चिनी मोबाईलवर बंदी?

ब्रॅण्डेड मोबाईलपेक्षा स्वस्त किंमतीत उपलब्ध असलेले चिनी मोबाईल फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा। कारण या फोनवर बंदी घालण्याचा विचार दूरसंचार विभागातर्फे करण्यात येत आहे. चीनमध्ये स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या मोबाईलना ‘इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट नंबर’ (आयएमईआय) नसतो. त्यामुळे या मोबाईलचा थांगपत्ता लावणे कठीण जाते. दहशतवादी कारवायांमध्ये याच मोबाईल फोनचा वापर झाल्याचे अलीकडे झालेल्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दूरसंचार विभागातर्फे हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे कळते. भारतात सुमारे दीड कोटी चिनी मोबाईलची विक्री झाल्याचा दावा केला जात आहे. सरसकट सर्व चिनी मोबाईलवर बंदी न टाकता केवळ ज्या मोबाईल फोनना आयएमईआय नाही, त्याच मोबाईलवर बंदी घालण्यात येणार आहे. इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट नंबर हा प्रत्येक जीएसएम मोबाईल फोनला देण्यात आलेला विशिष्ट क्रमांक असतो. एखाद्याचा फोन हरवला किंवा चोरला गेला आणि ग्राहकाने संबंधित मोबाईल सेवा कंपनीला त्या फोनचा आयएमईआय नंबर कळविल्यास तो फोन बंद करता येऊ शकतो. मोबाईलचा आयएमईआय नंबर मोबाईल बॅटरीच्या खाली लिहिलेला असतो. अथवा मोबाईलवर *#06# डायल केल्यावर मोबाईलच्या स्क्रीनवर आयएमईआय क्रमांक दिसतो.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...