पालक, पाल्य आणि ‘प्याला’

गीता सोनी , चतुरंग,लोकसत्ता

मद्यपानासारख्या चुकीच्या प्रथा अव्हेरण्यासाठी लागणारे पाठबळ पालकांनीच मुलांना आपल्या उदाहरणाने दिले पाहिजे.
गेल्या दोन दशकांत जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण, माहिती तंत्रज्ञान यामुळे भारतीय तरुणाईकडे ऐन उमेदीत हाती पैसा येऊ लागला आहे. परिणामी देशी, परदेशी बनावटीच्या चैनीच्या वस्तू परवडण्याजोग्या दरात सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत. शहरीकरणाचे वारे खेडोपाडीही जोमाने वाहू लागले आहेत. भरपूर कमवा व भरपूर खर्च करा, अशी अर्थकारणाची नवीन संहिता रूढ झाली. आठवडय़ातून एक-दोनदा ड्रिंक्स पार्टी, ध्रूम्रपान, चारचाकी/दुचाकी वाहन हे सर्व स्टेट्स सिंबॉल बनले. घरात मुलाबाळांसमवेत मद्यपान करणारे वडील, कधीकधी त्यांना कंपनी देणारी आई, ही दृश्ये सवयीची झाली आहेत. उंची हॉटेल्समधून आई-वडील सहकुटुंब, आलेले मित्रमैत्रिणी यांच्यासोबतच्या ओल्या डिनर पाटर्य़ातूनही मुले सहज रुळली.
वानगीदाखल ही खालील दृश्ये-
* १२ वर्षांच्या रिद्धीचे एका स्पर्धा परीक्षेतील सुयश साजरे करण्यासाठी तिचे आई-वडील, रिद्धी, वय वर्षे सात ते चौदामधली लहान मुले आणि त्यांचे आई-वडील एका उंची रेस्टॉरंटमध्ये जमले आहेत. जमलेल्या सर्व आई-वडिलांसाठी हार्ड ड्रिंक्स, तर सर्व छोटय़ांसाठी सॉफ्ट ड्रिंक्स मागवली आहेत. हा पक्षपात सहन न होऊन किंवा कुतूहल म्हणून काही लहान मुले आपापल्या आईकडे तिच्या पेयाची मागणी करतात. ‘हे ड्रिंक फक्त मोठय़ांसाठी आहे, लहानांसाठी नाही’, असे सांगून लहानांना गप्प केले जाते.
* नववर्षांच्या स्वागतासाठी विनी आणि निशांतच्या घरी त्याचे सहकुटुंब, मित्रमैत्रिणी आणि त्यांची १० ते १४ वर्षे वयांची मुले यांची जंगी पार्टी सुरू आहे. पूर्वापार प्रघात असल्याप्रमाणे सर्व पुरुषमंडळी मद्यपान आणि सिगरेटींचा धूर सोडण्यात गर्क आहेत. ‘आम्ही काय पाप केलंय?’ असं म्हणत स्त्रियाही पुरुषांच्या पंगतीत सामील होत आहेत. अधेमधे लुडबुडणाऱ्या लहान मुलांना या फक्त मोठय़ांनी करायच्या गोष्टी आहेत, असे सांगून त्यांना टीव्ही, कम्प्युटर रूममध्ये पिटाळले जात आहे.
वरील दोन्ही प्रसंग कोणत्याही कॉस्मोकल्चरमधल्या हाय सोसायटीतील नसून, मध्यमवर्गीय मराठमोळ्या घरांमधील आहेत. जिवलग मित्र किंवा समवयीन आप्त जमले की ड्रिंक्स पार्टी झालीच पाहिजे, असा समज या लहान मुलांच्या मनात दृढ होण्याची दाट शक्यता आहे.
आनंद, दु:ख किंवा श्रमपरिहार या गोष्टींसाठी ओल्या पार्टीसारखा दुसरा पर्याय नाही, अशी आपल्या लहानग्यांची धारणा झाली तर ती पटेल आपल्याला?
आपल्या छोटय़ांच्या मर्यादित भावविश्वात त्यांचे आई-वडील यशस्वी स्त्री-पुरुष असतात, पण पालकांच्या अशा व्यसन प्रदर्शनाने कदाचित त्या लहानांच्या मनात यशस्वितेचे चुकीचे मापदंड तयार झाले तर?
तसं पाहायचं झालं तर आजकाल चित्रपट, दूरदर्शनवरील देशीविदेशीच्या वाहिन्यांसाठी मद्यपान, धूम्रपान या सामान्य गोष्टी झाल्या आहेत, पण खऱ्या आयुष्यात पालकांनीच ही दृश्य पाल्यांसमोर उभी केली तर छोटय़ा किंवा मोठय़ा पडद्यावरील व्यसन दृश्ये त्यांना ‘लार्जर दॅन लाइफ’ वाटतील.
अशा सर्वच प्रसंगांतून आई-वडील लहान मुलांना ‘या फक्त मोठय़ांनी करायच्या गोष्टी आहेत’, असे सांगून प्रश्न निकालात काढतात, पण मुळात ज्या गोष्टी लहानांसाठी नाहीत, त्या लहानांसमोर कशासाठी?
मेंदूचा भुगा आणि रक्ताचं पाणी करून मिळविलेला पैसा, दारूच्या रंगीत पाण्यात किंवा सिगरेटच्या धुरात वाया का घालवावा, हा मूलभूत प्रश्न जिथे पालकांनाच भेडसावत नाही, तिथे त्यांच्या अजाण वयातील पाल्यांना ‘व्हॅल्यू फॉर मनी’चा फंडा कसा समजावा? मग हीच मुले जेव्हा महागडे कम्प्युटर गेम्स, फॅशन, मित्र-मैत्रिणींसोबत हॉटेलिंग अशा गोष्टींसाठी आपल्याकडे पैशांची मागणी करतील, आयुष्यात महत्त्वाचे निर्णय घेताना बेफिकिरी दाखवतील, तेव्हा दोष कोणाला द्यायचा?
हल्लीच्या अचिव्हिंग, मल्टिटास्किंग, डायनॅमिक यंगिस्तानात हे वरील विचार अगदी जुनाट आणि टाकाऊ वाटतील; परंतु विश्वविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कोटय़वधी रुपये मिळवून देणारी मद्यार्क कंपनीची जाहिरात केवळ तात्त्विक मूल्यांच्या जपणुकीसाठी नाकारली, ही बातमी सगळ्यांच्याच स्मरणात असेल. ‘जनी वंद्य ते सर्व भावे करावे’ ही समर्थ रामदासांची शिकवण शिरोधार्य असली तरीही, जर समाज चुकीच्या प्रथा वंदनीय ठरवीत असेल, तर त्या अव्हेरण्यासाठी लागणारे नैतिक पाठबळ आपण पालकांनीच आपल्या पाल्यांना पुरवायला हवे, तेही आपल्या वर्तणुकीतून..
अजूनही मद्यपान करावे की करू नये, या मुद्दय़ावर आपल्यात मतभेद असू शकतील, पण अशा व्यसनांचे प्रदर्शन पाल्यासमोर करू नये. या बाबतीत आपल्या सर्वाचे एकमत असायला हवे, कारण भविष्यातील सशक्त समाजाची निर्मिती सकस विचारांच्या युवा पिढीतूनच होऊ शकेल.

1 comment:

Brijesh Marathe said...

तुम्ही तुमच्या पाल्यांच्यासमोर चहा,कॉफीही घेत नसाल म्हणजे.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...