अमेरिकेच्या इंटरनेट वर्चस्वालाही धक्का!

इंटरनेट जगतातील अमेरिकेची एकाधिकारशाही आता संपुष्टात येत आहे. इंटरनेट सेवा पुरविण्याच्या क्षेत्रातील या देशाच्या मक्तेदारीला इतर देशांमुळे (विशेषतः चीन आणि भारत) मोठा तडा गेला आहे.

एकेकाळी इंटरनेटची मुळाक्षरे जगाला शिकविणाऱ्या अमेरिकेवरच आता त्याबाबत अधिक शिकण्याची वेळ आली आहे. "इंटरनेटला दिशा दाखविणारा देश' ही अमेरिकेची प्रतिमाही बदलत चालली आहे.

वॉशिंग्टनमधील "टेलिजिऑग्राफी रिसर्च सेंटर'ने केलेल्या पाहणीतून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. आर्थिक मंदीची झळ बसलेल्या अमेरिकेवर हे संकट अचानक कोसळलेले नाही. ते विविध क्षेत्रांमधून हळूहळू पसरत गेले आहे आणि त्यामध्येही इंटरनेट क्षेत्राचाही समावेश आहे. दक्षिण अमेरिकी आणि आशियाई देशांनी एका दशकाहूनही कमी अवधीत या तंत्रज्ञान क्षेत्रात मिळविलेले यश अमेरिकेचे "इंटरनेट ट्रॅफिक' (इंटरनेटवरील माहितीचे आदान-प्रदान) खेचून घेत आहे. पायाभूत सुविधा म्हणून इंटरनेट क्षमतेचा विकास करण्यात या देशांनी दाखविलेली धडाडी हे त्यामागचे प्रमुख कारण ठरले आहे.

""अमेरिका हेच इंटरनेटचे मूळ होते आणि आहे. आजही माहितीचा मोठा स्रोत अमेरिकेकडूनच येतो. तिथूनच पुष्कळ गोष्टी जगभरात पोचविल्या जातात; पण त्याचे महत्त्व आता कमी होत चालले आहे,'' असे "टेलिजिऑग्राफी'चे वरीष्ठ संशोधक एरिक स्कूनोव्हर यांनी म्हटले आहे. यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. १९९९ मध्ये आशिया खंडातील कोणत्याही स्वरुपाच्या माहितीसाठ्यापैकी (डेटा) ९१ टक्के माहिती कोणत्या ना कोणत्या मार्गावरून अमेरिकेतूनच येत होती. आता हेच प्रमाण ५४ टक्के इतके झाले आहे. म्हणजे असे, की थायलंडसारख्या आशियाई देशाशी संबंधित माहितीसाठ्यातून मिळणाऱ्या माहितीपैकी ५४ टक्के माहितीचा संबंध अमेरिकेशी येतो आहे. आफ्रिका खंडाच्या बाबतीत तर अमेरिकेची अवस्था त्यापेक्षाही वाईट आहे. या खंडातून होणाऱ्या "इंटरनेट ट्रॅफिक'मध्ये अमेरिकेचा सहभाग नऊ वर्षांपूर्वी ७० टक्के होता. तो आज अवघ्या सहा टक्‍क्‍यांवर आला आहे. अमेरिकेची जागा आता चीन, भारत आदी देश व्यापत आहेत.

अमेरिकी संरक्षण यंत्रणेशी संबंधित "अर्पानेट' या प्रकल्पापासून इंटरनेटचे युग सुरू झाले. सर टीम बर्नर्स ली यांनी विकसित केलेल्या "वर्ल्ड वाइड बेव'नंतर अक्षरशः थक्क करणाऱ्या गतीने प्रवास करीत इंटरनेटने जग आपल्या कवेत घेतले. या साऱ्या प्रवासात अमेरिका दिशादर्शक होती.

मात्र, या वर्षाच्या सुरवातीला जेव्हा चीनमधील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या अमेरिकेतील इंटरनेट वापरणाऱ्यांपेक्षा जास्त असल्याचे पुढे आले, तेव्हाच इंटरनेटला दिशा देण्याचे अमेरिकेचे स्थान हिरावले गेल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर भारत, सिंगापूर आणि दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलसारख्या देशांमध्ये इंटरनेटच्या पायाभूत सुविधांचा विकासही झपाट्याने झाला आहे. "सर्व्हर', "बॅंडविड्‌थ'च्या ज्या मुद्‌द्‌यावर अमेरिकेची मक्तेदारी टिकून होती. त्यालाही धक्का बसण्यास सुरवात झाली आहे.

"ऑप्टिकल फायबर नेटवर्क'च्या विस्तारामुळे इंटरनेटची गती या देशांमध्ये खूप वाढली आहे. पूर्वी पुण्यातल्या पुण्यात अगदी आपल्या तीन-चार घरांच्या पलीकडे राहणाऱ्या मित्राला "ई-मेल' पाठविला, तरी तो त्याला न्यूयॉर्कमार्गे मिळत असे. अर्थातच, इंटरनेट कनेक्‍टीव्हिटीमुळे पुणे आणि न्यूयॉर्कमध्ये अंतर राहात नसेच. आता हाच प्रकार कमी होत चालला आहे. आता स्थानिक पातळीवर "बॅंडविड्‌थ' यंत्रणा उभी राहात असल्यामुळे अमेरिकेचे इंटरनेटच्या प्रत्येक गोष्टीतील महत्त्व कमी होत चालले आहे.
- स्नेहा रायरीकर
[CREDIT:SAKAL NEWS NETWORK]

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...