बावखलांकडे गांभीर्याने पाहा

वसईच्या हिरव्यागार परिसराचे वर्णन करताना ‘मुंबईची फुफ्फुसे’ असा वारंवार उल्लेख केला जातो. मात्र अलिकडे ही फुफ्फुसे बरीच कमकुवत होत असल्याचे जाणवते. कारण वसईच्या पंचक्रोशीतील बावखलाकडे (तळी) होत असलेली/ केली जात असलेली डोळेझाकच! बिल्डर लॉबीकडून तसेच फार्म हाऊस बांधणाऱ्यांकडून या बावखलावर होत असलेले अतिक्रमण येथील शेती/ बागायतीवर परिणाम करीत आहे. आज अनेक भागांतील शेती/ बागायती ओस पडत चालली आहे. जिकडे तिकडे केळीचे बाग सुकलेले दिसत आहेत. येथील शेती/ बागायती प्रामुख्याने या बावखलांच्या पाण्यावरच पिकवली जात असे. मात्र अलीकडच्या काळात या बावखलांचा उपयोग कचरापेटीसारखा होऊ लागल्याने ती बुजवली जात आहेत. काहीजण तर ही बावखले व्यवस्थित बुजवून त्या जागी टुमदार फार्महाऊस बांधू लागले आहेत. बिल्डर लॉबी तर या बावखलांवर, तसेच त्यांच्या सभोवतालच्या जमिनीवर टू-बीएचके/ थ्री-बीएचके बंगले स्कीम आणू पाहताहेत. ही बाब पर्यावरणसंवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. याकडे ना पर्यावरणप्रेमी गांभीर्याने पाहताना दिसत, ना शासनप्रणाली! ‘आम्हा काय त्याचे?’ अशीच अवस्था प्रत्येक वसईवासीयांची झाली आहे.
केळी पानवलेची मळे असलेल्या या वसईच्या निसर्गरम्य परिसरात पूर्वी या बावखलावर ‘रहाट’ बसविलेले असत (ही पद्धत बहुदा रोमन/ पोतुर्गीजांच्या काळापासून प्रचलित होती.) या रहाटावर केळीच्या सुकलेल्या पानांच्या मधल्या शिरा काढून त्या एकमेकीत गुंफून सुंदर, सुबक, जाडजूड दोर वळली जाई. लाकडांची छोटी छोटी चिपाटे दोन समांतर दोरखंडात खोचून त्यावर मातीची मडकी सुंभाने अगदी गच्च बांधली जात. नंतर रहाटाला बैल वा रेडा जोडून बावखलांतले पाणी मडक्यातून उपसले जाई. हे पाणी पन्हाळातून छोटय़ा हौदात सोडले जाई. तेथून ते सरळ छोटय़ा पाटातून बागायतीला/ शेतीला पुरवले जाई. अशा रीतीने शेती/बागायती फुलत/ फळत/ बहरत असत. यातून बळीराजाला चांगले उत्पन्न मिळत असल्याने तोही सुखी, समाधानी होता. आता मात्र हे सारे कालबाह्य़ झाले आहे.
ही बावखले उन्हाळ्यात एकदा मजुरामार्फत गाळ काढून अधिक खोल तसेच स्वच्छ केली जात. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी भरपूर प्रमाणात साठवले जाईल. पाणी अधिक प्रमाणात साठवले गेल्याने पाण्याचा पुरवठा अगदी मे/ जूनच्या अखेरपर्यंत होत असे. पाण्याची कमतरता वसईकरांनी कधीही अनुभवली नाही. उन्हाळ्यात लहानपणी आम्ही बालगोपाळ मंडळी या बावखलात उतरून त्यांच्या झऱ्यांचा शोध घेत असू. झऱ्याखालची वाळू उकरून झरे मोकळे केल्याने अगदी स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पाणी पाझरे. कित्येकदा हे पाणी ओंजळीने भरभरून पीत असू. किती आनंद होता त्यात! आता फक्त आठवणीच उरल्या आहेत.
या बावखलांच्या समस्येवर उपाय करायचा झाल्यास वसईच्या पंचक्रोशीतील बावखलांचा ताबा पर्यावरणप्रेमी संघटना, सामाजिक संस्था, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, नगरपालिका यांनी घेऊन ती अधिक खोल करून स्वच्छ केल्यास पावसाच्या पाण्याचा अधिक साठा करणे आपणास शक्य होईल. या बावखलाचे पाणी जनसामान्यांना पिण्यासाठीही वापरता येईल. तसेच काही बावखलांचा उपयोग उत्तम बागा, फलोद्याने, नाना-नानी पार्क याबरोबरच मत्यशेतीसाठी सुद्धा करणे शक्य होईल. ही बावखले अधिक खोल केल्याने जास्तीत जास्त जलसाठा करून उन्हाळ्यात या जमिनीखालच्या पाण्याचाही उपसा करणे आपणास शक्य होईल. याचा विचार मात्र एकदिलाने व्हायला हवा.
-कीर्तिकुमार वर्तक, वसई
Credit:Loksatta news


No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...