रुपयाच्या चिन्हाचा फाँट डाऊनलोड करा...मोफत (free download of indian rupee font )

सौजन्य :अरविंद तेलकर, दै. सकाळ

मंगळूर - केंद्र सरकारने रुपयाचे नवे चिन्ह स्वीकारले आणि चलनाची स्वतंत्र ओळख असलेल्या अमेरिका, ब्रिटन, जपान आणि चीनसारख्या निवडक देशांच्या यादीमध्ये भारताचाही समावेश झाला. सरकारने हे चिन्ह स्वीकारल्यामुळे यापुढे रुपयाची ओळख पटविण्यासाठी हे चिन्ह आता अधिकृतपणे वापरता येणार आहे. चिन्ह तयार झाले असले, तरी सरकारने अद्याप त्याचा 'फाँट' तयार केलेला नाही. मंगळूरच्या 'फॉरँडियन टेक्नॉलॉजीज' या सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनीने त्यात आघाडी घेतली असून, हा 'फाँट' मोफत उपलब्ध करून दिला आहे.

जागतिक पातळीवर आणि 'इंटरनेट'वर रुपयाचे चिन्ह असलेला 'फाँट' वापरण्यासाठी 'युनिकोड कन्सोर्टियम'ची मंजुरी आवश्यक असते. परंतु, या जागतिक संघटनेकडून मंजुरी मिळेपर्यंत एकजुटीने वापर सुरू केल्यास, ही मंजुरी मिळविण्याची वाट पाहण्याचीही आवश्यकता नाही, असे आवाहन, हा 'फाँट' विकसित करणा-या कंपनीच्या संचालकांनी केले आहे. आपण वापर सुरू केल्यास, इतर सर्वजण त्याचे अनुकरण करतील, असेही त्यांनी आपल्या अधिकृत 'ब्लॉग'वर नमूद केले आहे.

संगणकासाठी रोमन लिपीत 'ट्रू टाईप' पद्धतीचे अक्षरशः लाखो 'फाँट' विकसित करण्यात आले आहेत. अलिकडच्या काही वर्षांत रोमनव्यतिरिक्त अन्य लिपींमधील 'फाँट'ही तयार झाले. रोमनपेक्षा अगदी वेगळ्या असलेल्या अरबी, फारसी, चिनी आणि जपानीबरोबरच देवनागरी 'फाँट'ही तयार झाले. परंतु, देवनागरी 'इंटरनेट'वर वापरता येऊ शकत नव्हती. त्यासाठी 'युनिकोड' पद्धतीच्या 'फाँट'ची आवश्यकता होती. परंतु, आता हा टाईपही 'मायक्रोसॉफ्ट' आणि 'मॉड्यूलर'सारख्या कंपन्यांनी उपलब्ध करून दिला आहे. रुपयाचे हे चिन्ह 'इंटरनेट'वरही वापरता येणार आहे.

कंपनीने आपल्या 'ब्लॉग'मध्ये म्हटले आहे, की 'फाँट' विकसित करणे हे आता अवघड राहिलेले नाही. कोणीही ते तयार करू शकते. विविध प्रकारचे 'फाँट' तयार करण्यासाठी सॉफ्टवेअरही उपलब्ध आहेत. भारत सरकार आणि प्रसिद्धी माध्यमांनी एकत्रितपणे काम केल्यास, देशातीलच नव्हे, तर जगात सर्वत्र
त्याचा प्रसार होऊ शकेल. हे सहज शक्य आहे आणि अवघ्या काही दिवसांत ते विकसित करता येऊ शकते, असाही कंपनीचा दावा आहे.

कंपनीने या चिन्हाची प्रथम 'व्हेक्टर इमेज' तयार केली आणि की बोर्डवरील 'ग्रेव्ह असेंट' या बटनाशी जोडली. हे बटन फारसा वापर नसलेल्या कीबोर्डच्या डावीकडील 'टॅब' या बटनाच्या वरच्या बाजूला आहे. देवनागरी वापरणारे मात्र अवतरण चिन्हासाठी त्याचा वापर करतात.

ब्लॉगवरून 'फाँट' डाऊनलोड केल्यानंतर, कंट्रोल पॅनेलमधून 'फाँट' हा पर्याय निवडा. अड्रेस बारमधील फाईलमध्ये जाऊन इन्टॉल न्यू फाँट या पर्यायावर क्लिक करा. फाँट जिथे डाऊनलोड केला असेल, तिथला पाथ द्या आणि क्लिक करा. आता 'रुपीफॉरँडियन' हा फाँट वापरण्यासाठी कोणताही वर्ड प्रोसेसर निवडा आणि फाँटच्या पर्यायात वरील फाँट निवडावा आणि बटन दाबावे.

तंत्रज्ञानाने विविध क्षेत्रांत वेगवान भरारी घेतलेल्या या युगात, व्यावसायिकदृष्ट्या हा 'फाँट' विकसित करण्यासाठी किमान एक वर्ष लागेल, या केंद्र सरकारच्या विधानामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे, असे 'फॉरँडियन टेक्नॉलॉजीज'चे मुख्य कार्यकारी अधिकारी उन्नी कोरोथ म्हणतात.

फाँट डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...