भूतकाळ विसरताना..

मुक्ता मनोहर  , लोकरंग,लोकसत्ता 
आज या वर्षांचा शेवटचा दिवस. नव्या आशा, आकांक्षांचं नवं वर्ष उद्यापासून सुरु होईल, पण ते आनंददायी होण्यासाठी मागच्या सगळ्या कटू आठवणी विसरायला हव्यात. तेच सांगणाऱ्या या काही सत्यकथा. भूतकाळ हा भूतकाळातच ठेवायला हवा हे सांगणाऱ्या. त्याचं ओझं वर्तमानावर आणि भविष्यकाळावर ठेवायचं नसतं, हे शिकवणाऱ्या. प्रेरणादायी, स्फूर्र्तीदायी..
ती शक्ती तुम्हालाही मिळो. नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा.

ते लढवय्या आहेत.. जन्माने दलित असले तरी तसं मानायला नाकारणारे.. पण त्याचमुळे मुलीवर झालेल्या बलात्काराविरुद्ध झटणारे.. आणि त्याचमुळे हातपाय गमावून बसलेले.. मात्र हार न मानता जे झालं ते तिथेच ठेवून पुढे पुढे जात राहणारे. ते कारण त्यांच्यासमोरचं उद्दिष्ट स्पष्ट आहे.. भविष्य नक्की आहे. उद्याचं स्वप्न सुंदर आहे..
बंतसिंग पंजाबला परत गेले. जाताना न उलगडलेल्या कितीतरी महत्त्वाच्या कोडय़ांचं एक गाठोडं त्यांनी माझ्या मस्तकावर ठेवलं. ते मानसा जिल्ह्य़ातल्या त्या छोटय़ाशा बुर्झ जब्बर गावी परत गेले. एखाद्या माणसाचे दोन्ही हात आणि पाय काहीसे अचानकपणे डॉक्टरांना कापावे लागले तर तो माणूस सहजपणे किती तासात नॉर्मल होऊ शकतो? शिवाय गाणंही म्हणू शकतो? इतका तातडीचा आत्मविश्वास त्याला कशामुळे येऊ शकतो? आपण आता परावलंबी झालो आहोत, आपलं भविष्यही अंधकारमय असेल अशा सगळ्या भीतीतून तो कसा सावरू शकतो? त्याची विचारशक्ती किती लौकर ताळ्यावर येऊ शकते? मग असं काय घडलं की, पंजाब सरकारला त्यांना मदत देणं भाग पडलं. असे कितीतरी प्रश्नच प्रश्न.
खरं तर बंतसिंग पुण्यापर्यंत माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी येऊ शकले हेच पहिलं कौतुकभरलं आश्चर्य. बंतसिंग म्हणजे दोन्ही हात कोपराच्या वर कापून टाकावे लागलेले, एक पाय गुडघ्याच्या वर कापलेला आणि उरलासुरला पाय हाही जवळजवळ निर्जीवच असलेला. म्हणजे म्हटलं तर हातपाय नसलेलं एक धड.  व्हीलचेअरच्या आधारानं जगणारा तो माणसाचा देह. केवळ देह नाही, तो आहे आवाज, परिस्थितीला शरण न जाणारा. तो देह म्हणजे साक्षात तरल आत्मविश्वास, संवेदनक्षमता. असं बरंच काही. व्हीलचेअरला जखडलेले वैज्ञानिक स्टिफन हॉकिंग त्यांच्या उत्तुंग संशोधनामुळे साऱ्या जगाला विस्मयात बुडवून टाकतात. अंतराळातही जाण्याची जिद्द बाळगतात. बंतही साऱ्या कष्टकरी समुदायाला आपल्या आवाजानं कवेत घेऊ बघतात. दडपलेल्यांना जागं करू बघतात. बंतसिंगही जगाला नीट उलगडले तर कदाचित माणूस असा कसा घडू शकतो, या विस्मयात जग बुडून जाईल.
अपघातामुळे किंवा कोणत्याही आजारामुळे बंतसिंगांवरही व्हीलचेअरला खिळून राहण्याची वेळ आलेली नाही. त्यांच्यावर सूड उगवणाऱ्यांनी त्यांच्या जीवनसंघर्षांलाच जणू काय आव्हान दिलं. जे आव्हान बंतसिंगांनी अवघ्या २४ तासाच्या अवधीतच सहजगत्या पेललं. कापून काढाव्या लागलेल्या हात-पायातून रक्तही ठिबकायचं थांबलेलं नव्हतं आणि पायातही डॉक्टरांनी घातलेल्या बोचऱ्या सळ्या ताज्याच होत्या. तेव्हा ते नुकतेच शुद्धीवर यायला लागले होते. मग आपले हात-पाय कायमपणे सोडून गेल्याचं आलेलं भान हुंदक्यात रूपांतरित झालं नाही. छाती दु:खानं भरून आली नाही. आली असली तरी निमिषार्धात बंतसिंगांनी ते ओझं दूर केलं आणि हॉस्पिटलातच ते बुलंद आवाजात गाणी म्हणायला लागले. त्यांच्या आवाजाने, त्यांच्या स्मरणशक्तीने, त्यांच्या आवाजातल्या सुरांनी त्यांच्या शब्दांना सहजपणे साथ केली. अन्य कोणत्याही वाद्यांची संगत नाही तरीही त्यांच्या आवाजानं साऱ्या हॉस्पिटलच्या रुग्णांना जागं केलं. जणू एक चैतन्यच दिलं. जादू मानवी आवाजातल्या सुरांची, जादू एका दीर्घकाळ पारंपरिक चालींची, जादू गाण्यातून ओव्यातून दडपलेल्या भावनांना मुक्तपणे व्यक्त करण्याची. जादू अडाणी माणसानंही कवन रचण्याची, त्याच्या डोक्यातल्या कॉम्प्युटरमध्ये त्याची चिरस्मरणीय नोंद होण्याची.
बंत अशी कोणती गाणी गाऊ शकले? त्यांनी गाणी म्हटल्यामुळे माझ्या मनात प्रश्न आलेच. स्वरांना शब्दांची जोड मिळून तयार होणारं भावगीत गाणं महत्त्वाचं की मानवाच्या सगळ्याच कोमल तरल भावना शब्दांना वगळून अद्भुत स्वरातून-रागातून उलगडून दाखवणं महत्त्वाचं? शब्द महत्त्वाचे का त्यांनी स्वत:त दडवलेल्या मानवी संबंधातली अभिव्यक्ती महत्त्वाची? बंतसिंग गाणी म्हणत होते संतराम उदासी यांची. संतराम उदासी हेही बंतसिंगांसारखेच स्वत: एक दलित शेतमजूर कुटुंबात जन्माला आलेले.
खरं तर पंजाब म्हणजे हरित क्रांतीचा समद्ध प्रदेश. ट्रॅक्टर युगात प्रवेश केलेली शेती आणि जगाच्याच बाजारपेठेत मानाचं स्थान मिळवलेल्या श्रीमंत शेतीचा प्रांत. असं असलं तरी खेडय़ापाडय़ातल्या भूमिहीनांच्या वाटय़ाला काय? भूमिहीन कोण? अर्थातच मोठय़ा संख्येनं दलित व खालच्या जातीजमाती. दलित असणं म्हणजे भूमिहीन असणं. दलित असणं म्हणजे पिढय़ान्पिढय़ा शिक्षणापासून वंचित असणं. दलित असणं म्हणजे सर्वसामान्यांचं आयुष्य वाटय़ाला न येणं.  या विरोधात चळवळी होऊनही भारतातल्या सर्वच प्रांतांमध्ये, दूर दूर पसरलेल्या खेडय़ांमध्ये गावकुसाबाहेरच्या व्यथा संपलेल्या नाहीत. जेव्हा दलित शेतमजूर किमान वेतन मागायला, कामाच्या अटीतटी ठरवायला, कर्जाचा खोटा डोंगर झुगारून द्यायला, शेतमजूर म्हणून किमान वेतन मागायला, उभे राह्य़ला लागतात तेव्हा मग हा सगळा उठाव मोडायला उच्च वर्ण आणि सधन वर्ग हातात हात घालून पुढे सरसावतात. वस्त्याच्या वस्त्या पेटवल्या जातात. एकाच वेळेस कुटुंबांच्या कुटुंबांना बंदुकीच्या गोळ्यांनी पिंजून काढलं जातं. तरीही समानतेच्या मानवी हक्कासाठी उठलेला आवाज बंद होऊ शकत नाही. संत उदासी म्हणजे हाच पंजाबमधल्या दलित श्रमिकाचा उठलेला आवाज होता.  त्यांच्या राजकीय- सामाजिक- जातिभेदाच्या विरोधातल्या गीतांवर बंतसिंगांचा पिंड पोसलेला. त्या गाण्यातूनच त्यांचा आत्मसन्मान जागा झाला. त्यांनी दलितांच्या वाटय़ाला असलेलं सालदार म्हणून जमीनदाराच्या पदरी गुलाम म्हणून जगण्याचं जीवन नाकारलं. ते छोटे-मोठे उद्योग, कधी डुकरं पाळून तर काही वस्तू विकून गुजराण करत होते आणि त्याचवेळेस त्यांच्यात एक क्रांतिकारक आकार घेत होता. ते इतर दलित श्रमिकांना संघटित करत होते.  समानतेचं स्वप्न या भूतलावर उतरवण्याच्या चळवळीतले ते एक शिलेदार होते. ते मजदूर मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते झाले. साहजिकच गावातल्या प्रस्थापित जमीनदार, उच्चवर्णीयांच्या डोळ्यात ते सलत होते. उद्या राजकारणातही ते आव्हान बनतील या भीतीनं त्यांच्या गावातले विरोधक संधीचीच वाट बघत होते.
बंतसिंगांच्या अल्पवयीन मुलीवर  २००० साली गावातल्या दोन उच्च जातीतल्या मुलांनी बलात्कार केला. त्या विरोधात पोलीस तक्रार करणारच असा निश्चय बंतसिंगांनी केला. गावातल्या प्रतिष्ठितांनी त्यांना त्यापासून सतत रोखण्याचा पवित्रा घेतला. पण बंतसिंग कशालाच बधले नाहीत. त्यांना माहीत होतं, आपण एक कार्यकर्ता आहोत. आपण माघार घेणं म्हणजे अशा प्रसंगात इतरांचीही तक्रार करण्याची हिंमत कापून टाकणं होईल. म्हणून त्यांनी आणि त्यांच्या मुलीनं जिद्दीनं केस लढवली. मग बलात्काऱ्यांना शिक्षाही लागली. त्या निकालानंतर मग हे मारहाणीचं पर्व घडवलं गेलं.
जेव्हा बंतंवर हल्ला झाला, तेव्हा बंतसिंग आंध्रमध्ये होणाऱ्या शेतमजूर परिषदेच्या प्रचारकामात व्यग्र होते. मारणाऱ्यांना वाटलं, बंतसिंग मेले. पण ते जिवंत होते. ते जिवंत राहिले आणि हात-पाय गेले तरी माझं डोकं आणि आवाज शिल्लक आहे असं म्हणून जेव्हा बंत उभे ठाकले तेव्हा पंजाबमधला, उत्तर प्रदेशमधला, कष्टकरी शेतमजूर त्यांच्या मागं खंबीरपणे उभा राहिला. बंतंच्या आवाजाला असंख्य आवाजांनी साथ केली. पंजाब सरकारला या आवाजानं नमवलं. बंतंना काही मदत देण्याला त्यांनी भाग पाडलं.
असे बंतसिंग जेव्हा प्रत्यक्ष बघितले तेव्हा प्रथम माझ्या पोटात खड्डाच पडला. काहीशा संकोचानं मी त्यांना पुस्तक प्रकाशनाला या म्हटलं आणि वर असंही म्हटलं, मुझे मालूम है, पुना आने के लिये आपको बहोत तकलीफ होगी. यावर बंत म्हणाले, तकलीफ ये क्या लब्ज है? मुझे मालूम नही. त्यांचे हे उद्गार ऐकून आमच्यात उत्साह संचारला. मग बंतसिंग, त्यांची पत्नी, सुखदर्शन नटसिंग त्यांची पत्नी असे पुण्याला आले. व्हीलचेअरवर बसलेले बंतसिंग दिलखुलास बोलत कार्यकर्त्यांत चार दिवस मिसळून गेले. रातको मच्छरने काटा तो नही? कोणीतरी त्यांना विचारलं, त्यावर बंत म्हणाले, डॉक्टरने इतना काटा है, अब मच्छर क्या काटेगा? ..असेच स्वत:वरही विनोद करणं सुरू असायचं. असं हे जिवंतपण बऱ्याच उत्सुकता निर्माण करुन तर गेलंच. पण भूतकाळातल्या घटनांमुळे रडत न बसता त्यातून सकारात्मक पावलं उचलायची असतात हेही अधोरेखित करुन गेलं.


No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...