गुगलला मराठीचे वावडे का?

भरत गोठोसकर, बुधवार, २० जुलै २०११,लोकसत्ता
bhargo8@gmail.com
www.ekmarathimanoos.blogspot.com
गुगलने  मराठी भाषेला वळचणीला टाकल्यामुळे ही भाषा व मराठी लोक यांच्यावर अन्याय झाला आहे. पण दुर्दैवाने मराठी लोकांचे व राज्य सरकारचे त्याकडे अजून लक्ष गेलेले नाही.  खरे म्हणजे ‘गुगलला मराठीचे वावडे’ हा विषय मराठी लोकांनी तातडीने व गांभीर्याने विचारात घेणे आवश्यक झाले आहे.
 आता गुगल जगातील बारावी सर्वात मोठी कंपनी झाली आहे. कंपनीच्या शेअर भांडवलाचे तिच्या शेअरच्या बाजारभावानुसार एकूण मूल्य म्हणजे मार्केट कॅपिटलायजेशन होय. त्यानुसार भारतात रिलायन्स इंडस्ट्रीज ही सर्वात मोठी कंपनी आहे. या मोजपट्टीप्रमाणे गुगलचा आकार रिलायन्सच्या तिप्पट ठरतो. मूळ धंदा स्थिरस्थावर झाल्यावर गुगलने आणखी शोध लावून नवीन सेवा उपलब्ध करून दिल्या. तसेच माहिती तंत्रविज्ञानातील काही कंपन्या विकत घेतल्या. त्यायोगे गुगलकडून कित्येक सेवा पुरवल्या जातात त्या अशा - ई-मेल (जी-मेल), सोशल नेटवर्किंग (ऑर्कुट व गुगल प्लस), स्ट्रीमिंग व्हिडीयो (यू टय़ूब), न्यूज अ‍ॅग्रीगेटर (गुगल न्यूज), नकाशे (गुगल मॅप्स), फोटो शेअरिंग (पिकासा), ऑनलाईन पुस्तके (गुगल बुक्स), इंटरनेट ब्रावसर (क्रोम), ब्लॉगिंग साईट (ब्लॉगर) इत्यादी. सध्या जगात रोज गुगलच्या सेवांचा लाभ घेण्याचे किमान एक अब्ज प्रयत्न होतात. म्हणजे गुगल हे जगातील पहिल्या क्रमांकाचे संकेतस्थळ (वेबसाईट) आहे. आता भविष्यकाळात आणखी प्रगत तंत्रविज्ञान साध्य करून ते लोकांना उपलब्ध करून देण्याचा गुगल प्रयत्न करीत आहे. क्लाऊड कॉम्पुटिंग हा त्यापकी एक नवा विषय आहे. या क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि अ‍ॅपल या दुसऱ्या कंपन्याही स्पध्रेत आहेत. यामुळे येत्या काही दशकांत जगातील सर्व लोकांचे जीवनच बदलून जाणार आहे. यास्तव याकडे सरकारे, संस्था किंवा व्यक्ती यांनी दुर्लक्ष करून मुळीच चालणार नाही.
गुगलची द्रुतगतीने वाढ होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या संकेतस्थळाचा वापर केला पाहिजे हे तिने प्रारंभीच जाणले. या संबंधात मुख्य अडचण भाषेची होती. तोपर्यंत फक्त इंग्रजीतून गुगलची सेवा उपलब्ध होती. मग ज्या भाषा इंग्रजीप्रमाणे रोमन लिपी वापरतात (उदा. फ्रेंच, जर्मन वगरे) त्या भाषिकांसाठी गुगलने आपली सेवा उपलब्ध केली. पुढे चिनी व अरबी भाषांमध्ये ही सेवा चालू झाली. लोकांना त्यांच्या भाषेच्या लिपीत टाइप करण्याकरिता ‘गुगल ट्रान्सलिटरेट’ ही सेवा सुरू केली. म्हणजे रोमन लिपीत "maharashtra" टाइप केलं तर त्याचे देवनागरी लिपीत ‘महाराष्ट्र’ असे रूपांतर होते. या सेवेमुळे भारतातील लोकांचा त्यांच्या मातृभाषेत इंटरनेटवरचा वापर खूप पटींनी वाढला. याचा पुढचा टप्पा म्हणजे ‘गुगल ट्रान्सलेट’ म्हणजे भाषांतर सेवा. या सेवेने जर आपण
 "How are you?" हे टाइप केले तर ते जर्मनमध्ये "Wie geht es Ihnen?"  म्हणून भाषांतरित होते! फक्त शब्द आणि वाक्य नाही तर चक्क परिच्छेदही भाषांतरित करता येतात. याचा अर्थ असा की, वेळ आणि पसे खर्च न करता आपण दुसऱ्या भाषेतील संकेतस्थळे, पुस्तके व लेख वाचू शकतो. भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे. मराठी मात्र वळचणीला टाकली आहे!
गुगलने आपल्या भाषांतर सेवेमध्ये मराठी समाविष्ट केली पाहिजे यासाठी तिचे महत्त्व काय आहे ते प्रथम पाहू -
*  भारतात जास्तीत जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी व बंगाली यांच्यानंतर मराठी व तेलुगू  तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तमिळ, कन्नड किंवा गुजराती या भाषिकांपेक्षा मराठी लोक अधिक आहेत. खरे म्हणजे जगात मराठी बोलणाऱ्यांची संख्या गुजराती भाषिकांच्या जवळजवळ दुप्पट आहे.
*  गुगलची भाषांतर सेवा ६४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. जगात मराठी भाषिक संख्येने पंधराव्या स्थानावर आहेत. याचा अर्थ मराठीहून संख्येने कमी असलेल्या ५० भाषांना या सेवेचा लाभ मिळतो. फ्रेंच, इटालियन किंवा कोरियन या भाषिकांपेक्षा मराठी भाषिक अधिक आहेत.
*  राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या भाषा आहेत. मुळात त्या १४ होत्या. आता त्यांची संख्या वाढून २२ झाली आहे. त्या परिशिष्टात अगदी पहिल्यापासून मराठी समाविष्ट आहे.
*  भारतात महाराष्ट्र हे लोकवस्तीनुसार दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून येथे मराठी ही कायद्याने राजभाषा आहे. तसेच गोवा, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव येथे द्वितीय क्रमांकाची राजभाषा आहे. इस्रायल व मॉरिशस या राष्ट्रांमध्ये मराठीला मानाचे स्थान आहे.
*  बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक व गुजरात याहून महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे.
*  भारतात सर्वाधिक ब्रॉडबँड इंटरनेट व मोबाईलचे उपभोक्ते महाराष्ट्रात आहेत.
*  इंडिअन रीडरशिप सव्‍‌र्हे या संस्थेनुसार भारतात वृत्तपत्रांच्या वाचकसंख्येत हिंदीनंतर मराठी वाचकांचा क्रम लागतो. त्यानंतर मल्याळी व इंग्रजी वाचकांची संख्या आहे. मराठी भाषेत आता १० दूरदर्शन वाहिन्या सक्रिय आहेत.
*  सॉफ्टवेअर क्षेत्रात मराठी माणसाचे प्राबल्य आहे.
*  लाखो मराठी लोक परदेशामध्ये स्थायिक झालेले आहेत. अमेरिका, युरोप, पश्चिम आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आदी ठिकाणी ते स्थिरावले आहेत. मराठीची जोपासना करण्यासाठी  त्यांनी तेथे संस्था स्थापन केल्या आहेत. मॉरिशसमध्ये मराठी प्रेमवर्धक मंडळी ही १९०२ साली तर लंडनचे मराठी मंडळ १९३२ साली अस्तित्वात आले.
*  इंडोआर्यन भाषांमध्ये मराठीचे साहित्य हे सर्वात जुने म्हणजे दहाव्या शतकापासूनचे आहे. खरे म्हणजे मराठीचा पहिला वापर आठव्या शतकात आढळतो.
*  आधुनिक भारतीय रंगभूमीची स्थापना विष्णुदास भावे यांच्या ‘सीतास्वयंवर’ या मराठी नाटकाने १८४२ साली झाली असे मानले जाते.
*  बायबलची मराठी आवृत्ती १८११ साली विल्यम कॅरी यानी प्रसिद्ध केली तर ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र १८३५ साली बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले.
*  भारतात मुलींची पहिली शाळा जोतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी सुरू केली. तिचे माध्यम मराठी होते.
*  अमेरिकेने १९७७ साली अवकाशाच्या बाहेरच्या कक्षेत वॉयेजर नावाचे अंतराळयान पाठविले. तेथे कोणी माणसे असतील तर त्यांच्यासाठी त्यामध्ये विविध भाषांमध्ये शुभसंदेश होते. त्यातला मराठीतला संदेश होता - ‘‘नमस्कार. या पृथ्वीतील लोक तुम्हाला त्यांचे शुभविचार पाठवतात आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही या जन्मी धन्य व्हा.’’
*  महाराष्ट्रात सर्व विद्यापीठांमध्ये मराठीचे अध्यापन होतेच. याशिवाय या राज्याच्या बाहेरील विद्यापीठांमध्ये म्हणजे महाराजा सयाजीराव (गुजरात), बनारस हिंदू (उत्तर प्रदेश), उस्मानिया (आंध्र प्रदेश), गुलबर्गा व कर्नाटक (कर्नाटक), देवी अहिल्या (मध्य प्रदेश) आणि गोवा या विद्यापीठांमध्ये मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे.
हैतीची क्रिओल, अजरबजानी, माल्टीज आणि कॅटलॅन वगरे नगण्य भाषिकांसाठी जर गुगलची ही सेवा उपलब्ध आहे, तर मग थोर वारसा असलेल्या मराठी भाषेला का नसावी? गुगल न्यूज गेली कित्येक वर्षे हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळी भाषांमध्ये उपलब्ध आहे, पण मराठीत नाही. जर ही मूलभूत सेवा अजून मराठी माणूस वापरू शकत नाही तर मराठी भाषांतर चालू करायला गुगल किती वेळ घेईल हे देवच जाणे! भाषा समृद्ध होण्यासाठी आणि तिचा वाढविस्तार होण्याकरिता या २१व्या शतकात तंत्रविज्ञानाचीही कास धरली पाहिजे. जर गुगल ट्रान्सलेटमध्ये मराठी समाविष्ट झाली नाही तर या भाषेची मोठी हानी होईल. मराठी साहित्य, इतिहास, विचारधन व पत्रकारिता यांच्याशी बाकीच्या जगाचा संपर्क गुगलविना सहजपणे होऊ शकणार नाही. ही सेवा उपलब्ध झाली तर स्वयंशिक्षणला, विशेषत: ग्रामीण महाराष्ट्रातील या शिक्षणपद्धतीला फार मोठा हातभार लागेल.
आता प्रश्न असा पडतो की, गुगलने मराठीला वळचणीला का टाकले? बहुतेक सर्व मराठी लोकांना हिंदी अवगत असल्यामुळे त्यांची भाषा घेण्याचे आपणाला कारण नाही असे त्या कंपनीला वाटले असावे किंवा भोजपुरी, ब्रजभाषा, मारवाडी आदी देवनागरी लिपीतील हिंदी पोटभाषांप्रमाणे मराठी एक असावी असा गरसमज झाला असेल.  कदाचित लिंगभेदाच्या अडचणीमुळे मराठी ही भाषांतराकरिता कठीण पडत असेल. T.A.N.A. (तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका) सारख्या संस्था अशा विषयात फार आग्रही असल्यामुळे तेलुगूचा हक्क कोणी डावलू शकत नाही, पण जगभरातील १०० हून अधिक ‘महाराष्ट्र मंडळे’ काय करत आहेत? भारतातील अन्य भाषिकांपेक्षा मराठी लोक फार सहिष्णू आहेत हे जाणून गुगलने हे दुर्लक्ष तर केले नाही ना? या कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांमध्ये मराठी लोक चांगल्या संख्येने आहेत, पण त्यांनी ‘मराठी बाणा’ दाखवलेला दिसत नाही.
 गुगलने केलेला हा अन्याय दूर करण्यासाठी मराठी लोकांनी कसलीही चळवळ करण्याची गरज नाही. मग महाराष्ट्र सरकार काही करणार का? या राज्याला आतापर्यंत जे १५ मुख्यमंत्री लाभले त्यापकी सध्याचे पृथ्वीराज चव्हाण हे तंत्रविज्ञानाचे शिक्षण घेतलेले एकमेव होत. या विषयाची अत्युच्च पदवी त्यांनी अमेरिकेतून घेतली आहे. गुगल वि. मराठी हा विषय त्यांना चांगलाच ठाऊक आहे, पण त्यांच्यावर कामाचे ओझे एवढे अतिप्रचंड आहे की, गुगलला एक पत्र लिहिण्यासाठीसुद्धा त्यांना फुरसद नाही, पण प्रत्येक प्रश्न सरकारने सोडविला पाहिजे, असा आग्रह का? सुदैवाने या समस्येवर साधा व सोपा उपाय आहे. तो म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने www.petitiononline.com/gmarathi येथे सही करून आपली नाराजी गुगलचे प्रमुख लॅरी पेज यांच्याकडे  व्यक्त करावी.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...