सागरी सुरक्षेसाठी "बीपीव्ही' बाईक (ई- सकाळ)

पुणे ,सकाळ वृत्तसेवा : सागरी किनारपट्टीच्या संरक्षणासाठी उपयुक्त अशी मोटारसायकल पुण्याच्या तरूणाने तयार केली आहे. अमित अहिरराव असे या तरूणाचे नाव. बंगळूरमध्ये ऑटोमेटिव्ह इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या अमितने प्रकल्पाचा भाग म्हणून बनविलेली ही मोटारसायकल एम. एस. रामय्या स्कूल ऑफ ऍडव्हान्स स्टडिज्‌ या संस्थेकडे सुपूर्त केली आहे. बीच पेट्रोल व्हेईकल (बीपीव्ही) असे नाव अमितने या मोटारसायकलला दिले आहे.

मोटारसायकलची संकल्पना आणि डिझाईन पूर्णत: अमितचे आहे. अर्थातच, मोटारसायकल प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची मदत झाली आहे.

सागरी किनारपट्टीलगत असणारी वाळूयुक्त जमीन आणि समुद्राला येणाऱ्या भरती- ओहोटीचा विचार करून ही मोटारसायकलची रचना केली आहे. वाळूयुक्त जमिनीवर ताशी ६०-७० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता, हे या मोटारसायकलचे वैशिष्ट्य. त्याचप्रमाणे मोटारसायकलमध्ये वरील बाजूस लावलेला एक्‍झॉस्ट आणि एअर इंटेक्‍स यामुळे सुमारे दोन फूट (५० सेंटिमीटर) पाण्यातही ती चालू शकते. प्रतिताशी दहा किलोमीटर एवढ्या वेगाने ती पाण्यामध्ये धावू शकते. एक लिटर पेट्रोलमध्ये ४०- ४५ किलोमीटर पळण्याची क्षमता हे मोटारसायकलचे आणखी एक वैशिष्ट्य.

पुण्यातील राजर्षी शाहूमहाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई मेकॅनिकलचे पदवी घेतल्यानंतर अमितने बंगळूरमधील ऑटोमोटिव्ह इंजिनियरिंगला प्रवेश घेतला. ऑटोमेटिव्हमध्ये विशेष ओढा असल्याने त्याला या क्षेत्रात नवीन काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यातच महाविद्यालयाने एक महिन्याच्या आत संकल्पना मांडून प्रकल्प तयार करण्यास सांगितले. दरम्यान अमितने त्याचा मित्र असिस्टंट कमांडर सुशांत देशमुखशी संपर्क साधून तटरक्षक दलातील गरजांबाबतची माहिती मिळविली. दोन व्यक्तींबरोबरच तेवढ्याच वजनाची हत्यारे वाहून नेणाऱ्या एका छोट्या वाहनाची सध्या दलाला गरज असल्याचे सुशांतने सांगितले. ही गरज ओळखून अमितने बीच पेट्रोल व्हेईकलचे डिझाइन तयार केले. हे झिडाईन ग्रुपमधील इतर विद्यार्थ्यांनादेखील आवडले, आणि दिवसरात्र मेहनत घेऊन एका महिन्यात ही मोटारसायकल प्रत्यक्षात आणली.

मोटारसायकलविषयी अधिक माहिती देताना अमित म्हणाला, तटरक्षक दलाकडे यापूर्वी जीप आहेत. दलाने नुकताच सीलेग्ज नावाची बोटही खरेदी केली आहे. या बोटची किंमत ५६ लाख रुपये आहे. मात्र, वाळूवर आणि पाण्यातही चालणारी ही मोटारसायकल आम्ही केवळ ३२ हजार रुपयांमध्ये तयार केली आहे. सध्या बाजारात अशाप्रकारच्या मोटारसायकलची किंमत तीन ते साडेतीन लाख रुपये आहे. मात्र, दलाच्या गरजेनुसार आम्ही केवळ एक लाखात ही गाडी बनवून देऊ शकतो. कोणत्याही गाडीमध्ये मागच्या चाकामुळे उर्जा निर्माण होत असते. आम्ही या मोटारसायकलला मागील बाजूस छोट्या ट्रॅक्टरची चाके वापरली आहेत. त्यामुळे समुद्राच्या वाळूतही ही गाडी वेग घेऊ शकेल. तसेच, ती घसरणारही नाही. या मॉडेलसाठी पल्सर १५० ही मोटारसायकल वापरली असून ती तीनचाकी करण्यात आली आहे. सध्या तटरक्षक दलाकडे चारचाकी गाड्या आहेत. मात्र, त्या आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्याही परवडणाऱ्या नाहीत.
-वैशाली भुते

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...