या ‘नक्षत्रां’नाही मानवंदना द्यावी

झी मराठी’ वाहिनीवर गाजलेला ‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम परत सुरू होत असल्याचा आनंद झाला। आजवर या कार्यक्रमातून अनेक प्रतिभावंत मराठी कलावंतांच्या कारकीर्दीवर श्रवणीय अन् प्रेक्षणीय झोत टाकण्यात आला व त्यास मराठी रसिकांनी भरभरून दाद दिली. यातले काही कार्यक्रम तर अविस्मरणीय असेच होते. मात्र पुन्हा सादरीकरण करताना या कार्यक्रमात बहुजनांवर मोहिनी घालणाऱ्या अनेक कलाकारांचा समावेश करत येण्यासारखे आहे.
मराठी लोकसंगीताची परंपरा अत्यंत समृद्ध आहे. (लग्नगीत, सवालजवाब, लळित, वहीगायन, भेदिक, गण- गवळण, लावणी, भारूड, कोळीगीतं, पोवाडा, पाळणा, फटका, अभंग, अंगाईगीतं.) या परंपरेविषयी नव्या पिढीला ज्ञान व्हायला हवे. कारण या लोककला-लोकपरंपरा म्हणजे आपल्या अस्सल मऱ्हाटी संस्कृतीचं संचित आहेत.
म्हणूनच जिथे-जिथे मराठी बोलली जाते त्या ठिकाणच्या कला-संस्कृतीचे प्रतिबिंब आपल्या कलेत उतरवणाऱ्या कलावंतांचाही समावेश ‘नक्षत्रांचे देणे’मध्ये व्हायला हवा. बहुजन समुदायामध्ये लोकप्रिय असलेल्या शाहीर साबळे, विठ्ठल उमप, प्रल्हाद शिंदे, शाहीर अमरशेख, सुलोचना चव्हाण, वामनदादा कर्डक, शाहीर निवृत्ती पवार, शाहीर पुंडलिक फरांदे, रोशन सातारकर, विठ्ठल शिंदे, विठाबाई भाऊ मांग, कृष्णा शिंदे, पी. सावळाराम, संगीतकार मधुकर पाठक, विश्वनाथ मोरे, श्रीकांत ठाकरे या व इतरही कलावंतांची कला ‘नक्षत्रांचे देणे’च्या माध्यमातून ‘झी’ मराठीने रसिकांसमोर आणायला हवी. या यादीत श्रीकांत ठाकरे यांचे नाव मुद्दाम घातले, कारण श्रीकांत ठाकरे रूढार्थाने बहुजनांमध्ये लोकप्रिय नसले तरी त्यांचे मराठी संगीतातील योगदान अनोखे आहे. मात्र त्याची यथायोग्य दखल घेतली गेली नाही.
आतापर्यंत या कार्यक्रमातून ज्या कलावंतांना मानवंदना देण्यात आली ते (एखाद-दुसरा अपवाद वगळता) सर्व अभिजनवर्गाच्या अभिरुचीस भावणारे होते आणि त्यांच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे होते. नागरी समूहाव्यतिरिक्त बहुजनवर्गाला ती व्यक्तिमत्त्वे भावणारी नाहीत.
अभिजनांची आणि बहुजनांची अभिरुची यात भिन्नता असतेच असते. अरुण दाते आणि प्रल्हाद शिंदे या दोन गायकांपैकी बहुजन व ग्रामीण समुदायात जी लोकप्रियता प्रल्हाद शिंदेंना आहे ती अरुण दातेंना नाही. तसेच अभिजन व नागरी वर्गात जेवढय़ा आवडीने व आदराने अरुण दाते ऐकले जातात, त्याच भावाने प्रल्हाद शिंदे नाही!
‘टीव्ही’ हे समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे अशा माध्यमाद्वारे सादर होणारे कार्यक्रम हे अभिजन आणि बहुजन अभिरुचीचा-संस्कृतीचा सुवर्णमध्य साधणारे असावेत.
हिंदीत ज्याप्रमाणे सध्या सुफी संगीताला सुगीचे दिवस आले आहेत, त्याप्रमाणे मराठीतही लोकसंगीताच्या विविध प्रकारांना पुरेसे स्थान मिळणे आवश्यक वाटते.
मराठी संगीतात आजच्या घडीला प्रयोग जरूर होताहेत (याचं श्रेय तरुण संगीतकार अजय-अतुल, सलील कुलकर्णी, अवधूत गुप्ते, कौशल इनामदार, संदीप खरे, अमर्त्य राहुल यांना द्यायला हवे!) मात्र त्यांचा प्रसार अजून जोमानं होऊन असे प्रयोग सर्व समूहांपर्यंत पोहोचणे नितांत गरजेचे आहे.

प्रा. प्रवीण घोडेस्वार, नाशिक
-लोकमानस, लोकसत्ता मधून

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...