व्यक्तिवेध : अनिल अवचट

सौजन्य : व्यक्तिवेध :- दैनिक लोकसत्ता
विषय सामाजिक समस्यांचा असो किंवा साध्या माणसांच्या जगण्याचा असो, डॉ. अनिल अवचटांच्या लेखनातून जाणवत राहातो तो त्यांच्यातील एक मनस्वी, कलंदर माणूस. आयुष्याच्या प्रत्येक क्षणावर प्रेम करणारा, ते रसरशीतपणे अनुभवणारा! साध्या, सभ्य अशा त्यांच्या लिखाणाला ‘निर्वैर लिखाण’ असे कौतुकाने संबोधले जाते. एक बाब वगळता त्यांचे व्यक्तिमत्त्वही निर्वैर आहे. एकाच गोष्टीशी त्यांचे चांगलेच वैर आहे आणि ते म्हणजे दिखाऊपणाशी, बेगडीपणाशी! तशा संस्कृतीला ते ‘किरटी संस्कृती’ म्हणतात. वयानं लहान असो की मोठा, आपल्याला एकेरीने बाबा नावानेच हाक मारण्याचा त्यांचा आग्रहच असतो. अवचट ऊर्फ बाबा स्वत:ला ‘पागल’ म्हणतात. ‘मला माझं हे वेडेपण हरवायचं नाहीये,’ असे ते म्हणतात. माझे खूप मित्र आहेत आणि ते माझे वैभव आहे, हे अभिमानानं सांगतात. ‘सक्रिय समाजकार्य वगैरे करण्यापेक्षा मी लिहिणारा अधिक आहे,’ असे ते प्रांजळपणे सांगतात आणि त्यांच्या लिखाणाकडे पाहताना त्याची खात्री पटत जाते. ‘युक्रांद’मध्ये असल्यापासून ते आपली निरीक्षणे नोंदवत गेले. बिहारमधल्या दुष्काळी स्थितीबाबत ‘पूर्णिया’मध्ये त्यांनी लिहिले. बलुतेदार, भटके-विमुक्त, देवदासी, हळदीच्या पेवात काम करणाऱ्या असंघटित कामगारांबाबत ते लिहीत गेले. वेगवेगळ्या क्षेत्रांत सामाजिक काम करणाऱ्या डॉ. अभय बंग, डॉ. बाविस्कर यांच्यासारख्यांवर त्यांनी ‘कार्यरत’ लिहिले. एक समस्या घेऊन तिचा अभ्यास करण्याच्या आवडीतून ‘प्रश्न आणि प्रश्न’ तयार झाले. मच्छिमारांचा प्रश्न असो वा पंचगंगेच्या प्रदूषणाचा, अनेक समस्या त्यांनी त्यात मांडल्या. बाहेरच्या वास्तवाप्रमाणेच स्वत:मधील वास्तवावर त्यांनी ‘स्वत:विषयी’मध्ये प्रकाश टाकला. व्यसनाधीनांसाठी स्थापन केलेल्या मुक्तांगण केंद्राचे त्यांचे काम सर्वश्रुत आहेच. बाबा नखचित्रे उत्तम काढतात. ओरिगामीच्या कलेत पारंगत असल्याने मुलांपर्यंत ते आधीच पोहोचले आहेत. बासरीतून मधुर स्वरांची वलये काढण्याचा छंदही त्यांना आहे. काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. शि. द. महाजन यांनी त्यांना जंगलातील झाडे वाचायला शिकवली. प्रत्येक झाडाशी ते बोलू लागले. त्यातूनच सुरू झाला कल्पनाविलास आणि जन्माला आल्या वेगवेगळ्या बालकथा! त्या बालकथांचंच रूपांतर एका पुस्तकात झाले, ‘सृष्टीत. गोष्टीत’. यातील अनेक गोष्टी मोठय़ांनाही आवडणाऱ्या आहेत. एका गोष्टीत दोन मुले स्वर्ग कसा आहे, ते पाहण्यासाठी एक शिडी तयार करतात. शिडीनं ते ढगापर्यंत जातात. ढग त्यांना परत खाली पाठवू पाहातो, पण वारा त्यांना स्वर्गात घेऊन जातो. तिथे चित्रगुप्त त्यांना आपल्या घरी ठेवून घेतो आणि त्याच्या मुलीशी या मुलांची गट्टी जमते. देवांसारखे राहून कंटाळलेल्या आत्म्यांना या मुलांचा दंगा आवडतो. आईच्या रेसिपी आठवून मुले पाणी-पुरी, रगडा-पॅटिस त्या मुलीच्या आईला करायला सांगतात. त्या वासाने नेहमी गोड अमृत पिऊन कंटाळलेले सगळे देव चित्रगुप्ताच्या किचनसमोर गर्दी करू लागतात. शेवटी या मुलांना परत पाठवण्यात येते, पण तोपर्यंत सगळा स्वर्ग खोडय़ा करण्यात गुंगून गेलेला असतो. पृथ्वीवरचे सामान्यांचे जगणेच खरेतर स्वर्गासारखे असते, हे त्यांनी या गोष्टीत सूचकपणे मांडले. अशा या काल्पनिक, पण मार्मिक गोष्टींची दखल आता साहित्य अकादमीनेही घेतली आणि या पुस्तकाला पुरस्कार जाहीर केला. साहित्य अकादमीने बालसाहित्याचा विभाग आता सुरू केला असून, त्या विभागात अवचट यांच्या ‘सृष्टीत. गोष्टीत’ या पुस्तकाची निवड केली. भटकणाऱ्या मुंगीची ‘मुंगीचा प्रवास’, सिग्नल एकमेकांत बोलू लागले तर काय होईल, त्यावरील ‘सिग्नल’, अशा एकाहून एक धमाल गोष्टी या पुस्तकात आहेत. ‘रवींद्रनाथ टागोर, प्रेमचंद, सत्यजित रे अशा नामवंतांनी लहानांसाठी लिखाण केले आहे. मराठीतही विंदा, तेंडुलकर यांनी लिखाण केले असले तरी अजून लिखाण व्हायला हवे’, असे ते म्हणतात. लहानांना आवडलेल्या त्यांच्या या पहिल्या पुस्तकानंतर आणखीही दर्जेदार बालसाहित्य त्यांच्या मनस्वी लेखणीतून उतरेल, अशीच अपेक्षा वाचक करतील.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...