पिंपरी, ८ मे / प्रतिनिधी,लोकसत्ता चित्रपटात दाखविण्यात आलेले आपल्या लहानपणातील तसेच तरुणपणाचे दु:खद प्रसंग पाहून जोरजोराने हंबरडा फोडावेसे वाटले होते, ढसाढसा रडू आले. मात्र, आजूबाजूला पाहिले, अनेक महिला तसेच पुरुषही रडत होते. तेव्हा वाटले, आपणच रडत बसलो तर इतरांचे काय? रडायचे थांबले, पुन्हा कामाला लागले. दुसऱ्याला आधार देऊन आपले दु:ख कमी करण्याची भूमिका आपण स्वीकारली, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ यांनी केले. सिंधुताईंच्या जीवनावर आधारित तयार करण्यात आलेल्या ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी आठवडा पूर्ण केला आहे. चिंचवड येथे एका खासगी कार्यक्रमासाठी त्या आल्या असता पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. चित्रपटाच्या यशाबद्दल काय वाटते, असा प्रश्न विचारला असता आपल्यावर चित्रपट काढला आणि तो इतका यशस्वी ठरला, हे अजूनही खरे वाटत नाही, असे त्या म्हणाल्या. चित्रपटात तेजस्विनी पंडित आणि ज्योती चांदेकर यांनी जीव ओतून काम केले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. लहानपणीच्या चिंधीची भूमिका करणाऱ्या प्रांजल शेटय़े हिने कमालच केली आहे. तिचा अभिनय पाहून संपूर्ण बालपण डोळ्यासमोर उभे राहिले. तेव्हा आपल्याला जोरजाराने रडायला आले होते. मात्र, शेजारी बसलेल्या महिला भगिनीही रडत असल्याचे पाहिल्यानंतर आपण रडू आवरले. देशातील अन्य भाषांतही हा चित्रपट डिबग करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाचा दुसरा भाग काढण्यात येणार असेल, तर आपल्याला आनंदच वाटेल, असे त्या म्हणाल्या. चित्रपट पाहून देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच सातासमुद्रापलीकडील देशांमधून आपल्या फोन आले. अमेरिका, दुबई, इंग्लंड यासारख्या देशांमधून भाषणांसाठी निमंत्रणे येऊ लागली. आपल्याला मिळणाऱ्या देणग्यांमध्येही वाढ झाली. मला नवऱ्याने हाकलले. मंदिराच्या पुजाऱ्याने बाहेर लोटले. रेल्वेमध्ये भीक मागत असताना तिकिट तपासणिसांनी त्रास दिला. या सगळ्या प्रवासातून हजारो मुलांची आई झाले. ‘तुम्ही तुमच्या नवऱ्याला माफ का केले, असा प्रश्न सर्वाधिक विचारला गेला. यावर चुका माफ करण्यातच खरे मोठेपण असते, असे सांगत नवऱ्याचा सांभाळ आता आपणच करीत असल्याचे त्यांनी सांगितले. नवऱ्याने सोडले म्हणून मी घडले. अन्यथा अनाथांची माई झालीच नसती. त्यामुळे मोठे मन ठेवून नेहमी माफ करायला शिकले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. राग आल्यानंतर मनाचा कोंडमारा करून घेऊ नका. कडाडून भांडा आणि मन मोकळे करा. मन सबळ असेल तर कोणतेही संकट टळेल, असे त्या म्हणाल्या. ज्यांनी वाऱ्यावर सोडले त्याच मंडळींच्या हस्ते १० मे ला नागरी सत्कार आणि मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ‘देर आए पर दुरुस्त आए’ असे सांगत हा विरोधाभास त्यांनी निदर्शनास आणून दिला. |
चित्रपट पाहून हंबरडा फोडावा वाटला
Labels:
SINDHUTAI SAPKAL
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment