काला मांजा(A tribute to Rajesh Khanna)

माझा चित्रपट पत्रकारितेतला उमेदवारीचा काळ आणि राजेश खन्नाच्या चित्रपट कारकीर्दीचा बहराचा काळ एकच होता. त्यामुळे त्याची अफाट लोकप्रियता, त्याचे नखरे, त्याचे मूड, त्याचं शूटिंग हे सारं मला ‘याची डोळा’ अनुभवता आलं.
बांद्रय़ाच्या कार्टर रोडवरचा त्याचा ‘आशीर्वाद’ बंगला हे एका पिढीच्या कुतुहलाचं आणि आकर्षणाचं केंद्र होतं. बाहेर कडेकोट बंदोबस्त असायचा. राजेश खन्ना बंगल्याबाहेर कधी पडतोय, याची वाट पाहत, पोरींच्या अक्षरश: ‘झुंडी’ आशीर्वादबाहेर ताटकळत असायच्या. त्या त्याच्या ‘क्रेझ’च्या काळात मला ‘आशीर्वाद’मध्ये जाऊन, त्याच्या समवेत खाता खाता गप्पा मारण्याचा योग आला. त्याच्या साखरपुड्याच्या पार्टीला उपस्थित राहता आलं आणि याला कारण देवयानी चौबळ.
इंग्रजी पत्रकारितेत ‘फ्रँकली स्पीकिंग’ म्हणत कुणाही नटावर, स्पष्टपणे काहीही टिप्पणी करण्याची हिंमत असलेली ही ज्येष्ठ पत्रकार. सर्वच नट आणि नट्याही तिला वचकून असत. कुणाच्याही घरी, कुठल्याही पार्टीत तिला मुक्त प्रवेश नि मान होता. सदाशिवपेठेत राहणार्‍या माझ्यासारख्या प्रादेशिक मराठी भाषेतल्या नवख्याला ‘देवयानी’मुळे सगळीकडे विशेषत: राजेश खन्नाच्या खासगी गप्पांगणात त्याकाळी शिरकाव करता आला.
आश्‍चर्य वाटेल; पण राजेश खन्ना हा अंजू महेन्द्रूला डच्चू देऊन ‘डिम्पल’शी लग्न करतोय, याची बातमी आणि त्याच्या साखरपुड्याचे फोटो दैनिकांमध्ये छापून येण्यापूर्वी ‘साप्ताहिक मनोहर’मध्ये आधी प्रसिद्ध होण्याचा चमत्कार घडला होता. कारण राजेश खन्नाची निकटतम मैत्रीण ‘देवयानी’ आमच्या ‘मनोहर’ साप्ताहिकात ‘चंदेरी च्युइंगम’ हा स्तंभ लिहायची. मराठीत आपला मजकूर छापून येण्याचं तिला आकर्षण होतं. मीच दर आठवड्याला मुंबईला तिला भेटायचो. ती मला हिंदी फिल्मी माहोलमध्ये घेऊन जायची. लेटेस्ट ऑथेंटिक बातम्या पुरवायची. ‘डिम्पल-राजेश’चं जुळत असलेलं लग्न तिला प्रथम कळलं आणि स्वाभाविकच चॅनल्सचा जमाना नसल्यानं ते वृत्त साप्ताहिकात प्रथम झळकलं. राजेश खन्नाच्या सुपरस्टार पद प्रवासाची ती निकटची साक्षीदार आणि तिच्यामुळे ‘गाड्याबरोबर नळयाची यात्रा’व्हावी तसे मला ते सारे क्षण जवळून अनुभवता आले. हे कळावं म्हणून ‘नमना’ला हे ‘देवी पुराण.’
राजेश खन्ना हातात ‘काळा गंडा’ बांधायचा. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीत तो ‘काका’ या टोपण नावापलीकडे जाऊन आणखी एका नावानं निकटच्या वतरुळात संबोधला जायचा. ते नाव होतं ‘काला मांजा’. पुढे खूप वर्षांनी २0१0 मध्ये तो पुण्यात आला असताना त्याला ‘काला मांजा’ नामसे आजकल कोई पुकारता है? असं मी विचारताच तो एकदम खुलला. त्याचे काळेभोर डोळे विस्फारले. त्याला एकदम त्याचा ‘वैभवी काळ’च आठवला. आम्ही त्यात रमलो.
त्याच्या गाडीमागे धावणार्‍या पोरींची झुंड, स्वत:च्या बोटांना ब्लेडनं कापून, ठिबकणार्‍या रक्तानं, राजेशच्या गाडीवर ‘आय लव्ह यू’ लिहिणार्‍या तरुणी (हे अविश्‍वसनीय वाटणारं प्रकरण प्रत्यक्श घडताना मी डोळ्यानं पाहिलंय). एकाच वेळी चाळीस थिएटरांत त्याचेच, वेगवेगळे सिनेमे ‘हाउसफुल्ल’ गर्दी खेचत असल्याची दृश्यं. खरा सुपरस्टार. तो स्वत:वर वाजवीपेक्षा जास्तच खूश होता. प्रचंड चाहत्यांच्या गराड्यात आणि बंगल्यावर ‘चमच्यांच्या’ स्तुतिसुमनांत रमायला त्याला फार आवडत असे. आपली भव्य पोस्टर्स लागली आहेत, आपल्या सिनेमाचं तिकीट मिळविण्यासाठी खचाखच गर्दी उसळलीय ही असली दृश्य पाहायचीसुद्धा त्याला हौस होती.
‘देवी, चलो रॉक्सीकी ओरसे एक राउण्ड मारके आते है’ असं म्हणत तो गाडी काढायचा. रॉक्सी थिएटरपाशी उतरणं, त्याची लोकप्रियता लक्षात घेता शक्यच नव्हतं. पण चर्नीरोडकडून ‘रॉक्सीवर उसळलेले चाहते’ दुरून का होईना क्षणभरासाठी पाहण्याकरता हा बांद्रय़ाहून गाडी काढून गिरगावात यायचा.
गिरगावात ठाकूरद्वारच्या नाक्यावर असलेल्या सरस्वती निवासापाशी मी आणि देवी त्याचं फोटोसेशन करण्याकरता त्याच्या ‘टॉप’ काळात त्याला घेऊन आलो होतो.
आजही त्याच्या काकांची ‘खन्ना’ नावाची पाटी असलेली ती कॉर्नरवरच्या बिल्डिंगची गॅलरी तशीच पाहायला मिळते.
फोटोसेशनच्या वेळी त्या चौकातल्या गॅलरीत उभं राहून, तिरकी मान करून हसत हा कितीतरी वेळ रस्त्यावरच्या गर्दीला बाय बाय करत होता.
‘‘या गिरगाव रस्त्यावरच्या पलीकडच्या सेंट्रल सिनेमा चौकातल्या सुंदर बिल्डिंगमध्ये रवी कपूर म्हणजे जितेंद्र राहायचा. त्याची माझी दोस्ती होती. माझी आई रवीकडे जायची; आम्हाला मॅजेस्टिक थिएटर ग्रेट वाटायचं, इथून एकदा बग्गीत बसून जायचंय,’’- असं काहीबाही तो त्या गिरगावातल्या गॅलरीत भरभरून बोलत होता.
बोलताना तो दोन्ही डोळे मिचकावत हसायचा. डाव्या हाताचा पंजा, उजव्या हाताच्या मुठीतून सोडवत हवेत फेकायचा. तिरकी मान करून खळाळून हसायचा. पटपट पावलं टाकत चालायचा. मध्येच गर्रकन वळून हाताची बोटं ओठानं दाबत तुमच्याकडे रोखायचा. चालताना मध्येच छोटीशी उडी मारून पुन्हा भरभर चालायचा. बोलताना एकदम वरची पट्टी नाही, एकदम खालची पट्टी नाही. मधल्या पट्टीत नाटकातले डायलॉग म्हणावेत तसं बोलायचा. स्वत:च्याच सिनेमातले लोकप्रिय संवाद म्हणून दाखवायला त्याला आवडत असे. वरकरणी या सार्‍या चालण्या-बोलण्या-हसण्याच्या लकबी नाटकी वाटतील; पण त्यात कणमात्र ‘नाटकीपणा’ नव्हता. पण नाट्यपूर्ण देहबोली आणि शब्दफेक हा त्याचा स्थायीभाव होता. स्वत:त रमलेलं, स्वत:शीच खेळणारं एकाकी लहान मूलच होतं म्हणा ना!
आम्ही एकदा मळवलीला मनमोहन देसाईंच्या शूटिंगला गेलो होतो. ‘रोटी’चं चित्रीकरण चाललं होतं. लंचब्रेकला ‘देवी’ म्हणाली,
‘‘सुधीर आता खाणं झाल्यावर गंमत बघ हं.’’
काय झालं, की त्यानं घरून मागवलेला डबा संपवला. त्यावेळी तरी सर्व शाकाहारीच पदार्थ तो खात होता. ‘दाल फ्राय’ हातानं एकदा चाखलं. त्याच्या ओठांना गालाला ‘दाल फ्राय’ लागलेलं होतं. यानं काय करावं?- नेहमी कडक स्टार्चच्या पांढर्‍या साडीत असलेल्या देवीच्या साडीला ते दाल फ्रायचं तोंड पुसून, तिच्या मांडीवर त्याने डोकं टेकलं. लाडोबा पोरानं आईच्या कुशीत शिरावं तसं!
देवी मला म्हणाली, ‘पाह्यलंस? याच्या व्यक्तिमत्त्वात दडलेल्या एकाकी लहान पोराला आईच्या प्रेमाची भूक आहे. कितीही तरुणी मागे लागल्या तरी, हा कसला त्यांच्यात गुंतणार?’
खंडाळ्याच्या ‘एल ताज’मध्ये आम्ही एकदा गेलो होतो. माझ्या आठवणीप्रमाणे राजेशच्या साखरपुड्याची चर्चा चालू होती. १९७३ साल होतं. चुनीभाई कापडिया, बलदेव पाठक, देवी असे सारे होते. ‘बॉबी’ हिट गेला होता. अंजू महेन्द्रूबरोबरची राजेशची मैत्री चर्चेचा विषय होती आणि ‘बॉबी’मुळे अफाट लोकप्रिय झालेल्या, मधाळ डोळ्याच्या डिम्पलबरोबर राजेशचं लग्न ठरवण्याच्या गोष्टी चालल्या होत्या.
‘हिला म्हणजे डिम्पलला मी निर्माता रावेरच्या सेटवर प्रथम भेटलो होतो. ती नऊ वर्षाची होती. मी ढुंकूनही तिच्याकडे पाहत नव्हतो’ असं गर्वानं राजेश देवीला सांगत होता. लग्नात कपडे कुठले घालायचे हे तो देवीला विचारत होता. कारण फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘सूट’ बाजूला ठेवून ‘गुरुशर्ट’ घालण्याचा सल्ला देवीनंच राजेशला दिलेला होता. गुरुशर्टातला राजेश सामान्य प्रेक्षकाला जवळचा वाटला होता.
लोभस हसणं, रोमँटिक हिरो म्हणून सिनेमात झळकणं, तिरकी मान करून मधल्या पट्टीत भावुकपणे डायलॉग फेकणं असा सारा ‘सुपरस्टार’ प्रवास चालू असताना ‘आनंद’ चित्रपट पूर्ण झाला.
माझ्या आठवणीप्रमाणे प्रेस शो ला राजेश आला होता. बरोबर अर्थातच देवयानी होती. शो संपल्यावर आमच्याबरोबर गाडीतून चल, असा निरोप देवीनं मला दिला. मी चुपचाप गाडीत पुढच्या बाजूला ड्रायव्हरशेजारी बसलो. बहुधा ‘गोमा’ हे त्या ड्रायव्हरचं नाव असावं.
गाडी सुरू झाली आणि पाठीमागच्या सीटवर, राजेश खन्नाशेजारी बसलेल्या देवयानीनं स्पष्टपणे राजेशला सांगितलं,
‘काका, फिर कभी इस लंबूके साथ काम नही करने का. ये तुम्हारी छुट्टी कर देगा.’
मी या संवादाचा साक्षी आहे. देवीनं या सुपरस्टारला हरवणारा अमिताभ बच्चन येत आहे, याची स्पष्ट जाणीवच ‘आनंद’च्या प्रेस शो ला रिलीजपूर्वीच दिली होती.
काल सगळ्या चॅनल्सवर ‘आनंद’चा तुकडा आणि ‘बाबू मोशॉय’ ही हाक ऐकताना मला ती देवीची भविष्यवाणीच आठवत होती.
‘मेरे सपनोंकी रानी,’ ‘प्यार दिवाना होता है,’ ‘कोरा कागज था ये मन मेरा,’ ‘ये जो मोहब्बत है,’ ‘देख जरा पिछे मुडके,’ ‘ये दिवानी’ वगैरे हिट गाणी पडद्यावर पाहत असताना, अंदाज, अमरप्रेम, सफर, कटीपतंग, दो रास्ते, दुश्मन, बंधन, आराधना, सच्चा-झुठातली त्याची डोळे मिचकवणारी लोभस रूपं पाहत असताना, मला मात्र ‘आनंद’चा प्रेस शो च आठवत होता.
अमिताभच्या बुलंद आवाजानं, परिणामकारक मुद्राभिनयानं, राजेशचं राज्य उतरवायला सुरुवात केली होती हे खरंच! पण अमिताभसुद्धा त्याचं म्हणजे राजेश खन्नाचं ‘सुपरस्टार पद’ खेचून घेऊ शकला नाही.
-किती काळ लोटला आता त्या दिवसांना.
देवी कधीच गेली,
लाडाने तिच्या पदराला तोंड पुसणारा काकाही आता राहिला नाही.
-तरीही त्या आठवणी मात्र तरुण आहेत. दिवस सरले असले तरी तारुण्य थोडंच सरतं?

- सुधीर गाडगीळ,manthan@lokmat.com

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...