अंधारातली ‘दृष्टी’

ज्ञानोबा सुरवसे

altविमलबाई धोंडिराम फड या जन्मानेच अंध. पण तीव्र स्मरणशक्ती, उपजत स्पर्शज्ञान  आणि इच्छाशक्तीच्या जोरावर उत्तम संसार करताहेत. घरातला स्वयंपाक छान करतातच पण त्याचबरोबर रोजंदारीची कामे, उसाची लागवड, पेरणी,  खुरपणी, कापूस वेचणी करत समाधानाचं जीवन जगताहेत...
परळी तालुक्यातील बेलंबा या गावातील विमलबाई धोंडिराम फड  या महिलेची ही गोष्ट!  सकाळी उठल्यावर घरातली नाश्ता, स्वयंपाकाची कामं उरकायची. मुलाबाळांचं न्हाणं-धुणं करून त्यांना शाळेसाठी तयार करायचं.. कुणी म्हणेल, यात काय विशेष? ही कामं तर सर्वच स्त्रिया करतात. त्यात विमलबाईंचं कौतुक कशासाठी? पण हे तुम्हाला प्रत्यक्ष विमलबाईंना भेटल्यावर, बघितल्यावरच कळेल. कारण विमलबाई या जन्माने आंधळ्या आहेत; परंतु त्यांची घरकामातली सफाई पाहून समोरचा डोळस माणूसही आवक्  होऊन जातो. विशेष म्हणजे घरातल्या कामांपुरताच त्यांची ही सफाई सीमित राहिलेली नाही; आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून त्या रोजंदारीवर कामं करतात, तीही सफाईदारपणे!
आपली कामे डोळसांप्रमाणेच उलट त्यांच्यापेक्षा काकणभर जास्तच सफाईने करणाऱ्या विमलबाई, या गावातील लोकांच्या कौतुकाचा आणि औत्सुक्याचा विषय बनल्या आहेत. परंतु आपण काही विशेष करतो आहोत, याची पुसटशी भावनाही त्यांच्या मनाला शिवलेली नाही. ‘मी आपलं माझं कामं करतेय, त्यात कसलं आलंय कौतुक,’ अशीच साधी-सरळ त्यांची प्रतिक्रिया असते.
विमलबाई धोंडिराम फड यांचं अंदाजे वय चाळीसच्या आसपास. त्या मूळच्या ब्राह्मणवाडी, ता. जिंतूर, जि. जालना येथील. वडील आत्माराम घुगे यांची परिस्थिती अतिशय बेताची होती. जन्मापासूनच त्या अंध असल्याने आई-वडील खूप जपत. या मुलीचं कसं व्हायचं, हा विचारही त्यांना डाचत असे. परंतु कालांतराने विमलने त्यांची ही काळजीच दूर केली. विमल हळूहळू घरातली सर्व कामे करू लागल्या. सुरुवातीला थोडं ते जड गेलं. परंतु सराव आणि आई-वडिलांच्या मदतीने या घरातील प्रत्येक कामात माहीर झाल्या. प्रत्येक काम त्या मनापासून करू लागल्या. विमलबाई सांगतात, ‘‘माझ्यापेक्षा आई-वडिलांनाच माझ्या अंधपणाची काळजी अधिक वाटत असे, विशेषत: आईला. परंतु मला लहानपणापासून आपल्याला हे जग बघता येत नाही, याची खंत वाटली नाही. उलट मी जससशी कामं शिकत गेले, तसतसा माझा आत्मविश्वास वाढत गेला. डोळसपणाचा अनुभवच मी कधी घेतला नसल्याने, ‘दिसणं’ खूप काही महत्त्वाचं आहे, ही भावनाच कधी मनाला शिवून गेलेली नाही. लहानपणी मी प्रत्येक गोष्ट आईला विचारून करीत असे. तिच्या देखरेखीखालीच मी घरातली सर्व कामं शिकले. सुरुवातीला चूल पेटविताना, तव्यावर भाकरी भाजताना हात भाजे, हाताला फोड येत. पण मला ते फोड दिसतच नसल्याने, त्या फोडांचं ‘दुखणं’ फारसं जाणवलं नाही. त्यावर उपाय म्हणून हाताला कापड बांधून मी भाकरी शेकू लागले, पण भाकरी करणं सोडलं नाही. आता इतका सराव झालाय, की त्यात काही विशेष वाटत नाही.’’
विमलबाई अंध असल्याने आपल्या लेकीला आयुष्यभर एकटेपणाचंच जीवन जगावं लागणार, तिच्या वाटय़ाला संसाराचं सुख कधीच येणार नाही, असं विमलबाईंच्या आई-वडिलांना वाटे. परंतु परळी तालुक्यातील बेलंबा येथील धोंडिराम फड यांनी विमलशी लग्न करण्याची तयारी दर्शविली आणि त्यांना हायसं वाटलं. धोंडिराम फड यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने त्यांनाही कोणी मुलगी देत नव्हतं. त्यामुळे त्यांनी या लग्नास होकार दिला.  सुमारे १६ वर्षांपूर्वी या दोघांचा विवाह झाला.
बेलंबा येथे विमलबाई आणि धोंडिराम यांचा संसार सुरू झाला. सुरुवातीपासून घरकामाची आवड आणि स्वावलंबी होण्याचा ध्यास असल्याने सासरी आल्यापासून विमलबाईंनी घरातील कामामध्ये स्वत:ला झोकून दिलं. त्यांच्या सासूबाईंनीही त्यांच्या या प्रयत्नांना सकारात्मक पाठिंबा दिला. घरातील कोणती वस्तू कुठे आहे, नवीन वस्तू कुठे ठेवायची, याचा पूर्ण विचार त्यांच्या डोक्यात असायचा. त्यांचे पती धोंडिराम सांगतात, की उत्तम स्मरणशक्ती आणि स्पर्शज्ञानाचं उपजत ज्ञान या जोरावच विमल सगळी कामं करते. अर्थात, तिच्या या गुणांना तिने इच्छाशक्तीचीही जोड दिली आहे.कोणतेही काम आत्मसात करण्यात तिचा हातखंडा आहे.
स्वयंपाकासाठी लागणारे गहू, ज्वारीचे पीठ कोणत्या डब्यात आहेत, तसेच मीठ -तिखट कोणत्या बरणीत ठेवले आहेत, हे सर्व त्या व्यवस्थित लक्षात ठेवतात. सासरी आल्यावर त्यांना हे सर्व पुन्हा नव्याने शिकावं लागलं. सुरुवातीला थोडी अडचण आली, पण नंतर सराव होत गेला. घर सारवणे, सडा टाकणे, चुलीवर पाणी तापविणे, स्वयंपाक करणे अशी सर्व कामे हळूहळू नव्याने अंगवळणी पडली. त्यांना काम करताना पाहून गावातील बाया-बापडय़ांना कौतुक, कुतूहल वाटायचं, कोणी मदतही करायचं.
धोंडिराम फड हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. बांधकामाचा पाया खोदणे, कच्चे बांधकाम करणे किंवा कोणाच्या  तरी शेतात रोजंदारीने काम करणे, असा त्यांचा उद्योग! त्यातूनच मिळणाऱ्या पैशावर घरप्रपंच चालतो. पती एकटाच कमावतो आणि आपण घरी बसतो, हे विमलबाईंच्या स्वाभिमानी स्वभावाला पटेना. त्यांनी पतीबरोबर रोजंदारीची कामे करण्याचा हेका धरला. धोंडिराम यांनी सुरुवातीला विरोध केला, पण विमलबाईंच्या हट्टापुढे त्यांचे काहीही चालले नाही. ते विमलबाईंना आपल्याबरोबर खोदकाम करायला घेऊन गेले. सुरुवातीला त्यांनी विमलबाईंना खोदलेली माती टोपल्यात भरून कुठे टाकायची ते समजावून सांगितले. आणि आश्चर्य म्हणजे धोंडिराम यांनी खोदकाम केलेली माती विमलबाई सांगितलेल्या ठिकाणी सराईतपणे टाकू लागल्या. सुरुवातीला काम देणाऱ्यांनी त्यांच्यावर अविश्वास दाखविला, परंतु विमलबाईंचा आत्मविश्वास आणि काम करण्याची वृत्ती, गती पाहून त्यांना पुढची कामे मिळू लागली.
विमलबाईंनाही आता कामाची सवय लागली. हळूहळू त्यांनी शेतातील कामे करण्यास सुरुवात केली. उसाची लागवड, पेरणी, खुरपणीआदींसोबत कापूसवेचणीतही त्या तरबेज झाल्या. शेतात गेल्यावर कोणते पीक खुरपायचे आहे याची व्यवस्थित माहिती दिली, की अगदी व्यवस्थितपणे खुरपणी होते. यात पिकाला धक्काही न लागता केवळ गवतच काढणे कसे जमते, हे त्यांनाही व्यवस्थित सांगता येत नाही. अन्य स्त्रियांप्रमाणे त्या शेताच्या कामासाठी रोज जातात आणि त्यांच्याबरोबरीने काम करून तेवढेच पैसे कमावतात. गावातील मंडळी त्यांना आवर्जून शेतीच्या कामासाठी बोलावतात. विमलबाईंनाही आपण काही वेगळे करतोय, असे वाटत नाही. आपल्या अंधत्वाबद्दल त्यांना खेद, दु:खही नाही. उलट जिद्दीने मुलीला, मुलाला शिकवून मोठे करण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.
विमलबाई-धोंडिराम यांना पाच वर्षांची मुलगी आणि एक वर्षांचा मुलगा आहे. आता मुलगी मोठी झाल्याने ती विमलबाईंना मदत करते. त्यामुळे विमलबाईंच्या होत्या-नव्हत्या त्या अडचणीही दूर झाल्या आहेत. मुलगी त्यांचा मोठा आधार बनली आहे.
दृष्टी नसतानाही मुलांचे संगोपन विमलबाईंनी कसे केले, हा प्रश्न सर्वांना  पडतोच. त्या सांगतात, ‘त्यांची दोन्ही बाळंतपणं त्यांची आई- प्रयागबाई घुगे हिने केली. त्यामुळे संगोपनात तिचाच जास्त सहभाग होता. सासरी मात्र पतीची मदत मिळाली. मुलं लहान असताना अनेक अडचणी आल्या; परंतु त्यावर मात करण्यात त्या यशस्वी झाल्या. आपल्या मुलांना त्यांना खूप शिकवायचे आहे. त्यासाठी पैसाही हवा. म्हणून आता ऊसतोडणीच्या कारखान्यात काम करणार आहेत आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठविणार आहेत.
विमलबाई या अंध, अपंगांना निश्चितच प्रेरणादायी ठरतील. त्यांनी आपल्या अंधत्वाचं भांडवल करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला नाही, तर जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठल्याही प्रकारच्या अपंगत्वावर मात करता येते, हेच त्यांनी सिद्ध केले आहे. अंध, अपंग व्यक्तींकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन सहानुभूतीचा असतो.  देवाने या माणसांवर खूप मोठा अन्याय केला आहे, असेच काहीसे धडधाकट माणसांना वाटत असते. परंतु विमलबाईंचे हे जितेजागते उदाहरण सर्वसामान्यांच्या या विचाराला नक्कीच धक्का देणारे आहे आणि अंधांना प्रकाशाची वाट दाखविणारे आहे.
संदर्भ सेवा: लोकसत्ता

1 comment:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

विमलाबाईची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. यांची हकीगत जगासमोर यायला हवी. १०वि पास झालेल्या गरीब मुलांसाठी म. टा. दरवर्षी शैक्षणिक मदत मिळवून देते तसा उपक्रम या कुटुंबासाठी त्यांनी केला तर किती बरे होईल! माझी खात्री आहे कीं त्यांचेसाठी लोक आनंदाने चेकबुक हातात घेतील!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...