सकाळ वृत्तसेवा ,४ ऑगस्ट २०१०
नवी दिल्ली - भारताच्या सुरक्षाविषयक नियमांचे पालन करू, अशी हमी देणाऱ्या "ब्लॅकबेरी' या बिझनेस फोनचे उत्पादन करणाऱ्या "रिसर्च इन मोशन' (रिम) या कॅनडियन कंपनीने आता चक्क हात झटकले आहेत! भारतीय गुप्तचर यंत्रणाच नव्हे तर आम्हालासुद्धा एसएमएस आणि ईमेल्सचा "डेटा' देखरेखीसाठी उपलब्ध करून देता येणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे। एवढेच नव्हे तर तुमची सुरक्षाविषयक गरज असेल तर तुमचे तुम्ही पाहून घ्या, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
ब्लॅकबेरीच्या हॅंडसेटमधून पाठविले जाणारे एसएमएस आणि ईमेल्सच्या "ट्रॅफिक'वर देखरेख करण्याची मागणी गृहमंत्रालयाची होती. सुरक्षितताविषयक संवेदनशीलता लक्षात घेऊन अन्य मोबाईल कंपन्यांनी अशी देखरेख सुविधा भारतीय गुप्तचरांना यापूर्वीच उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र, "रिम'कडून टाळाटाळ सुरू होती. तेव्हा नियमांचे पालन करा; अन्यथा भारतातील व्यवसाय बंद करू, असा इशारा दिल्यानंतर "रिम' सुतासारखी सरळ झाली होती. तशी हमी कंपनीने दिल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाचे प्रवक्ते आणि विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) उत्तमकुमार बन्सल यांनी दिली होती. आज मात्र कंपनीने निवेदन प्रसिद्धीस देऊन हात झटकले आहेत. विशेष म्हणजे भारतासारखाच इशारा संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया यांनीही नुकताच दिला होता.
""ब्लॅकबेरीची सुरक्षा यंत्रणा अशा पद्धतीने तयार केली आहे, की "डेटा' खुद्द कंपनीलाही उपलब्ध होत नाही. ब्लॅकबेरीचे ग्राहक स्वतःची "इनक्रिप्टेड की' (सांकेतिक किल्ली) स्वतःच तयार करत असतात. कंपनीकडे "मास्टर की' अस्तित्वातच नाही. त्यामुळे मागील दारानेदेखील कंपनीला "डेटा' मिळविता येत नाही,'' असे सांगून कंपनीने पुढे म्हटले आहे, की अशी "मास्टर की' उपलब्ध नसल्याने सरकारची मागणी मान्य करता येणार नाही. किंबहुना "रिम'च काय कोणत्याही "वायरलेस नेटवर्क ऑपरेटर'ला ही मागणी पूर्ण करता येणार नाही.

ग्राहकांच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत माहितीच्या सुरक्षेची आम्ही पूर्ण खात्री देतो, असे सांगतानाच कंपनीने गृहमंत्रालयाला उद्देशून म्हटले आहे, की राष्ट्रीय सुरक्षेची काळजी घेण्यासाठी आणि गुप्तचर यंत्रणांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे विविध पर्याय आणि स्रोत उपलब्ध असतात. त्यामुळे व्यावसायिक कंपन्यांच्या सुरक्षिततेच्या मुळावर येण्याची गरज नाही.
अन्य देशात "रिम'ने अशी "डेटा' देखरेख सुविधा उपलब्ध करून दिली आहे, याकडे लक्ष वेधून गृहमंत्रालयाने ही सुविधा केवळ भारतात का नाही, असा सवाल केला होता. तसेच कॅनडात असलेला सर्व्हर भारतात आणण्याची सूचनाही कंपनीला केली होती. ही मागणी फेटाळून लावताना कंपनीने म्हटले आहे, की 175 देशात आम्ही सेवा देतो. त्या त्या देशांशी झालेले करार गोपनीय असल्याने ते उघड करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही.
भारतामध्ये एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा टेलिसर्व्हिसेस, बीएसएनएल आणि एमटीएनएल अशा बड्या कंपन्या ब्लॅकबेरी सेवा देतात. हा हॅंडसेट वापरणाऱ्यांची देशातील संख्या सुमारे दहा लाख आहे.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...