फलाटदादा, बोला वो तुमि!

यंत्रयुगात माणूस माणुसकी गमावतो आहे, ही बा. सी. मर्ढेकरांची व्यथा त्यांच्या कवितांतून जाणवते. फलाटदादाच्या संवादातही हा आर्त स्वर आहे. मराठी कवितेला नवे वळण लावणाऱ्या या प्रतिभाशाली कवींचा आज जन्मशताद्बी दिन आहे. त्यानिमित्त...

मी जन्मभर आगगाड्यांचे लांबलांबचे प्रवास खुषीत करत आलो आहे. सोबतीला असतात दोन पुस्तके- मर्ढेकरांच्या कविता आणि सलीम अलींचे पक्षिदर्शन. रात्री एखाद्या स्टेशनवर गाडी थांबली की जाग येते, "चाय, कॉफी, चाय, कॉफी, पान, बिडी, माचिस'च्या आरोळ्यांनी. हटकून मर्ढेकरांची कविता आठवते- "फलाटदादा फलाटदादा! बिडि- माचिस कुनि इकीत फिरले...; पचकपान ह्यो कुनी थुंकले!' मग खूपदा ऐकू येतो मैनांचा गोंगाट. "चिक्‌ चिक्‌ चिक्‌; किच्याव्क्‍किच्याव्‌ , चिर्र, किचीक्‌ चिक्‌.' छपराजवळच्या भल्या मोठ्या तुळयांवर नजर टाकली की दिसतात दाटीवाटीने बसलेल्या शेकडो मैना. लगबगा इकडून तिकडे उडत, एकमेकींची जागा पटकावण्याच्या खेळात रमलेल्या. पुन्हा नजर फिरते खाली आणि मनात येते, "हिम्मत तुमची खरी पहाडी, फलाटदादा, फलाटदादा; कितीक गेला गडी तुडवुनी- छातीवरती तुमांस समदा! किति पायांची छोट्या-मोठ्या मऊ चामडी गेलां हुंगुन; किती बुटांच्या ठोकर टाचा - फलाटदादा, गेलां पचवुन! '

तेवढ्यात एखादा पोऱ्या डब्यात घुसतो झाडू मारत, नाही तर बुटांना पॉलिश करायचे का विचारत. मर्ढेकरांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक द. भि. कुलकर्णी उलगडा करतात, की फलाटदादाशी जो संवाद चालला आहे, तो अशा एका पोऱ्याचाच. जिणे कष्टाचे, तरी याची जिद्द जबरदस्त आहे. त्यानेही फलाटासारखेच खूप काही पाहिले आहे. "किती बावटेवाले दादा -मुछीदार अन्‌ मुछीबगर बी; हमाल- पोर्टर निळेतांबडे- तुमी पाहिले हजरजबाबी! हर गार्डाची न्यारी शिट्टी; हर ड्रायव्हरचा न्यारा हात; तुमांस दादा, ठाउक आहे - पर्‌ समद्यांची बारिक बात!' हा पोरगाही "कुनि मायेचे निरोप दिधले; विलायती कुनि मुके घेतले !' पाहत पाहत या आयुष्यात आपल्याला एखादी गोंडस जोडीदारीण मिळेल का म्हणून स्वप्ने पाहतो आहे; फलाटदादाला विचारतो आहे, "किति तोऱ्याने ऐटबाज अन्‌ -दिमाख दावित, घेत सलामी, "थ्रू' गाडी ही येई- जाई- झगाळ, जनु की रानीवानी! मनात ठसली फलाटदादा, झोकदार ही पल्लेवाली? फटाकडी वा "लोकल' गाडी - चटकचांदणी थिल्लर पटली?'

पक्ष्यांच्या रात्रशाळा अन्‌ या मैना?
या फलाटावर रात निवारा शोधत का आल्या आहेत? चिमण्या, सुग्रणी, धोबिणी, वेडे राघू , मैना, पोपट, पारवे, कावळे, घारी असे तऱ्हे तऱ्हेचे पक्षी दिवसभर सुटे सुटे फिरत असले तरी रोज संध्याकाळी मोठ्या घोळक्‍यात एकत्र जमून विश्रांती घेतात. इतर जाती; वटवटे, दयाळ, खंड्या, सुतार, कोकिळ, टिटव्या, कोतवाल रात्रभर एकटेदुकटेच डुलक्‍या खातात. असे का? सलीम अलींबरोबर मी या प्रश्‍नाचा एक छोटा अभ्यास केला. ताडून पाहिले की रात्रभर मोठ्या थव्यात राहणाऱ्या जातींची एकट्यादुकट्याने रात्र काढणाऱ्या जातींशी तुलना केली तर काय दिसते? शेतात, माळरानांत अन्न शोधणारे, दिवसा छोट्या-मोठ्या थव्यांत फिरणारे पक्षी जास्त प्रमाणात रात्रीच्या मोठमोठ्या शाळा भरवतात. एवढेच नाही तर अनेकदा कावळे, पोपट, मैना, बगळे असे अगदी वेगवेगळे आहार असलेले, दिवसा अगदी स्वतंत्र फिरणारे तीन- चार जातींचे पक्षीही रात्री झोपायला एकमेकांची सोबत शोधतात. अनेकदा हे सामूहिक रातनिवारे मनुष्यवस्तीत, वर्दळीच्या जागी असतात. रहदारीच्या रस्त्यांवर, ढणाण्या दिव्यांच्या उजेडातल्या झाडांवर. अशा जागी घुबडे, साप या पक्ष्यांच्या शत्रूंचा वावर कमी असतो. तेव्हा मुख्यतः एकमेकांना चटकन सावध करण्यासाठी, शत्रूंपासून बचाव करण्यासाठी असे पक्षी मोठ्या थव्यांत रात्रीसाठी एकत्र येत असणार. अशी रात्रभर वर्दळ असलेल्या खास जागा म्हणजे आगगाडीचे फलाट आणि यांच्यावर रातनिवाऱ्याला येतात मैना आणि पारवे.

शिशिरागम हा मर्ढेकरांचा पहिला कवितासंग्रह. त्यातल्या पहिल्याच कवितेत ते काकुळतीने विचारतात, "पानात जी निजली इथे - इवली सुकोमल पाखरें, जातील सांग आता कुठे? निष्पर्ण झाडिंत कांपरे.' मैनांनी शतकानुशतके किडे खात खात आपल्या शेतीला हातभार लावला. रात्रीसाठी आपल्या आश्रयाला आल्या. आपण "लटलपट लटपट तुझे चालणे गं मोठ्या नखऱ्याचे - बोलणे गं मंजुळ मैनेचे' म्हणून त्यांचे गुणगान केले. आणि आता गेली पन्नास वर्षे त्यांना कीटकनाशक विष चारतो आहोत! मर्ढेकर त्यांची ही गती पाहून निश्‍चितच शोकाकुल झाले असते.

यंत्रयुगात माणूस माणुसकी गमावतो आहे ही मर्ढेकरांची व्यथा त्यांच्या कविताकवितांतून जाणवते. फलाटदादाच्या संवादातही हा आर्त स्वर आहे : "फलाटदादा फलाटदादा - बोला वो तुमि, पाठ टेकतों- ज्या जीवाला धरिले पोटीं, या समद्यांच्या सांगा गोष्टी!' आजच्या परिस्थितीत मर्ढेकर फलाटाने ज्याला पोटी धरावे असा हा पोर कुठून आला असेल अशी कल्पना करतील? त्यांना सुचेल की कदाचित त्याच्या शेतकरी बापाने एन्डोसल्फॉन पिऊन जीव दिला असेल. कीटकनाशकांचा खर्च न परवडल्यामुळे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांवरचा हा बोजा वाढतोच आहे. कारण त्यांना काटकसरीने, नेटके कोणते फवारे मारावेत याची काहीच माहिती पुरवली जात नाही. त्यांचे मार्गदर्शक असतात याच विषांचे दुकानदार. त्यांना हवा असतो कीटकनाशकांचा खप वाढवायला. मग ते वाटेल तो सल्ला देतात आणि अद्वातद्वा विषप्रयोग चालू राहतात. त्यामुळे आणखी आणखी किडींच्यात कीटकनाशकांविरुद्धची प्रतिकारशक्ती वाढते. मग कीटकनाशकांचा आणखीच भरमसाट वापर सुरू होतो. हे विष साऱ्या जीवसृष्टीत पसरत राहून किड्यांच्या तऱ्हतऱ्हेच्या नैसर्गिक शत्रूंची - खंडोबाचे घोडे, कोळी, बेडूक, सरडे, सातभाई, कोतवाल, मैनांची संख्या घटत राहते. पण या सगळ्या माणसाच्या- निसर्गाच्या दुर्दशेतून रासायनिक उद्योगधंद्यांची मात्र भरभराट होते आहे. त्याला हातभार लावण्यासाठी सरकारे सबसिड्या देत आहेत. सबसिड्यांची खिरापत करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचे, उद्योगधंद्यांकडून संशोधनासाठी अनुदाने मिळवणाऱ्या शास्त्रज्ञांचे हितसंबंधही या दुष्टचक्रातच गुंतून पडले आहेत.

गिरणोदयाची भूपाळी
मर्ढेकर यंत्रयुगाचे विरोधक नव्हते. मुंबापुरीच्या प्रेमात होते. त्यांनी आपल्या प्रिय उद्योगनगरीची एक सुंदर भूपाळी लिहिली आहे. "न्हालेल्या जणु गर्भवतीच्या- सोज्वळ मोहकतेने बंदर- मुंबापुरिचे उजळत येई- माघामधली प्रभात सुंदर!' त्यांना खंत होती. उद्योगधंद्यांची भरभराट दुर्बलांच्या शोषणातून होते आहे याची. म्हणून त्यांनी दुसरी एक भूपाळी लिहली आहे गिरणोदयाची. त्यात ते म्हणतात : "शुद्धबुद्धिविनाशाय भोंगाकुत्री नमीोस्तु ते!'

हे कधी संपेल का? दुर्बलांवरचा अन्याय, निसर्गावरचे अत्याचार कधी आटोक्‍यात येतील का? मर्ढेकरांना दिसत होते, की स्वार्थ, शोषण हाच जगाचा स्थायीभाव आहे. हेच शाश्‍वत आहे. पण त्यांना हेही दिसत होते, की या साऱ्यांविरुद्ध शेतकऱ्याचा असूड उगारणारे जोतिबा फुलेही याच जगात झगडत आले आहेत. जरी असा प्रतिकार अनेकदा या दुष्ट प्रवृत्तींपुढे निष्प्रभ ठरतो, अशाश्‍वत वाटतो, तरी चिकाटीने लढत राहिले आहेत. मर्ढेकरांचा आशावाद दुर्दम्य आहे : "अखेर घेता टक्कर जरि मग- युगायुगांचे फुटेल भाल- अशाश्‍वताच्या समशेरीवर- शाश्‍वताचिही तुटेल ढाल!'

मर्ढेकर सांगतात, "धीर धरा, मानवापाशी जी तकलादू वाटणारी सद्भावनेची तलवार आहे, ती एक दिवस भरभक्कम भासणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींच्या ढालीला भेदेल आणि मानव समाज एक अर्थपूर्ण, माणुसकीचे, निसर्गाशी समरस जीवन जगायला शिकेल।'

माधव गाडगीळ
सौजन्य : सकाळ वृत्तसेवा

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...