"एक्‍सप्लोझिव्ह डिटेक्‍टर'ने वाचविले असते अनेकांचे प्राण... - प्रमोदकुमार

सौजन्य :विष्णू सोनवणे - सकाळ वृत्तसेवा
मुंबई - साडेसहाशे मीटरच्या रेंजमध्ये शस्त्रास्त्रे किंवा स्फोटके आणणारी व्यक्ती आल्यास त्याची खबर तत्काळ "एक्‍सप्लोझिव्ह डिटेक्‍टर' देतो.
डिटेक्‍टरला कनेक्‍ट असलेल्या सीसी कॅमेऱ्यात त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे पोलिस सावध होतात. त्या व्यक्तीला तपासणीसाठी ताब्यात घेता येते... सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेले देशातील हे पहिलेच अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, असा दावा हे यंत्र विकसित करणारे खासगी सुरक्षा सल्लागार प्रमोद कुमार यांचा आहे. मात्र रेल्वेस्थानकात झळकणाऱ्या जाहिरातींना हा डिटेक्‍टर अडथळा ठरतो आणि रेल्वेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होते, अशी सबब पुढे करीत रेल्वे प्रशासनाने हा डिटेक्‍टर काढून टाकला होता. रेल्वेने हे पाऊल उचलले नसते तर अनेक नागरिकांचे प्राण वाचले असते...

"एक्‍सप्लोझिव्ह डिटेक्‍टर'च्या रेंजमध्ये कोणतीही स्फोटके किंवा केमिकल आणणारी व्यक्ती आली; तर त्या व्यक्तीचा फोटो सीसी कॅमेऱ्यात आणि स्फोटकांची माहिती या यंत्रात तत्काळ दिसते. त्यामुळे या व्यक्तीला ताबडतोब रोखता येऊ शकते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रमोद कुमार यांनी हा "एक्‍सप्लोझिव्ह डिटेक्‍टर' विकसित केला आहे. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी तयार करण्यात आलेले देशातील हे पहिलेच तंत्रज्ञान असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जानेवारी २००५ पासून त्यांनी या तंत्रज्ञानावर संशोधन केले आहे.

चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये "एक्‍सप्लोझिव्ह डिटेक्‍टर' मोफत बसविण्याची तयारीही प्रमोद कुमार यांनी दर्शविली होती. रेल्वे प्रशासनाशी त्यांनी याबाबत पत्रव्यवहारही केला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांना चर्चगेट रेल्वेस्थानकात डिटेक्‍टर बसविण्यासाठी परवानगी मिळाली, मात्र रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या डिटेक्‍टरचे यंत्र काढण्यास भाग पाडले. या डिटेक्‍टरमुळे जाहिरातींना अडथळा निर्माण होत असल्याने रेल्वेचे उत्पन्न बुडते, हे कारण त्यांनी पुढे केले आणि हे तंत्रज्ञान गुंडाळण्यास भाग पाडले, अशी माहिती प्रमोद कुमार यांनी दिली.

अशी आहे कार्यप्रणाली
"एक्‍सप्लोझिव्ह डिटेक्‍टर'मध्ये ३२ हजार केमिकल्सच्या प्रॉपर्टीजही आहेत. "डिटेक्‍टर'ला सीसी कॅमेऱ्याचे सर्किट जोडण्यात आले आहे. सहा चौरस फुटाच्या जागेत हा "डिटेक्‍टर' ठेवून रेल्वेस्थानकात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवणे शक्‍य आहे. या "डिटेक्‍टर'च्या रेंज स्प्रेड होतात. मेटल डिटेक्‍टर आणि सीसी कॅमेऱ्यातून स्फोटके ओळखता येत नाहीत. म्हणूनच हे नवे तंत्रज्ञान मुंबईकरांच्या सुरक्षेसाठीच आपण तयार केले आहे, असे प्रमोद कुमार यांनी सांगितले.

...तर शशांक शिंदेंसह प्रवासी वाचले असते
अतिरेकी कारवायांचा धोका असल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये "एक्‍सप्लोसिव्ह डिटेक्‍टर' बसविण्याचा आग्रह या रेल्वेस्थानकात अतिरेक्‍यांशी लढताना शहीद झालेले रेल्वेचे पोलिस निरीक्षक शशांक शिंदे यांनी धरला होता. त्यासाठी त्यांनी प्रमोद कुमार यांना सर्वेक्षण करण्यासाठी मदत केली होती. ही यंत्रसामग्री बसविण्यात आली असती, तर अतिरेक्‍यांना रोखता आले असते, अशी चर्चा आता रेल्वे पोलिसांमध्ये आहे.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...