मालमत्ताधारी उमेदवार बोलतात शपथेवर खोटे

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सर्वपक्षीय रणधुमाळीत मंत्र्या- खासदारांची, भावी खासदारांची लाखा-कोटीची मालमत्ता वर्तमानपत्रांतून जाहीर होत आहे. सन्माननीय अपवाद वगळले तर सर्वाकडे सत्ताप्राप्तीनंतर मालमत्ता कशी जमा होते, ते एक उघड गुपित आहे. या पाश्र्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्रिपद, केंद्रीय मंत्रिपद भूषविलेली जी मंडळी एरवी वातानुकूलित गाडय़ा (सरकारी नव्हे!) उडवत असताना आपल्या नावावर केवळ जुन्या मॉडेलची फियाट आणि ट्रॅक्टर, अशी वाहने असल्याचे उमेदवारी अर्ज भरताना जाहीर करतात ते वाचून प्रचंड करमणूक झाली. विविध राज्यांची मंत्रिपदे, केंद्रीय मंत्रिपदे भोगणाऱ्या सत्ताधीशांचे ‘कोटकल्याण’ होते त्यामागे त्यांचे भ्रष्ट कारनामे असतात हे त्यांना (अन्य आरोपांखाली) अटक झाली तरच उघडकीस येते!
लोकशाहीत सत्ताधारी म्हणजे जनतेचे विश्वस्त! शासनाने मंजूर केलेला निधी जनतेच्या कामांसाठी वापरणे, लोकोपयोगी कामांचे प्रस्ताव मांडणे, अधिकाऱ्यांकडून ते मंजूर करवून घेणे, प्रसंगी त्यासाठी निदर्शने-आंदोलने करणे असे लोकशाहीप्रणीत मार्ग अवलंबणे हे ज्यांच्याकडून अपेक्षित असते त्यांच्याकडे सत्ताप्राप्तीनंतर अल्पावधीत एवढा गडगंज पैसा येतोच कसा? राजकारण-सत्ताकारण हा हा पैसा मिळवून देणारा धंदा नव्हे हा आमचा भाबडा समज!
सत्ता हाती आल्याबरोबर चारचाकी, फार्म हाऊस, गोडाऊन, शेतीवाडी त्यांच्याजवळ कशी जमा होते, ते वेळोवेळी विचारले पाहिजे. पण योग्य वेळी कुणी काही सिद्ध करू शकत नाही. बेनामी किंवा अज्ञात मार्गाने जमविलेली मालमत्ता, विक्रीकर- जकातकर प्राप्तिकर चुकवून जमलेली मालमत्ता, अन्य प्रकारची करचोरी, दरोडेखोरी, खंडणीखोरी, लाचखोरी, शासकीय पद किंवा मंत्रिपद यांच्या गैरवापरातून जमविलेली मालमत्ता हे सर्व शोधणारे विभाग आपल्याकडे वेगवेगळे आहेत. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरून घेणाऱ्या खात्याशी त्यांचा फारसा संबंध नाही आणि या सर्व सरकारी विभागात आपापसात काही ताळमेळ असेल असेही वाटत नाही. त्यामुळे ज्ञात व वैध स्रोतांहून अधिक मालमत्ताधारी उमेदवाराला तिथेच अडवायची तरतूद नाही. त्याला अडवून कागदपत्रे जमवेपर्यंत पुढची निवडणूक येते!
उमेदवारी अर्ज भरताना खुशाल दडवून खोटी माहिती देणारे निवडून आल्यावर दिलेली वचने व शपथा विसरून भ्रष्टाचाराने मालमत्ता जमवतात आणि तरीही मतदार पुन्हा त्यांना निवडून देतो. असा देश भ्रष्टाचारात वरच्या क्रमांकावर राहिल्यास नवल ते काय?
राजेंद्र घरत, वाशी, नवी
लोकमानस (लोकसत्ता )

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...