नको ओझे स्पध्रेचे!

कल्पना संचेती ,लोकरंग
kalpanasancheti@gmail.com

स्पर्धा म्हटलं की कोणाला तरी उचलून धरायचं बाकीच्यांना दुय्यम किंवा कुचकामी ठरवायचं, एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकां विरूद्ध उभं ठाकायचं यापेक्षा वेगळा विचार करून काही नाही का करता येणार? जिथे एका विरूद्ध दुसरा नसेल, एकमेकांशी तुलना नसेल तर प्रत्येकाला आपलं गुणप्रदर्शन, कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. असे  ‘गुणदर्शन सोहळे’ आयोजित करता येतील का?
त्यादिवशी छोटय़ा मुलांची स्केटिंगची स्पर्धा होती. छोटी छोटी मुलं स्केटिंगचे चाकाचे बूट पायात घालून आणि डोक्यावर हेल्मेट घालून सज्ज होती. ती मस्त आनंदात, उत्साहात दिसत होती. तर मुलांचे पालक मात्र जरा तणावाखाली दिसत होते. आपल्या मुलांनी स्पध्रेत सर्वात पुढे पळावं यासाठी मुलांवर त्यांची सूचनांची सरबत्ती चालू होती. स्पर्धा झाली, निकाल लागले. पहिला, दुसऱ्या क्रमांकावर आलेली मुलं, त्यांचे पालक खूश दिसत होते. बाकीचे पालक मात्र नाराज. काही पालकांनी मुलांच्या स्पध्रेतल्या पळण्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांचं असमाधान मुलांबरोबरच्या त्यांच्या वागण्यात स्पष्ट दिसत होतं. काहींचा लागलेल्या निकालावर आक्षेप होता. त्यातच एका छोटया मुलाची आई त्याला ओढतच बाहेर घेऊन गेली. ‘आई गं..’ ‘काही बोलू नकोस. एरवी नुसता दंगा करतोस, मस्ती करतोस आज जोरात पळायला काय झालं होतं.’ तर दुसरे एक  पालक आपल्या मुलाला सांगत होते, ‘अरे दुसऱ्या ट्रॅकमधल्या त्या पुढे पळणाऱ्या मुलाला सरळ ढकलायचस. तुला काय सांगितलं होतं लक्ष ठेवायचं, कोणी पुढे जायला लागलं, की कोपराने ढकलून द्यायचं किंवा जोरात ओरडायचं, त्याचं लक्ष विचलित करायचं, म्हणजे दुसऱ्या नंबर ऐवजी चांगला पहिला नंबर आला असता. अगदी वेडाच आहेस! काही कळत नाही तुला.’
खूप वेळा आपण स्पर्धेलाच सर्वस्व मानतो. मग जिंकणं, हरणं यालाच महत्त्व येतं. खेळ, चित्रकला, संगीत, वक्तृत्व इत्यादी अनेक गोष्टींच्या स्पर्धा होतात. मुलांना थोडी जरी एखाद्या विषयांमध्ये गोडी आहे असं वाटलं की पालक मुलांना वेगवेगळ्या क्लासेसना पाठवतात. त्यातही मुलांनी फक्त क्लासेसना जाणं पालकांच्या पसंतीला उतरत नाही. मुलांनी त्याही विषयांच्या परीक्षा द्याव्यात, त्या उत्तीर्ण व्हाव्यात, त्यांनी सर्टिफिकेटस मिळवावित, त्यातल्या वेगवेगळ्या स्पर्धामधे उतरून आपलं कौशल्य दाखवावं, अशी पालकांची अपेक्षा असते. एखाद्या विषयांत विशेष गती असेल तर मग मुलांना घेऊन पालक त्या-त्या विषयातील आयोजित वेगवेगळ्या स्पर्धामध्ये, कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी धडपड करतात. मुलांचं ज्ञान वाढेल, समज वाढेल, क्षमता वाढेल यासाठी आवर्जून प्रयत्न करावेत; परंतु सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारचा ताण घेणं, सतत परीक्षांना सामोरं जाणं, वरचेवर योग्यता सिद्ध करणं, याने मुलाच्या मनाची दमणूक होते. तो एकाच दिशेने, त्याच त�ं जग, तिथलं वातावरण, त्यातलं राजकारण, योगायोग, ऐन वेळी घडण्याऱ्या अनुभवांपासून वंचित राहतो. त्याचं जगंच बदलतं. सतत यशापयाशाचा विचार करून जगण्याला काही मुलं कणखरपणे सामोरी जाऊही शकतील; परंतु कित्येक जण मात्र अशा प्रकारच्या ताणापुढे मनाने, शरीराने खचत जातात. हळूहळू याचा परिणाम त्यांच्या वागण्यावर, अभ्यासावरही होतो. आवडत्या विषयाचाही मग त्यांना कंटाळा यायला लागतो.
स्पध्रेचं जग, तिथलं वातावरण, त्यातलं राजकारण, योगायोग, ऐन वेळी घडण्याऱ्या गोष्टी, सह-स्पर्धकांचं वागणं या सगळ्यांचाच त्या कोवळ्या मनावर परिणाम होत जातो. त्यातून काहींनाच मिळणारं यश, होणारं कौतुक तर बहुतेकांच्या वाटय़ाला अपयश, टीका याने मुलांच्यात द्वेषाचं, ईष्य्रेचं, भेदभावाचं बीज टाकलं जातं. कित्येक स्पर्धाचं स्वरूप इतकं उथळ असतं, की अशा स्पर्धेत मिळणाऱ्या यशाने काही जणांचा फजील आत्मविश्वास वाढतो, तर अनेक जण उगीचंच आत्मविश्वास गमावून बसतात. एखाद्याच्या यशावर शिक्कामोर्तब होताना अनेकांना अपयश झेलावं लागतं. समाजाच्या आरोग्याचा विचार करता आपल्याला मुलांना नेमकं काय शिकवायचंय? सतत चढाओढ, मी पुढे रहावं आणि इतरांनी माझ्यापुढे जाता कामा नये म्हणून प्रयत्नात राहणं, की एकमेकांना सहकार्य करणं, सहयोग करणं, मदत करणं, मिळून कामं करणं...
आजचं जग स्पध्रेचं आहे, असं आपण मानतो. त्यामुळे स्पर्धा नसून कसं चालेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. स्पध्रेत उतरलो नाही तर मागे पडू असंही सगळेच जण म्हणतात. खरंच तसं आहे, की हा ही आपण फुगवलेल्या भीतीचाच एक फुगा आहे! खरं तर मुलांच्या शिकण्याच्या वयात मुलं किती आनंदाने आणि किती विविध अंगांनी शिकत राहतील, हे बघणं महत्त्वाचं असतं; किती स्पर्धामधे उतरतात, हे नाही. अशा विविध अनुभवाच्या शिक्षणातून मुलं आलेल्या कुठल्याही प्रसंगांना, मग त्या स्पर्धा का असेनात समर्थपणे सामोरी जाऊ शकतात. वयाप्रमाणे जीवनाची समज येणंही महत्त्वाचं असतं. हे सगळं करत असताना माणूस उपजत प्रेरणेने, स्वतच्या क्षमतेप्रमाणे स्वत:ला घडवत असतो. त्यासाठी प्रयत्नशील राहतो. त्यामुळे स्पर्धाही त्या जीवनाचाच एक भाग म्हणून घेतली पाहिजे, असं वाटतं.
आम्हा अनेकांना मार्गदर्शक असणाऱ्या आमच्या ताईंचा मुलगा  शोनिल कॉलेज व्यतिरिक्त त्याच्या आवडीच्या म्हणजे जंगलाच्या, पर्यावरणाच्या अभ्यासात गुंतलेला असायचा. त्याचा त्या  कामातला प्रत्यक्ष अनुभव, वाचन इतकं दांडग होतं, की त्याच्या पद्व्युत्तर  अभ्यासक्रमाच्या कित्येक पुढे तो गेलेला होता. स्वत: फिरून निरिक्षण करून निर्सगाचं, जंगलाचं, त्यात कार्यरत असण्याऱ्या सूक्ष्म निसर्ग चक्राचं उत्तम ज्ञान त्याच्याकडे होतं. त्याने एका जागतिक पातळीवरच्या मानाच्या  स्कालरशीपसाठी अर्ज केला होता. मुलाखतीसाठी जेव्हा त्याला बोलावणं आलं त्यावेळीही तो एका जंगलात काम करत होता. त्या आडरानातून सांगितलेल्या वेळी मुलाखतीसाठी कसाबसा तो दिल्लीला येऊन पोहोचला. मुलाखतीसाठी लागणारी कोणतीच वेगळी तयारी तो करू शकला नाही. आहे त्या कपडय़ानिशी त्याला मुलाखतीला हजर रहावं लागलं. मुलाखतीच्या तीन-चार फेऱ्यांमधून तो सही सलामत पार तर पडलाच आणि आँक्सफर्ड युनिव्हसिर्टीत त्याला आवडणाऱ्या कोर्ससाठी त्याची निवडही झाली. पुढे डॉक्टरेट पूर्ण झाल्यावर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्येच एका महत्त्वाच्या पदावर तो काम करत आहे. स्वत:ची आवड ओळखून जिद्द, चिकाटीच्या जोरावर स्पध्रेशिवाय मिळालेल्या मोकळ्या ताणविरहित वातावरणात तो वाढला. सुजाण पालक आणि सहकार्य करणारे गुरूजन यांच्या मुळेच स्वत:ला आवडणाऱ्या विषयात तो प्रगती करू शकला.                 
रोजच्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या निमित्ताने अनेक प्रकारच्या स्पर्धाचं आयोजन केलं जातं. सण-उत्सवांच्या निमित्ताने किंवा शालेय कार्यक्रमाचा भाग म्हणून किंवा गावातील, शहरातील काही सामाजिक संस्थाही मुलांसाठी  अनेक  उपक्रम राबवितात. त्या मागचा मूळ उद्देश चांगलाच असतो. त्या निमित्ताने मुलांशी संवाद होतो. त्यावेळी काही कला, क्रीडा प्रकारांना चालना देता येते. त्यानिमित्ताने त्या-त्या शाळेतली किंवा त्या-त्या भागांत राहणारी मुलं एकत्र येतात. परिणामी मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो. वैयक्तिक आणि गटाने काम करण्याची संधी मिळते. भाग घेण्याऱ्या मुलांना प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली जातात. मुलांबद्दल असणाऱ्या आस्थेतून जरी अशा उपक्रमांची आखणी झाली, तरी अनेक वेळेला मुलांच्या मानसिक, भावनिक गरजांकडे आवश्यक तेवढं लक्ष दिलं जातंच असं नाही. काही वेळेला केवळ पैसे जमविले आहेत म्हणून किंवा प्रसिद्धि मिळावी म्हणूनही असे कार्यक्रम आखले जातात. काही वेळा बक्षिस म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तू किंवा रकमा यांचीच जाहिरातबाजी अधिक केली जाते. यातून स्पर्धेमागचा मूळ हेतूच मारला जातो. पुढे जाऊन याचाच परिणाम म्हणून स्पर्धेत भाग घेण्यासाठी बक्षिसाच्या लालसेने मुलांना स्पध्रेत उतरवलं जातं.  त्यातूनच ‘एवढी तयारी करून आमच्या मुलांनी स्पर्धेत भाग घेतला आणि कसली ही फडतूस बक्षिसं’, अशा प्रतिक्रिया मुलांसमोरच देणं सुरू होतं. अशा वेळी स्पर्धेच्या उद्दिष्टालाच आपण निकालात काढतो. स्पध्रेचं म्हणून एक वेगळंच अर्थकारण, राजकारण सुरू होतं.
स्पर्धा म्हटलं की कोणाला तरी उचलून धरायचं बाकीच्यांना दुय्यम किंवा कुचकामी ठरवायचं, एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकां विरूद्ध उभं ठाकायचं यापेक्षा वेगळा विचार करून काही नाही का करता येणार? जिथे एका विरूद्ध दुसरा नसेल, एकमेकांशी तुलना नसेल तर प्रत्येकाला आपलं गुणप्रदर्शन, कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. स्वत:तल्या क्षमतांचा अंदाज घेता येईल अशा खेळीमेळीच्या वातावरणात मुलांसाठीचे ‘गुणदर्शन सोहळे’ आयोजित करता येतील का? अशा आयोजित केलेल्या सोहळ्यात मुलांच्यात वेगळं  दिसलेलं, विशेष भावलेलं हेरून, ते त्याच्या पर्यंत पोहोचवून कार्यक्रमाची गुणात्मकताही वाढवता येईल. यातूनच मुलांना खरं प्रोत्साहन मिळेल. अशा कार्यक्रमांतून मुलांना गावातल्या, शहरातल्या उत्तम कलाकारांना, लेखकांना, कारागिरांना, विचारवंतांना भेटवता येईल. अशा लोकांच्या अनुभवांचे बोल ऐकून मुलंही अनुभवांनी समृद्ध होतील. नुसत्या दिखाऊ आणि पोकळ कार्यक्रमांना यातून आळा बसेल आणि मुलांसाठी सकारात्मक, कृतिशील असं एक व्यासपीठ तयार होईल. सर्वच मुलांच्या गुणविकसनाला वाव मिळेल. प्रत्येकात काहीतरी चांगलं असतं, असा विश्वास समाजात प्रस्थापित व्हायला मदत होईल. अशा गुणप्रदर्शन सोहळ्यातून निव्वळ चढाओढ टाळून स्पध्रेतून मिळणाऱ्या इतर चांगल्या गोष्टींना उदा. लोकांसमोर येऊन आपली कला सादर करणे, गटांनी मिळून काही सादर करणे, लिहणे, बोलणे इत्यादी चांगल्या गोष्टींना स्थान मिळेल. एकमेकांचं कौतुक करणं, सहकार्य करणं, चांगल्या गोष्टींचं आदानप्रदान होणं अशा समाजविधायक गोष्टींना त्यातून स्थान मिळेल.
कित्येक वेळा तर छोटय़ा मुलांना ‘स्पर्धा म्हणजे काय?’ हेही कळलेलं नसतं. त्यातूनच मग खूपवेळा ऐनवेळी मुलं स्टेजवर यायला स्पष्ट नकार देतात आणि पालकांचा हिरमोड होतो. अशा वेळी जेव्हा मुलांवर पालक ओरडतात, जबरदस्ती करतात तेव्हा मुलं अशा सगळ्या प्रकाराचा धसका घेतात. कधी कधी या प्रकाराने स्पध्रेची भीती बसते. ती पुढे यायला बुजतात. एवढंच नाही तर ज्या विषयाची स्पर्धा असते त्या विषयाबद्दलच नावड निर्माण होते.  यामुळे मुलाच्या भविष्यातील एकूण विकासात फार मोठा अडथळा निर्माण होतो. म्हणूनच असं वाटतं लहानपणी मुलांना स्पर्धामधून जोखणं, त्यातल्या यशापयशा वरून त्याची पात्रता ठरविणं योग्य नाही. एखाद्या गोष्टीत मूल यशस्वी होत असेल तरीही जिथेतिथे प्रत्येक ठिकाणी नेण्याचा अट्टहासही टाळला पाहिजे. एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणं, सराव करणं, त्यातलं चितंन करणं या सगळ्याला एक निवांतपणा लागतो. सतत कार्यक्रम, स्पर्धाना जात राहिल्याने मुलांना खऱ्या अभ्यासासाठी लागणारा शांतपणा मिळत नाही. आणि त्याची खरी वाढ खुंटते. खरं कौशल्यं, खऱ्या ज्ञानापासून दूर राहून केवळ परीक्षकांना आणि प्रेक्षकांना जिंकण्याची हातोटी मुलं फारतर यातून मिळवू शकतील. कधीकधी अशा बाबतीत पालक म्हणून मुलांवर आपण अतिरेक करतोय, हेही कळत नाही. ज्या मुलांच्या बाबतीत पालक अशा गोष्टी वेळीच ओळखून थांबवत नाहीत, तिथे या मोहमयी जाळ्याची पकड मुलाचं भविष्यातील जीवन नासवू शकतात. खूप लहानपणीच मुलांच्यातली निरागसता संपते. कधी कधी यशाची हवा त्यांच्या डोक्यात जाते.
आधुनिक जीवनशैलीचा ‘असमाधान’ हा शापच आहे. वर्तमानात न जगता भविष्यात काहीतरी मिळेल या आशेने ते सतत धावायला शिकवते. सतत दुसऱ्या बरोबरची तुलना, आपण मागे पडू या भीतीने आपल्याबरोबर मुलांनाही ग्रासले आहे. ‘शिक्षणक्रांती हीच खरी क्रांती’ या पुस्तकात ओशो म्हणतात, ‘आपली शिक्षणपद्धती तुलना शिकवते, भय शिकवते, प्रलोभनं शिकवते, ईष्या आणि प्रतिस्पर्धा शिकवते. ही शिक्षणपद्धती महत्वाकांक्षेच्या ज्वराची दीक्षा देते. असलं हे शिक्षण ज्ञानाचं प्रसारक कसं होणार? असलं हे शिक्षण मुक्तिदायी कसं होणार? असा माणूस निरोगी कसा होणार? तेव्हा स्पर्धा हव्यात की नकोत? त्या कशा हव्यात? त्यांना काही चांगला पर्याय देता येईल का? याचा विचार पालक म्हणून आपल्यालाच करायला हवा. कारण आरोग्यदायी समाजाची उभारणी करताना स्पध्रेपेक्षा सहकार्याचं मूल्यच अधिक महत्त्वाचं ठरतं!

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...