इर्जिक

फोटो स्वामित्व : दै.लोकसत्ता
बालकवींची ‘फुलराणी’ कविता आठवते तेव्हा तुळसीविवाह डोळ्यांसमोर येतो। दिवाळी झाली की तुळसीविवाह साजरा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. फुलराणीसारखाच हा तुळसीविवाह!
मोहरलेल्या वनझाडांना त्या काळात पहिला बहर येतो. हा बहर प्रथम तुळसीच्या ओटीत टाकण्यासाठी ही वनझाडे उत्सुक असतात. बोरं, चिंचा, कवठ, ऊस, धान्याच्या ओंब्या, आवळे अशा रानावनात सहज मिळणाऱ्या गोष्टी. या सगळ्यांचा बहर ओसरतो तेव्हासुद्धा संक्रांतीला त्या सवाष्णीच्या आव्यात जाऊन बसतात. कवठाचं काम थोडं वेगळं. तो आपला निरोप घेतो शिवरात्रीला.. शिवाच्या चरणी रुजू होऊन! तुळसीवृंदावनात हा रानमेवा दिसला की त्या संध्याकाळी असा भास होतो की, ही वनफळं तुळसीची थट्टामस्करी करत असणार व ती लाजून लाजून संकोचत असणार.. त्या फुलराणीसारखीच!
बालकवींची फुलराणी काय, तुळसीविवाह काय किंवा संक्रांतीतील सवाष्णींचा असणारा आवा काय, हा सगळा निसर्गातील स्थित्यंतरांचा आलेख आहे. स्त्रीमनाची ती प्रतिमा आहे. निसर्ग आपपरभाव न ठेवता प्रत्येकाला काहीतरी देत असतो. आपण घेताना मात्र त्यात प्रतीकात्मता शोधत राहतो. मानवी संस्कृतीचा तो प्रवास आहे.
बांधावर, माळरानावर बोरांची लगडलेली झुडपं, तर कुठे उंच झाडं पाहून हे सगळं आठवणारच ना! या बोरींना कृषिजीवनात फार प्रतिष्ठा नाही. त्यांचे काम रखवालदाराचे. त्यांना असणाऱ्या काटय़ांमुळे बोरीच्या फांद्या- ज्याला ‘बोऱ्हाटय़ा’ म्हणतात- त्या बांधावर उभं राहून पिकाचं गुराढोरांपासून, माणसांपासून संरक्षण करतात. कुठं बोऱ्हाटीच्या झावळ्या केलेल्या असतात. गुराढोरांचं वाडगं असतं तिथं दार म्हणून लावण्यासाठी किंवा घरात येणारी धान्यरूपी लक्ष्मी ज्या कणगीत भरली जाते, तिच्याखाली उंदीर, घुशी येऊ नयेत म्हणून. एवढाच बोऱ्हाटय़ांचा उपयोग!
..आणि म्हणूनच बोरीची झाडे लावणे, ती सांभाळणे या गोष्टी तशा दूरच. आपण काही माणसं जशी उपेक्षित ठेवली, तशाच उपेक्षित राहिल्या या बोरी-बांभळी. पण तुळसीविवाह झाला की संक्रांतीपर्यंत बोरी लगडून जातात बोरांनी. आणि हा रानमेवा खाण्यासाठी मग पोरं अशा माळरानावर, बांधा-बांधावर उधळली नाही तरच नवल! हा बोरवेडेपणा लोकगीतांतही डोकावतो-
हारा बाई हरकुलं, बाळाच्या हाती कुरकुलं
बाळ जातं बोराला, संगं नेतं पोराला
बाळाची बोरं सांडली, पोरं वेचू लागली
बाळ लागलं रडायला, पोरं लागली हसायला
काही आंबट, काही तुरट, काही पिठुळ, काही गोड, काही आंबट-गोड. प्रत्येक झाडाची चव वेगळी. तुळसीविवाह किंवा सवाष्णीच्या आव्यातली बोरं माणसांच्या उत्सवाचाच भाग असतो. संक्रांतीला मुलाला ‘बोरन्हानं’ घालण्याची प्रथा आहे. माणसाच्या अंगाखांद्यावर निसर्ग असा खेळत राहावा यासाठीच बालपणीच ही दीक्षा दिली जात नाही ना?
बोरींसारखीच या ऋतूत फुलणारी दुसरी झाडंझुडपं बाभळींची. बोऱ्हाटय़ांसारखाच बाभळीच्या फांद्यांचा उपयोग बांधावर, वाडग्याच्या दारावर संरक्षक म्हणून केला जातो. ‘ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी’सारखी म्हण त्यातूनच तयार झाली. एरव्ही नकोशा असणाऱ्या या बाभळीच्या शेंगांपासून पूर्वी लहान बाळासाठी तीट बनवलं जायचं. बाळाला दृष्ट लागू नये म्हणून! पण हेच उपेक्षित झाड ‘डिंका’सारखी किमती गोष्टही देतं. केवळ बाळंतिणीसाठीच नाही, तर बळ वाढविण्यासाठी माणसांना डिंकाचे लाडू- विशेषत: हिवाळ्यात सकाळी सकाळीच उब देतात.
बिच्चारी बोरं! त्यांचं स्थान शबरीच्या झोपडीत. राजवाडय़ात वा आजच्या डायनिंग टेबलावर थोडेच आहे? एवढा ऋतू संपला की मग ही झाडं पुन्हा उपेक्षितच राहतात. ना त्यांना कोणी खत-पाणी घालत, ना कोणी सांभाळत. ‘बोरी-बाभळी उगाच जगती’ म्हणत आपणही ही भूमिका अधिक स्पष्ट करत राहतो.
अशा रानमेव्यांमुळे हा ऋतू मात्र बहरत राहतो.. वेगवेगळ्या गंधांनी, चवींनी. बांधावरच्या अशा झाडाझुडपांच्या फांदीला एखादी झोळी बांधलेली दिसते. अन् बाजूच्या वावरात असतात खुरपणाऱ्या महिला!
पिकं वाढायला लागतात तेव्हा त्या पिकांत गवतही वाढू लागतं. जमिनीतील अन्न फक्त पिकांना मिळावं, ते जोमानं वाढावं, म्हणून असं माजत असलेलं गवत काढण्यासाठी याच काळात खुरपणीही चालू असते. अशा खुरपणीच्या कामावर आलेली असते एखादी लेकुरवाळी! आपल्या मुलाला ती घरी कशी ठेवणार? मग घेऊन येते ती आपल्या बाळाला. मधूनच लेकराला पाजताना तिची ‘सरी’ मागं राहते. बाजूच्या समजूतदार बायका मग तिची सर खुरपत पुढे नेतात. एकाच ओळीत, एकाच रेषेत, एकाच लयीत अशी खुरपणी चालते तेव्हा ते दृश्य पाहत राहावेसे वाटते.
शेतीच्या सगळ्या कामांत खुरपणीला फार महत्त्व आहे. खुरपणी केली की रान स्वच्छ, मोकळे होते. पिकाच्या बुडाला लागलेली माती.. त्या मोकळ्या मातीतून मिळते पिकाच्या मुळांना हवा. मग ही पिकं रसरशीत होऊन तरतरा वाढायला लागतात. म्हणूनच ग्रामीण जीवनात एक संकेत आहे- ‘खुरप्याची आणी आन् पावसाचं पाणी.’ (आणी म्हणजे खुरप्याचा पुढचा भाग) एक पाऊस पडल्यामुळे जेवढा फायदा पिकांना मिळतो, तेवढाच या खुरपणीमुळेही!
सगळ्याच शेतकऱ्यांना नाही परवडत खुरपणी. मोलमजुरीला पैसा जातो. कधी कधी माणसंही मिळत नाहीत. म्हणून आज जागोजागी कोळपणी चाललेली दिसते. कोळपणीसाठी बैलं लागणारच. रानातलं हिरवंगार धान्य त्यांनी खाऊ नये म्हणून अशा वेळी बैलांना मुसकी बांधली जाते. कितीही उनाड जनावर असलं तरी अशा वेळी ते एक रोपही खाऊ शकत नाही. ‘मुसक्या बांधणे’ हा शब्दप्रयोग यातूनच आला.
आज महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ांत ही सगळी गडबड चालू आहे. सुगीची ही पूर्वसंध्या! रानातल्या या सगळ्या गोष्टी आपल्या सणावारांत, पूजापद्धतीत सामावून घेतल्या आहेत. एका बाजूने हा कृतज्ञताभाव, तर दुसऱ्या बाजूने हे महाकाव्य- निसर्ग, माणूस आणि देवांना सामावून घेणारे! पुन्हा पुन्हा प्रत्यय देणारे!!
आज बोरांकडे फळ म्हणून व उत्पादन म्हणून पाहिले जात आहे. जाणीवपूर्वक वाढवलेल्या या संकरित बोरांना गावरान बोरांची चव कोठून असणार? ही मोठमोठी, बटबटीत ‘बोरं’ जाळ्यांच्या पिशव्यांत विक्रीला पाठविली जात आहेत. कमी पाऊस असणाऱ्या क्षेत्रात ती वाढू शकत असल्यामुळे विविध कृषी विद्यापीठांतून बोरांच्या जातींचे संशोधन चालू आहे.
बाभळीचेही तसेच! सुबाभूळचे उत्पन्न घेण्यास शेतकरी फार उत्सुक दिसत नाहीत. बोरी आणि बाभळीमुळे रानात वणवा येतो म्हणून ही झाडं सांभाळली जात नाहीत. पण लिंब वा इतर झाडांसाठी शेतकरी अपवाद करतो, तो त्यांच्या उपयुक्ततेमुळे! बाभळीत मात्र ‘रामकाठी’ बाभूळ आवर्जून सांभाळली जाते. रामकाठी सरळ वाढते आणि तिच्या या गुणामुळेच खुरप्याच्या मुठीपासून बैलगाडीच्या जूपर्यंत सगळी सणगं बनवायला ती उपयोगी येते.
ज्यांनी रानावनांत फिरून माळरानावर बोरं वेचली आहेत, बोरं वेचताना बोऱ्हाटय़ांनी ज्यांचं अंग ओरखडलं गेलं आहे व ज्यांनी आपले बोरांनी भरलेले खिसे पखालीसारखे उडवत गावभर हा रानमेवा लुटला आहे, त्यांना नवीन जातीची संकरित बोरं आवडणार नाहीत. म्हणून तर छोटय़ा आटुळ्या असलेल्या आंबट-गोड देशी बोरांचा भाव वाढला आहे. ती महाग असतात.
आयुर्वेदात डिंकाचे महत्त्व आहेच, पण बोरांतून जी प्रथिने मिळतात ती पाहता बोरे ही गरीबांची सफरचंदेच आहेत. एन.सी.एल.मधील ज्येष्ठ संशोधक डॉ. रतिकांत हेंद्रे यांच्या ‘आपल्या परिचयाची फळे’ या पुस्तकातील बोरांवरचा लेख वाचला तर या उपेक्षित झाडाचं महत्त्व समजेल.
नदीकाठी, ओढय़ाकाठी, विहिरीच्या बाजूला अशी बोरी-बाभळीची झुडपं असतील, तर तिथे एखादे मधमाश्यांचे मोहोळ नक्कीच सापडते. अशी मोहोळं शोधणं, त्यांचा मध चाखणं आणि उरलेल्या पोळय़ाच्या कांद्यापासून मेण बनवणं, हा उपद्व्याप करण्यात मुलांचा शनिवार- रविवार चांगला जाई. पूर्वी हळदी-कुंकवाच्या करंडय़ाबरोबर असे मेणाचेही करंडे असत. आज या गोष्टी पाऊलखुणांसारख्याच राहिल्या आहेत. आज बदलत्या कृषिसंस्कृतीत या उपेक्षित बोरी-बाभळी व मध उत्पादन भविष्यासाठी नवा अर्थपूर्ण उद्योग असेल, हे नक्की!


-अरुण जाखड़े
-(दै. लोकसत्तातील 'इर्जिक ' या सदरातून साभार )

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...