स्व. नरहर कुरुंदकर समज आणि गैरसमज

नरहर कुरुंदकर यांच्या मृत्यूला पंचवीस वर्षांहून अधिक वर्षे होत असली तरी त्यांच्याविषयीचे विचारमंथन अजूनही संपलेले नाही व पुढेही संपणार नाही, यात त्यांचे मोठेपण आहे.
त्यांच्या विषयीचे सारे समज, गैरसमज बाजूला सारून आजही कुठल्याही विकारापलीकडे पाहणे हिताचे वाटते. या संदर्भात एक आठवण द्यावीशी वाटते. ‘पंचधारा’ या नियतकालिकाच्या कुरुंदकर
विशेषांकात त्यांच्याविषयी भोळ्या भाबडय़ा आठवणी सांगून त्यांचा एक विद्यार्थी, पण फार न शिकलेला, व्यापारी वृत्तीचा बाबू रुद्रकंठवार शेवटी पोटतिडिकीने सांगतो ‘कुरुंदकरांच्या विद्यार्थ्यांना, नातेवाईकांना, प्रेमी लोकांना, चाहत्यांना नम्र प्रार्थना आहे की, कुरुंदकरांना देव करून शेंदूर फासू नका. त्यांच्यावर कुठलाही धर्म, पंथ लादू नका. पक्षही लादू नका, तुमच्या विचारांचा पगडाही लादू नका, तुमच्या चष्म्यातूनही पाहू नका. जसे कुरुंदकर होते तसेच कुरुंदकर ठेवा.’
एका फार न शिकलेल्या माणसाचे हे हृद्गत शहाण्यांना, जाणकारांनाही बरेच काही शिकवणारे आहे. मोठे बोलके आहे. असे असूनही आम्ही नेमकी तीच आगळीक करीत असतो. कुरुंदकरांविषयी अजूनही समज, गैरसमज पसरविताना मागे रहात नाही. आणि त्यात स्वत:चे हित जपतो!
समीक्षेच्या क्षेत्रात नरहर कुरुंदकर हे कलावादी होते, जीवनवादी होते की सौंदर्यवादी होते याविषयी वादंग आहे। नरहर कुरंदकरांची सारी साहित्यमीमांसा, समीक्षा वाचूनही आपण आपला एकेरी दृष्टिकोन बाजूला सारीत नाही. नरहर कुरुंदकरांनी सतत ‘काय’ सांगावे आणि ‘कसे’ सांगावे या विषयी समन्वयवादी भूमिका घेतली. आपल्या चिंतनाच्या पातळीवर ते एकाच वेळी वाङ्मयाचे स्वरूप, प्रयोजन आणि कार्य या संदर्भात या दोन्ही विचारसरणींचा समन्वय घडवून आणीत राहिले. जीवनात त्यांनी सांस्कृतिक मूल्य अधिक जपल्याने जीवन आणि त्याचे अर्थनिर्णयन यात ते कलेचे महत्त्व आवर्जून सांगून जातात.
कुरुंदकरांनी स्वातंत्र्याचे व्यामिश्र स्वरूप तितक्याच पोटतिडिकीने स्पष्ट करताना कलेचे स्वातंत्र्य आणि कलावंताची सामाजिक बांधिलकी यांचा श्रद्धापूर्ण आलेख वेळोवेळी वाचकाच्या, अभ्यासकाच्या डोळ्यापुढे ठेवला आहे. जीवनातले वास्तव आणि स्वप्न आणि त्याचे भवितव्य रंगविताना नैतिकता आणि संस्कृती यांचा अत्युच्च संदर्भ लक्षात घेऊन त्यांनी समीक्षा लेखन केले.
साहित्यात कल्पना, भावना आणि विचार ज्या अनुभूतीद्वारे शब्दबद्ध करायचा त्यावेळी त्यातले सौंदर्य आणि वास्तव परस्परांना पूरक, रसिकनिष्ठ असले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. आपल्या समीक्षेतील आकलन, आस्वादन, रसग्रहण आणि मूल्यमापन या पायऱ्या त्यांनी स्वच्छ मांडून त्या टप्याटप्याने ओलांडूनच आपले समीक्षा लेखन केले आहे. असे असूनही आम्ही त्यांच्या या लेखनाविषयी अशाप्रकारे संभ्रमात का राहावे? मतभेद जरूर मांडावेत, पण संभ्रमात राहून गैरसमज माजवू नये. नरहर कुरुंदकर हे आपल्या उभ्या आयुष्यात मानसन्मानाविषयी कधीच तडजोडवादी नव्हते किंवा मानसन्मानाची अपेक्षा करणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांच्याकडे पद्मश्री, खासदारकी, साहित्य अकादमीच्या पारितोषिकासारखे मानसन्मान, कुलगुरुपद सहज चालून येतील असे सामाजिक व राजकीय वातावरण आजूबाजूला होते. मात्र या पैकी कुठल्याच पदाचा त्यांना मोह झाला नाही. एवढेच नव्हे तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला. यामागे अहंतेचा आविर्भाव नसून आपल्यापेक्षा वयाने व अधिकाराने मोठे असलेले इतर साहित्यिक यांच्या विषयीचा आदर होता.
त्यांना मिळालेला आदर्श शिक्षक हा शासकीय पातळीवरचा पुरस्कार हा त्यांच्या हितचिंतकाच्याच मानसन्मानाचा भाग होता व त्या पायी इतरांना केवढा खटाटोप करावा लागला हे सांगणे मनोरंजनाचे आहे. आपल्या मुलाची घरात मुंज करणे किंवा आपल्या मुलीचा विवाह धार्मिक पद्धतीने करणे या मागेही त्यांचे कुठलेच वैचारिक ढोंग नसून तो कौटुंबिक श्रद्धेचा प्रांजळ भाग होता. शेवटी तेही एक प्रेमळ पिता, प्रेमळ मुलगा, प्रेमळ पती आणि प्रेमळ मित्र या विविध नात्यांनी बांधलेले माणूसच होते, हे विसरता येऊ नये.
कुरुंदकर हे रूढार्थाने कुठल्याच राजकीय पक्षाशी बांधील नव्हते. कुठल्याच राजकीय पक्षाचे सभासद नव्हते. मराठवाडा विद्यापीठ नामांतरप्रसंगी ज्या दलितविरोधी वादळात ते सापडले त्यात तावून सुलाखून निघालेले कुरुंदकरही आपल्या प्रादेशिक अस्मितेशी शेवटपर्यंत घट्ट बांधलेले होते. त्यांची ही अस्मिता कुठल्याही विशेषणात मावणारी नव्हती. ती टिंगल करण्याजोगी नव्हती की जातीच्या कोषात बंदिस्त नव्हती. तिच्या प्रामाणिकपणाविषयी शंका घेता येणार नाही. एकदा आपण स्वार्थ - परमार्थ आणि सोय - गैरसोय ही द्वंद्वे आपला चष्मा काढून रास्तपणे पाहिली पाहिजेत. खरे म्हणजे, साऱ्यांनाच हा भाग अंतर्मुख करणारा आहे. या पाश्र्वभूमीवर कुरुंदकरांचा पक्ष कोणता? ते मार्क्‍सवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी, सावरकरवादी की आणखी कोणत्या वादात अडकलेले?
एक मात्र खरे की, त्यांचा लोकशाही प्रणालीवर नको तेवढा विश्वास होता आणि याहीपेक्षा विचार, उच्चार व आचार या तिन्ही मूल्यांवर जास्त भरवसा होता. ज्ञानाचे संपादन करणे व संपादलेले ज्ञान मुक्तहस्ते वाटत जाणे यालाच ते प्रबोधन मानत होते. आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांनी हे व्रत अविरत चालवले.
असे असूनही आम्ही त्यांना कुठल्यातरी एका वादात (मग तो राजकीय असो) बांधावे का? कुरुंदकरांना या संदर्भात वारंवार प्रश्न विचारला जाई. कारण त्यांचे या विषयीचे लेखन गोंधळात टाकणारेही आहे. मात्र आपले मित्र कै. आनंद साधले यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी या विषयीचा खुलासा खास आपल्या शैलीत केलेला आहे. तो असा:-
‘‘माझा माणसांच्या पशुतेइतकाच त्याच्या माणूसपणावर विश्वास आहे. मुख्य बाब म्हणजे मी हिंदू आहे. हिंदू आईबापाच्या पोटी जन्माला आलो आहे म्हणून हिंदू. उद्या जर जातीय दंगली झाल्या तर माझे विचार-आचार न पाहता, जे हिंदूचे भवितव्य असेल ते माझे होईल. म्हणून मी हिंदू आहे. पण यापेक्षा मी हिंदू असण्याचे दुसरे एक कारण आहे. वेद अप्रमाण मानून, ईश्वर अमान्य करून, साऱ्या स्मृति-श्रुती अमान्य करून, चालीरीती सोडून देऊन सारे करून पुन्हा मी हिंदूच राहतो. हिंदू धर्माचा स्वीकार न करता मी हिंदू राहतो. दुसरा कोणताही धर्म विधीपूर्वक स्वीकारीत नाही तोपर्यंत हिंदूच आहे. इतकी मोकळीक कोणत्याच धर्माने दिलेली नाही.’’ (राजस, दिवाळी १९८२, पृष्ठ ७९)
आता या साऱ्या विवेचनात धर्माचे मोठेपण आहे की त्यातल्या पंथाचे, जातीचे की राजकीय वादाचे हे आपापल्या वैचारिक कुवतीच्या जोरावर ठरविता येईल. कुरुंदकरांच्या स्मृतींना उजाळा देताना फक्त त्यातून समज-गैरसमजाचे तण दूर सारायचा प्रयत्न करावा, - एवढेच.
-
मधु जामकर , (दै. लोकसत्ता मधून )

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...