सर्व शिक्षा अभियानाचा निधी गेला कुठे?

सर्व शिक्षा अभियानावर केंद्र शासन करोडो रुपये खर्च करीत आहे, पण हा पैसा कसा खर्च होतो हे बघण्याची यंत्रणाच शासनाकडे नाही. एक तर ५० टक्के रक्कम पडून असते किंवा शिक्षणाच्या मुळापर्यंत पोहोचत नाही.
उदा. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतची शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिरे/वर्ग तालुकावार चालू असतात. प्रचंड पैसा खर्च करून पुस्तके व साहित्य अर्धवट दिले जाते. कधी कधी धरून, पकडून ‘तज्ज्ञ मार्गदर्शक’ म्हणून कोणाला तरी उभे केले जाते. शिक्षकांना १०/१० दिवस प्रशिक्षण दिले जाते, पण साहित्य अपुरे किंवा दिलेच जात नाही.
शिक्षण निरीक्षक/ उपनिरीक्षक या प्रशिक्षणासाठी शिक्षकांना नाश्ता, जेवण, टी. ए., डी. ए. मिळेल म्हणून सांगतात. शेवटी मिळत नाही. यावरून बऱ्याच केंद्रांवर हमरीतुमरीचे प्रसंग उद्भवतात. प्रशिक्षण केंद्र असलेल्या अनेक शाळा शिक्षकांचे प्रशिक्षणाचे पैसेच देत नाहीत. शांताराम तलाव, मालाड (पूर्व) येथील एक शाळा व त्याच्या मुख्याध्यापिका यांना माझ्या पुढय़ात शिक्षण उपनिरीक्षकाने फोनवरून झाडले, कारण त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने गेल्या तीन वर्षांपासूनचे शिक्षकांचे प्रशिक्षणाचे पैसेच दिलेले नाहीत. यामध्ये एक गोम अशी आहे की, प्रशिक्षणानंतर केव्हातरी प्रशिक्षणाचे पैसे डिपार्टमेंट (शिक्षण) कडून आले की अवाच्या सव्वा नाश्ता/ जेवण इ. बिले लावून शिक्षकांच्या हाती तुटपुंजी रक्कम ठेवायची, यामध्ये प्रशिक्षणानंतर बऱ्याच शिक्षकांचे पैसे शिक्षण खाते कळवत नसल्याने कुठे गायब होतात हे शिक्षण खात्यालाच शोधावे लागेल. अशी कित्येक प्रशिक्षणे झाली आहेत. बऱ्याच प्रशिक्षणार्थी- शिक्षकांना याचे पैसे गेल्या तीन-चार वर्षांपासून मिळालेले नाहीत. ‘एकदाचे प्रशिक्षण झाले’ म्हणून या पैशाबद्दल शिक्षकही साधी चौकशी करीत नाहीत, त्यामुळे अशा केंद्रशाळांचे फावते.
गेल्या २१ ते २५ एप्रिल ०८ रोजी दादर मनपामध्ये झालेल्या प्रशिक्षणात साधा चहासुद्धा दिला गेला नाही. पुस्तके/ साहित्य कोणाला पूर्णपणे मिळालेच नाही. प्रशिक्षणाचा हा पैसा गेला कुठे?
टीव्ही, रेडिओवर सर्व शिक्षा अभियानाचा ‘स्कूल चले हम’ म्हणून रतीब घालायचा, अन् मुंबईतील मराठी शाळांच्या इमारतींसाठी, देखभालीसाठी, अनुदानासाठी ‘चुना लावायचा’. त्यामुळे मराठी शाळा आज पडक्या-मोडक्या स्थितीत आहेत. या ‘जाहिराती’वरील खर्च जरी या शाळांच्या दुरुस्तीसाठी दिला तरी हजारो शाळा दुरुस्त होतील.
गेल्या वर्षी ३४ कोटी रु. या योजनेचे पडून होते. योग्य उद्दिष्टानंतर हा पैसा खर्च होत नाही. त्यामुळे ही सर्व शिक्षा अभियानाची योजना यशस्वी कशी होईल?

अविनाश सावंत, मालाड, मुंबई

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...