मराठीतील गूढ, रहस्य व भयकथा-एक उपेक्षित साहित्यप्रकार

सौजन्य : श्री. निरंजन घाटे
मराठीतील कथा : रहस्य, गूढ आणि भयकथा’ या विषयावर पुणे विद्यापीठ मराठी विभाग, मनोविकास प्रकाशन, धनंजय वार्षिक यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विद्यापीठाच्या खेर वाङ्मय भवनमधील संत नामदेव सभागृहामध्ये येत्या बुधवारी एक दिवसाचा परिसंवाद आयोजिण्यात आला आहे. त्या अनुषंगाने लिहिलेला हा लेख.
मराठी साहित्यात काही साहित्य प्रकार हे एक तर नगण्य मानले गेले आहेत किंवा साहित्याच्या दरबारात त्यांना कायमची प्रवेशबंदी आहे. बरीच वर्षे विज्ञान साहित्याला असंच तुच्छ लेखण्यात येत होतं. पुढं डॉ. जयंत नारळीकर विज्ञानकथा लिहू लागले. ‘मौज’ प्रकाशनाने त्यांचे कथासंग्रह आणि कादंबऱ्या छापल्या आणि प्रकाशित केल्या. त्यानंतर विज्ञान साहित्यासाठी साहित्य दरबाराचं स्थान किलकिलं केलं गेलं. विद्यापीठांमधून त्यावर चर्चासत्र घडू लागली. साहित्य संमेलनामध्येही अधूनमधून विज्ञान साहित्यावर चर्चा झाल्या.
बाबा कदम यांच्यासारख्या अतिशय लोकप्रिय साहित्यिकाला अखेरीस मृत्यूपूर्वी काही काळ आधी साहित्य संमेलनात व्यासपीठावर मानानं बसविण्यात आलं; पण दुर्दैवाने चंद्रकांत काकोडकर, सुहास शिरवळकर, चिंतामणी लागू आणि इतरही अनेक लेखक-लेखिकांच्या नशिबी हे भाग्य नव्हतं. कुमुदिनी रांगणेकर या अशा लेखिकांपैकी एक, कुसुम अभ्यंकर हे असंच एक नाव; पण या प्रकारच्या लोकप्रिय साहित्यिकांना किंवा स्त्री लेखिकांना कुणी विद्यापीठाच्या मराठी विभागानं बोलावून त्यांच्या यशाचं रहस्य उलगडून दाखवायला सांगितल्याचं ऐकिवात नाही. खरंतर या प्रकारचं लेखन करणारे बरेच लेखक-लेखिका त्यांच्या लेखणीच्या ताकदीवर संसार चालवत होते. पुढं दूरचित्रवाणी मालिकांनीही यांना काही प्रमाणात मदत केली, प्रसिद्धीही मिळवून दिली.
यापेक्षाही तुच्छ लेखला गेलेला, नाव घेताक्षणीच ‘पलायनवादी’ हे विशेषण लावण्यात येणारा एक साहित्य प्रकार आहे. एकेकाळी हा प्रकार जबरदस्त लोकप्रिय होता. मराठीतील सामांन्यातील सामान्य माणसाला वेड लावणारा हा साहित्य प्रकार म्हणजे रहस्य कथा. टांगेवाले, पिठाची गिरणी चालविणारे आणि माकडं पकडून गावाबाहेर सोडण्याचा उद्योग उपजिविकेसाठी करणारे, असे अनेक प्रकारचे साधारण लिहाय-वाचायला शिकलेले लोक हीच पुस्तके उशाशी ठेवून झोपत असत. बाबुराव अर्नाळकर, दिवाकर नेमाडे, गुरुनाथ नाईक ही त्यांची दैवतं होती. यांच्याच जोडीला मध्यमवर्गी पांढरपेशा वर्गाला घरात बसल्याबसल्या भीतीनं घाम फोडायचं काम करणारे जे लेखक होते; त्यातले अग्रगण्य लेखक म्हणजे नारायण धारप. याशिवाय रत्नाकर मतकरी, यशवंत रांजणकर, द. चिं. सोमण, द. पां. खांबेटे आणि इतरही काही सदानंद भिडे यांच्यासारखे लेखक होतेच. रम्यकथा प्रकाशन, स. म. खाडिलकर आणि कंपनी आदी प्रकाशक या रहस्यकथा प्रकाशित करीत तर धारप, मतकरी, खांबेटे आदींचे प्रकाशक इतर म्हणजे ज्याला त्या काळात साहित्य आणि ज्याच्या लेखकांना साहित्यिक म्हटलं जायचं, अशा प्रकारचं लेखन प्रसिद्ध करीत असत; पण गूढ, भयकथांचा मात्र साहित्यात समावेश केला जात नव्हता. सर्वसाधारणपणे आपण असं म्हणू शकतो, की ज्यांची पुस्तके भरपूर खपत त्यांना
साहित्यिक म्हणायचे नाही. ज्यांची पुस्तकं कशीबशी खपतात त्यांना साहित्यिक म्हणायचे, असा एक अलिखित नियम त्या काळात अस्तित्वात होता. या असाहित्यिकांना सरकारदरबारी मान नसे. आता तो साहित्यिकांनाही नसतो, तो भाग वेगळा. याउलट पाश्चात्त्य देशातली परिस्थिती होती. तिथं रहस्यकथा लेखकांना जसा भरपूर पैसा मिळत होता. तसे मान-सन्मानही लाभत होते. अ‍ॅगाथा ख्रिस्ती ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये बसत असत. अमेरिकेचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष छातीठोकपणे इयान फ्लेमिंग माझा आवडता लेखक आहेत, हे सांगत. आपल्याकडं अलीकडच्या काळात बरेच मोठे लोक बालपणी बाबुराव अर्नाळकरांची पुस्तकं वाचल्याचं कुणी ऐकत नाहीना, याचा कानोसा घेऊन कबूल करतात.
ही पाश्र्वभूमी लक्षात घेता पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाने ‘मराठीतील रहस्य गूढ आणि भयकथा’ या विषयावर एक दिवसाचा परिसंवाद ठेवावा, ही घटना अभिनंदनास पात्र आहे. ह. मो. मराठे या परिसंवादाच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे असून, ‘लोकसत्ता’चे सहसंपादक अरविंद गोखले हे या सत्राचे अध्यक्ष आहेत. याशिवाय मराठी रहस्य कथेचा इतिहास, गुरुनाथ नाईक यांच्या रहस्य कथा, दिवाकर नेमाडे यांच्या कथा, नारायण धारप यांच्या गूढकथा अशा विषयांवर या विषयातील दर्दी वाचक बोलणार असून, र. अ. नेर्लेकर, व. सु. भारद्वाज, शुभदा गोगटे, ही गूढकथा लेखन करणारी मंडळी त्यांच्या लेखनामागचं गूढ उलगडून दाखविणार आहेत. डॉ. नागनाथ कोतापल्ले या परिसंवादाचा समारोप करतील.
परिसंवादाच्या संयोजकांनी गुरुनाथ नाईक यांच्याशी संपर्क साधायचा बराच प्रयत्न केला; पण तो यशस्वी होऊ शकला नाही. तर काही ज्येष्ठ गूढकथा लेखक वैयक्तिक अडचणींमुळे उपलब्ध झाले नाहीत. या परिसंवादाला मनोविकास प्रकाशन आणि सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या धनंजय वार्षिकाचे सहकार्य लाभले आहे.

[CREDIT: This article is taken from newspaper daily LOKSATTA]

1 comment:

sharayu said...

गोदामात पडून रहाते ते अक्षर साहित्य ही अक्षर साहित्याची ब्याख्या सर्वानाच मान्य नाही

Related Posts Plugin for WordPress, Blogger...