अभिवादन :इतिहासाचा एक कालखंड विसावला...

Credit :Divyamarathi News
अशोक अडसूळ
स्वाभिमानी आयुष्याची ९५ वर्षे पूर्ण करणारा आणि सर्वच प्रलोभनांना लाथाडणारे पत्रकारांचे भिष्माचार्य दिनू रणदिवे यांचे अलिकडेच निधन झाले. रणदिवे राजकारणाच्या वादळात सर्व अवस्थांत वावरले, परंतू होते तसेच अनिकेत राहिले. त्यांच्या जाण्याने इतिहासाचा एक कालखंड विसावला असला तरी रणदिवे यांनी रिपोर्टिंगचे घालून दिलेले मापदंड हाच मोठा ठेवा आहे. मराठी पत्रकारितेने तो जपला तर पत्रकारितेला कैक ‘दिगू टिपणीस’ मिळतील.
"पत्रकारितेत यशस्वी होण्याचा फाॅर्म्युला नाही. तथ्यांचा चिकाटीने पाठलाग करणे आणि सत्तेला सतत प्रश्न विचारणे, हे काम पत्रकाराने न घाबरता केले पाहिजे' असे ९५ वर्षांचे दिनू रणदिवे सांगत होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुका होत्या... देश स्वतंत्र झाल्यापासूनच्या निवडणुका पाहिलेल्याचा अनुभव यावर 'दिव्य मराठी रसिक'साठी एक लेख करायचा होता. त्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो.  दादर रेल्वे स्टेशनला अगदी खेटून "घामट टेरेस' ही चाळीसमान इमारत आहे. त्याच्या पहिल्या मजल्यावर रणदिवे हे पत्नी सविता सोनी यांच्यासोबत राहात. छोटे स्वयंपाकघर अन दुसरी दहाबाय दहाची खोली. शेल्फवर मोजकी पुस्तके आणि काळवंडून गेलेल्या पुरस्काराच्या ट्रॉफ्या. दोन सिंगल बेड, दोन पत्र्याच्या खुर्च्या अन सर्वत्र पसररेला बातम्यांच्या कात्रणांचा ढिग असे त्यांचे घर होते. त्या मळकट कात्रणांना रद्दी म्हणणे त्यांना बिल्कुल आवडायचे नाही.
रणदिवे यांचा जन्म १९२५ सालचा... पालघर जिल्ह्यातील डहाणुचा. रुईया काॅलेजात गोविंद तळवकलर, मधु दंडवते त्यांचे वर्गमित्र होते. शिक्षण संपल्यावर त्यांनी लोकमान्य वर्तमानपत्रात उमेदवारी केली. ते आधी कार्यकर्ते आणि नंतर पत्रकार झाले. ‘मुंबईसह महाराष्ट्रा’च्या मागणीसाठी ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ची स्थापना झाली फेब्रुवारी १९५६ मध्ये. त्याआधी ‘दादर युवक सभे’ने जोरदार प्रचार मोहीम सुरू केली होती. त्या संघटनेच्या स्थापनेत दिनू रणदिवे, प्रभाकर कुंटे आणि अशोक पडबिद्री यांचा सहभाग होता. त्यापूर्वी त्यांनी गोवा मुक्ती लढ्यात भाग घेतला होता.
मुंबईतले अनेक पत्रकार रणदिवेंचे फॅन आहेत. त्यांचे हिरो असलेले रणदिवे प्रत्येकाचे अलगअलग आहेत. कुणाला ते "सिंहासन' चित्रपटातील दिगू टिपणीस म्हणून भावतात, तर  कुणाला ते मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांचा सिमेंट घोटाळा बाहेर काढणारा पत्रकार म्हणून आवडतात. कुणाला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातला कार्यकर्ता म्हणून भारी वाटतात तर कुणाला सीएम कोट्याचे घर नाकारणारा पत्रकार म्हणून ग्रेट वाटतात. त्यांच्या रिपोर्टिंगच्या दंतकथा मुंबईच्या पत्रकारात अजूनही चर्चिल्या जातात. रणदिवे यांच्याकडे जाणाऱ्या पत्रकारांना त्यांचा इतिहास जाणून घ्यायची आस आसायची. त्यांच्याशी गप्पा झाल्यावर ‘तुम्ही हे सर्व लिहा’ असे अनेकजण त्यांना सांगत. त्यावर रणदिवे काहीच उत्तर देत नसत. उलट त्यांना सतावणारी समस्या सांगून, तिच्यावर कशी बातमी यायला हवी, हे सांगत असत. महाराष्ट्र टाईम्सचे वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक इंटरेस्टींग बातम्या दिल्या. ‘आठवणी महाराष्ट्र जन्माच्या’ हे त्यांचे एकमेव पुस्तक प्रकाशित आहे. त्यांचे शेकडो लेख दिवाळी अंक अन मासिकांच्या ढिगाऱ्यात धूळखात पडून आहेत.  महापालिका हे त्यांचे आवडीचे बीट होते. मुंबई महापालिकेत जाॅर्ज फर्नांडीस, मृणाल गोरे, सोहनसिंग कोहली, काॅ.अहिल्या रांगणेकर, काॅ.तारा व काॅ. जी.एल.रेड्डी, काॅ.पी.के.कुरणे, काॅ.मणिशंकर कवठे, वामनराव पगारे, आर.जी.खरात हे कसे झोपडपट्टीवासियांचे प्रश्न लावून धरायचे याच्या ते आठवणी सांगत. दत्ता सामंतांचा गिरणी कामगारांचा संप असो की जाॅर्ज फर्नांडीसने केलेला रेल्वेचा संप असो...त्याचे अनेक किस्से अन आठवणी त्यांच्याकडे होत्या.
दिनू रणदिवे व बाळासाहेब ठाकरे हे बालपणी दादरला एकाच शाळेत शिकत असत व मित्रही होते. पण त्यांनी शिवसेनेच्या चुकीच्या राजकारणाबाबत मत मांडताना कधी कच खाल्ली नाही. आपलं महानगर, सांज दिनांक या वर्तमानपत्रांवर जेव्हा शिवसैनिकांनी हल्ला केला, तेव्हा शिवसेना भवनासमोर निषेध करण्यात ते पुढे होते.
अरुण साधू यांच्या "मुंबई दिनांक' आणि "सिंहासन' या कादंबऱ्यांवर "सिंहासन' चित्रपट निघाला. या चित्रपटातील निळु फुले यांनी रंगवलेले "दिगू टिपणीस' हे पात्र तुमच्यावर बेतलेले आहे ना, असा प्रश्न त्यांना आजपर्यंत कित्येकांनी केला. पण, त्याला रणदिवे यांनी कधीच उत्तर दिले नाही. ‘ते साधुंनाच माहिती….अरे मी तो चित्रपटच पाहिलेलाच नाही’, असे ते उत्तर देत.
पत्रकार त्यांना सल्ला विचारायचे. तेव्हा ते प्र. के. अत्रे यांच्या बातम्यांचे किस्से सांगायचे. स्पॉटवर जात चला, लोकांशी बोला.. इतकाच सल्ला ते देत. ठाणे जिल्ह्यात वारली बंडाचे वृत्तांकन करण्याासाठी अत्रे डहाणूला गेले होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची  नागपुरला दिक्षा घेतली, त्याला अत्रे हजर होते. पुण्यात पानशेतचे धरणे फुटले, तेव्हा मातीच्या धरणाचे ब्रिटीश कमिशनरकडून अत्र्यांनी पुस्तके मागवली अन त्यावर सविस्तर लेख लिहिले, याविषयी ते सांगत.
संयुक्त महाराष्ट्र पत्रिका कशी काढली, यावर ते आनंद बझार पत्रिकेचा दाखल देत. मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागासाठी इकॉनामिक इन्व्हेस्टिगेटर म्हणून काम करत होतो. तेव्हा इंडियन प्रेस’ हे मार्गारेट बार्न्स यांचे पुस्तक वाचनात आले. अमृतबझार या खेड्यातील घोष नामक तीन भावांनी अमृतबझार साप्ताहिक कसे सुरू केले, त्यात याचा वृत्तांत आहे. माझे ५० आणि अशोक पडबिद्रीचे ४० रुपये इतक्या भांडवलात संयुक्त महाराष्ट्र पत्रिका सुरु केली. पुढे त्याचा खप ५० हजारांवर गेला. दिड वर्षात ते बंद कसे पडले. कर्ज कसे फेडले या हकीकती त्यांच्या तोंडून अनेकांनी ऐकल्या आहेत.
‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची सरकार चुकीची माहिती द्यायची. जाळपोळीचे जुने फोटो आंदोलनातले म्हणून दिले जायचे. त्यातील सत्य आमच्या पत्रिकेने चव्हाट्यावर आणले. या पत्रिकेत मावळा नावाने बाळासाहेब ठाकरे विनामोबदला व्यंगीचित्र काढत. फ्लोरा फाऊंटनला म्हणजे आजच्या हुतात्मा चौकात १९५६ मध्ये बाँबे प्रेसिडेन्सीचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी जमलेल्या सत्याग्रहींवर बेछूट गोळीबार केला. तेव्हा बाळ ठाकरे फ्री प्रेसमध्ये काम करत होते. त्यांनी मानवी सांगाड्याच्या डोंगरावर हातात बंदुक घेऊन उभे असलेले मोरारजीभाई रेखाटले. ते आमच्या पत्रिकेत प्रसिद्ध झाले. बाळासाहेबांच्या काही शेलक्या व्यंगचित्रापैकी ते एक आहे’, असे ते अभिमानाने सांगत.
रणदिवे यांच्या रिपोर्टींगची अनेकांना उत्सुकता आहे. त्याचे अनेक किस्से ते विचारल्यावर सांगत. लोक थंडीत फुटपाथवर कसे राहतात, याची बातमी देण्यासाठी त्यांनी एके रात्री दादर ते व्हीटी अशी पायपीट केली होती. यावरची बातमी प्रकाशित होताच फुटपाथवरच्या लोकांना ब्लॅकेट देण्यासाठी मुंबईकर पुढे आले. मुंबईत रात्री उशीरा घरी जाणाऱ्यांना रेल्वे पोलीस त्रास द्यायचे. त्याची बातमी देण्यासाठी रणदिवेंनी दादर स्टेशनवर रात्र काढली होती. एकदा ते महापालिकेच्या प्रेस रुममध्ये बसले होते. एक व्यक्ती भेदरलेल्या स्थितीत आत आली. त्याची विचारपूस केली. तो सांगू लागला, ‘माझ्या छोट्या बाळाचे निधन झाले आहे. स्मशानभूमीत पुरण्यासाठी नीट जागा देत नाहीत. जी दाखवतात तिथे चिखल आहे. ती व्यक्ती दलित होती. स्मशानभूमीत कशी जातीयता पाळली जाते, याची रणदिवेंनी बातमी लिहिली. नेमके तेव्हा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होते. विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. सरकारला मोठ्या टिकेला तोंड देत स्मशानभूमीसंदर्भात नवे नियम करावे लागले.
रणदिवे पतीपत्नी दोघे स्वातंत्र्यसैनिक होते. पत्नी निवृत्त शिक्षिका होत्या. त्यांना आर्थिक विवंचना नव्हती. पण, त्यांच्या देखभालीसाठी कोणी नव्हते. त्यांचे जे डाॅक्टर होते, त्या कुटुंबाने या दाेघांची शेवटपर्यंत देखभाल केली. अनेकांनी त्यांना वृद्धाश्रमात राहण्याचा सल्ला दिला. पण, रणदिवे यांना वृद्धाश्रमात राहायचे नव्हते. ‘यांना इतके पुरस्कार मिळाले पण पुरस्काराची रक्कम घरी कधी आणली नाही. चार मुख्यमंत्री घरी आले, पण आमच्या समस्या सुटल्या नाहीत,अशी कुरकुर त्यांच्या पत्नीची होती. पण, त्याची रणदिवेंना खंत नव्हती. रणदिवे शेवटपर्यंत तीनचार वर्तमानपत्रे वाचत. त्यांनी एक पुस्तक सोडता मोठे लिहिले नाही. त्यांच्या बातम्या आज पुराभिलेखागारातल्या वृत्तपत्रांच्या गठ्ठ्यात गुडून झाल्या आहेत. पण रणदिवे यांनी रिपोर्टिंगचे घालून दिलेले मापदंड हाच मोठा ठेवा आहे. मराठी पत्रकारितेने तो जपला तर पत्रकारितेला कैक ‘दिगू टिपणीस’ मिळतील.

एक "साधू' पत्रकार
दिनू रणदिवे यांचे व्यक्तिगत आयुष्य तर असं होतं की धुतलेल्या तांदळाला 'भले वो हमसे सफेद क्यू?' असं वाटलं असतं. आयुष्याकडून त्यांच्या फार अपेक्षा नव्हत्या. 'ऐ जॉर्ज', 'ऐ बाळ', असं फर्नांडिस आणि बाळासाहेबांना हक्काने हाक मारणाऱ्या या पत्रकाराने नुसतं तोंड उघडलं असतं तरी सुखं त्यांच्या पायाशी चालत आली असती, पण या व्रतस्थ पत्रकाराने तर त्यांना स्वतःला मिळालेले पुरस्कारही घरी नेले नाहीत. हिमालयात तप करणारेच फक्त साधू नसतात. कुंभमेळ्यात गांजा ओढणारे तर अजिबात साधू नसतात. चार माणसांसारखा संसार करून लेखणीतून लोकसेवा करणारी दिनूंसारखी व्रतस्थ माणसं हेच खरेखुरे साधू असतात.
- द्वारकानाथ संझगिरी (लेखक)

पत्रकारांचा "बाप' गेला...
स्वाभिमानाने आयुष्याची ९५ वर्ष पूर्ण करणारा आणि सर्वच प्रलोभनांना लाथाडणारा हा पत्रकारांचा खरा खुरा ‘बाप’ आज आपल्यातून निघून गेला. पत्रकारिता करतांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांची नांवे घेण्यात येतात. ते तर लांब राहिले निदान दिनू रणदिवे आणि मधू शेट्ये यांचा जरी आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केले तर तीच खरी श्रद्धांजली रणदिवे -शेट्ये यांना अर्पण केली असे समजता येईल. नाही तर विशेष प्रतिनिधी, बातमीदार या ऐवजी “आत्ताच हाती आलेल्या पाकिटावरून” असे छापण्याची वेळ आली असेच खेदाने नमूद करावे लागेल. दिनू रणदिवे, आम्हाला माफ करा!
- योगेश वसंत त्रिवेदी (ज्येष्ठ पत्रकार)

"माणूस' हेच बातमीचे केंद्र...
माणूस हा दिनू रणदिवेंच्या बातमीचा केंद्र तर बातमी हेच या माणसाचे आयुष्य. आजच्या सुपरफास्ट आणि र्व्हच्युअल बातमीदारीच्या काळात दिनू रणदिवेंची बातमीदारी ऐतिहासिक होती. माणसांमध्ये राहून संवेनशीलतेने केलेली पत्रकारिता म्हणजे दिनू रणदिवे. दिवसभर फिरून, अनेकांना भेटून रात्री उशीरा त्यांची बातमी यायची. त्यासाठी वर्तमानपत्राच्या कार्यालयातील सगळे प्रतिक्षा करीत बसत. बातमी मिळवण्यासाठी ते जेवढा वेळ घेत तेवढाच बातमी लिहिण्यासाठी. तास-दोन तास चिंतन करून बातमी लिहीत. त्यासाठी असंख्य संदर्भ आणि नोंदी हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी त्यांची बातमी हा संपूर्ण राज्याच्या चर्चेचा विषय ठरे. बातमीचा विषय असो वा बातमीतील शब्द, प्रत्येक गोष्ट ते मोजून मापून निवडत. राज्यातील अनेक नेत्याशी त्यांचा परिचय. धनिष्ट मैत्री. मात्र, ते संबंध त्यांनी बातमीदारी करण्यासाठीच उपयोगी आणले, बातमी रोखण्यासाठी नाही. त्याकाळी पत्रकारितेत तसा अवकाशही देण्यात येत होता आणि दिनूसारख्या पत्रकारांसाठी ती पूरक परिस्थिती होती.
-दिनकर गांगल (ज्येष्ठ संपादक)

adsul.ashok@gmail.com
Image &Article Credit:  https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/columnist/news/ashok-adsul-rasik-article-127429184.html?ref=inbound_More_News

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...