रामजन्मभूमीला मान्यता

पीटीआय (सौजन्य : दै. सकाळ):
लखनौ - बाबरी मशीद पाडून जिथे तात्पुरते राममंदिर उभे केले होते, त्या वादग्रस्त वास्तूमध्येच श्रीरामाचे जन्मस्थळ होते, असा ऐतिहासिक निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. संपूर्ण देशाची उत्कंठा ताणून धरलेल्या अयोध्याप्रकरणी निकाल देताना न्यायालयाने 2.77 एकरच्या वादग्रस्त परिसराचे हिंदू आणि मुस्लिम यांत त्रिविभाजन करावे, असेही स्पष्ट केले. या निकालाचे संपूर्ण देशाने प्रगल्भतेने स्वागत केले असून, अनुचित प्रकाराची कोठेही नोंद झाली नाही. या निकालावर भाजपसह संघ परिवाराने संयमाने प्रतिक्रिया दिली आहे, तर मुस्लिम संघटनांमधूनही फारसे आक्रमक सूर उमटलेले नाहीत.

दरम्यान, या महत्त्वपूर्ण निकालानंतर अयोध्याप्रकरणावरील न्यायालयीन लढाई संपुष्टात येण्याची शक्‍यता मावळली आहे. या निकालावर नाराज असलेल्या सुन्नी वक्‍फ बोर्डाने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ""वादग्रस्त वास्तू आम्ही कोणाच्याही ताब्यात देणार नाही,'' असे बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी यांनी सांगितले. दुसरीकडे वादग्रस्त परिसरातील एकतृतीयांश जागा वक्‍फ बोर्डाला देण्याच्या निर्णयाला "श्री रामजन्मभूमी ट्रस्ट'नेही विरोध दाखविला आहे. आम्हीही निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांनी लगोलग जाहीर केले आहे.

हा बहुचर्चित निकाल त्रिसदस्यीय खंडपीठाने बहुमताने (दोन विरुद्ध एक) दिला आहे. न्या. एस. यू. खान आणि न्या. सुधीर आगरवाल यांनी वादग्रस्त परिसराचे त्रिविभाजन करण्याचा निकाल दिला, तर तिसरे न्यायाधीश धर्मवीर शर्मा यांनी संपूर्ण परिसर हिंदूंच्या मालकीचा असल्याचे मत स्वतंत्र निकालात नोंदविले आहे. यापूर्वीच्या निकालावरूनही न्या. शर्मा यांचे न्या. खान आणि न्या. आगरवाल यांच्याशी मतभेद झाले होते. बहुमताने दिलेल्या निकालामध्ये वादग्रस्त परिसराचे हिंदू महासभा, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्‍फ बोर्ड यांच्यात वाटप करण्याचा आदेश आहे. सीता रसोई, राम चबुतरा आणि भांडार हा बाह्यपरिसर निर्मोही आखाड्याच्या मालकीचा आहे. त्याचबरोबर मुस्लिम याचिकाकर्त्यांना एकतृतीयांशपेक्षा कमी जागा देता कामा नये, असेही खंडपीठाने बजावले आहे. तसेच, या जागेबाबत तीन महिने "जैसे थे'चा आदेशही दिला आहे.

गेली साठ वर्षे सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईला महत्त्वाचे वळण देणारा हा निकाल तब्बल 8189 पानांचा आहे. त्यातील आगरवाल यांचाच निकाल 5238 पानांचा आहे. न्या. शर्मा यांना 1556 पाने लागली आहेत, तर न्या. खान यांनी अत्यंत कमी जागेत म्हणजे फक्त 285 पानांतच निकाल दिला आहे.

देशव्यापी अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था आणि उत्कंठा ताणलेल्या वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर खंडपीठाचा हा निकाल दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जाहीर करण्यात आला. तीनही न्यायाधीशांनी स्वतंत्र निकाल लिहिले आहेत; पण तिघांनीही मध्यवर्ती घुमट हेच श्रीरामाचे जन्मस्थान असल्याचे म्हटले आहे. न्या. खान आणि न्या. आगरवाल यांनी वादग्रस्त परिसराचे सुन्नी वक्‍फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि "रामलल्ला विराजमान' या तिघांमध्ये विभाजन करण्याचा निकाल दिला.

"बाबराने मशीद बांधण्यापूर्वीच जुने मंदिर उद्‌ध्वस्त करण्यात आले होते. त्याच्या अवशेषातूनच मशीद बांधली होती,'' असे लक्षणीय मत नोंदवून न्या. खान यांनी म्हटले आहे, "मशिदीच्या परिसरात नमाजाबरोबरच हिंदूंची पूजा अशी वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती आहे. त्यामुळे जागेवर हिंदू आणि मुस्लिमांची ही संयुक्त मालकी आहे. मात्र, मध्यवर्ती घुमटाची जागा हेच श्रीरामाचे जन्मस्थळ आहे.'

न्या. धर्मवीर शर्मा यांनी हा संपूर्ण परिसर हिंदूंच्या मालकीचा असल्याचे स्वतंत्र मत निकालात जोडले आहे. "हे ठिकाण जन्मस्थान असल्याचे मानून हिंदू अनादी काळापासून तिथे पूजा करीत आहेत. मशीद बांधण्यापूर्वी तिथे हिंदूंचे धार्मिक स्थळ होते, असे पुरातत्त्व खात्यानेही स्पष्ट केले आहे, तसेच इस्लामच्या नीतितत्त्वांविरुद्ध बांधकाम झाल्याने वादग्रस्त वास्तूला मशीद म्हणता येणार नाही,' असे मत नोंदविले आहे.

हिंदू याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रवक्ते रविशंकर प्रसाद निकालानंतर प्रचंड उत्साहात होते. ते म्हणाले, ""जिथे रामलल्लाची मूर्ती आहे, तिथून ती आता हलविता येणार नाही; कारण तेच श्रीराम जन्मस्थळ आहे, हे खंडपीठाने एकमताने मान्य केलेले आहे.''

दिवसभरातील घडामोडी
निकालास मुस्लिम वक्‍फ बोर्ड सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार
वक्‍फ बोर्डाला एकतृतीयांश जागा देण्याविरोधात श्रीरामजन्मभूमी ट्रस्ट सर्वोच्च न्यायालयात जाणार
लखनौ व उत्तर प्रदेशात सकाळपासूनच अघोषित संचारबंदी
देशात शांतता, कडेकोट सुरक्षाव्यवस्था. बाजार, शाळा, सार्वजनिक व्यवहार दुपारनंतर बंद
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची सोनिया गांधी यांच्याशी चर्चा; कॉंग्रेस "कोअर कमिटी'ची बैठक
भाजपचे नेते लालकृष्ण अडवानी यांच्या निवासस्थानी बैठक
.......
अयोध्येमध्ये भव्य राममंदिर बांधण्याचा मार्ग या निकालामुळे मोकळा झाला आहे. या निकालामुळे आस्थेचे नवे पर्व सुरू झाले आहे.
- सरसंघचालक मोहन भागवत

न्यायालयाचा निर्णय काहीही असला तरी त्याचा सर्वांनी आदर राखायला हवा. सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या मताचा मी नाही.
- हाशीम अन्सारी (वय 90) खटल्यातील पक्षकार

रामजन्मभूमीचा वाद अनेक वर्षे चिघळला होता. आजच्या निकालाने एक बरे झाले, की या वादाला "राम' म्हणावे लागले.
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

वादग्रस्त जागेवर बाबरी मशीद असल्याचे तीनही न्यायमूर्तींनी मान्य केले होते. मग निकाल आमच्या विरोधात कसा दिला?
- झफरयार जिलानी, वकील, सुन्नी सेंट्रल वक्‍फ बोर्ड
......
वेगवान दिवस
दुपारी 3.27 - अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाकडून निकाल वाचनास सुरवात
3.41 - पहिला निकाल, 28 मुद्द्यांची उत्तरे.
सायं. 4.16 - उर्वरित प्रकरणांचा निकाल जाहीर.
4.22 - वक्‍फ बोर्डाची याचिका फेटाळली.
4.24 - वादग्रस्त जागेचे तीन भाग करण्याचा निकाल.
4.31 - रामजन्मभूमीची जमीन रामललाकडे सोपविली.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...