शहरयार |
‘सिने में जलन आँखो में तुफान सा क्यूं है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूं है..
रोजच्या जगण्याच्या रोजीरोटीच्या लढाईत प्रत्येक जणच परेशान आहे. ‘दिल की धडकन’ वगैरे नाजूक गोष्टी केव्हाच विसरून गेलेलं मन पत्थराप्रमाणे बेजान होऊन पडलं आहे. माणसांच्या गर्दीत प्रत्येक जण तनहाँ आहे आणि नजर पोहोचेल तिथपर्यंत फक्त निर्जन रेगिस्तान पसरलेला आहे. आरशातील आपलंच प्रतिबिंब आपल्याला पारखं झालंय. ‘आईना हमे देखके हैरान सा क्यू है?’ माणसांचे जथेच्या जथे पसरलेले आणि या चेहरा हरवलेल्या गर्दीतील एक ठिपका म्हणजे मी. या गजबजलेल्या शहरात आपली पहचान हरवून बसलेल्या सामान्य माणसाची व्यथा शहरयार गझलमधून मांडतो.
१९८१ चा रेखाचा जुना ‘उमराव जान’ आठवतो? त्यातील सर्व गझला शहरयारने लिहिलेल्या होत्या. आशाबाईंनी त्या गाऊन नॅशनल अँवॉर्डही मिळवलं. या सिनेमातील अमरीन म्हणजे ‘मै दु:ख की लंबी रात’ प्यार मुहब्बतमध्ये ठोकर बसलेल्या अमरीन (रेखा) या तवायफची अकेलेपनची दर्दभरी दास्ताँ ‘उमराव जान’मध्ये पेश केली आहे. हा सिनेमा मुजफ्फर अलीने काढला. तो शहरयारचा जिगरी दोस्त. म्हणून शहरयारने त्याच्यासाठी गझला लिहिल्या. १९७८ मध्ये मुजफ्फरच्या ‘गमन’ सिनेमासाठी शहरयारने ‘सिने में जलन..’सारख्या गझल दिल्या. यश चोप्राने ‘फासले’ नंतर शहरयारला त्याच्या तीन सिनेमांत गझला लिहिण्यासाठी विनवलं. पण मागणी तसा पुरवठा करणार्या सिनेगीतांचा कारखाना शहरयारला खोलायचा नव्हता. शहरयारच्या गझललेखनाच्या सुहावन्या सफरीमध्ये यश, कीर्ती, मानसन्मान वगैरे सरायांनी त्यांना कधीच लुभावलं नाही. शहरयार फक्त कवितेचाच दिवाना होता. ‘दिवाने तो हो जाते है, बनाये नहीं जाते,’ अशी ती दिवानगी होती. त्यामुळे सिनेमाच्या मायावी दुनियेत साहिर, शैलेंद्र, मजाज सारखे शहरयार कधीच गुंतून पडले नाहीत. त्यांनी यश चोप्राला सपशेल नकार दिला.
‘दिल चिज क्या है आप मेरी जान लिजिए, ‘जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें’ ‘इन आँखो की मस्ती के मस्ताने हजारो है’, ‘यह क्या जगह है दोस्तो, ये कौनसा दयार है’, ‘जुस्तजू जिस की थी उस को तो ना पाया हमने’ अशा एक से बढकर एक गझला त्यांनी ‘उमराव जान’मध्ये पेश केल्या आणि अंजुमनला (मैफल) अंजुममध्ये (सितारों की मेहफील) बदलवून टाकलं.
बाहेर पावसाची उदास रिपरिप.. सुना पडलेला थंडगार अर्धा बिछाना.. अचानक पापण्यांवरील नीज उडून जावी आणि उत्तररात्री त्याची याद सतावावी हे नेमकं शहरयारने शब्दबद्ध केलंय.
‘याद तेरी कभी दस्तक कभी सरगोशी से
रात के पिछले प्रहर रोज जगाती है हमे
हर मुलाकात का अन्जाम जुदाई क्यू है,
अब हर वक्त यही बात सताती है हमे’
अमरीनने उम्र का लंबा सफर अकेले तय किया. दरदर की ठोकरे खाऊन ती योगायोगाने तिच्या बालपणीच्या गावी पोहोचली. तिच्या आई आणि भावाला भेटली. पण भावाने तवायफ बहिणीला स्वीकारायला साफ नकार दिला. प्रियकराने ठोकरलेल्या, आई-भावाने नाकारलेल्या, प्रीतीच्या, रक्ताच्या नात्यामधले फिजूलपण उमगलेल्या अमरीनला भूतकाळाच्या पडद्याआडचे ते सोनेरी दिवस आठवतात. तिच्यासाठीही या अलम दुनियेत कुठंतरी.. कुणीतरी व्याकूळ झालं असेल, अशी फोल आशा ती करत राहते.
‘बुला रहा है कौन मुझको, चिल्मनो के उस तरफ
मेरे लिए भी क्या कोई उदास बेकरार है?’
‘सितारों के साये’ शब्दांवर असणारा हा जादूगार म्हणजे उर्दू कवी शहरयार. त्यांचे खरे नाव होते अखलाक मुहम्मद खान. १९३६ मध्ये बरेलीजवळ त्यांचा जन्म झाला. एका मुस्लीम राजपूत कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला कसरतपटू खेळाडू व्हायचे होते. त्याच्या अब्बाजानची ख्वाईश त्यांना पोलिसात भरती करायची होती. पण वाटा चुकल्या. हा शायराना आदमी घरातून पळून खलील उर-रहमानच्या आश्रयाला गेला. उर्दूत पीएच. डी. केली. अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटीमध्ये शहरयार प्रोफेसर होते. पुरी हयात त्यांनी विद्यार्थ्यांना उर्दू कादंबरी शिकवण्यात घालवली, पण विद्यार्थ्यांना त्यांनी कधीच उर्दू कविता शिकवली नाही. कविता अनुभवायची असते. ती शिकण्याची किंवा शिकवण्याची चीजच नव्हे, असं त्यांचं ठाम मत होतं. भवभूतीप्रमाणे शहरयारही ‘अरसिकेषु, कवित्वनिवेदनं मालिख.. मालिख.. मालिख.’ (अरसिक माणसाला कविता ऐकवणं माझ्या भाळी कधीही लिहू नकोस.. लिहू नकोस.. लिहू नकोस) असंच मानत होते. त्यांच्या वाड्मयीन कारकिर्दीची सुरुवात ‘अंजुमन तरक्की-ए-उर्दू’ या मासिकातील नोकरीपासून झाली. १९८६ पासून अलीगड विद्यापीठात प्राध्यापकी, ‘शेर-ओ-हिकमत’ मासिकाचे संपादक असा त्यांचा सुंदर प्रवास होता. १९६५ मध्ये त्यांचा ‘इस्म-ए-आजम’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९७८ मध्ये प्रसिद्ध झालेला त्यांच्या ‘हिज्र के मौसम’मधील कविता कुठल्याही मुशायरात वर्णी लावायच्या. त्यांचे पाच उर्दू कवितासंग्रह देवनागरीमधूनही उपलब्ध आहेत. १९८७ मध्ये आलेल्या त्यांचा काव्यसंग्रह ‘ख्वाब के दरवाजे बंद है’ला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला.
सन २00८ मध्ये शहरयार यांना साहित्यसेवेतील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आणि त्यांच्या कवितेला खरोखर चारचाँद लागले.
परवाच्या १३ फेब्रुवारीला लंग कॅन्सरच्या वेदनांशी झगडत असलेला चुकून आपल्या सामान्य माणसांच्या मेहफलीत आलेला हा जन्नतचा फरिश्ता अल्लाला प्यारा झाला!
खुदा हाफिज!!
- लीना पांढरे,लोकमत
manthan@lokmat.com
No comments:
Post a Comment