शफाअत खान
ब्लॅक कॉमेडी शैलीत लेखन करणारे नव्वदच्या दशकातले महत्त्वपूर्ण नाटककार ही शफाअत खान यांची ओळख. कोणत्याही गोष्टीकडे तिरकसपणे पाहण्याची उपजत दृष्टी आणि त्याच शैलीत खिल्ली उडविणारी हुकमी लेखणी व वाणी, जोडीला भवतालाचे सजग भान असलेल्या शफाअत खान यांच्या लोकसत्तेतील सदरातील हा लेख!
अलीकडेच एक बातमी वाचली. बातमी फार मोठी नव्हती. महत्त्वाचीही नव्हती. पण वर्तमानपत्रवाल्यांना माझ्यासारख्या भरपूर वेळ असणाऱ्यांसाठी काही चिल्लर बातम्या छापाव्या लागतात, तशी ती बातमी होती.
कुणीएक जैनब नावाची अकरा वर्षांची मुलगी शाळेतून घरी जात होती. बसमधून प्रवास करणाऱ्या जैनबने तिकिटासाठी कंडक्टरला दहा रुपयांची नोट दिली. कंडक्टरसाहेबांना नेमकी चिल्लर हवी होती. नोट बघून साहेब भडकले. मुलीकडे सुटे पैसे नव्हते. बाका प्रसंग उभा राहिला. मोठा वाद झाला. वाद म्हणजे साहेबच बोलले. आपल्या भाषेत बोलले. साहेबांची भाषा मराठी. पण ‘अमृताते पैजा जिंकी’पेक्षा ही मराठी वेगळी होती. अत्यंत अल्प वेळेत, अल्प शब्दांत समोरच्याचा सणसणीत अपमान करण्याचं सामथ्र्य त्या भाषेत होतं. प्रत्यक्ष हाणामाऱ्यांसाठी वेळ नसलेल्या अनेक अहिंसक मंडळींनी ही धारदार भाषा मातृभाषा म्हणून स्वीकारली आहे. तर साहेब बोलले. पण माणसं मान-सन्मानापलीकडे गेल्यामुळे काही उपयोग झाला नाही. गुंता सुटला नाही. भाषेनेही काम भागत नाही, हे लक्षात येताच साहेबांनी नियमाचा आधार घेतला. आपले नियम म्हणजे अपमान करण्याचा कायदेशीर परवानाच! कंडक्टरने दोरी ओढली. बस कुठेतरी फ्लायओव्हरवर थांबली. मुलीला उतरवून बस पुढे गेली.
ही एवढीशी- कुणाला काही वाटू नये अशी बातमी! आसपासच्या सणसणीत बातम्यांत ही बातमी काही उठून दिसत नव्हती. आता नाही म्हणायला ही किरकोळ बातमी सजविण्यासाठी जैनबचा अपमान होण्यापूर्वीचा एक फोटो छापला होता. फोटोत ती हसत होती. अकरा वर्षांची मुलगी जेवढी निरागस दिसायला हवी, तेवढी ती निरागस दिसत होती. मी आजूबाजूला शोधायचा प्रयत्न केला, पण हसणाऱ्या कंडक्टरचा फोटो मात्र दिसला नाही.
बातमीत दम नव्हता. पुढच्या चमचमीत बातम्यांकडे वळायला हरकत नव्हती. पण मनात भलतेसलते विचार वळवळायला लागले. मन कुरतडू लागले.
ही एकटी मुलगी नंतर दप्तराचं ओझं सांभाळत घरी कशी गेली असेल? तिला आपलं घर सापडलं असेल का? घर किती दूर असेल? कंडक्टरकडे चिल्लर नव्हती; पण बसमधल्या कुणाकडेच दहा रुपये सुटे नव्हते? पुलावर बस थांबवून पोरीला उतरवलं जात असताना कंडक्टरला कुणीच का रोखलं नाही? ती मुलगी आता प्रवासाचा धसका तर घेणार नाही ना? अपमानाला घाबरून शाळेत जायचं बंद तर करणार नाही ना?
अशा वेडय़ावाकडय़ा चिल्लर विचारांचा त्रास होऊ लागला. काय करावं? मेडिटेशन वगैरे शिकून घ्यायला हवं. आसपास अनेक ठिकाणी शिबिरं भरत असतात. शिबिरात जाऊन आलेले असल्या चिल्लर बातम्यांचा त्रास करून घेत नाहीत. आनंदात असल्यासारखे राहतात. शेवटी आनंदी होणं महत्त्वाचं!
माणसाला एन्जॉय करता आलं पाहिजे!
आंबोलीत दोन खून
एकदा सकाळी सकाळी सर्व विसरून आयुष्य एन्जॉय करीत बसलो होतो. आपल्याला आनंद व्हायलाच हवा, हे ठरवून टाकलेलं असल्यामुळे आनंदही वाटत होता. हा आनंद असाच आयुष्यभर टिकवायचा, जपायचा, आनंदात भर घालायची; पण आनंद कमी होऊ द्यायचा नाही, असे सुविचार मनात घोळत असतानाच एक बातमी वाचली. टाळायचा प्रयत्न केला; पण बातमीने गाठलंच! त्या बातमीने आपला आनंद पंक्चर होतो की काय, असं वाटायला लागलं.
मुंबईत अंधेरीजवळ आंबोली नावाचा एरिया आहे. मुंबईत जिथे मनुष्यवस्ती- तिथे बार अॅण्ड रेस्टॉरंट असायलाच हवेत, असा कायदाच असल्यामुळे आंबोलीतही अनेक बार आहेत. आपल्या एरियातला बार चालविण्याची जबाबदारी तिथल्या नागरिकांवरच येऊन पडल्यामुळे लोक बारमध्ये जातात.
ही घटना ‘आंबोली बार अॅण्ड किचन’मध्ये घडली. ‘कर्तव्यदक्ष’ नागरिकांमुळे हे हॉटेल कायम गजबजलेलं असतं. संध्याकाळी सर्व प्रकारचे गरीब, श्रीमंत लोक आयुष्य एन्जॉय करण्यासाठी इथे जमतात. सरकारी अधिकारी कॉन्ट्रॅक्टरबरोबर महागाईवर बोलत बसलेले असतात. काही मित्र मैत्रिणींसोबत गंमत करीत असतात. काही माणसं सहकुटुंबही येतात. एकमेकांना ठाऊक असलेल्या सुखदु:खाच्या गोष्टी पुन:पुन्हा बोलून संध्याकाळ एन्जॉय करतात.
तर बातमीतल्या त्या संध्याकाळी चार तरुण आणि सोबत काही तरुणी खाणंपिणं संपवून हॉटेलच्या बाहेर पडले. रात्रीचे साडेदहा वाजले होते. मुंबईत रात्रीचे साडेदहा म्हणजे ऐन संध्याकाळ! समोरचा रस्ता गजबजलेला होता. पानाच्या टपरीवर अनेक सभ्य व काही असभ्य माणसं पान चघळत उभी होती. शेजारीच एका राजकीय पक्षाचं कार्यालय होतं. त्यात स्वत:च्या घरी नकोसे झालेले चार-पाच लोक ‘समाजकार्य’ करीत बसले होते. समोरच्या कॅफेत अनेक तरुण देशातला भ्रष्टाचार संपविण्यासाठी प्राणाची आहुती देण्याच्या गोष्टी करीत कॉफी पीत होते.
तर बातमीतले तरुण हॉटेलच्या बाहेर आले तेव्हा पानाच्या टपरीवर काही टगे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींची छेड काढत उभे होते. स्त्रियांची छेड काढण्याचा छंद अनेकांना असतो. संधी मिळाली की भलेभले आपला हा छंद पूर्ण करून घेतात. हिंदी सिनेमावाले त्यांना साहित्य पुरवतात. नवीन युक्त्या सुचवतात. आपलं छेड काढण्याचं ज्ञान ‘अपडेट’ करण्यासाठी अनेक लोक नव्या सिनेमांना गर्दी करतात. नव्या युगाच्या युक्त्या समजावून घेतात.
टपरीवरचे टगे हॉटेलातून बाहेर पडलेल्या तरुणांसोबतच्या मुलींची छेड काढू लागले. तरुणांना हे आवडलं नाही. त्यांनी टग्यांच्या छंदाला विरोध केला. टगे भडकले. बाचाबाची, धक्काबुक्की झाली. टगे एन्जॉय करीत असताना त्यांना सहसा कुणी अडवत नसे. क्षमाशील पोलीसही समजुतीनं वागत. टगे आपल्या छंदातून वेळ काढून राजकीय पक्षाचं कार्यही करीत. नेत्याचा वाढदिवस असला की मोठमोठी रंगीत होर्डिग्ज लावून आपला एरिया सजवीत. होर्डिग्जवर नेता, नेत्याची कायदेशीर फॅमिली, शेजारी इतिहासातल्या काही व्यक्ती व सर्वात खाली हसणाऱ्या टग्यांचे फोटो असत.
अपमान झालेले टगे तात्काळ तिथून आपल्या वस्तीत निघून गेले. त्यांनी वस्तीतल्या इतर टग्यांना गोळा केलं. आपल्यावर झालेल्या अन्यायाची करुण कहाणी त्यांना ऐकवली. इतर टगेही गहिवरले. आपल्या आनंदात विष कालवणाऱ्यांना वेळीच धडा शिकवायला हवा, अन्यथा जगात आनंद नावाची गोष्टच उरणार नाही, हे सर्वाना पटलं. त्यांनी स्टम्प्स, हॉकीस्टिक्स बाहेर काढल्या आणि ते पीडित टग्यांसोबत मॅच खेळायला हॉटेलच्या दिशेने धावले. टग्यांच्या सुदैवाने त्यांना अडवणारे तरुण अजूनही हॉटेलसमोरच रेंगाळत होते. टग्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. पण मधे कुणी पडलं नाही. असंख्य माणसं हा अस्सल रिअॅलिटी शो एन्जॉय करीत उभे राहिले, पण कुणी त्यांना अडवलं नाही. या हल्ल्यात दोन तरुण मारले गेले.
पुढे पोलीस आले. टग्यांच्या वस्तीत शिरले. टगे दडून बसले होते. पोलिसांना बघून वस्तीतले लोक भडकले. टग्यांची काही चूक नव्हती. टगे फक्त आपल्या आनंदाच्या रक्षणासाठी लढले होते. पोलिसांनी निष्पाप टग्यांना पकडू नये म्हणून वस्तीतल्या लोकांनी पोलिसांना अडविले. त्यांनी पोलिसांवर दगडही फेकले. टग्यांच्या रक्षणार्थ काही राजकीय पक्षांचे लोकही धावले.
असो! गोष्ट इथे संपत नाही. काही दिवसांनी कळलेली गोष्ट अशी..
त्या रात्री तरुणांवर हल्ला होत असताना बघ्यांच्या गर्दीत हॉटेलचा स्टुअर्डही उभा होता. त्याला म्हणे हा खेळ एन्जॉय करता येईना! तो मध्ये पडायची भाषा करू लागला. त्याने टग्यांना अडवायचाही प्रयत्न केला. हे बारमालकाच्या कानावर गेलं. मालकाने म्हणे त्याला कामावरून काढून टाकला.
आता त्या चिल्लर नसलेल्या पोरीला मध्येच पुलावर उतरवणाऱ्या कंडक्टरला कुणी अडवलं असतं तर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्याला शिक्षा झाली असती काय? सतत ‘दुसऱ्यांच्या भानगडीत नाक खुपसू नये’ असा संस्कार करून आपण माणसं गोठवून टाकली आहेत काय?
चिल्लरांचा काळ
चिल्लरवरून आठवलं. मोठी नोट घेऊन बसमध्ये चढलात तर असंच अपमानित होऊन उतरावं लागणार. नोट जेवढी मोठी, तेवढा अपमान जास्त! नेमकी चिल्लर बाळगणाऱ्यांचा सन्मान होतो, सत्कारही होतो. चूक कंडक्टरची नाही, चूक काळाची आहे. हा काळ चिल्लरांचा आहे!
आलिशान बस निघाली आहे. कुठे? माहीत नाही. माहिती करून घेण्याचं कारणही नाही. ‘आनंदाची गॅरंटी’ एवढंच पुरेसं आहे. विचारबिचार करणारे विद्वान, टॅलेंटेड-बिलेंटेड लोकांना कंडक्टरने बसमधून कधीच उतरवलंय. ते फ्लायओव्हरवरून कसबसे आपले घर शोधत निघाले आहेत.
चिल्लरांच्या आनंदासाठी सगळं जग राबतंय. ‘आनंद मिळायलाच हवा. आनंद मिळत नाही म्हणजे काय?’ असं सतत धमकावलं जातंय. माझा आनंद ठरवणारी माणसं भलतीच आहेत. मला ब्रँडेड आनंद मिळावा म्हणून सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. एस. एम. एस.वरून जोक्सचा वर्षांव होतोय. आनंदाच्या माऱ्याने सारेजण गुदमरून गेले आहेत. जरा आनंद कमी झाल्याचा संशय जरी आला, तरी माणसं मोडून पडताहेत.
स्टुअर्डने टग्यांना अडवलं, त्याची नोकरी गेली असेल; पण त्याला झालेला आनंद मोठा आहे. तो कुठल्याही मॉलमध्ये मिळत नाही.
चिमुरडय़ा पोरीकडे मोठी नोट आहे म्हणून तिला बसमधून उतरविणाऱ्या कंडक्टरला रोखण्यात आणि ‘बस तुझी नाही, बस तर त्या पोरीची आहे!’ हे ठणकावून सांगण्यात खरा आनंद असतो, हे आपण शिकायला हवं होतं.. शिकवायला हवं होतं.
अजूनही वेळ गेलेली नाही. तोवर एन्जॉय करूया.
चीअर्स!
No comments:
Post a Comment