लोक-नागर रंगभूमीचा दुवा निखळला! अशोकजी परांजपे - अल्पचरित्र

औरंगाबाद, दै. लोकसत्ता
लोककलांचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ नाटककार आणि गीतकार अशोकजी परांजपे यांनी विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविला होता. ‘संत गोरा कुंभार’, ‘आतून कीर्तन, वरून तमाशा’,‘अबक दुबक’, ‘बुद्ध इथे हसला’ यांसारखी वैविध्यपूर्ण आशय-विषयांची नाटके त्यांनी लिहिली आहेत. भक्तिगीते आणि लडिवाळ भावगीतांसाठी त्यांची ख्याती होती. ‘नाविका रे, वारा वाहे रे’, ‘दारी पागोळ्या गळती’, ‘भास इथे स्वप्नातील संपले जणू’, ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’सारखी अवीट गोडीची गाणी त्यांच्या लेखणीतून उतरली होती. संगीतकार अशोक पत्की, गायिका सुमन कल्याणपूर आणि गीतकार अशोकजी परांजपे हे त्रिकूट संगीत क्षेत्रात गाजले. त्यांनी अनेक कार्यक्रमही एकत्रितपणे सादर केले होते. भक्तिगीते, लोकगीते यांचा त्यांचा अभ्यास गाढा होता. त्यांनी पंढरपूरला भक्तिगीते व लोकगीतांचे संमेलनही भरविले होते.इंडियन नॅशनलथिएटर (आयएनटी) च्या लोककला संशोधन विभागात ते १०-१२ वर्षे कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखालील या विभागाने महाराष्ट्र आणि गुजरातमधील अनेक दुर्लक्षित, उपेक्षित लोककला उजेडात आणून त्यांचे दस्तावेजीकरण केले. लोककलावंतांना नागर रंगमंच उपलब्ध करून देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. बापूराव विभूते, लोकशाहीर विठ्ठल उपम, राजारामभाऊ गोंधळी यांच्यासारखे अनेक लोककलावंत त्यांनी शहरी, पांढरपेशा रसिकांसमोर पेश केले व त्यांना नागर व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आयएनटीच्या लोककला संशोधनातून ‘खंडोबाचं लगीन’, ‘दशावतारी राजा’, ‘वासुदेव सांगाती’, ‘अबक दुबक’, ‘जांभुळ आख्यान’ यांसारखे लोककलांवर आधारित रंगाविष्कार सादर केले गेले. त्यात अशोकजींचे मोलाचे योगदान आहे. प्रकाश खांडगे, सुरेश चिखले, गणेश हाके, तुलसी बेहेरे, रमेश कुबल यांच्यासारखी लोककलांत संशोधन करणारी एक फळीच त्यांनी तयार केली. आयएनटीच्या या लोकनाटय़ांतून विजय कदम, भालचंद्र झा आदी कलावंत-दिग्दर्शक पुढे आले.महाराष्ट्रातील लोककलांना सैद्धान्तिक बैठक मिळवून देण्यात अशोकजी परांजपे यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. एका अर्थी ते लोकरंगभूमी आणि नागर रंगभूमी यांच्यातले दुवाच होते. ‘आधुनिक काळातील पठ्ठे बापूराव’ असेही त्यांना म्हणता येईल. उपेक्षित लोककला आणि लोककलावंत यांना प्रसिद्धीच्या झोतात आणून त्यांना मोठे करण्यात अशोकजींनी मोलाची भूमिका बजावली. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्रांतून लोककलांवर सातत्याने लेखनही केले.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...