इडू-फिडूच्या सुन्न जगात



इम्फाळहून निघालो
‘चुराचंदपूर’ या जिल्ह्याच्या गावी जायचं होतं.
हॉटेलच्या बाहेर पडताना दोनच गोष्टी जाणवत होत्या- एक थंडीचा पहारा आणि दुसरा सैन्याचा. बाकी सामसूम सन्नाटा.
त्यादिवशी कुठल्याशा अण्डरग्राऊण्ड गटानं म्हणजेच यूजींनी ‘बंद’ पुकारला होता. त्यांच्या एका म्होरक्याला सैन्यानं मारलं म्हणून तो कडकडीत ‘बंद’ होता.
‘बंद’ म्हणजे ‘बंद.’ बाहेर पडायची परवानगी ना यूजी देतात, ना लष्करी जवान. जगायचं असेल तर माणसांनी मुकाट घरात बसायचं या मुद्यावर बहुतेक दोन्ही बाजूंचं एकमत असावं. माणसं करतील काय? बाप भीक मागू देत नाही, आई जेवायला घालत नाही. उपाशी बसणं हाच एक पर्याय. तर असंच ‘तोंड बांधून’ बसलेलं इम्फाळ पाहत आम्ही पुढे सरकलो. आम्ही म्हणजे ‘सेंटर फॉर अँडव्होकसी अँण्ड रिसर्च’ या संस्थेचे काही सहकारी आणि भारतभरातून आलेले काही पत्रकार. गाडीवर ‘प्रेस’ असं ठळक अक्षरात लिहिलेलं होतं. हा म्हणे मणिपुरातला नियमच. बंद असेल तर तीनच पाट्या असलेली वाहनं रस्त्यावरून धावू शकतात. एकतर लष्कराच्या गाड्या, सरकारी वाहनं नाहीतर मग प्रेसवाले.
जिवंत ठेवेल, सुख देईल असं काय आहे अवतीभोवती.? पालापाचोळ्यासारखं जगणं. स्वप्न पहावीत, आयुष्य घडवावं, काहीतरी कमवावं असं वाटायला भाग पाडणारं काय आहे वास्तवात.? तर काहीच नाही. जगण्याची ‘किक’च बसत नसेल तर वेगळी ‘किक’ शोधत एका वेगळ्याच ‘हाय’मध्ये जातात लोक.! त्या नशिल्या जगात हरवून टाकतात स्वत:ला.!
काडीपेटीतल्या काडीवर जितका ‘गूल’ असतो साधारण तेवढा हेरॉईन नावाचा अमली पदार्थ पन्नास रुपयांना मिळतो, त्याला इथे ‘पीस’ म्हणतात. त्या एका पीसवर हवी ती किक बसली की काम फत्ते, नाहीतर एकामागून एक चार-पाच पीस टोचावे लागतात शरीरात. पण म्हणजे खिशात दोनशे रुपये असले तरी दिवसभर आत्मानंदी टाळी लागल्यासारखं हरवून जाता येतं. ते हरवणं अवघड नाही, आपण मेडिकल स्टोअर्समधे जाऊन डोकेदुखीची गोळी विकत घेतो तितकं सोपं आहे इथे ड्रग्ज मिळवणं.
इम्फाळमध्ये भेटलेच होते मी अशा कितीतरी ‘इडू’ना. इडू म्हणजे इंजेक्टिंग ड्रग युर्जस. स्वयंसेवी संस्थांच्या परिभाषेत शिरेवाटे अमली पदार्थ टोचून घेणार्‍या पुरुषांना ‘इडू’ म्हणतात. आणि बायकांना ‘फिडू’ म्हणजे फिमेल इंजेक्टिंग ड्रग युर्जस. किती कहाण्या त्यांच्या, वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी टोचलेल्या पहिल्या इंजेक्शनपासूनच्या. हरवलेल्या नजरांच्या आणि ड्रगच्या नशेत असतानाच शरीरात शिरलेल्या एचआयव्हीच्या विषाणूच्या.
डोकं ठिकाणावर ठेवून नशा न करता जगायचं आव्हान वाटावं इतकं आजूबाजूचं समाज वास्तव भयानक. त्यापेक्षा सोपी वाट एकच, एक सिरिंज घ्यावी, एक ‘पीस’ शिरेत टोचून घ्यावा आणि विसरून जावं जगाला.!
असंच स्वत:ला विसरून नशेत हरवलेल्या काही महिलांसाठी एक सेंटर चालवणार्‍या पुई पचावची भेट झाली चुराचंदपूरमध्ये. शेलॉम नावाचं एक सेंटर ती चुराचंदपूरमध्ये चालवते. सहा फूट उंच, धिप्पाड ही पुई. शिलॉँगमध्ये शिकलेली, दिल्लीत जेएनयूमध्ये पदवी घेतलेली मुलगी. आपलं ब्राईट करिअर आणि दिल्लीसारखं मॉर्डन जग सोडून ही थेट चुराचंदपूरच्या मातीतच काम करायला निघाली.
तिला विचारलं, ‘तू कसं ठरवलंस परत आपल्या गावी येऊन हे काम करायचं.?’
ताडकन ती म्हणाली, ‘मै तो यहां आना भी नहीं चाहती थी.! नो बडी वॉण्ट्स टू लिव्ह हिअर. पण माझ्या वडिलांनी सुरू केली होती ही संस्था. ते म्हणत होते, ये, काम बघ. करून बघ. नाही पटलं तर परत जा. त्यांच्यासमोर काही बोलताच आलं नाही. कामाला सुरुवात केली आणि लक्षात आलं की, पळून जाणं हा पर्याय नाही. लोकांना इथं मदतीची गरज आहे. पळून जाऊ कसं चालेल.? म्हणून राहिले.!’
पुईच्या त्या आधारकेंद्रात कितीतरी बायका भेटतात. शिरेवाटे अमली पदार्थ टोचून घेणार्‍या. कुणी नवर्‍याच्या संगतीत अमली पदार्थाच्या रॅकेटमध्ये ओढल्या गेल्या, कुणी पोट भरता भरता ड्रग पेडलिंग करायला लागल्या आणि कुणी कुणी तर पोट भरण्यासाठी शरीरविक्रय करता करता नशा करायला लागल्या.
नशा करणार्‍यांत तरुणांचं प्रमाण अधिक. हातात पैसे कमी. ते ‘पीस’ विकत घ्यायला आणि स्वस्तात मिळणारी (आणि जगात अत्यंत महागडी समजली जाणारी) मरिज्युआना सिगरेट प्यायला पैसे लागतात. टोळक्यानं नशा करणारी ही माणसं मग वेगळी ‘सिरिंज आणि निडल’ का विकत घेतील? एकच सिरिंज अनेक जण अनेक वेळा वापरतात. त्यातून एचआयव्हीचा प्रसार होतो. मणिपुरात अमली पदार्थ आणि एचआयव्ही या एकाच नाण्याच्या दोन बाजू व्हाव्यात इतकं भयानक चित्र गेल्या काही वर्षांत निर्माण झालं आहे.
जेमतेम शंभर किलोमीटरवर असलेली म्यानमार बॉर्डर, तिथून येणारे अमली पदार्थ. त्यातून फिरणारा पैसा, त्यातून सहज उपलब्ध होणारी शस्त्रास्त्रं आणि घुसखोरीचे/ खंडणीचे वाढते प्रश्न. सगळं भयानक चक्र सतत गोल गोल फिरतं आणि नशेत हरवलेली माणसं त्यात प्याद्यासारखी वापरली जातात. त्यात एचआयव्हीसह जगणं वाट्याला आलं की, जगण्याची फरफट कित्येक पट वाढते.
पुईच्या केंद्रात अशीच फरफट वाट्याला आलेल्या कितीतरी जणी भेटल्या. पुरुषांना तरी घरचे पुनर्वसन केंद्रात ठेवतात. बाई थोडीच महत्त्वाची असते.? मग तिच्यासाठी कोण पैसे खर्च करील? ना त्या सेंटरमध्ये जातात ना घरी राहतात. त्यांना रस्त्यावर फेकून देण्यात येतं. एकाच घरात नवरा-बायको दोघं अमली पदार्थ टोचून घेत असले तरी नवरा घरात, बायको रस्त्यावर अशी कहाणी सर्रास दिसते. या बायकांना मग पेडलर्स हवे तसे वापरतात, कधी मारतात, कधी सैन्य आणि पोलीसवाले फायदा घेतात. कधी तुरुंगाची हवा खावी लागते आणि काहीच नाही तर एकेकटं भणंग जगणं जगावंच लागतं.
पुईच्या शेल्टरसारखी काही आधारगृह निदान त्यांना पाठ टेकण्यापुरती तरी जागा देतात. किमान आधार वाटतो अशा जागांचा आणि वाटही सापडते या नशेच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याची.!
अशी वाट सापडून, स्वत:चा काही उद्योग सुरू करत स्वत:च्या पायावर उभ्या राहणार्‍या काही जणी भेटल्या. त्या अत्यंत अभिमानाने सांगतात की, ‘मी क्लीन आहे.’ नशेतून बाहेर पडून पूर्णत: नॉर्मल आयुष्य जगण्याला ‘क्लिन’ जगणं म्हणतात इथं.
ते ‘क्लीन’ होणं सोपं नाही, कारण ‘हाय’वर असलेलं शरीर सतत ती ‘किक’ मागतं आणि ते क्रेव्हिंग थांबवणं ही सुविचार सांगण्याइतकी सोपी गोष्ट कधीच नसते.
आणि पुरुषांसाठी तर नाहीच नाही.
एकदा एखादा तरुण नशेच्या या गर्तेत अडकला की, त्याला त्यातून बाहेर काढणं हे एक आव्हान असतं. ‘सासो’ नावाच्या एका संस्थेत असे काही तरुण भेटले, जे स्वत: आधी नशा करायचे. आता त्यातून बाहेर पडत त्यांनी इतरांना ‘क्लीन’ जगण्याचा मार्ग दाखवायला सुरुवात केली आहे.
पण तो मार्ग किती खडतर असू शकतो याची जाणीव प्रत्यक्ष नशा करणार्‍यांच्या ‘हॉट स्पॉट’वर गेल्याशिवाय नाहीच होऊ शकत.
चुराचंदपूरमध्ये प्रत्यक्ष ते ‘हॉट स्पॉट’ पाहताना एकाचवेळी अनेक भावनांचा स्फोट होतो मनात.!
हॉट स्पॉट म्हणजे अशा जागा जिथं अमली पदार्थ टोचून घेणारे काही जण नियमित एकत्र येतात. नशा केल्यानंतर तिथंच पडून राहतात. हरवून जातात स्वत:च्या दुनियेत. एकाहून अधिक कितीही माणसं जिथं एकत्र येतात, त्या जागेला हॉट स्पॉट’ म्हणतात. तिथंच अमली पदार्थ विक्रेतेही असतात.
हे हॉटस्पॉट कुठे असतात.? दूर कुठेतरी, जंगलात.?
नाही. भरवस्तीत. भाजीबाजारात, कॉलेजच्या जवळ. कुठेही राजरोस दिवसाढवळ्या चालतं हे सारं. जितके सर्रास आपल्याकडे देशी दारूचे गुत्ते दिसतात तितकेच सर्रास इथे हे हॉटस्पॉट दिसतात. काही ठिकाणी तर सुलभ शौचालयाच्या जागाही हॉटस्पॉट म्हणून वापरल्या जातात. मुख्य मुद्दा असतो तो पाण्याचा. इंजेक्शन टोचायचं तर पाणी लागतं. नशेसाठी अधीर झालेली डोकी स्वच्छ पाण्याच्या शोधात का जावीत.? जे मिळेल ते पाणी, अगदी गटाराचंही वापरलं जातं. ते शरीरात टोचलं, एखादी सिगारेट फुंकली किंवा मेणबत्तीखाली धरून हुंगली की झालं काम.
ना अन्नाची गरज, ना पाण्याची. ना शरीराचं भान उरतं त्यानंतर.!
पण सगळेच दिवस असे सुखाचे कुठे असतात.?
कधी यूजीवाले बदडून काढतात. कधी पोलीस-सैन्यवाले. पण ते बरं, अनेकदा तर ओव्हरडोस होतो. त्यात जीव गमवावा लागतो. मेणबत्ती लावून ती पावडर हुंगताना (ज्याला चेस करणं म्हणतात) आगीचा भडका उडून काही जण प्रचंड भाजतात. अशी किती तडफड आणि किती प्रश्न. त्यात अनेक ठिकाणी हॉटस्पॉट हा शरीरविक्रयासाठीही वापरला जातो.
सगळं एकात एक अडकलेलं. गुंतलेलं आणि अधिक किचकट होत जाणारं.! जगणं किती अवघड होत जातं याची कल्पनाच केलेली बरी.!
पण जिथं सरकारला लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवायला वेळ नाही तिथं आरोग्याची आणि मनस्थितीची कोण काळजी वाहणार.? कोण एचआयव्ही, ड्रग्ज, हिपॅटायटिस सी यासारख्या आजारांवर उपचाराला मदत करणार.?
उरतात फक्त असे प्रश्न आणि भकास नजरा.!
त्यातून डोकं इतकं भणभणायला लागतं की, सेकंदभर वाटावं नको ही लाचारी आणि नको हे प्रश्न. त्यापेक्षा एक इंजेक्शन सोपं.
मणिपुरात हे हॉटस्पॉट शोधत हिंडताना ही अशी अस्वस्थ भावना मनात उसळी खातेच.!
दिवस घरात कोंडून घालतात आणि संध्याकाळपासून पुन्हा उजाडेपर्यंतचा काळोख खायला उठतो.!
त्या रिकामपणाची उत्तरं कोणाकडे मागायची.?
समाज असा पोखरून निघत असताना फक्त पैसा ओतून केंद्र सरकार जबाबदारी निभावल्याचे पुण्य पदरात पाडून घेऊ शकते.? पाठीचा कणाच नसल्यासारखे राज्यसरकार किती काळ यूजी आणि आर्मीच्या नावानं खडे फोडू शकते.? अर्थात याही प्रश्नांची उत्तरं आजच्या घडीला कुणाकडे नाहीत.
अशा अवस्थेत काही माणसं आपापल्या वाटा तयार करत काही उत्तरं शोधत निघाली आहे. नशा अनुभवलेलीच काही माणसं आता नशेपासून दूर जाणार्‍या वाटा शोधत आहेत. ते प्रयत्न छोटे असले तरी अंतिमत: त्याचे परिणाम मोठे दिसावेत!


- मेघना ढोके,परिक्रमा,लोकमत मंथन 

meghanadhoke@lokmat.com

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...