Hey, व्हॉट्‌सअप dude?

सौजन्य :सम्राट फडणीस (samrat।phadnis@esakal.com)
इंटरनेटनं विस्तीर्ण, अविश्‍वसनीय असं खासगीपण दिलंय. 'मी जे काही करतोय, ते फक्त मला आणि मलाच माहीत आहे, दुसरं कुणाला नाही,' हा विश्‍वास निर्माण केलाय. या विश्‍वासानं सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌सवर उतरणारी उमलती तरुणाई 'प्रोफाइल इमेज'मध्ये अडकतेय...? त्यातून समस्या तयार होताहेत...? या समस्यांवर मार्ग आहे...?

'सिझलिंग् सलमान' या 'प्रोफाइल'वरून त्याच्याशी ओळख झाली. तो सलमान खानचा जबरदस्त फॅन. 'मस्क्‍युलर बॉडी' दाखवणाऱ्या सलमानच्या फोटोंनी त्याचा ऑर्कुट अल्बम भरलेला. मुलींशी 'चॅट' करण्यासाठी आणि त्यांना 'फ्रेंड रिक्वेस्ट' पाठविण्यासाठी हा 'सलमान' तासन्‌तास नेट कॅफेत पडून. जेवढा वेळ 'ऑनलाइन' असतो, तेवढा आख्खा वेळ त्याचं विश्‍व पूर्ण वेगळं. त्याची ओळख पूर्ण वेगळी. 'की बोर्ड'वर झरझर फिरणारी बोटं आणि चेहऱ्यावरचे बदलते हावभाव पाहिले, तरी सहज लक्षात यावं, की हा 'ऑनलाइन सलमान' कुठल्या तरी अनोख्या दुनियेत प्रवास करतोय...

...आणि ही 'कुल कॅट'. 'बोल्ड अँड ब्युटिफूल' असा तिचा 'प्रोफाइल लुक'. माहिती असो वा नसो, जगातल्या कोणत्याही विषयावर अत्यंत आत्मविश्‍वासानं 'चॅट' करणारी. गंमत म्हणून सहज तिच्या खऱ्या माहितीविषयी छेडलं, तर 'You betrayed' असं म्हणून 'ऑनलाइन' रुसणारी आणि मग रागावून 'ऑफ लाइन' होणारी. पुढच्या वेळी ऑनलाइन दिसलीच, तर तिच्याकडून रुसल्याच्या खुणा दाखवणारे 'स्मायलीज्‌' ठरलेलेच...! खरी माहिती विचारायची नाही, या अटीवरच पुढचा संवाद सुरू होणार...

सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌सच्या ऑनलाइन कट्ट्यांवर रोज असे 'सिझलिंग् सलमान' आणि 'कुल कॅट' शेकडोंनी भेटताहेत. वास्तवातल्या आयुष्यापासून फारकत घेणाऱ्या ऑनलाइन 'प्रोफाइल इमेज'वर जगणारे. कुणीतरी सांगितलं म्हणून किंवा कुठंतरी पाहिलं म्हणून किंवा 'फन' म्हणून बनवलेले स्वतःचे खोटे 'प्रोफाइल'. हळूहळू या खोट्या 'प्रोफाइल'ची झिंग मनावर चढू लागते. स्वतःची खरी ओळख किमान काही तास तरी विसरायला लावण्याची जबरदस्त 'ताकद' या 'सोशल नेटवर्किंग'मध्ये मिळू लागते. पाहता पाहता ही झिंग वास्तवातलं आयुष्य आणि ऑनलाइन आयुष्य यात एक अदृश्‍य दरी तयार करते. खरेतर एका 'क्‍लिक'वर ही आभासी दरी कधीही ओलांडता येते; मात्र बहुतेक वेळा दरीच्या 'ऑनलाइन प्रोफाइल'च्या टोकाला जाण्याची इच्छाच प्रबळ राहते आणि 'ऑनलाइन प्रोफाइल'मध्येच मुलं-मुली रमू लागतात. खरी ओळख लपविण्यासाठी वापरलेले 'प्रोफाइल' हीच आपली खरी 'ऑनलाइन' ओळख मानू लागतात. किमान काही तासांसाठी तरी 'आयडेंटिटी क्रायसिस'ची शिकार बनतात...

विस्तारते मैत्र आणि तिरसट पालक...
गेल्या दशकभरात भारतात माध्यम म्हणून इंटरनेट प्रचंड गतीने वाढते आहे. २००० साली देशात पन्नास लाख लोक इंटरनेट वापरत असत. २०१० साली हीच संख्या साडेचार कोटींवर आहे. पाच वर्षांपूर्वी केवळ शहरी भागापुरते मर्यादित असणारे हे माध्यम आता ग्रामीण भागातही तितकेच सक्षमपणे रुजू लागले आहे. शहरी आणि ग्रामीण उमलती तरुणाई या माध्यमाच्या प्रेमात आहे. माहितीचा महासागर असलेल्या इंटरनेट माध्यमाने सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌सच्या रूपाने बसल्या जागी जगाशी मैत्र जोडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ओळखीच्या मित्र-मैत्रिणींचा 'ऑनलाइन कट्टा' भन्नाट चालतो. फेसबुक, माय स्पेस, ऑर्कुटवर असे कट्टे अक्षरशः लाखोंनी आहेत. अशा 'ऑनलाइन कट्ट्यां'नी मैत्र वाढतेय, घट्ट होतेय. त्याच वेळी विस्तारणाऱ्या क्षितिजामधून धोकेही तयार होताहेत. या संभाव्य धोक्‍यांची पुरेशी जाणीव ना इंटरनेट वापरणाऱ्यांना (मुले-मुली) आहे, ना इंटरनेटकडे तिरसटासारखे आणि तिऱ्हाईताप्रमाणे पाहणाऱ्यांना (पालकांना).

प्रायव्हसी सेटिंग्ज वापरा
सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌सवर सर्वाधिक संख्येने तरुणाई आहे. उमलती आणि तारुण्यात प्रवेश करती झालेली. सुरक्षितता म्हणून पत्ता, फोन नंबर न देणे मान्य झालेले आहे. व्यक्तिगत माहितीचा वापर करून त्रास दिला गेल्याची, फसवणूक झाल्याची उदाहरणे जगभर आहेत. त्यामुळे ही माहिती नाही दिली, तर अगदीच गैर केले, असे नाही. प्रवासात किंवा रस्त्यावर सहज ओळख झालेल्या व्यक्तीला आपण आपली किती माहिती देतो? तितकीच माहिती ऑनलाइन प्रोफाईलवर असावी. ही माहिती विश्‍वासार्ह व्यक्तींनाच द्यावी, हा संकेत. त्यासाठी 'प्रायव्हसी सेटिंग्ज'ची नीट माहिती आपल्याला हवी. त्यामुळं दिलेली माहिती शंभर टक्के सत्य असेल, तरीही ती कुणाला दाखवायची आणि कुणाला नाही, याचा अधिकार सर्वस्वी 'यूजर्स'च्या हाती राहतो.

'प्रोफाइल इमेज'च्या समस्या
तथापि, प्रश्‍न सुरू होतात, ते वास्तवातल्या 'मी'पेक्षा अगदी वेगळी अशी 'ऑनलाइन इमेज' तयार करण्यातून, त्या 'प्रोफाइल इमेज'मध्ये अडकण्यातून. अशा वर्तनातून निश्‍चितपणे काही समस्या तयार होत आहेत. सहज दृश्‍य समस्या म्हणजे या प्रकारच्या 'प्रोफाइल्स'ना वास्तवात यायची इच्छा राहत नाही. परस्पर संवादाची ऑनलाइन क्षमता आणि वास्तवातील क्षमता यात वेगाने फरक पडत आहे. वास्तवातील संवादापेक्षा ऑनलाइन संवादावर भर वाढत आहे. वास्तवातील संवादाची क्षमता अत्यंत क्षीण बनत आहे. 'प्रोफाइल इमेज'च्या नादात उसने घेतलेले विचार आपलेच म्हणून स्वतःवर लादण्याने व्यक्तिमत्त्वाचा संकोच होत आहे. सध्यातरी हे माध्यम नवीन आणि कोरे करकरीत आहे. त्यामुळे, या प्रकारच्या समस्यांवर मार्ग काढण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही. त्याहून गंभीर बाब म्हणजे अशा समस्या तयार होताहेत, याची जाणीवच कमी आहे. त्यामुळे समस्येवरचा मार्ग हा खूपच लांबचा विषय. कोणतेही माध्यम विचारांवर, तर्कशक्तीवर, बुद्धीवर परिणाम करते. इंटरनेटही त्याला अपवाद नाही. शिवाय ते तंत्रज्ञानावर आधारित माध्यम. परिणामी, या माध्यमातून निर्माण होणारे मानसिक प्रश्न गुंतागुंतीचे असू शकतात. त्याचा अभ्यास असणारे तज्ज्ञही सध्या नाहीत. 'रिअल लाइफ'मधील समस्यांवर आपण उपाय शोधले आहेत; 'व्हर्च्युअल लाइफ'मधील नव्हे. आता, वेळ आली आहे ती उपाय शोधण्याची...

वर रंगली चर्चा
'सकाळ'ची ऑर्कुटवर 'मुक्तपीठ' कम्युनिटी आहे. या कम्युनिटीवर चर्चेसाठी हा विषय घेतला, तेव्हा अनेकानेक उत्तरं पुढे आली. 'आम्ही गंमत म्हणून वेगळी प्रोफाइल करतो...,' इथंपासून ते 'मुलगी म्हणून मी खरे फोटो वापरले, तर नको त्या गोष्टींना सामोरं जावं लागतं,' इथपर्यंतची खुली उत्तरं कम्युनिटीच्या सदस्यांनी दिली. 'खरी माहिती वापरण्याचा आग्रह कशासाठी बुवा', असा प्रश्‍नही अनेकांच्या समोर आहे.

या कम्युनिटीवरील चर्चेत काहींनी मांडलेले मुद्दे :
कल्पी : व्यक्तिगतरीत्या भावनिक स्तरावर गुंतणे फार धोक्‍याचे आहे. युवा पिढी भावनिक पातळीवर गुंतताना पाहिलीय.


भूषण : कॉलेज तरुणांच्या घोळक्‍यातही एखादाच बॉस असतो. बाकी सगळे अव्यक्त. हा कोंडमारा कुठेतरी फुटला पाहिजे की नाही? कोंडमारा न फुटलेले तुमचे-आमचे आई-बाबा तीस-तीस वर्षे नाकासमोर चालत राहून संसार करतात... आजच्या तरुणांसमोर पर्याय आहे...

समीर जोशी : मी थोडे दिवस नेट वापरणं बंद केलं. योग सुरू केला. त्यामुळं मन स्थिर आणि शांत राहतं. काही दिवसांनी नेट वापरणं पुन्हा सुरू केलं, तेव्हा मनाशी पक्कं ठरवलं की आता जास्त गुंतायचं नाही.

शैलजा : ऑर्कुट कम्युनिटीज्‌वरील माझ्या कविता आवडल्या लोकांना. मग डोक्‍यात हवा गेली. नुकतीच एका साहित्य कार्यक्रमाला गेले, तेव्हा आश्‍चर्य वाटलं... लोकांना माझं नाव माहीत नव्हतं. कसं असेल? मी ऑर्कुटच्या विश्वातून बाहेर पडून त्यांच्या संपर्कात कधी गेलेच नव्हते.

शीतल : आनंद घेणे याचा अर्थ हा नक्कीच नाही, की कोणाला फसवून इथं नको ते करणं. जे इथं आम्ही वागतो-बोलतो त्याची पूर्ण जाणीव घरी असते.
ऑर्कुट कम्युनिटीचा पत्ता
-
http://www.orkut.co.in/Main#Community?cmm=19343644


इंटरनेटवर फसव्या प्रोफाइल्सद्वारे फसवणूक करण्याचे आणि फसविले जाण्याचे प्रकार घडतात. बडेजाव मारण्यापासून ते धमक्‍या, शिवीगाळ करण्यापर्यंतचा समावेश यात होतो. 'मी फसवणुकीची शिकार ठरतोय का?' किंवा 'मी कुणाची फसवणूक करणारा शिकारी बनतोय का?' हे तपासून पाहा.

मी आहे का शिकार?

- विशिष्ट ई-मेल, इन्स्टंट मेसेज (चॅट) किंवा टेक्‍स्ट मेसेज पाहून डोकं सटकतंय?
- कॉम्प्युटर वापरल्यानंतर अस्वस्थ वाटतंय?
- घराबाहेर पडायला किंवा शाळेत जायला नकार येतोय?
- कुटुंबात किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळायला नकोसे वाटतेय?
यापैकी काही घडत असलं, तर हा 'ऑनलाइन' छळवादाची शिकार बनण्याचा प्रकार असू शकतो.

मी आहे का शिकारी?
- शेजारून कोणी गेलं, तरी झटकन कॉम्प्युटरचे स्क्रीन, प्रोग्रॅम्स बदलले जाताहेत?
- रात्री उशिरापर्यंत कॉम्प्युटरवर 'काम' चालतंय?
- कॉम्प्युटर वापरायला मिळाला नाही, तर खूप अस्वस्थता येतेय?
- वेगवेगळ्या नावांनी ऑनलाइन अकाउंट्‌स आहेत किंवा दुसऱ्याचीच अकाउंट्‌स वापरली जाताहेत?
यापैकी काही घडत असलं, तर हा 'ऑनलाइन' छळवाद करणारा शिकारी बनण्याचा प्रकार असू शकतो.

होऊ शकतं छान ब्राऊजिंग... त्यासाठी...
या घडीला इंटरनेटसारखा माहितीचा स्रोत जगात दुसरा नाही. या माध्यमापासून दूर राहणं हे साक्षात अज्ञानाला निमंत्रण. त्यामुळे हे माध्यम वापरलंच पाहिजे. सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌सच्या माध्यमून मैत्र विस्तारलंच पाहिजे. त्यासाठी 'मी' आणि 'आई-बाबां'नी नेमकं काय करायला हवं?

मी
  • मी सोशल नेटवर्किंगच्या कोणत्या साईट्‌सवर आहे, हे आई-बाबांना दाखवेन
  • मी व्यक्तिगत माहिती कशी सुरक्षित ठेवतेय/ठेवतोय हे आई-बाबांना दाखवेन
  • मी या साईट्‌स कशा वापरायच्या, हे आई-बाबांना दाखवेन
  • माझ्या फ्रेंड्‌स लिस्टमध्ये कोण कोण आहे, हे आई-बाबांना दाखवेन
  • कधी अचानक आई-बाबा शेजारी आल्यास मी साईट्‌स/चॅट्‌स लपवणार नाही
  • कोणत्या नावाने मी साईट्‌स वापरतेय/वापरतोय, हे आई-बाबांना दाखवेन

आई-बाबा
  • इंटरनेट वापरण्यासाठी मुलाला/मुलीला पुरेसा वेळ जरूर देईन
  • कोणती माहिती जगजाहीर करू नये, याची कल्पना मुलाला/मुलीला देईन
  • इंटरनेटवर कोणतीच गोष्ट लपून राहात नाही, याची कल्पना मुलाला/मुलीला देईन
  • अनोळखी लोकांनी मैत्री करताना कोणती दक्षता घ्यायची, याची कल्पना मुलाला/मुलीला देईन
  • खासगी माहिती कितपत शेअर करायची, याची कल्पना मुलाला/मुलीला देईन
  • फोटो, फोन नंबर्स कुणाला द्यावेत, याविषयी आपला अनुभव कल्पना मुलाशी/मुलीशी शेअर करेन

जगातील संशोधन सांगते...
युरोपात इंटरनेटवर पौगंडावस्थेतील (टीनेजर्स) मुले-मुली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहताहेत. वेगवेगळ्या ओळखी निर्माण करून चाचपणी करताहेत. त्यासाठी ते जोखीमही पत्करताहेत. ही जोखीम आहे खासगी माहिती खुली करण्याची. गैरसमज होण्याची. अयोग्य वर्तणुकीला सामोरे जावे लागण्याची.
  • अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील द बर्कमन सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीसाठी काम करणाऱ्या डाना बॉयड्‌ यांनी म्हटले आहे, की टीनेजर्स ओळख लपविण्यासाठी नाव, वय आणि स्थळाची माहिती जाणीवपूर्वक खोटी भरतात. अमेरिकेत याबद्दल आहे दुहेरी स्थिती. आपल्या मुलांचा अनोळखी व्यक्तींपासून बचाव करण्यासाठी मुलांच्या या खोटेपणाचे पालक समर्थन करतात, तर दुसरीकडे आपल्या पालकांचीच नजर चुकविण्यासाठी मुलेही अशी खोटी माहिती भरतात.
  • इंग्लंडमध्ये पन्नास टक्के मुलं-मुलीच खऱ्या माहितीच्या आधारे सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌स वापरतात, असं फ्युचर फाउंडेशन म्हणते.
  • आई-बाबांनी 'पोलिसगिरी' न करता मार्गदर्शक बनून सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌सवर सुरक्षितपणे मुला-मुलींना वावरण्यास शिकवले पाहिजे, असं अमेरिकेतील संशोधक म्हणतात. (भारताबाबत यापेक्षा वेगळी भूमिका आवश्‍यक; कारण गेल्या पाच वर्षांत सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌सवर अवतरलेल्या तरुणाईचे पालक या एकूणच प्रकाराबाबत निरक्षर. त्यामुळे पहिल्यांदा हा उद्योग शिकणे आणि नंतर मार्गदर्शन करणे, हे जास्त सयुक्तिक !)

फेसबूकवर भेटा http://www.facebook.com/samrat.phadnis
ट्विटरवर फॉलो करा http://twitter.com/samaphadnis


[ credit: images and information by samrat phadnis for esakal.com]

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...