...एक उगवतीचा प्रवास

पुणे,'सकाळ' मधून - रात्रीचे पाळणाघर म्हटले की सध्याच्या आयटी, बीपीओ, केपीओच्या जमान्यात पटकन असे वाटते की अशा आधुनिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या मुलांचा विचार करून एखाद्या व्यक्तिने किंवा कंपनीने पाळणाघर चालू केले असावे. नाही म्हणायला फार दिवसांपूर्वी काही आयटी कंपन्यांनी आपल्या महिला कर्मचाऱ्यांची कामातली 'इन्हॉल्व्हमेंट' वाढावी या हेतूने त्यांच्या पाल्यांसाठी कंपनीच्याच आवारात दिवसभराच्या पाळणाघराची कल्पना मांडली होती.

पण महिलांचा असाही एक वर्ग आहे जो कधी फसवणुकीमुळे, कधी परंपरेमुळे तर कधी पोटाची खळगी भागवण्यासाठी किंवा कोणताच पर्याय न मिळाल्याने अक्षरशः नरकातील जीवन जगत आहे. या महिलांचे दुर्देव इथेच संपत नाही तर ते घृणास्पद आयुष्य त्यांच्या मुलांच्या वाट्यालाही येते. त्या कोवळ्या जिवांची कोणतीच चूक नसताना त्यांचे आयुष्य अंधारातच सुरू होते आणि अंधारातच संपते. परिस्थितीमुळे निखळ, सर्वसामान्य जीवनाला ती कायमची पारखी होतात. त्यांच्या वाट्याला केवळ रस्त्यावरचेच आयुष्य येत नाही तर गुन्हेगारी, अमली पदार्थांच्या आणि अशा पदार्थांच्या वाहतुकीच्या विळख्यात ती नकळत सापडतात. एकदा गुन्हेगारीचा शिक्का माथी बसला की मग जीवनाचा प्रवास त्याच अंधाऱ्या दिशेने होतो.

वेश्‍या व्यवसायातील महिलांच्या मुलांचे जीवन किती वेदनादायक आहे याचा विचार कोणाताही सर्वसामान्य माणूस करू शकत नाही आणि ते स्वाभाविकच आहे.
कोणत्याही "रेडलाईट एरिया'त दिवस सुरू होतो तो संध्याकाळी आणि देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या पोटी जन्माला आलेल्या त्या लहानग्यांना खेळण्या-बागडण्याच्या वयात भीषण अनुभवांना सामोरे जावे लागते. वयाने थोड्या मोठ्या असलेल्या म्हणजे सहा-सात वर्षांच्या मुलांना आपल्या आईकडे येणाऱ्या गिऱ्हाईकांसाठी चहा, सिगरेट, कोल्डड्रिंक, दारू एवढेच काय कंडोम देखील आणायला सांगितले जाते. रात्रीच्या वेळी जी मुले आईशिवाय झोपू शकत नाहीत त्यांना झोपवण्यासाठी अनावश्‍यक औषधे दिली जातात. थोडीशी समज आलेल्या मुलांना तर त्याच खोलीत राहून अनाकलनीय आणि मनावर आघात करणाऱ्या प्रसंगांना सामोरे जावे लागेत. जे ऐकू नये ते ऐकावे लागते, जे पाहू नये ते पहावे लागते. ज्यांना खोलीतून बाहेर पिटाळले जाते त्यांना पुष्कळदा उघड्यावर रात्र काढावी लागते.

आईविना राहावे लागणाऱ्या या कोवळ्या जिवांची आई होण्याचे आव्हान पेललेय पुण्यातील चैतन्य महिला मंडळाने. मंडळाचा "उत्कर्ष प्रकल्प' या निष्पापांच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन आला आहे, रात्रीच्या पाळणाघराच्या रूपाने!

पुण्यातल्या बुधवार पेठेत गेल्या पाच वर्षांपासून हे पाळणाघर चालवले जात आहे. चैतन्य महिला मंडळाच्या ज्योति पठानिया आपल्या दोन महिला सहकाऱ्यांच्या मदतीने अतिशय तळमळीने हे काम करतात.

या पाळणाघरात रोज २५ ते ३० मुले येतात, त्यात अगदी रांगायचा प्रयत्न करणारे लहान मुलही आहे. रोज संध्याकाळी सहा वाजता या पाळणाघराला सुरवात होते ती मिळणाऱ्या छानशा खाऊने आणि दूधाने! पोटपूजा झाली की विविध खेळ आणि खेळण्यांचा मनसोक्त आनंद या चिमुरड्यांना घेता येतो. साधारण तासभर चांगली दंगामस्ती झाली की मग असतो अभ्यासाचा तास. या मुलांच्या घरातील वातावरण पाहता त्यांना अगदी अक्षर ओळख करून देण्यापासून अभ्यासाची गोडी लावण्यापर्यंत सगळ्या गोष्टी या अभ्यासाच्या तासात होतात. त्यानंतर वेगवेगळी गाणी, बडबडगीते, देवाची गाणी म्हणणे; टीव्हीवरील लहान मुलांसाठीचे कार्यक्रम, कार्टून फिल्म्स्‌ पाहणे असा कार्यक्रम असतो. या सगळ्याच्या जोडीला योगासने शिकवली जातात.

या मुलांसाठी रात्रीचे जेवण याच पाळणाघरात शिजवले जाते. या मुलांचे शारिरीक आणि बौद्धिक वाढीचे वय लक्षात घेऊन विविध डाळी, कडधान्ये यांचा योजनापूर्वक समावेश त्यांच्या जेवणात केला जातो. दर रविवारच्या जेवणासाठी या मुलांच्या आवडीचे पदार्थ तयार केले जातात. एवढेच नाही तर प्रत्येक मुलाच्या वाढदिवशी गोड पदार्थ केला जातो. हा वाढदिवस साजरा करताना 'गिफ्ट'आणि 'रिटर्न गिफ्ट'ही दिले जाते. रात्री यापैकी बहुतेक मुले पाळणाघरातच झोपतात तर काही जणांना आईकडेच जायचे असल्याने त्यांना घरी सोडले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी ही मुले आपापल्या वेळेला उठतात. त्यानंतर आंघोळ आणि नाश्‍ता झाला की नऊ वाजेपर्यंत सर्वच जण घरी परतात. तर पाळणाघरात येणाऱ्या २५-३० मुलांपैकी १०-१२ मुले शाळेत जातात, त्यांच्या आईनेच त्यांना शाळेत घातले आहे.

या पाळणाघरासाठी बरेच दिवस स्वतःची अशी जागा नव्हती. गेल्या वर्षी 'उत्कर्ष'साठी बुधवार पेठेतच एक फ्लॅट खरेदी करण्यात आला आणि १५ फेब्रुवारी २००९ पासून हे पाळणाघर स्वतःच्या जागेत भरू लागले. हे पाळणाघर चालवण्यासाठी वर्षाकाठी दीड लाख रुपये खर्च येतो आणि त्यातील मोठा वाटा ज्योति पठानिया आणि त्यांचे 'चैतन्य महिला मंडळ'च उचलते आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून या उपक्रमाला दरवर्षी ४० हजार रुपयांची मदत दिली जाते.

गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या पाळणाघरात येऊन गेलेली अनेक मुले आहेत. इथे येणारी मुले नेहमीच बदलत असतात कारण त्यांच्या आईला तिच्या 'करत्याकरवित्या'कडून काही काळानंतर दुसऱ्या शहरात हलवले जाते. त्यामुळे जोपर्यंत आई पुण्यात आहे तोपर्यंत ते मूल 'उत्कर्ष'च्या पाळणाघरात येते. जोपर्यंत ते मूल पाळणाघरात येत आहे तोपर्यंत त्याला चांगली शिकवण देण्याचे, चांगले संस्कार करण्याचे कर्तव्य ज्योति पठानिया आणि त्यांच्या सहकारी महिला अतिशय मनापासून करतात.

मात्र, हे पाळणाघर सुटल्यानंतर पुढे काय? हा प्रश्‍न या मुलांच्याबाबतीत उभा राहतो. पाळणाघरातून सकाळी घरी गेल्यानंतर जी मुले शाळेत जातात त्यांची फारशी चिंता करण्याचे कारण नसते पण जी मुले शाळेत जात नाहीत ती वेगळ्याच दुष्टचक्रात अडकतात. दिवसभर रिकामे ठेवण्यापेक्षा त्यांची आईच त्यांना चार पैसे मिळवण्यासाठी मिळेल तिथे काम करायला भाग पाडते. त्यातून बालमजुरीच्या समस्येत भर पडते. काही मुले व्यसनांकडे वळतात तर काही मुलांचा वापर अमली पदार्थांच्या व्यापारासाठी करून घेतला जातो.

या सर्व समस्यांपासून या मुलांना दूर ठेवण्यासाठी एखादे हॉस्टेल उभे करण्याची निकड असल्याचे चैतन्य महिला मंडळाच्या लक्षात आले आहे. गेल्या पाच वर्षात 'उत्कर्ष'मधील पन्नास मुलांना विविध संस्थांच्या हॉस्टेलमध्ये पाठवण्यात आले आहे. या पाळणाघरात जायला लागल्यानंतर आपल्या मुलात झालेला बदल त्या आईला चांगलाच जाणवतो आणि मग तिच त्याच्या पुढच्या शिक्षणाची, आयुष्याची जबाबदारी 'उत्कर्ष'वर सोपोवते. मात्र जोपर्यंत आईला वाटत नाही, ती सांगत नाही तोपर्यंत कोणत्याच मुलाला हॉस्टेलमध्ये पाठवण्यात येत नाही. विविध संस्थांची हॉस्टेल असतानाही 'चैतन्य'ला आपले स्वतःचे हॉस्टेल कशाकरिता सुरू करायचे आहे असा प्रश्‍न उपस्थित होते. त्याच्या उत्तरातच या मुलांबाबतची आणखी एका समस्या समोर येते. सर्वच हॉस्टेल उन्हाळ्याच्या सुटीत बंद असतात तेव्हा ही मुले पुन्हा आपल्या आईकडे जातात आणि तिथल्या वातावरणाचा त्यांच्या मनावर परिणाम होतो. त्यातून पुन्हा तेच प्रश्‍न, तेच धोके यांचा सामना करावा लागतो.

प्रश्‍न मोठा आहे, गुंता खरंच मोठा आहे. आपल्यापरिने जितके होईल तितके प्रामाणिक प्रयत्न करायचे अशा निर्धाराने ज्योती पठानिया आणि त्यांच्या सहकारी महिला चिकाटीने प्रयत्न करत आहेत. मुंबईतील उच्चमध्यम वर्गात वाढलेल्या, बी.एससी. (ऍग्रिकल्चर) पर्यंत शिक्षण झालेल्या, चाकणमध्ये स्वतःचा 'सेफ गिअर इंडस्ट्रीज' नावाचा लघुउद्योग असलेल्या ज्योतीताई आरामशीर आयुष्य जगण्याचे सोडून लहानपणी 'क्वीन मेरिज' शाळेत शिकताना झालेल्या सामाजिक जाणीवेचा संस्कार उराशी बाळगून या मुलांसाठी झटत आहेत.
देशाला जागतिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न बघताना समाजातील कोणताही घटक उपेक्षित राहणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे आणि हे पाळणाघर त्याचाच एक भाग आहे!

संपर्कासाठी पत्ता -
श्रीमती ज्योति पठानिया
चैतन्य महिला मंडळ
१३/१, गुरूराज सोसायटी, भोसरी, पुणे - ४११ ०३९.
फोन - (०२०) २७ १२ ७६ १८.
ई-मेल - jyotidpathania@yahoo.co.in

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...