एकदा तिलोकचंद महरूम मुलाला घेऊन फिरायला चालले होते. डोंगरावर घरे उभारलेली पाहून त्यांनी एक ओळ म्हटली -
पहाडोंके उपर बने है मकान
मुलाने क्षणाची उसंत न घेता दुसरी ओळ जोडली- अजब उनकी सुरत, अजब उनकी शान
हा मुलगा म्हणजेच जगन्नाथ आझाद. महरूम यांची ओळख आपण ‘बस्तिक’मध्ये या महिन्यातच १ जुलैला करून घेतली होती. आता त्यांचा मुलगा जगन्नाथ. वडिलांप्रमाणे दीर्घ आयुष्य, कविता आणि लहानपणापासून काव्यशौक आझाद यांनाही मिळाला होता. हळूहळू वयासोबत कवितेचीही उंची वाढत गेली. ‘बेकरार’, ‘सितारों से जरे तक’ वगैरे काव्यसंग्रह गाजू लागले. त्यांच्या काव्याबद्दल जोश मलिहाबादी म्हणाले होते, ‘आझाद यांची शायरी नुसती रोचक नाही, मानवजातीला हितकारक आहे.’ फिराक गोरखपुरी म्हणाले होते, ‘हे काव्य पुस्तकी नाही, जीवनाचा आवाज आहे.’ एहतिशाम हुसेन म्हणाले होते, ‘आधुनिक काळातील हा यशस्वी कवी आहे’ आणि ख्वाजा अहमद अब्बास म्हणाले, ‘राजकीय, सामाजिक गरज म्हणून आझाद यांनी काव्याचा गळा घोटणारे लिखाण कधीच केले नाही.’’
५ डिसेंबर १९१८ ला ईसाखेल (प. पंजाब, आता पाकिस्तानात) येथे जन्मलेल्या आझाद यांनी रावळपिंडीच्या मॉडर्न महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी घेतली. लाहोरमध्येच १९४४ मध्ये त्यांनी पर्शियन भाषेतून एम.ए.ची पदवीही मिळविली. त्रिलोकचंद व आशादेवी यांचे पुत्र असलेले आझाद यांची पहिली पत्नी शकुंतला १९४६ ला वारली. जेमतेम सहा वर्षांचा त्यांचा संसार झाला. त्यांना पम्मी व मुक्ता या कन्या झाल्या. शकुंतलाजी वारल्यानंतर आझाद यांनी १९४८ मध्ये विमला वीरमणी यांच्याशी विवाह केला. त्यांच्यापासून त्यांना आदर्शकुमार, चंद्रकांत हे मुलगे आणि पूनम ही कन्या झाली. वडिलांप्रमाणे आझाद यांनी काही उर्दू मासिकांचे संपादन केले. ‘अदबी दुनिया’सारख्या साहित्याला वाहिलेल्या मासिकातून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. ते ‘जयहिंद’ या उर्दू दैनिकाचे सहायक संपादकही होते. सिकंदर हयात यांनी हिंदू-मुस्लीम एकता आंदोलन छेडल्यावर त्यातही आझाद तनमनाने सहभागी झाले. फाळणीच्या जखमा अंगावर घेऊन ते भारतात आले.
केंद्र सरकारच्या माहिती खात्यात ते अधिकारी झाले. कधी कृषी तर कधी पर्यटन खात्यात जनसंपर्क अधिकारी म्हणून चांगले काम केले. गृहखात्यात जनसंपर्क अधिकारी झाल्यावर बढती मिळून काश्मीरला चार वर्षे जनसंपर्क खात्याचे संचालक राहून नवृत्त झाले. जम्मू विद्यापीठात त्यांनी काही काळ अध्यापनही केले आणि आत्ता आत्ता म्हणजे २00४ मध्ये दिल्लीत शेवटचा श्वास त्यांनी घेतला. आझाद यांचे काही शेर वाचून त्यांच्या काव्याची, त्यांच्या प्रतिभेची भरारी लक्षात येईल -
कहते है कि आता है मुसीबत में खुदा याद
हमपर तो पडी वह कि खुदा भी न रहा याद
(असे म्हटले जाते, की संकटात देव आठवतो. पण, आमच्यावर असे संकट कोसळले की देव आठवणेसुद्धा विसरून गेलो.)
गमे-जानाँ से भी आगे, गमे-दौराँ से भी आगे
इक ऐसा गम भी है अल्फाज में जो आ नही सकता
नही मुमकीन की मैं इसको लिबासे-नुत्क पहनाऊँ
समझ सकता हूँ मैं इसको मगर समझा नही सकता
(प्रेयसीच्या दु:खाच्या पुढे, जगाच्याही दु:खाच्या पुढे एक असे दु:ख आहे, की जे शब्दांत येत नाही. त्या दु:खाला वाणीचे कपडे घालणे सोपे नाही. मी त्याला समजू शकतो, सांगू शकत नाही.)
तुझे भूला न सकूँ, तुझको याद रख न सकूँ
यह राहे-इश्कमें आया अजब मुकाम ए दोस्त!
(तुला विसरू शकत नाही की आठवणीत ठेवू शकत नाही. प्रेमात ही अशी कशी वेळ आली? हे अजीब ठिकाण आले कसे?)
दाग वो तूने दिया है कि छुपा भी न सकूँ
गर हो मंजूर दिखाना तो दिखा भी न सकूँ
(तू हृदयावर असा घाव घातला की, त्याचा व्रण धड लपविता येत नाही आणि दाखवावा म्हटले तर दाखवूही शकत नाही. वा! तुझ्या कलेला सलामच!)
अब किसी की थी उस वक्त खता याद नही
किस तरह से हम हुए थे जुदा याद नही
है याद वो गुफ्तगू की तल्खी लेकिन
‘आझाद’! वो गुफ्तगू थी क्या, याद नही
(तेव्हा कुणाची चूक होती, आपण कसे वेगळे झालो काहीच आठवत नाही. हां, हे आठवते की आपण चर्चा केली त्यात कडवटपणा होता; पण ती चर्चा काय होती, आठवत नाही)
मैंने पूछा जो जिंदगी क्या है?
हाथसे गिर के जाम टूट गया
फाळणी होणार आणि १४ ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र होणार म्हटल्यावर बॅ. जीनांना देशाची तयारी करायची होती. झेंडा कसा असावा, देशाची घटना कशी असावी वगैरे चर्चेत त्यांना राष्ट्रगीताची आठवण झाली. ते गीत जाणीवपूर्वक हिंदू माणसाने लिहावे म्हणजे पाकिस्तान हे ‘सेक्युलर’ राष्ट्र आहे हे दाखविण्याचा त्यांचा विचार होता. त्यांनी आझाद यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आणि आझाद यांच्या लेखणीतून अक्षरे उमटली.
अय सरजमींने - पाक
र्जे तेरे है आज सितारोंसे ताबनाक
रोशन है कहकशाँ से कही आज तेरी खाक
(हे पाकिस्तानच्या भूमी, तुझ्या धुळीचे कणही आज तार्यांपेक्षा चमकदार आहेत. आकाशगंगेच्या उजेडापेक्षाही तुझी माती अधिक लखलखीत आहे.) जीनांना ते गीत फार आवडले. पाकिस्तानमधील नागरिकही ते आनंदात गाऊ लागले. एकीकडे दंगे वाढत होते. फाळणी माणसांना विभक्त करीत होती. कसेबसे चार-पाच वर्षे हे राष्ट्रगीत चालले. जीना वारले आणि पाकमधील हिंदूद्वेष टोकाला गेला. राष्ट्रगीत बदलायचे ठरले. पाक कवींना आव्हान करण्यात आले. ७२३ कवींनी रचना पाठविल्या. त्यातली हाफीज जालंधरी यांची रचना निवडली गेली. विशेष म्हणजे हाफीज त्या निवड समितीचे सदस्यही होते. आता ते राष्ट्रगीत पाकमध्ये सुरू आहे. त्याचे बोल आहेत -
पाक सरे-जमीं शादबाद
(हे पाकिस्तानच्या भूमी, सुखी, आनंदी राहा).
१३ ऑगस्ट १९५४ च्या मध्यरात्री हे नवे राष्ट्रगीत सुरू झाले. खरेतर शायर कधीच हिंदू किंवा मुस्लीम असू शकत नाही. तो शायरच असतो; पण इथे पाकिस्तानमधील धर्मांधाच्या वागणुकीमुळे तसे शब्द वापरावे लागत आहे, हे सुजाण वाचक लक्षात घेतीलच. पूर्वीचे गीत हिंदू शायराचे होते, त्यात उर्दूच शब्द होते. आताचे गीत मुस्लीम कवीचे आहे, ज्यात फक्त ‘का’ एवढे अक्षर उर्दू सोडले तर संपूर्ण गीत फार्सीत आहे.
आझाद यांना ‘माहिरे-गालिब’ व ‘माहिरे-इक्बाल’ म्हणून ओळखले जायचे. पाकिस्तानात इक्बालबद्दल काही चर्चासत्र असेल तर अधिकारवाणीने बोलण्यासाठी त्यांना पाचारण केले जात होते, एवढे सांगितले तरी त्यांच्या व्यासंगाची जाणीव आपल्याला होईल. पाकच्या या राष्ट्रगीतकाराला पाक विसरले तरी चालेल, पण आपणही..?
हा लेख श्री.प्रदीप निफाडकर यांनी दै.लोकमत च्या 'बस्तिक' सदरासाठी लिहिलेला आहे.
No comments:
Post a Comment