‘निर्मळ रानवारा’ ची रौप्यमहोत्सवी दरवळ

दै. लोकसत्ता (श्रीकांत ना. कुलकर्णी)
पुण्यातील वंचित विकास या सामाजिक संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘निर्मळ रानवारा’ या मुला-मुलींसाठी असलेल्या मासिकाने नुकतेच आपले रौप्यमहोत्सवी वर्ष पार केले. कोणत्याही संस्थेचा, नियतकालिकाचा वा मासिक किंवा साप्ताहिकाचा ‘रौप्यमहोत्सव’ हल्ली धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र ‘निर्मळ रानवारा’च्या बाबतीत तसे काही घडले नाही. रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त जे काही तीन-चार कार्यक्रम झाले ते ‘रानवारा’च्या परंपरेला धरून होते. त्यामुळे त्याचा फार कोठे गाजावाजा झाला नाही. खरे तर सध्याच्या काळात लहान मुलांचे मासिक चालविणे फारच अवघड झाले आहे. ‘आनंद’सारखी ज्येष्ठ बालसाहित्यिकांची परंपरा लाभलेली मासिकेही दुर्दैवाने बंद पडली. मात्र ‘निर्मळ रानवारा’ अजून तग धरून उभा आहे. रौप्यमहोत्सवी वर्ष पार केल्यामुळे तो ‘तरुण’ झाला असला तरी आर्थिक मर्यादेच्या चौकटीत तो आपली दमदार वाटचाल करीत आहे.
‘वंचित विकास’चे संस्थापक विलास चाफेकर यांनी पंचवीस वर्षांपूर्वी संस्थेच्या उद्दिष्टाप्रमाणे सामाजिक जाणिवेतूनच ‘निर्मळ रानवारा’ सुरू केला. अगदी प्रारंभी तेच या मासिकाचे संपादक होते. मात्र संपादक असल्याचा कसलाही दुराभिमान त्यांनी बाळगला नाही. त्यामुळे सुरुवातीला मासिकाचा मजकूर तयार करताना अगदी खिळे जुळविण्यापासून अंकांचे गठ्ठे तयार करण्यापर्यंत त्यांनी सर्व प्रकारची कामे केली. त्या भक्कम पायावर ‘रानवारा’ उभा राहिला व अल्पावधीतच त्याने छान बाळसे धरले. ज्येष्ठ बालसाहित्यिका सरिता पदकी याही प्रारंभापासून ‘रानवारा’च्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. ‘रानवारा’चा सुगंध तळागाळातील मुला-मुलींपर्यंत पोहोचला पाहिजे हा त्यांचा व चाफेकरसरांचा प्रथमपासून आग्रह होता. त्यांचा हा हेतू साध्य झाला आहे, असे म्हणावे लागेल. कारण ‘रानवारा’तील बरेचसे साहित्य (अगदी चित्रासंह) हे समाजाकडून दुर्लक्षित झालेल्या ‘वंचित’ मुला-मुलींचे असते. कसलीही अपेक्षा न ठेवता केवळ सामाजिक जाणिवेतून ‘निर्मळ रानवारा’साठी झोकून काम करणाऱ्या श्रीमती सरोज टोळे व ज्योती जोशी यासारख्या संपादिका ‘रानवारा’ला लाभल्या. त्यामुळेही ‘रानवारा’ची वाटचाल यशस्वी होत गेली. सद्यस्थिीतत ‘रानवारा’पुढे आर्थिक बाबींसह असंख्य अडचणी आहेत. त्यामुळे काही त्रुटीही आहेत. तरीसुद्धा या अडचणींवर मात करून तो स्वत:च्या पायांवर उभा राहण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण मुला-मुलींची बौद्धिक भूक भागविण्याचा संबंधितांचा निर्धार पक्का आहे. लहान मुलांना, मनोरंजनाच्या माध्यमातून ‘विज्ञाननिष्ठ’ बनविणे हाही ‘रानवारा’चा मुख्य हेतू आहे. अंकातील विज्ञानवादी साहित्य ही त्याची साक्ष आहे. अशा या ‘निर्मळ रानवारा’चा सुगंध चिरकाल टिको व तो जास्तीत जास्त, तळागाळातील मुला-मुलींपर्यंत जावो हीच ‘रानवारा’च्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त शुभेच्छा.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...