नाळ


मुलांना कोणत्या भाषेत शिकवले म्हणजे त्यांना चांगले आकलन होईल यासंदर्भात खरे तर कुठलाही किंतु असण्याचे कारण नाही, पण दुर्दैवाने पालकांनाच आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिकविण्याबाबत उत्साह नाही. मराठी शाळांच्या दर्जा व गुणवत्तेसंदर्भात निर्माण झालेली साशंकता, सद्य:स्थितीत संगणक, विज्ञान-तंत्रज्ञानाची भाषा म्हणून मराठीला असलेल्या र्मयादा, इंग्रजीतून शिकण्याबाबत पालकांचा बुद्धिभ्रम, इंग्रजी शाळांच्या बाह्य चकाचक रंगरूपामुळे निर्माण झालेले आकर्षण, इंग्रजी माध्यमातून शिकणे म्हणजे ‘स्टेटस सिम्बॉल’, गरीब लोकच मुलांना मराठी माध्यमातून शिकवितात ही लोकप्रिय अफवा आणि स्पर्धेसाठी इंग्रजीच हवी हा गैरसमज यामुळे मराठी माध्यमालाच घरघर लागली आहे. 
मराठी माध्यमातून शिक्षण घेतले तर उच्च शिक्षणात इंग्रजीतून अभ्यास जमणार नाही हाही एक मोठा गैरसमज. उलट माध्यमिक शिक्षणापर्यंत मुलांना इंग्रजी (परकी भाषा) नीट समजत नाही. विषयाचे सखोल ज्ञान संपादणे, नवनवीन कल्पना आत्मसात करून प्रकट करणे हे फार अवघड जाते. परिणामत: शिक्षकांनी लिहून दिलेल्या टिपणांवर व सोप्या भाषेत थोडक्यात लिहिलेल्या उत्तरांच्या घोकंपट्टीवरच त्यांची सर्व मदार अवलंबून असते. विद्यार्थी ज्ञानार्थी न होता परीक्षार्थी बनतात. अर्थपूर्ण आकलनाचा अभाव, अपूर्ण ज्ञान, अस्पष्ट संबोध यामुळे पुढे उच्च शिक्षणात त्यांच्या नशिबी अपयश व नैराश्यच येते. 
धक्कादायक निष्कर्ष
एका सामाजिक संस्थेतर्फे मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई येथील नामांकित १४२ शाळांतील ३२ हजार विद्यार्थ्यांची एक चाचणी घेण्यात आली. हे सर्व विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून पाचवी ते सातवी या वर्गातील होते. या चाचणीत निष्कर्ष असे - विद्यार्थ्यांचे विषयज्ञान वरवरचे असून, ते केवळ पाठांतरावरच अवलंबून आहेत. त्यांच्या अभिव्यक्तीतही त्रोटकपणा आहे. याप्रमाणेच पुण्याच्या माध्यमिक शिक्षण मंडळानेही काही वर्षांपूर्वी एक संशोधन केले होते. माध्यमिक शिक्षणात विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यम घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व इंग्रजी माध्यम घेतलेल्या मुलांचा महाविद्यालयीन काळातील विज्ञान विषयातील प्रगतीचा तौलनिक आढावा घेतला. त्यात माध्यमिक शाळेत मराठी माध्यम घेतलेल्या मुलांनी इंग्रजी माध्यमातल्या मुलांपेक्षा अधिक प्रगती केल्याचे निष्कर्ष निघाले होते. 
कुसुमाग्रजांनी ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ या गाजलेल्या कवितेत म्हटले आहे की,
भाषा मरता, देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे,
गुलाम आणिक होऊन आपुल्या प्रगतिचे शिर कापू नका.
भाषेमागे संस्कृती असते. उदाहरणार्थ- भीमटोला मारला, यातला ‘भीम’ मराठी मुलांना ज्ञात असतो; पण ‘पॉवर ऑफ हक्यरुलस’ सांगितलं तर आधी ‘हक्र्युलस’ कोण, कसा हे सांगावं लागतं. ‘इसफिगस’ म्हटलं तर मुलांना लवकर कळत नाही, पण ‘अन्ननलिका’ म्हटलं तर लागलीच लक्षात येते, कारण ‘अन्न माहीत असतं आणि ‘नलिका’ही माहीत असते. परक्या माध्यमाने संस्कार, संस्कृतीचीही नाळ तुटू लागते. बोलताना गरज नसतानाही इंग्रजी शब्दांचे ठिगळ लावणे प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने दोन्ही भाषांचा डौल बिघडतो.
अवहेलना आणि विरोधाला न जुमानता सुमारे सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्‍वरांनी मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करून दिला. ‘ज्ञानेश्‍वरी’सारखा जगन्मान्य अपूर्व ग्रंथ रचला. तो काळ तर मराठीच्या बाल्यावस्थेचा होता. अविकसित अवस्थेत तिच्या अंगी एवढं सार्मथ्य होतं तर आज प्रौढावस्थेत ती किती सक्षम असायला हवी. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा या तीन दिग्गजांनी तिला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळवून दिला. ‘परि एक एक शब्द तू नवा जो शिकसी । शक्तीतयाची उलथील जगासी ।’ असं केशवसुत म्हणतात त्याप्रमाणे मराठीच्या शब्दाशब्दांत प्रचंड सार्मथ्य वास करीत आहे. हा आत्मविश्‍वास मनामनांत निर्माण व्हायला हवा. अनेक विद्वानांनी संगणकासाठीही मराठी सक्षम असल्याचे म्हटले आहे. ‘युनिकोड’ या फॉन्टमुळे संगणकावरील मराठीचे अस्तित्व अधिक ठळक झाले आहे. मुंबई विद्यापीठातील वैद्यक शिक्षणाच्या पहिल्या तुकडीला वैद्यकशिक्षण मराठीतून मिळाले होते, अशी नोंद आहे. शेकडो वर्षांपूर्वी भारतीय विद्वानांनी शून्याचा शोध, वर्ग-वर्गमूळाची सूत्रे यासह वैद्यकीय क्षेत्रातही प्लॅस्टीक सर्जरी इ. खगोलशास्त्र, रसायनशास्त्र या विविध क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी केली होती. तेव्हा काय इंग्रजी माध्यम होते? आज आघाडीवर असलेल्या अनेक मान्यवरांचेही प्राथमिक, माध्यमिक शिक्षण इंग्रजीतून झालेले नाही. 
मराठीचा आग्रह म्हणजे इंग्रजी वा अन्य भाषांबद्दल अप्रीती, द्वेष, मत्सर, तिरस्कार नाही. आवश्यकता असेल तेथे कोणत्याही भाषेतील योग्य शब्दही मराठीने स्वीकारले पाहिजेत. भाषा समृद्ध होण्याचा तोच मार्ग आहे. ज्यावेळी इंग्लंडवर फ्रेंचांचे राज्य होते, त्यावेळी इंग्लंडचा कारभारही फ्रेंच भाषेतूनच चालत होता. पार्लमेंट, कोर्ट यासह अनेक शब्द फ्रेंच आहेत. प्रारंभी अनेक शब्द इंग्रजांनाही परकीय भाषेतून घ्यावेच लागले. तसे घेताना त्यांनी मूळ शब्दांचे काही वेळा स्पेलिंग, उच्चार व अर्थही बदलविले तेव्हा कोठे आपण जिला प्रगत समजतो ती ‘इंग्रजी’ तयार झाली. मग आपले हात कोणी बांधले? मुख्य म्हणजे आपण इंग्रजीवर किती काळ विसंबून राहायचे, तिचा किती उदो उदो करायचा, आपला न्यूनगंड किती काळ कुरवाळत बसायचा, याचा आपण विचार केला पाहिजे. 
विद्यापीठ शिक्षण आयोगासह आजपर्यंत नेमलेल्या जवळ जवळ सर्वच शिक्षण आयोगांनीही शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेलाच प्राधान्य दिले आहे. भाषा म्हणून इंग्रजीवर आपण जरूर प्रभुत्व मिळवू या, पण त्यासाठी प्रथमपासून इंग्रजी माध्यमाचा स्वीकार स्वीकारार्ह नाही. 
‘देश भूगोलाने तयार होतो, पण राष्ट्र भाषेतूनच साकारते’ हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. भाषा नष्ट झाली की संस्कृतीही नष्ट होते. जगातली अनेक उदाहरणे याला साक्षी आहेत. 

- प्र. ह. दलाल,लोकमत
manthan@lokmat.com

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...