवकारले जात. पण इथे पोहोचणारी सारी माहिती हस्ते-परहस्ते पोहोचणारी होती. या मोहिमेची खरी बातमी मिळणार होती ती केवळ 'लंडन टाइम्स'ला! एव्हरेस्टच्या या मोहिमेसाठी या वृत्तसमूहाने त्या वेळी मोठी मदत दिलेली होती. यामुळे तिच्या बातमीवरही त्यांचाच अधिकार होता. यासाठी त्यांनी आपला वार्ताहर जेम्स मॉरिसलाच या मोहिमेवर पाठवले होते. वार्ताहर आणि गिर्यारोहक असलेल्या मॉरिसने या मोहिमेत अगदी दक्षिण खिंडीपर्यंत जात वार्ताकन केले होते. त्याची ही बातमी सांकेतिक स्वरूपात लिहिली जाई. रिले पद्धतीने ती काठमांडूपर्यंत पाठवली जायची आणि तिथून पुढे तारेद्वारे तिचा लंडनचा प्रवास होई. '२९ मे'चे ते यशदेखील अशाच पद्धतीने रवाना झाले आणि चार दिवसांनी बरोबर १ जूनच्या रात्री लंडनला पोहोचले. दुसऱ्या दिवशी इंग्लडच्या राणीचा राज्यारोहणाचा समारंभ होता. याच मुहूर्तावर तिला या यशाच्या शुभेच्छा देत 'लंडन टाइम्स' एव्हरेस्ट विजयाची घोषणा केली. 'बीबीसी'द्वारे थोडय़ाच वेळात ही बातमी जगभर पोहोचली.
एडमंड हिलरी न्यूझीलंडच्या एडमंड हिलरीचा जन्म १९१९चा! मधमाश्या पालनाची आवड असलेला हिलरी गिर्यारोहणाच्या प्रेमात पडला आणि एव्हरेस्टच्या वाटेवर आला. एव्हरेस्ट यशानंतर मिळालेल्या प्रसिद्धीचा उपयोग करत तो जगभर फिरला, निधी गोळा केला आणि यातून एक ट्रस्ट उभा केला. न्यूझीलंडच्या हिलरीचा हा ट्रस्ट आज शेर्पाच्या भूमीतील २७ शाळा चालवतो आहे. इथे त्याने दोन रुग्णालये उभी केली आहेत. आरोग्य, शिक्षणाबरोबरच हा ट्रस्ट हिमालयातील पर्यावरण रक्षणातही आपले योगदान देत आहे. ज्या हिमालयाने, एव्हरेस्टने आपल्याला ही जागतिक कीर्ती दिली, त्याच भूमीसाठी त्याने आपले उर्वरित आयुष्य बहाल केले. या असामान्य एव्हरेस्टवीराने ११ जानेवारी २००८ मध्ये या जगाचा निरोप घेतला.
'पहिले पाऊल' अखेपर्यंत रहस्य!
'हिलरी-तेनझिंग'ने एव्हरेस्ट सर केल्याबरोबर त्या दोघांमध्येही पहिले पाऊल कुणी टाकले याचीच चर्चा जगभर सुरू झाली, जी आजपर्यंत चालू आहे. अनेकांनी याबाबत आपापली मते मांडली. पण या दोघांनीही हे गुपित अखेपर्यंत त्यांच्या मनातच दडवून ठेवले. 'गिर्यारोहण' ही काही कुठली स्पर्धा, शर्यत नाही. तेव्हा असल्या वादाला त्यांनी अखेपर्यंत निर्थक ठरवत त्यांच्या या यशाला मूल्यही बहाल केले.
अभिजात दस्तऐवज पहिल्या मोहिमेचा नेता असलेल्या कर्नल जॉन हंटने या मोहिमेवर पुढे एक सुंदर पुस्तक लिहिले- 'द अॅसेंट ऑफ माऊंट एव्हरेस्ट'! सहा प्रकरणांत विभागलेल्या या पुस्तकात हंटने एव्हरेस्टची पाश्र्वभूमी, यापूर्वीच्या मोहिमा, तयारी, अडचणी, प्रत्यक्ष मोहीम, अंतिम चढाई आणि शिखर माथा अशा क्रमाने माहिती दिली आहे. त्याची ही सारी माहिती, छायाचित्रे, रेखाटनांची जोड हे सारेच वाचताना आज अद्भुत वाटते. साठ वर्षांनंतरही हा मजकूर रोमांच उभा करतो.
नेपाळ आणि एव्हरेस्ट! एव्हरेस्टसह अनेक महत्त्वाची हिमशिखरे नेपाळमध्ये वसली आहेत. या हिमशिखरांनी नेपाळच्या अर्थकारणास आज मोठे बळ दिले आहे. या देशाच्या एकूण महसुली उत्पन्नात एव्हरेस्ट,अन्य गिर्यारोहण, पर्यटनाचा वाटा साठ टक्क्यांच्या आसपास आहे. मोहिमांसाठी लागणारे सरकारी परवाने, त्यासाठीचे शुल्क, गिर्यारोहकांचे वास्तव्य, प्रवास या साऱ्यातून हे उत्पन्न मिळत आहे. याशिवाय काठमांडूपासून ते एव्हरेस्ट पायथ्यापर्यंतच्या छोटय़ा गावांपर्यंतचा प्रवास, निवास, हॉटेल व्यवसाय, रुग्णालये, बाजारपेठा आदी प्रत्येक ठिकाणी या 'एव्हरेस्ट'ने रोजगाराची मोठी निर्मिती केली आहे. शेर्पा आणि त्यांच्याप्रमाणे पर्वतीय भागात राहणारा समाज तर गिर्यारोहणावरच जगत आहे.
- संकलन : अभिजित बेल्हेकर,लोकसत्ता
No comments:
Post a Comment