ऑपरेशन रेड लोटस्‌: जाज्ज्वल्य मराठा इतिहास


'मॅनपॉवर', 'लॉजिस्टिक', 'कम्युनिकेशन टूल्स' ही एकविसाव्या शतकातील कोणत्याही यशस्वी 'प्रोजेक्‍ट'मागची शक्ती. एखादा प्रकल्प, 'मिशन' आखून ते शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी या तीन तंत्रांचा उपयुक्त वापर अनिवार्य. एकविसाव्या शतकातील यशाची ही त्रिसूत्री बरोबर १५३ वर्षांपूर्वी एका मराठा योद्‌ध्याने वापरली. इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. पारतंत्र्यात राहून निबर बनलेल्या भारतीय मनांना प्रज्ज्वलित केले. जगाच्या इतिहासात १८५७ चे स्वातंत्र्य समर अजरामर केले.
तात्या टोपे
हे त्या मराठी योद्‌ध्याचे नाव.
 • नवी दृष्टी का हवी?
  आज दीडशे वर्षांनंतरही या नावाची जादू, मोहिनी ताजी टवटवीत. महान योद्धा, अतुलनीय कुटनीतीज्ज्ञ आणि अत्यंत कुशल नियोजनकार अशी तात्या टोपे यांच्या व्यक्तीमत्वाची विविध अंगे. गुलामगिरीचे जोखड फेकून देऊन स्वदेशाची हाळी देणारा आणि आधुनिक एकात्मिक भारतासाठीभविष्याचा पाया घालणारा हा योद्धा इतिहासात सुवर्णाक्षरात झळाळतो आहे. या झळाळीवर पडलेला एक डाग आता दीडशे वर्षांनंतर पुसण्याचा प्रयत्न झाला आहे. 'ऑपरेशन रेड लोटस्‌' या ग्रंथाने ही कामगिरी बजावली आहे. विशेष म्हणजे तात्या टोपे यांच्या वंशजांनी चार वर्षे अथक परिश्रमाने हा ग्रंथ सिद्ध केला आहे. 'तात्या टोपे यांना इंग्रजांनी फाशी दिली,' हा आजवर वाचलेला इतिहास चुकीचा होता, हे या ग्रंथाने सप्रमाण दाखवून दिले आहे. 'तात्या टोपेंना इंग्रजांशी लढताना वीरमरण आले...', हा नवा ऐतिहासिक पुरावा या ग्रंथाने जगासमोर आणला आहे.

 • संशोधनाची सिद्धता
  'भारताचा विशेषतः 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाचा बहुतांश इतिसाह हा इंग्रजी दृष्टिकोनातून लिहिला गेला आहे. म्हणून याला बंड म्हणून पुढे आणले गेले. हे बंड नव्हते. हे स्वातंत्र्य युद्ध होते. तात्या टोपे त्याचे निर्णायक नेते होते. हा इतिहास आम्हाला कधी शिकवलाच गेला नाही. म्हणूनच संशोधन करून स्वतःच हा इतिहास उजेडात आणण्याचे ठरवले...', 'ऑपरेशन रेड लोटस्‌'चे लेखक पराग टोपे सांगतात. 'ई सकाळ'शी बोलताना इतिहासातल्या अनेक पैलूंवर ते कसलेल्या इतिहास संशोधकाप्रमाणे प्रकाश टाकतात. तात्यांचे उत्तर भारतातील संघटन, युद्धे, प्रवास याचे वर्णन अत्यंत तन्मयतेने करतात. साहजिकच पहिला प्रश्‍न पडला, तो पराग मुळचेच इतिहास संशोधक आहेत का?...

 • ग्रंथाची तयारी
  'नाही. मी अमेरिकेत असतो. सॅनफ्रान्सिस्कोला. व्हिस्टारस ही माझी कंपनी. व्यवसायाने मी मॅकॅनिकल इंजिनिअर. नंतर फायनान्स ऍन्ड स्ट्रॅट्‌जीमध्ये एमबीए केलेय. १८५७ ला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या बातम्या २००६ मध्ये येत होत्या. १८५७ चा जो इतिहास आपण शाळेत शिकलो आणि तात्या टोपेंनी जे कार्य केले, त्यामध्ये खूप तफावत होती. शिकवला गेलेला इतिहास खूप छोट्या दृष्टिकोनाचा होता. दीडशेव्या वर्षानिमित्त आपण इतिहास नव्या दृष्टिकोनातून अभ्यासला पाहिजे, अशी आमची चर्चा होत होती. बहिणी रुपा जोशी-टोपे हीने हा विषय मांडला. मी पुस्तक लिहायचे ठरवले,' अशी 'ऑपरेशन...'ची जन्मकथा पराग मांडतात.

 • मध्य, उत्तर भारतात धांडोळा
  'सप्टेंबर २००६ पासून कामाला सुरूवात केली. २००९ च्या डिसेंबरमध्ये पुस्तक पूर्ण झाले. तात्या टोपेंशी निगडित खूपशा दंतकथा आहेत. त्या सगळ्या पूर्ण बाजूला ठेवून सगळे संशोधन केले. त्यांची कर्मभूमी उत्तर भारत होती. दिल्ली, भोपाळ, ग्वाल्हेर, झांसी, कानपूर, बिठूर या ठिकाणी जाऊन सगळे अर्काईव्ह्ज्‌ तपासले. ग्रंथालयांमध्ये तासन्‌तास बसलो.', ग्रंथाचा प्रवास पराग सांगू लागतात...'सर्वात महत्वाचे संशोधन होते, ते भोपाळ अर्काईव्ह्ज्‌मध्ये मिळालेली सव्वोश उर्दू पत्रे. फेब्रुवारी-मार्च १८५८ मध्ये तात्या टोपे यांना लिहिली गेलेली ही पत्रे होती. काही पत्रे नानासाहेबांच्या कोर्टातून, काही अखबार नवीसमार्फत, काही सैन्यातील अधिकाऱ्यांनी, काही खबऱ्यांनी लिहिलेली अशी ही पत्रे. ही पत्रे नुसत्या उर्दूत नव्हे, तर खते शिकस्तामध्ये होती. खते शिकस्ता वाचता येणारी खूप कमी लोकं असतात. त्यांना शोधण्यात आम्हाला जामियामिलियॉं विद्यापीठाच्या प्रा. अझिझुद्दीन यांची मदत लाभली. त्यांच्यामुळे आम्हाला अमीन उल्ला यांना भेटता आले. त्यांनी ही पत्रे वाचून दिली. या पत्रांमधून उलगडलेला इतिहास खूप वेगळा होता. त्यावेळी भारताचा बराचसा भाग स्वतंत्र झालेला होता. त्यावेळचे सरकार कसे चालवले जात होते, याची माहितीही पत्रांमध्ये होती. ग्रंथातील अत्यंत महत्वाच्या भागांपैकी हे एक संशोधन आहे.'

 • तात्यांची व्युहरचना
  पराग टोपे यांना इतिहासाचा दृष्टिकोन बदलायचा होता. त्यासाठी संशोधन अधिक सखोलपणे आणि वेगवेगळ्या साधनांद्वारे करणे गरजेचे होते. फक्त इंग्रजांचीच माहिती वापरली, तर इतिहासावर इंग्रजांचाच प्रभाव राहिला असता. त्यामुळे इंग्रजांचे गुप्तचर अहवाल वापरले, तरी त्याला नकाशाची जोड दिली. तात्यांच्या सैन्याच्या हालचाली नकाशावर अधिक प्रभावीपणे उमगत गेल्या. परिणामी, नोव्हेंबर 1858 च्या काळात मुळताई (मध्यप्रदेश)पासून पिपळज, राजपूरपर्यंत (गुजरात-मध्य प्रदेश सीमा) असे तात्यांचे सैन्य अघाडीवरच चालले असल्याचे पुढे आले. तात्यांची व्यूहरचना पराग यांनी अत्यंत उत्तमपणे पुस्तकात उभी केली आहे. इंग्रजांचे सैन्य महत्वाच्या शहरांमध्ये केंद्रीत होते. त्यांना शहरांमधून बाहेर काढून लढायला भाग पाडण्याची तात्यांची योजना होती. त्यासाठी तात्या गुजरातच्या पंचमहलमध्ये नाईकदास आदीवासींची मदत घेऊन लढले, तर बांसवाडामध्ये भिल्लांच्या मदतीने युद्ध केले. अखेरीस तात्यांनी इंग्रजांच्या सैन्याला शहरांमधून बाहेर काढलेच.

 • १८५७ ची फळे
  'मुख्य युद्धापूर्वी बादशाह बहाद्दूरशहा जफरच्या नावाने एक जाहिरनामा काढला होता. इंग्रजांनी भारताला कसे लुटले आहे, याची माहिती आणि या जोखडातून मुक्ततेची हमी या जाहिरनाम्यात होती. त्यात करप्रणाली, व्यापाराची एकाधिकारशाही, कामगारवर्गाची गुलामी, सरकारी नोकरीतील जाच, ख्रिस्ती धर्म हा सरकारी नियम आदींचा समावेश होता. आर्थिक, वैयक्तिक आणि राजकीय स्वातंत्र्याची घोषणा या जाहिरनाम्याने केली. १८५७ च्या युद्धामुळे इंग्रजांनी खिस्ती सक्ती दूर केली. भारत राष्ट्र म्हणून जिवंत राहिला. या युद्धाचेच हे फळ होते. अर्थातच, या घोषणेनंतरही संपूर्ण विजयासाठी तात्या लढत राहिले. आपल्याला झांसीच्या लढाईपर्यंतच तात्या माहिती आहेत. प्रत्यक्षात ते त्याही नंतर लढत होते...', याकडे संशोधक पराग लक्ष वेधतात.

 • तात्यांचा मृत्यू रणांगणावर
  'ऑपरेशन रेड लोटस'चे सर्वांत महत्वाचे संशोधन म्हणजे तात्यांच्या मृत्यूवर टाकलेला प्रकाश. मध्य प्रांतात तात्या आणि उत्तर भारतात फिरोजशहा लढत होता. १८५९ च्या जानेवारीत दोन्ही सैन्य एकत्र येऊन त्यानंतर इंग्रजांच्या छत्राखालील शहरांवर हल्ला करणार होते. १ जानेवारी १८५९ ला राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर छिपाबरोट येथे सकाळी साडे सात वाजता इंग्रजांसोबत तात्यांच्या सैन्याची लढाई झाली. ब्रिगेडियर सॉमरसेट याच्या नेतृत्वाखालील सैन्याला तात्या भिडले. इंग्रजांच्या सैन्यात मेजर पॅजेटच्या नेतृत्वाखाली तोफखाना होता. या लढाईचे वर्णन मेजर पॅजेटच्या बायकोने, जॉर्जिया पॅजेटने १८६५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात आले आहे. 'कॅम्प ऍन्ड कॅन्टॉनमेन्ट'नावाच्या या पुस्तकाला खुद्द मेजर पॅजेटची प्रस्तावना आहे. 'पांढऱ्या घोड्यावर स्वार झालेला शुभ्र वेशातला नेता त्यांच्या सैन्याला प्रोत्साहन देत होता. घोडा दौडत होता. अचानक एक तोफगोळा आला आणि घोड्यावर आदळला. घोडा कोसळला. नेता कोसळला. त्यांचे सारे सैन्य हादरले. पडलेल्या नेत्याभोवती गोळा झाले. हा नेता होता तात्या टोपे...'. या युद्धात जखमी झालेल्या तात्या टोपे यांचे नंतरच्या दोन-तीन दिवसांत निधन झाले. त्यांना युद्धमरण आले.

 • फाशी दुसऱ्यालाच
  'तात्यांसारखा नेता गेला, हे समजले, तर सैन्याचे मनोबल तुटून पडेल, याची माहिती रावसाहेब, फिरोजशहा यांना होती. म्हणूनच त्यांनी तात्यांचा मृत्यू जाहीर केला नाही. ते तात्यांच्या नावानेच लढत राहिले. तात्या गेले, हा गुप्तचर अहवाल इंग्रजांना मिळत होता. पण, मृत्यू जाहीरही होत नव्हता. अखेरीस इंग्रजांनी भागवत नावाच्या एका माणसाला शिवपुरीत पकडले आणि तात्या टोपे म्हणून त्याला फाशी देऊन युद्धाची अखेर केली...मात्र, ज्यांनी ज्यांनी या माणसाला पाहिले, त्यांना हा माणूस तात्या टोपे नव्हे, याची खात्री होती. म्हणूनच तात्या जिवंत असावेत, अशा अफवाही पसरत गेल्या. तात्यांच्या नावाने अनेक दंतकथा तयार झाल्या...', इतिहासातली एक अत्यंत संवेदनशील कथा पराग यांनी एकविसाव्या शतकात साधार उलगडली आहे.

 • 'ऑपरेशन रेड लोटस' का?

  प्रत्यक्ष युद्धापूर्वी अनेक सैन्यांमध्ये रोज एक माणूस कमळाचे फूल घेऊन येत असे. हे फूल तो माणूस पहिल्या सैनिकाच्या हातात देत असे. तो सैनिक पाकळी काढून मागच्या सैनिकाकडे देत असे. या क्रमाने प्रत्येक सैनिक एक पाकळी काढून घ्यायचा. अखेरच्या सैनिकाच्या हातात कमळाची दांडी राहिली, की ती मुळ माणसाकडे परत दिली जात असे. अनेकदा हा प्रकार श्रद्धा म्हणून पाहिला गेला. प्रयक्षात 'आपली माणसं किती', हे मोजण्यासाठी तात्यांनी केलेली ही योजना होती. कमळाला विशिष्ट पाकळ्या असतात. ज्याच्या हातात पाकळी, तो आपला सैनिक, ही तात्यांची खूणगाठ होती.

  - युद्धापूर्वी अनेक गावांमध्ये काही माणसे चपात्या किंवा पोळ्या घेऊन जायची. गावकऱ्यांना एकत्र करून या चपात्या खाल्ल्या जात असत. हजारो गावांमधून अशा चपात्या युद्धापूर्वी पोहोचवल्या गेल्या. प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले, तर सैन्याला रसद पुरवठा कसा करायचा, याची योजना या चपात्यांच्या वाटपातून साकारली गेली.

  - युद्ध सुरू होण्यापूर्वी सहा महिने अगोदर मथुरेला मोठ्या यज्ञाची घोषणा केली गेली. यज्ञात सहभागी होणाऱ्या ब्राम्हणांना सात लाख रुपये (आताचे सुमारे 35 कोटी रुपये) दक्षिणा देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. या यज्ञाच्या निमित्ताने गोपनीय माहितीची देवाण-घेवाण सुकर झाली. अनेक राजांचे राजगुरू संदेश घेऊन सगळीकडे संचार करू लागले. हा यज्ज्ञ ग्वाल्हेरच्या बायजाबाई शिंदे यांनी आयोजित केला होता.

  या तिन्ही योजनांमुळे
  १८५७ च्या प्रत्यक्ष युद्धापूर्वीची तयारी करता आली. 'मॅनपॉवर', 'लॉजिस्टिक' आणि 'कम्युनिकेशन', 'इंटेलिजन्स्‌' या साधनांची चाचपणी आणि व्यवस्थापन करता आले. या योजनांचे सूत्रधार होते तात्या टोपे. म्हणून या ग्रंथाचे नाव आहे, 'ऑपरेशन रेड लोटस्‌'

  ऑपरेशन रेड लोटस
  लेखक - पराग टोपे
  प्रकाशक - रुपा ऍन्ड कंपनी, नवी दिल्ली
  पृष्ठसंख्या - ४६८
  प्रकाशन - १ जानेवारी २०१०
  हिंदी आणि मराठीतही अनुवाद होणार
  तात्या टोपे परिवार (१९३२)


  कुंवरसिंग मिर्झापूर

  तात्या टोपे परिवार (२०१०)


  उर्दू पत्र
 • [ Credit: this article is written by Mr.Samrat phadnis for esakal.com ]

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...