१२५ वर्षे चाललेली न्यायालयीन लढाई

सौजन्य : दै . सकाळ
1859 - ब्रिटिशांकडून वादग्रस्त भागात निर्बंध. परिसरातील आतील भागात मुस्लिमांना, तर बाहेरील भागात हिंदूंना प्रार्थना करण्याची परवानगी.

1885-86 - मशिदीला लागून असलेल्या राम चबुतऱ्यावर मंदिर बनविण्याची निर्मोही आखाड्याची मागणी न्यायालयाने फेटाळली. हिंदूंच्या दृष्टीने पवित्र असलेल्या जागी मशीद उभारण्याची घटना दुर्दैवी असली, तरी साडेतीनशे वर्षांपूर्वीची चूक दुरुस्त करता येणार नसल्याचे न्यायालयाचे मत.

5 जानेवारी 1950 - धार्मिक तणावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून बाबरी मशीद हे वादग्रस्त बांधकाम असल्याचे घोषित. जागेला कुलूप.

16 जानेवारी 50 - हिंदू महासभेचा कार्यकर्ता गोपाल सिंह विशारद याची दिवाणी न्यायालयात याचिका. याच स्वरूपाची याचिका दिगंबर आखाड्याचे रामचंद्र दास परमहंस यांनी दाखल केली. ती नंतर 1989 मध्ये मागे घेतली. हाशीम अन्सारी यांचीही याचिका. कुलूप उघडून वादग्रस्त जागी नमाज पढू देण्याची विनंती.

19 जानेवारी 50 - वादग्रस्त जागेतून मूर्ती न हलविण्याची मागणी आणि पूजाअर्चा करू देण्याची विनंती न्यायालयाकडून मान्य. हिंदूंना दरवाजाबाहेरून दर्शन घेण्याची अनुमती. वादग्रस्त मशिदीच्या तीनशे मीटर परिघात न्यायालयाची मुस्लिमांना बंदी.

1959 - निर्मोही आखाड्याची तिसरी याचिका. वादग्रस्त स्थानी राममंदिर होते व त्याची मालकी आपल्याकडे होती, असा दावा करून जागा सुपूर्द करण्याची आखाड्याची मागणी. वादग्रस्त जागी पूर्वापार पूजा होत असल्याची आणि तेथे नमाज पढला जात नसल्याचा आखाड्याचा दावा.

1961 - सुन्नी वक्‍फ बोर्ड आणि स्थानिक मुस्लिमांकडून चौथा खटला दाखल. बादशाह बाबरने 1528ला मशीद बांधली आणि त्यानंतर 1949 पर्यंत त्या जागी नमाज पढली जात असल्याचा दावा. त्यामुळे वादग्रस्त बांधकाम हे "मशीद' घोषित करण्याची मागणी. निर्मोही आखाड्याचा दावा राम चबुतऱ्यापुरता असल्याचाही युक्तिवाद.

1 फेब्रुवारी 86 - स्थानिक वकील उमेशचंद्र पांड्ये यांच्या याचिकेवर, वादग्रस्त बांधकामाचे कुलूप उघडून हिंदूंना आत जाऊन पूजा करू देण्याचा फैजाबाद सत्र न्यायाधीशांचा आदेश.

1 जुलै 89 - विहिंपचे नेते व माजी न्यायाधीश देवकीनंदन अग्रवाल यांची पाचवी याचिका. वादग्रस्त जागी मंदिर होते, असा दावा करणारे पुरावे सादर. रामजन्मभूमी न्यासही प्रतिवादी केली. त्यामुळे विहिंपही अप्रत्यक्षपणे खटल्यात सहभागी.

11 नोव्हेंबर 89 - पुढील बांधकामाला न्यायालयाची मनाई.

जुलै 89 - फैजाबाद न्यायालयातील पाचही दावे काढून घेऊन विशेष न्यायालयामार्फत सुनावणी घेण्याची उत्तर प्रदेश सरकारची अलाहाबाद उच्च न्यायालयाला विनंती. तीन न्यायाधीशांचे पीठ स्थापन. त्यानंतर किमान बारा वेळा न्यायपीठाची फेररचना.

डिसेंबर 92 - केंद्र सरकारकडून वादग्रस्त 2.77 एकर जागा ताब्यात.

1993 - उत्तर प्रदेशातील भाजप सरकारकडून वादग्रस्त भागातील 67 एकर जमीन ताब्यात आणि विश्‍व हिंदू परिषदेकडे सुपूर्द. या जागेवर रामकथा पार्क उभारण्याचा दावा.

1994 - सर्वोच्च न्यायालयाकडून भाजप सरकारची कार्यवाही रद्दबातल. वादग्रस्त जागेवर "जैसे थे' स्थिती ठेवण्याचे आदेश. वादग्रस्त जागेवर मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली का, या वादात न पडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.

एप्रिल 02 - अलाहाबाद उच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांच्या पीठापुढे वादग्रस्त जागेच्या मालकीविषयीच्या सुनावणीला प्रारंभ.

26 जुलै 10 - रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयात पूर्ण.

28 सप्टेंबर 10 - अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठविली.

30 सप्टेंबर 10 - वादग्रस्त जागा रामजन्मभूमीच आहे, इतक्‍या नि-संदिग्ध शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय।

न्या. धर्मवीर शर्मा यांनी दिलेल्या स्वतंत्र निकालाचा घोषवारा प्रश्‍नोत्तराच्या स्वरुपात
:
1) वादग्रस्त जागा ही भगवान रामाची जन्मभूमी होती काय?
- वादग्रस्त जागा ही भगवान राम जन्मस्थानच आहे. राम हे आराध्य दैवत आहे आणि त्याचे जन्मस्थान हे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या श्रद्धांनुसार ईश्‍वराची प्रतिमा साकारत असतो. हे दैवत निर्गुण, निराकार असू शकते. त्याचा वास सर्वत्र असतो.

2) वादग्रस्त जागा ही काय मशीद होती? ती कधी आणि कुणी बांधली?
- ही वादग्रस्त वास्तू बाबरने बांधली होती. कधी बांधली ते नक्की नाही; पण ही मशीद इस्लामच्या नीती तत्त्वांविरुद्धच बांधली होती. त्यामुळे मशीद म्हणता येणार नाही.

3) हिंदू मंदिर उद्‌ध्वस्त करून ही मंदिर बांधली होती काय?
- जुनी वास्तू उद्‌ध्वस्त करून नवी वास्तू (मशीद) बांधण्यात आली होती. जुनी वास्तू हे भव्य हिंदू मंदिरच होते, हे पुरातत्त्व खात्याने निःसंदिग्धपणे स्पष्ट केले आहे.

4) वादग्रस्त वास्तूमध्ये 22, 23 डिसेंबर 1949 च्या मध्यरात्री मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या काय?
- 22, 23 डिसेंबर 1949 च्या मध्यरात्री मधल्या घुमटामध्ये मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या.

5) वादग्रस्त जागेची (गर्भगृह आणि बाह्य परिसर) यापुढे स्थिती (स्टेटस) काय असेल?
- वादग्रस्त जागा ही भगवान राम जन्मस्थान आहे, हे सिद्ध झाले आहे. जन्मस्थानासह राम चबुतरा, सीता रसोई यांसारख्या अन्य पवित्र धार्मिक वास्तूंचे, मूर्तींचे पूजन करण्यासाठी हिंदू अधिकारवाणीने अनादी काळापासून येथे येत आहेत, हे ही सिद्ध झाले आहे. बाह्य परिसरदेखील केवळ हिंदूंच्या ताब्यात होता आणि ते तिथे अनादी काळापासून तिथेही येत आहेत. इस्लामच्या नीतीतत्त्वांविरुद्ध बांधल्याने वादग्रस्त वास्तूला मशीद म्हणता येणार नाही, असेही सिद्ध झाले आहे.


खटल्यातील मुख्य दावेदार
पहिला दावा - जानेवारी 1950 - गोपालसिंह विशारद - वादग्रस्त भागातून रामाच्या मूर्ती हलवू नयेत व पूजेची परवानगी मिळावी
दुसरा दावा - जानेवारी 1950 - रामचंद्र दास परमहंस (हा दावा 1989 मध्ये मागे) - वादग्रस्त भागातून रामाच्या मूर्ती हलवू नयेत.
तिसरा दावा - 1959 - निर्मोही आखाडा - वादग्रस्त जागी पूर्वीपासून रामाचे मंदिर होते व त्याची मालकी आखाड्याकडे.
चौथा दावा - 1961 - ही मशीद 1949 पर्यंत मशीद म्हणूनच वापरात होती. नंतर त्यात मूर्ती ठेवण्यात आल्या.
पाचवा दावा - जुलै 1989 - देवकीनंदन अग्रवाल-वादग्रस्त जागा रामाचे जन्मस्थान असल्याने त्यावर प्रभू रामचंद्रांचाच हक्क.

अन्य सहभागी वादी-प्रतिवादी
रामजन्मभूमी पुनरुद्धार समिती, हिंदू महासभा, आर्य प्रादेशिक सभा, जमियत-ए-उलेमा हिंद, शिया वक्‍फ बोर्ड, ऑल इंडिया शिया कॉन्फरन्स, बाबरी मशीद पुनर्निर्माण समिती

कोण होता बाबर?
बाबर याचे पूर्ण नाव झहिरुद्दीन मोहंमद बाबर असे होते. त्याचा जन्म 23 फेब्रुवारी 1443 मध्ये उझबेकिस्तानमधील अंदिजन शहरात झाला. त्याचे वडील ओमर शेख मिर्झा हे फरगाणा शहराचे "आमीर' होते. आईचे नाव कुतलक निगार खानुम असे होते. मंगोलिस्तानचा शासक युनूस खानची ती कन्या. बाबर हा ओमर व कुतलक यांचा ज्येष्ठ पुत्र. बाबर हा मूळचा मंगोल वंशातील बारलास या जमातीचे प्रतिनिधित्व करत होता.

भारतात 1519 मध्ये त्याने पहिल्यांदा स्वारी केली. चिनाब नदीपर्यंत जाऊन तो काबूलला परतला. त्याच वर्षी पुन्हा स्वारी करण्याचा प्रयत्न त्याने केला; परंतु त्याही वेळी त्याला तसेच परत यावे लागले. दिल्लीच्या सुलतानाविरुद्ध पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदी याने 1524 मध्ये बाबराची मदत मागितली. बाबर याच संधीच्या शोधात होता. तिचा उपयोग करून घेत त्याने पंजाब प्रांत घेतला आणि त्यानंतर भारतातील एकेक प्रांत तो काबीज करीत गेला. मुघल साम्राज्याचा विस्तार त्याच्या काळात मोठ्या प्रमाणात झाला. तो रोजनिशी ("बाबरनामा') लिहीत होता. बाबरचे निधन 5 जानेवारी 1531 रोजी झाले. निधनापूर्वी त्याला भरपूर ताप येत होता. काबूलमधील त्याच्या आवडत्या बगीच्यात अंत्यसंस्कार करावेत, अशी त्याने इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्याचे पार्थिव आग्रा येथे दफन करण्यात आले. त्यानंतर नऊ वर्षांनी त्यांचे पार्थिव काबूलमध्ये नेण्यात आले आणि "बाग ए बाबर'मध्ये दफन करण्यात आले.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...