सिंधुदुर्गच्या किनाऱ्यांवरील ‘ऑलीव्ह रिडले’ कासवांची फिल्म ग्रीन ऑस्करसाठी

अभिमन्यू लोंढे, सावंतवाडी,दै. लोकसत्ता
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अथांग सागरकिनाऱ्यावर आढळणाऱ्या ‘ऑलीव्ह रिडले’ (कासव)ची फिल्म ग्रीन ऑस्करसाठी वनखात्याने पाठविली आहे. उपवन संरक्षक नरेश झुरमुरे यांनी सागरकिनाऱ्यावर १४ वेळा जाऊन ही फिल्म तयार केली असून, ‘ग्रीन ऑस्कर’साठी फिल्म पाठविण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
सिंधुदुर्गचा अथांग सागरकिनारा पर्यटनासाठी आल्हाददायक ठरला आहे. गोव्यापेक्षाही अधिक सौंेदर्य लाभलेल्या या किनाऱ्यावर मोठी संपत्ती असल्याचे उघड होत आहे. निवती बंदरात डॉल्फीन तसेच स्विफ्ट पक्षी अशा अचंबित करणाऱ्या सागरीदर्शनाचा लाभ मिळतो. पांढरी शुभ्र वाळू आणि निळेशार पाणी हे एक पर्यटनदृष्टय़ा वैशिष्टय़ आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरीकिनाऱ्यावर ऑक्टोबरच्या दरम्यान ऑलीव्ह रिडले अंडी घालण्यासाठी येतात. त्यांची तस्करीही होते, पण गेल्या काही वर्षात लोकांची जागरुकता आणि वनखात्याचे लक्ष यामुळे या कासवांना तस्करीपासून वाचविण्यात यश आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑलीव्ह रिडले अंडी घालण्यास येणाऱ्या हंगामात वनखात्याने संबंधित सागरी किनाऱ्यावर संरक्षण दक्षता समिती नेमून कासवांच्या संरक्षणासोबतच फिल्म तयार केली. पर्यावरणाच्या दृष्टीने हे मोलाचे कार्य आहे.
सागरी किनाऱ्यावरील तोंडवळी येथे १०४ अंडी व ५९ पिल्ले, तारकर्ली येथे १३५ अंडी व १२९ पिल्ले, देवबाग येथे ७० अंडी व ६९ पल्ले, वायंगणी येथे ८८० अंडी व ७७२ पिल्ले, तर तळाशील येथे १२४ अंडय़ांचे संरक्षण केले. त्यासाठी तळाशील येथे दोनदा, वायंगणीत नऊ, देवबाग एक, तारकर्ली एक, तर तोंडवळीत एकदा अशा प्रकारे झुरमुरे यांनी १४ वेळा सागरकिनारा गाठला. यामुळे १३१३ अंडी आणि १०२९ ऑलीव्ह रिडलेचे संरक्षण झाले. या कासवांच्या अंडय़ांचे संवर्धन होईपर्यंत संरक्षण करून नंतर सर्व ऑलीव्ह रिडलेंना सागरात सोडण्यात आले.
या ऑलीव्ह रिडलेची फिल्म तयार करून डिस्कव्हरी ऑफ इंडियाकडे पाठविण्यात आली आहे. ग्रीन ऑस्करसाठी ही फिल्म मेहनत घेऊन तयार करण्यात आली.
सिंधुदुर्गच्या वनविभागाने असा प्रयत्न प्रथमच केला आहे. त्यासाठी खास मोहीम आखून स्थानिक जनतेच्या सहकार्याने ग्रीन ऑस्करसाठी फिल्म तयार केली आहे. या पुरस्कारासाठी अनेक फिल्म जातात, पण सिंधुदुर्गचा हा पहिलाच प्रयत्न असून, त्यात यश मिळेल आणि सिंधुदुर्ग देशात झळकेल, असा विश्वास झुरमुरे यांनी व्यक्त केला.


No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...