विकासाचा दहशतवाद!

दै. लोकसत्ता :
विकास-सुरक्षा-तंत्रज्ञानविषयक प्रस्थापित दृष्टिकोन बाजूला सारूनच महाविध्वंसक घटनांपासून काही शोधबोध घेता येईल. भ्रष्टाचाराबाबत बोलायचे तर पैसा-सत्ता-मत्ता-प्रतिष्ठा-पैसा याचे जे भयंकर षड्यंत्र उभे राहिले आहे. त्याचे मुख्य कारण मस्तवाल भोगलालसा आहे. मुंबईवरील भीषण अतिरेकी हल्ला व तारांकित हॉटेलांमधला विध्वंस यांच्या बातम्या क्षणार्धात जगभर पोहोचल्या. दक्षिण मुंबई, महाराष्ट्र आणि भारतालाच नव्हे तर अवघ्या विश्वाला यामुळे एक जबरदस्त हादरा बसला. वृत्तवाहिन्यांनी प्रत्यक्ष दृश्य दाखविले, वृत्तपत्रांतूनही छायाचित्रे, घटनाक्रम आणि त्याबरोबरच संरक्षणविषयक गाफीलपणाच्या अनेक बाबी चव्हाटय़ावर आल्या..

सागरी संरक्षण व्यवस्थेच्या गलथानपणाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. सागरी मार्गाने चालणारी तस्करी व अमली पदार्थाचा व्यापार वर्षांनुवर्षे चालू आहे, हे सर्वानाच ठाऊक आहे. यात देशी-परदेशी माफिया टोळ्या व राजकारणी, नोकरशहा, पोलीस व संरक्षण यंत्रणेचे लागेबांधे आहेत, हेदेखील ढळढळीत सत्य आहे.
देशोदेशींच्या तमाम शासन-प्रशासन-संरक्षण व्यवस्थेला धाब्यावर बसवून हे सर्व अवैध धंदे चालू राहतात, याचे कारणच मुळी सर्वदूर पसरलेला भ्रष्टाचार हे आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. खरे तर हा भ्रष्टाचार एवढा प्रचंड व महाभयानक आहे की, त्याची ‘कामे करून घेण्यासाठी पैशाची देवघेव’ एवढी मर्यादित व्याख्या करणे चुकीचे आहे. पैसा-सत्ता-मत्ता-प्रतिष्ठा-पैसा याचे जे एक भयंकर षड्यंत्र उभे राहिले आहे त्याचे मुख्य कारण अघोरी भोगलालसा, हावहव्यास आणि ‘खाओ- पिओ-जिओ’ची मस्तवाल प्रवृत्ती आहे.
आर्थिक सुधारणा व जागतिकीकरणाच्या झगमगाटाच्या आजच्या जमान्यात बहुराष्ट्रीय कंपन्या, आंतरराष्ट्रीय संस्था, सरकारे, नोकरशहा आणि या सर्वाशी लागेबांधे असलेल्या एनजीओ अर्थात ‘स्वयंसेवी’ (खऱ्या सेवाभावी नव्हे) संस्था यांची संस्थात्मक कार्यपद्धती व व्यक्तिगत जीवनशैली ही सामाजिक-पर्यावरणीय दृष्टीने विषमतावादी व विनाशकारी आहे. सर्वसामान्यांचा राबता असणारे मुंबईचे सीएसटी रेल्वे स्टेशन आणि ताज व ओबेरॉयसारखी पंचतारांकित हॉटेले पोळून निघण्यात समाजाच्या सर्वच आर्थिक स्तरांना झळ पोहोचली.
ताजमहाल हॉटेल हे गेटवे ऑफ इंडियासमोरील खरोखरीच फार भव्य व मोहक वास्तू आहे; स्थापत्य व शिल्पशास्त्रीयदृष्टय़ा ती एकमेमाद्वितीय आहे. तथापि अशा पंचतारांकित ठिकाणी दरडोई वीज, पाणी व अन्य संसाधनांचा जो अवास्तव, अनावश्यक वापर होतो, अन्नपदार्थाची जी नासाडी व अफाट सेवन होते, त्याचा विचार करता ही जीवनशैली किती बकासुरी आहे हे लक्षात येऊ शकते. त्याचे येथे वावरणाऱ्या महाजन-अभिजन वर्गाला यत्किंचितही देणेघणे नाही. ती म्हणे त्यांची सामाजिक-सांस्कृतिक गरज आहे. ते आधुनिकीकरणाचे- औद्योगिकीकरणाचे- जागतिकीकरणाचे प्रतीक आहे.
ही सर्व तथाकथित संस्कृती (की विकृती) बघून गांधीजींनी १९०९ साली लिहिलेल्या ‘हिंद स्वराज्य’ या आशयगर्भ पुस्तकात पाश्चात्त्य औद्योगिक सभ्यतेचे जे विवेचन केले त्याची प्रकर्षांने आठवण होते. आज जगभरचे पर्यावरणविद ज्याबाबत चिंतित आहेत त्याच्या बुडाशी ही तथाकथित औद्योगिक-आधुनिक सभ्यता आहे. गांधींनी हे अचूकपणे हेरले होते. हेच गांधीजींचे द्रष्टेपण म्हटले पाहिजे. हिंसा फक्त युद्धात अगर दहशतवाद्यांच्या हल्ल्यापुरती मर्यादित नाही, ती तर दृश्य व भयानक आहेच, मात्र आपण अभिजन मंडळी जे अन्न खातो, जे कपडे वापरतो, ज्या घरात राहतो (ज्या पद्धतीने ते सजवतो) जे वाहन वापरतो त्यामुळे कमीअधिक प्रमाणात निसर्गाविरुद्ध हिंसा घडून येते, स्वेच्छेने ते नाकारणे, ही खरी संस्कृती आहे.
कला, शिल्प, संगीत, स्थापत्य वस्त्र, पाककला, अन्नस्वाद हे सर्व संस्कृतीचे आयाम आहेत. तथापि, तारतम्याने त्यांचा विकास व वापर करणे आवश्यक आहे. वृद्धीवादी विकास पद्धती याला मस्तवालपणे नकार देते. प्रचलित प्रभावशाली विकास प्रतिमान निसर्ग व मानवतेचे क्रूरपणे दोहन व शोषण करते. म्हणूनच गांधीजींनी नि:संदिग्ध शब्दात भोगवादी उत्पादन, विनिमय उपभोग पद्धतीचे वर्णन सैतानी संस्कृती असे केले होते. वस्तुत: १९०९ साली म्हणजेच बरोबर शंभर वर्षांपूर्वी पर्यावरणीय विनाश व विध्वंसाचा एवढा सखोल, स्पष्ट व भविष्यलक्षी विचार फार मोजक्या तत्त्ववेत्त्यांनी केला होता. त्यांचे चिंतन रस्किन, धिरो, टॉलस्टॉय यांच्या भूमिकेचा पुरस्कार करणारे आहे. रस्किनच्या ‘अन्टु धिस लास्ट’ने तर गांधींची जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलून गेली होती. टॉलस्टॉय यांच्याशी तर त्यांचा पत्रव्यवहार होताच. गांधींनी ‘हिंद स्वराज’चा मसुदा टॉलस्टॉय यांना अभिप्रायासाठी पाठिवला होता. मुंबईतील महाविध्वंसक घटनांची पाश्र्वभूमी व विकास-सुरक्षा-तंत्रज्ञानविषयक प्रस्थापित दृष्टिकोन लक्षात घेता त्यापासून आपण काय शोधबोध घेतो हा कळीचा प्रश्न आहे. इतिहासापासून आपण काय शिकतो, त्याचा वर्तमान व भविष्याबाबत काय धडा घेतो या बाबीला अनन्यसाधारण महत्त्व असते.
अग्रक्रमाने सुरक्षाव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन करून कठोरपणाने गलथानपणा व भ्रष्टाचाराला पायबंद घालणे हे मोठे आव्हान आहे. त्यासोबतच विकास, तंत्रज्ञान, सुरक्षापद्धती याबाबत संरचनात्मक विचार करणे आवश्यक आहे. एवढा भयंकर हादरा व प्रलयंकारी घटनेपासून आपण काही शिकणार आहोत की नाही? आपण मुंबई चार-दोन दिवसांत पूर्ववत झाल्याचे कौतुक करतो, गोडवे गातो. अर्थात मुंबईतील कामगार, कर्मचारी आणि कष्टकरी माणसाच्या जीवनकलहाचा रेटाच मुळी एवढा भारी आहे की बॉम्बस्फोट होवो की महापूर येवो, त्याला एक दिवसही घरात अडकून बसणे परवडणारे नाही, ही त्यामागची कारणमीमांसा आहे! साहजिकच मुंबईकरांच्या कामसू वृत्तीचे व एकमेका साह्य़ करू या वृत्तीचेही गमक तेच. एकीकडे हे ९० ते ९५ टक्के बहुभाषिक, बहुप्रांतीय, बहुधर्मीय सर्वसामान्य मुंबईकर तर दुसरीकडे पंचतारांकित हॉटेल-क्लब वा आलिशान महालात स्वत:च्या मस्तीत मश्गूल असलेले महाजन- अभिजन ‘बॉम्बे’वाले अशी या महामुंबईची सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक विभागणी आहे.
त्याखेरीज मुंबईचा एक महामस्त आर्थिक-राजकीय माफिया कंपू आहे. आकाश-पाताळ, समुद्र-खाडी, नद्या-नाले, डोंगरटेकडय़ा, वने-कुरणाच्या जमिनी साम-दाम-दंड-भेद नीती अलवंबून हस्तगत करणारे बिल्डर, माफिया यांची मुंबई व महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात एक जबरदस्त प्रभावळ असून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व केंद्रातील राज्याचे मंत्री त्यांचे एजंट म्हणून काम करतात. त्यामुळेच तर नगरविकास खाते (संदर्भ- भ्रष्टाचाराचे कुरण) मुख्यमंत्री जाणीवपूर्वक स्वत:कडे ठेवतात! ‘मुंबईला भूमाफियांपासून वाचवा’ अशी आर्त हाक खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दोन वर्षांपूर्वी मुंबईतच दिली होती, हे या संदर्भात लक्षात घेणे सयुक्तिक होईल.
अर्थात जेव्हा राज्यकर्ते व सत्ताधारीच स्वत: भूमाफिया होतात अथवा त्यांचे आश्रयदाते म्हणून पोलीस प्रशासन व अन्य सत्तास्थानांचा राजरोसपणे गैरवापर करतात तेव्हा स्थिती किती गंभीर आहे, याची कल्पनाच येते. आजमितीला नेता-बाबू-थैला-झोला या चांडाळ चौकडीने सर्व समाजास वेठीस धरले आहे.
तात्पर्य, स्वैराचार, भ्रष्टाचार व दहशतवाद यांचे जे लागेबांधे रूढ व दृढ झाले आहे, त्यामुळे ड्रगमाफिया, भूमाफिया, तस्करी करणाऱ्या टोळ्या या सर्वामधील दलालांची एक जबरदस्त प्रभावळ अर्थकारण-राजकारणावर हुकमत गाजवत आहे. यालाच ‘विकासाचा दहशतवाद’ म्हणणे चुकीचे होणार नाही.
प्रचलित व्यापार उदीम व विकासप्रक्रियेवर या सर्व शक्तींचा जो प्रभाव आहे त्यामुळे अशी दहशतवादी घातपाती कृत्ये हा या विकास विळख्याचा, सत्ताव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी विकास, तंत्रज्ञान, शहरीकरण, शस्त्रास्त्रे, संरक्षण, सुरक्षा व्यवस्था या सर्वाचा मुळापासून फेरविचार करणे गरजेचे आहे. निसर्ग व मानवाचे सौहार्दपूर्ण नाते व सुसंवाद प्रस्थापित केल्याखेरीज अशी घातपाती कृत्ये, धर्म-जाती-देश-प्रांत-भाषा-वर्ण या विद्वेषांमुळे उफाळणारा असंतोष, उद्रेक व क्रिया-प्रतिक्रिया याला आळा घालणे सुतराम शक्य होणार नाही. या सर्व बाबींचा साकल्याने फेरविचार करताना चैनवादी विकास पद्धती, तंत्रज्ञान व दहशतवाद यांना स्वतंत्रपणे गृहित धरणे चुकीचे आहे. त्यांचा मुकाबला करण्यासाठी विकास, समाज व निसर्गाचे जैव नाते नीट लक्षात घेतले पाहिजे. मुंबईतल्या घटनेसंदर्भात अंतर्मुख होऊन याकडे बघणे ही आज काळाची गरज आहे. बुद्धापासून गांधींपर्यंतच्या सांस्कृतिक-नैतिक वारशाचा आधार घेऊनच नवा मार्ग शोधणे इष्ट होईल.

प्रा. एच. एम. देसरडा

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...