पुरुषी वर्चस्ववादाच्या शेवटाची सुरुवात

आज ‘जागतिक पुरुष दिन’. सध्या तो साजरा केला जात नाही. पण भविष्यात ही वेळ येणारच नाही, याची खात्री देता येत नाही,  पुरुषांनी जर वेळीच काळाची पावलं ओळखली नाही तर! स्त्रीच्या बाजूनं एक सूक्ष्म पण निश्चित असा बदल सध्या घडताना दिसतो आहे. प्रचंड गतीनं बदलणाऱ्या आजच्या समाजात एखादा स्वल्पविराम घेऊन पुरुषानं स्वत:ला बदलून घेतलं पाहिजे, आपल्या आत्तापर्यंतच्या सत्ताधीश मानसिकतेला मुरड घातली पाहिजे कारण पुरुषी वर्चस्ववादाच्या शेवटाची सुरुवात झालेली आहे. सांगताहेत, अनिल शिदोरेचार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल किंवा कदाचित त्याही आधीची...
व्यवस्थापनशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या एका संस्थेने मला त्यांच्या अभ्यासक्रमातील एक विषय घेण्यासाठी आमंत्रित केलं होतं. नसíगक आपत्तींमध्ये सरकारची किंवा मदत देणाऱ्या संस्थांची व्यवस्था कशी असावी, यावर तो विषय बेतलेला होता. मला एकूण सहा व्याख्यानं द्यायची होती आणि त्याचे नियोजन करण्यासाठी त्या महाविद्यालयाने त्यांच्याच एका विद्याíथनीची नेमणूक केली होती. या व्याख्यानांमधून त्यांना नेमके काय अपेक्षित आहे हे तिनं आमच्या पहिल्याच भेटीत फार मुद्देसूदपणे सांगितलं. मला सुखद धक्का बसला, पण आनंदही झाला. तिचा नेटका विचार आणि सांगण्याची पद्धत फारच अप्रतिम होती. मी प्रभावित झालो..
पुढे माझी व्याख्यानं द्यायला गेलो तेव्हा तर मला आणखी एक सुखद धक्का बसला. या वेळी थोडा जास्त क्षमतेचा.
माझ्यासमोर बहुसंख्येनं मुली होत्या आणि त्यांचं वर्गातील लक्ष आणि सहभाग मुलांपेक्षा खूप म्हणजे खूपच चांगला होता. काही वेळा तर मला त्यांची समज आणि त्यांचा दृष्टिकोन मुलांपेक्षा जास्त प्रगल्भ वाटला. या वर्गाविषयी मी थोडं उत्सुकतेनं त्यांच्या प्राध्यापकांना विचारलं आणि या वर्गातील मुली निश्चितच अधिक चौकस, जिज्ञासू आहेत हे त्यांनी सांगितलं. तीन ते चार वेळा आम्ही यावर बोललो. या वर्गाचीच ही विशेषता असावी, असं आम्ही म्हणालो आणि तेवढय़ापुरता तो विषय आम्ही सोडून दिला.
अर्थात तसं असलं तरी मनातून तो विषय पूर्णपणे गेलेला नव्हता. त्या वर्गातल्या मुली मुलांपेक्षा अधिक उत्सुक आणि जिज्ञासू का? हा प्रश्न मनात रुंजी घालत राहिलाच.
काही महिन्यांनी समाजकार्य विषयाच्या एका वर्गातही नेमका असाच अनुभव आला. समोर बहुसंख्येने मुली होत्या. त्या जास्त उत्सुक, जास्त चौकस आणि विचारी वाटल्या. तो तर समाजकार्याचा वर्ग. पदव्युत्तर शिक्षण देणारा. तिथल्या प्राध्यापकांनी त्यांचं निरीक्षण जास्त विस्तारानं सांगितलं. गेल्या चार-पाच वर्षांत त्यांच्या वर्गातील पहिल्या येणाऱ्या, अधिक गुणवान अशा मुलीच आहेत यावर त्या प्राध्यापक मंडळीचं एकमत होतं. याची सामाजिक, मानसशास्त्रीय कारणं काय असावीत, यावरही आम्ही बोललो आणि हा विषय मनात पक्का बसत गेला.
पुढे काही दिवसांनी मेळघाटमधील प्राथमिक शिक्षणाचा आणि तिथल्या शाळांचा अभ्यास करताना आणखी एक गोष्ट तिथल्या अधिकाऱ्यांनी मला हळूच सांगितली. तिथल्या शिक्षकांमध्ये ज्यांच्यावर अवलंबून राहता येईल आणि शिक्षणाचा दर्जा सांभाळतील अशा प्रामुख्याने शिक्षिकाच आहेत. तो विभागच शिक्षिकांवर अवलंबून होता. हा अनुभव मागच्या दोन अनुभवांना पुष्टी देणारा होता. माझा एक मित्र मनोरंजनाच्या क्षेत्रात महत्वाच्या पदावर काम करतो. तो मला म्हणाला की, त्याच्याकडे जे शिकाऊ उमेदवार आहेत त्यात मुली आघाडीवर आहेत, त्यांच्यात जास्त सृजनशीलता आहे, ईर्षांही अधिक आहे आणि त्यांनाच जास्त भविष्य आहे, त्याच्याकडे काम करणाऱ्या मुलांपेक्षा.
हे ऐकल्यावर हा विषय फारच व्यापक आहे असं वाटायला लागलं.
गेल्या १० ते १५ वर्षांत माझ्या स्वत:च्या टीममधल्या साधारण २० ते २२ मुला-मुलींसोबत मी काम केलंय. त्यांच्याही नावांकडे आणि त्यांच्या कर्तृत्वाकडे नजर टाकली आणि मलाही जाणवलं त्या सर्वामध्ये मुलांचे काही तुरळक अपवाद सोडले तर ज्यांच्याकडून पुढे काही करतील अशी अपेक्षा करावी अशा मुलीच निश्चितपणे अधिक आहेत.
का असं झालं? हा सर्वत्र होणारा बदल आहे की काही थोडय़ाच क्षेत्रातला आहे? आत्तापर्यंत वाचत, ऐकत होतो, पण येणारं शतक आणि त्यापुढची शतकं खरंच स्त्रियांचीच असणार आहेत का? असली तर कशी असणार आहेत? त्या वेळचा समाज मग कसा असणार आहे?
आपल्याकडे ‘श्रमशक्ती’ अहवाल वीस वर्षांपूर्वी आला आणि त्यानंतर फार चांगली आकडेवारी आली नाही, पण अमेरिकेत याच वर्षी, म्हणजे २०११ साली, त्या देशाच्या इतिहासात प्रथमच काम करणाऱ्या सर्व अमेरिकी लोकांमध्ये स्त्रियांनी संख्येच्या बाबतीत पुरुषांना मागे टाकलंय असा निष्कर्ष वाचला. अजून पगाराच्या बाबतीत नाही, पण संख्या म्हणून.
अभ्यासकांनी जी १४ क्षेत्रं येत्या शतकात सर्वात जास्त वाढणार आहेत असं म्हटलं आहे, त्यात १२ क्षेत्रांमध्येही आत्ताच स्त्रिया पुढे जाण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या १० वर्षांत ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यात खूपच संख्येनं पुरुष मंडळी आहेत. नोकऱ्या मोठय़ा प्रमाणावर गेल्या असं स्त्रियांच्या बाबतीत मात्र झालं नाही, याउलट शहरात कॉल सेंटर्स, मॉल्स, खाद्य उद्योग, सॉफ्टवेअर उद्योग यांसारख्या उद्योगात आणि बचत गट आणि त्यासारख्या क्षेत्रात ग्रामीण भागात स्त्रियांना उद्योगाच्या बऱ्याच दिशा सापडल्या. एक अभ्यास असं सांगतो की, आपल्या देशात जेव्हा कॉल सेंटर्ससाठी विशिष्ट पद्धतीने इंग्रजी बोलता येण्याची गरज लागली तेव्हा मुलींनी मुलांपेक्षा खूप म्हणजे खूपच आघाडी मारली.
सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी आणि बदल त्या त्या वेळच्या आíथक चौकटीशी आणि आíथक संबंधांशी खूपच निगडित असतात आणि बांधलेल्या असतात. काय झालं की, गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाने आपली सामाजिक-आíथक बठकच बदलली. नव्या प्रकारचे उद्योग त्यामुळे सुरू झाले, ज्या उद्योगात अंगभूत गुणांनी स्त्रिया पुढे येणं अत्यंत स्वाभाविक होतं. डेव्हिड गग्रेन याचं Enlightened Power: How Women Are Transforming the Practice of Leadership या नावाचं एक अप्रतिम पुस्तक आहे. त्याच्या प्रस्तावनेत लेखक म्हणतो, ‘आजच्या युगाला लागणारी सर्व कौशल्ये आणि मनोभूमिका स्त्रियांकडे आहे आणि म्हणून भविष्य त्यांचंच आहे’.
पुरुषांकडून स्त्रियांकडे नेतृत्व येण्याची आणि अधिकार येण्याची हळू पण निश्चित अशी प्रक्रिया सुरू झाली आहे. आता त्यात बदल होईल किंवा त्याची दिशा उलट होईल असं वाटत नाही. सगळंच बदललं आहे आणि हजारो र्वष चालू असलेला पुरुषी वर्चस्ववाद संपुष्टात आला आहे असं मी मुळीच म्हणणार नाही. अजूनही स्त्री-भ्रूणहत्या होते आहे, अजूनही घरात तिला मारहाण होते आहे, तिला समान वेतन मिळत नाहीय, तिच्यावर अन्याय अत्याचार सुरु आहेतच. गावात गेलं की ‘मी सरपंच-पती’ - म्हणजे सरपंचबाईंचा नवरा असं सांगणारा महत्वाचा असतो.. पण तरीसुद्धा दिशा काय आहे ती दिसते आहे.
ज्या समाजात स्त्री अधिकारपदावर असणार आहे असा समाज कसा असणार आहे यावरही जगात खूप संशोधन सुरू आहे. मानसशास्त्राला वाहिलेल्या ब्रिटिश जर्नलने मागच्या मार्च महिन्यातच फार मजेदार निष्कर्ष काढला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, नव्या सामाजिक-आíथक परिस्थितीला स्त्रिया जितक्या सहजपणे जुळवून घेऊन पुढे जाताहेत तितकंच पुरुषांना स्त्री अधिकारपदावर येणं डाचत आहे आणि येत्या काही वर्षांत पुरुषांना बरीच मानसिक समुपदेशनाची गरज लागणार आहे आणि कदाचित ते समुपदेशनही स्त्रियाच अधिक चांगलं देतील!
तीन प्रकारचे गुण सध्याच्या नव्या सामाजिक परिस्थितीत टिकण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी आवश्यक आहेत, असं तज्ज्ञ म्हणतात. पहिला गुण सामाजिक ज्ञान (Social Intelligence), दुसरा गुण मुक्त, स्वच्छ संपर्क साधण्याची कला (Open Communication), तिसरा गुण, शांतपणे, विचलित न होता एकाग्रचित्ताने काम करण्याचं कसब. आज बऱ्याचशा आघाडीच्या क्षेत्रात हेच गुण आवश्यक आहेत आणि त्यात स्त्रिया नक्कीच आघाडीवर आहेत. पूर्वी समाज जेव्हा शेतीप्रधान होता किंवा जड उद्योगांचा होता तेव्हा शारीरिक शक्ती, कष्ट करण्याची तयारी आणि क्षमता यासारख्या गोष्टी हव्या होत्या, त्याची अधिक गरज होती तसा रोजगार जास्त प्रमाणात होता. आता तसं राहिलं नाही. वेगळ्या प्रकारचे गुण, कौशल्य आणि क्षमता लागणार आहेत आणि लागत आहेत, ज्यात स्त्री मुळीच मागे नाही, किंबहुना पुढेच आहे.
आपण सर्वानीच या बदलाचा वेध घ्यायला हवा. पुरुषी वर्चस्ववादाच्या शेवटाची सुरुवात झाली आहे हे समजून घ्यायला हवं आणि त्याप्रमाणे वागायला हवं. आपल्याला समाज म्हणून ही जाग आली आहे असं मुळीच वाटत नाही, पण २०५०चा महाराष्ट्र आपण डोळ्यापुढे आणू या. कोणी कितीही म्हणो की, हे सगळं अमेरिकेत किंवा शहरातल्या काही भागात ठीक आहे. खेडोपाडय़ांत अजून ही गोष्ट होण्यातली नाही, पण आज महाराष्ट्रात ज्या मुली जन्माला येत आहेत त्या कर्त्यां-सवरत्या होतील तेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रात त्या अधिकारपदावर पुरुषांबरोबर असतील. महाराष्ट्राचं निम्मं मंत्रिमंडळ स्त्रियांचं असेल, बहुसंख्य वाहिन्यांवर प्रमुख संयोजक मुली असतील आणि बऱ्याचशा कारखान्यांच्या संचालक मंडळांवर स्त्रियाच असतील. आपण याला विरोध करायचा म्हटला तरी आता ते शक्य नाही. काळाची दिशा आपण फार बदलू या संभ्रमात राहणं योग्य नाही. वेळीच विचार करायला हवा, नाही तर पुरुषांच्या उन्नतीसाठी महामंडळ आणि सरकारी मदतीने पुरुषांच्या उद्धारासाठी फार मोठय़ा प्रमाणात ‘पुरुष दिन’ साजरा करण्याची गरज लागायची.

anilshidore@gmail.com 
[Article by Mr.Anil Shidore for Loksatta]

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...