जागल्याच्या भूमिकेतून उभे केले गावोगाव विधायक कार्याचे डोंगर
सकाळ न्यूज नेटवर्क
पुणे - महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक अभिसरणाची गरज ओळखून "सकाळ'ने सातत्याने नागरिकांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्यविषयक असे सर्व समाजघटकांना स्पर्श करणारे प्रश्न नेमकेपणाने मांडले, त्यांचे विश्लेषण करून राज्यकर्त्यांनी त्यांची सोडवणूक करावी, यासाठी सातत्याने आग्रही भूमिका घेतली. यातूनच उभा राहिला अगणित सामाजिक कार्यांचा डोंगर, त्यातून निर्माण झाली असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांची व सामाजिक संस्थांची भली मोठी फळी. मातीशी असलेले नाते जपणारे व वृद्धिंगत करणारे विविध सामाजिक उपक्रम सुरू करण्यात "सकाळ'ने घेतलेला पुढाकार लक्षणीय महत्त्वाचा व राष्ट्रीय वृत्तपत्रांच्या इतिहासात पहिलेपणाच्या अनेक नोंदी करणारा आहे.
हे कार्य राज्यातील लाखो हात जबाबदारीच्या जाणिवेतून पुढे नेत आहेत...सात महिने एकट्याने राबून विहीर खणणारे हुंबरवाडी (ता. शिराळा) येथील बाळकू रामा शिंदे असोत, शाळा-पाणीयोजना-रस्त्याचे स्वप्न साकारणारे रत्नागिरीच्या बस स्थानकावरील हमाल राजाराम गुरव असोत, एकट्याच्या हिमतीवर तीन वर्षांत पाझर तलाव बांधणारे जामनेरचे (जि. जळगाव) कामगार सुखदेव महाजन असोत, निवृत्तीनंतर दीडशे मुलांची मोफत शिकवणी घेणारे हडपसरचे सुरेश कुलकर्णी अथवा कीर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रचार करणारे करमाळा येथील बाबूराव हिरडे असोत; "सकाळ'ने अशा विधायक उपक्रमांची सातत्याने दखल घेत समाजात खूप काही चांगले होत आहे, हा विश्वास वाचकांच्या मनी जागता ठेवला.
आपत्तींच्या फटक्याने बेघर झालेल्यांसाठी "सकाळ'ने उभी केली नगरे, बेघर झालेल्या मुलींसाठी बांधली वसतिगृहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री व कुशल मनुष्यबळाच्या आधारे "सकाळ'ने आधुनिक पर्वात संपूर्ण महाराष्ट्रातील कितीतरी "रिअल लाइफ हीरो' वाचकांपुढे आणले, ते निखळ जागल्याच्या भूमिकेतून.
राजकारण्यांवर अंकुश
निष्पक्ष पत्रकारितेचा वसा घेतलेल्या "सकाळ'च्या पानापानांतून वर्षानुवर्षे साकारल्या अशा हजारो निर्भीड बातम्या, ज्यांनी राजकारण्यांवर सतत अंकुश ठेवला आणि राजकीय सत्तेच्या आश्रयातून निर्माण झालेल्या गुंडगिरीवर शरसंधान करताना कोणाची भीती बाळगली नाही. 18 जून 2008 च्या रात्री सोमेश्वरनगर (जि. पुणे) परिसरात दोन चिंकारा जातीच्या हरणांची शिकार झाली. या हरणांच्या शिकारीवर बंदी असतानाही दोन आलिशान गाड्यांतून आलेल्या मंडळींनी ते कृत्य केल्याची बातमी "सकाळ'ने प्रथम प्रसिद्ध केली. ही शिकार तत्कालीन परिवहन राज्यमंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी केल्याचे नंतर उघड झाले. "सकाळ'ने या प्रकरणाचा कसोशीने पाठपुरावा केला. अखेरीस अत्राम यांना या प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टाळंबा, तिलारी, नातूवाडी प्रकल्पातील भ्रष्टाचार 1985 मध्ये "सकाळ'ने उघडकीस आणला. अखेर त्या प्रकरणी तीन अधिकारी निलंबित झाले.
सामर्थ्य आहे चळवळीचे
विदर्भातील तीर्थस्थळांच्या विकासाचा "अजेंडा' हाती घेत "सकाळ'च्या नागपूर आवृत्तीतून "गाव हे फुलांचे होते, का बकाल झाले' ही वृत्तमालिका प्रकाशित करण्यात आली. मुख्यमंत्री अशोक चव्हाण 18 जानेवारी 2009 रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना "सकाळ'ने शेगावच्या विकासाबाबतची लोकभावना त्यांच्यासमोर प्रकर्षाने मांडली. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या कामाला होकार देत त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले. "सकाळ'चे वरिष्ठ बातमीदार मंगेश इंदापवार यांनी शेगावच्या कालबद्ध विकासाच्या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. विविध निर्देश देत सरकारला शेगाव विकासाबाबत गंभीर होण्यास न्यायालयाने भाग पाडले.
कोकण रेल्वे प्रकल्प मार्गी लागताना निधी उभारण्यासाठी कर्जरोखे काढण्यात आले. त्यांना प्रतिसाद मिळावा, यासाठी "सकाळ'ने मुंबईत व्यापक मोहीम हाती घेतली.
सुमारे 17-18 वर्षांपूर्वी घरोघरी जाऊन टपाल दिले जाणार नाही, त्याऐवजी ते तळमजल्यावर किंवा एखाद्या पेटीत टाकले जाईल, असा आदेश टपाल खात्याने काढला होता. टपालाचा बटवडा करणाऱ्या पोस्टमन मंडळींचा या आदेशाला पाठिंबा नव्हता. व्यापक जनहितासाठी "सकाळ'ने हा विषय हाती घेतला. सर्व बाजू मांडणाऱ्या बातम्या, अग्रलेख यांबरोबरच जनजागृतीसाठी चौकसभा घेतल्या गेल्या. अखेरीस टपाल खात्याला संबंधित आदेश मागे घेणे भाग पडले.
"गोदावरी वाचवा' मोहीम
गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त करून नाशिककरांच्या या जीवनवाहिनीला मोकळा श्वास घेता यावा, यासाठी "सकाळ'ने 2010 च्या मे महिन्यात मोहीम चालविली. नाशिकच्या इतिहासात प्रथमच फक्त वृत्तपत्राच्या व्यासपीठावरच एखादा विषय न मांडता, तो आंदोलनाच्या रूपाने जनतेसमोर नेण्यात आला. प्रशासनाने त्याची दखल घेऊन "गोदावरी संवर्धन विभाग' स्थापन करण्याची घोषणा केली.
उजनीतील योजना मार्गी
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाची पाणी साठवणक्षमता 117.24 टीएमसी आहे. पाणीसाठ्यापैकी 16 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होईल, असे गृहीत धरले होते. पण कालांतराने लक्षात आले, की एवढ्या पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. त्यामुळे 16 टीएमसीपैकी 13.6 टीएमसी पाणी धरणामध्ये शिल्लक राहते. एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या वापराचे नियोजन पाटबंधारे खात्याने केले नव्हते. "सकाळ'ने या संदर्भातील गौप्यस्फोट केल्यानंतर पाटबंधारे खात्याला जाग आली. त्यांनी 13.6 टीएमसी पाणी वापराच्या योजना तयार केल्या.
"सकाळ' ठरला दीपस्तंभ
गेल्या 25 वर्षांच्या कालावधीत "सकाळ'ने वादळवाऱ्यात, उन्हापावसात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी आघाडीवर असणारे दैनिक असा लौकिक प्राप्त केला आहे. "सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यातून आजवर केलेले काम प्रचंड आहे. पूर, वाद, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींच्या काळात दिलेला मदतीचा हात मोलाचा ठरला. "कारगिल निधी'तून कोल्हापुरात सैनिकांच्या मुलींसाठी वसतिगृह उभे राहिले. पुराच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेल्या शाळेला नवसंजीवनी मिळाली. कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळ्याला जलपर्णीमुक्त करण्यासाठी "सकाळ'ची मानवी साखळी महत्त्वाची ठरली. सांगलीत शाहीर अण्णा भाऊ साठे यांची नात सुवर्णा हिच्या हलाखीच्या परिस्थितीचे चित्र सातत्याने मांडले. परिणामतः: सारस्वत बॅंकेने सुवर्णाला इस्लामपूर शाखेत नोकरी दिली.
दुर्गम भागामुळे एसटी बसची सोय नसल्याने आणि बसच्या वेळा सोयीच्या नसल्याने मावळ तालुक्यातील अनेक विद्यार्थिनींना शाळेसाठी रोज सुमारे पंधरा किलोमीटरची पायपीट करावी लागत असे. "सकाळ'ची ही बातमी वाचून पुणे-पिंपरीतील कंपन्या, अन्य संस्था व काही व्यक्तींनी पुढाकार घेऊन या मुलींसाठी पाचशे सायकलींची व्यवस्था केली. त्यामुळे शिक्षणाची ओढ असलेल्या या मुलींची वाटचाल सुकर होण्यास मदत झाली आहे.
अंधश्रद्धेच्या विरोधात बिगूल
नाशिक जिल्ह्यातील अंधश्रद्धेवर कठोर प्रहार करून 2005 मध्ये "सकाळ'ने त्या विरोधात मोठी मोहीम उघडली. त्र्यंबकेश्वरला पडलेल्या भोंदूगिरीच्या विळख्यावर वृत्तमालिका प्रकाशित करून जनजागृती केली. गुजरातमधील पार्वती मॉंची पुत्रकामेष्टी, फरशीवाले बाबाची भोंदूगिरी, तोंडातून वस्तू काढणाऱ्या इगतपुरीच्या तरुणीची भोंदूगिरी, घरातील कोकीळ पक्ष्याच्या आधारे पुरविण्यात येणाऱ्या अंधश्रद्धा यांचा बुरखा टरकावला.
संघर्षात साथ, निर्मितीतील सोबती
लोहा (जि. नांदेड) तालुक्यातील माळाकोळीतील महिलांनी गावातील दारूचे दुकान बंद करण्यासाठी ग्रामसभा बोलाविण्याचा निर्णय घेतला. त्याची पहिली बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. अडीच हजारांहून जास्त महिला उपस्थित असूनही फक्त अकराशे महिलांची उपस्थिती नोंदविण्यात आली. आवश्यक असलेल्या संख्येने महिला उपस्थित नसल्याचे कारण दाखविल्याने दारू दुकान बंद करण्याचा ठराव बारगळला. पोलिस आणि प्रशासन महिलांच्या विरोधात असताना "सकाळ' या आंदोलकांच्या पाठीशी उभा राहिला. जिल्हा प्रशासनाला पहिली ग्रामसभा रद्द करून, दुसरी ग्रामसभा घ्यावी लागली. दारूचे दुकान बंद करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाची चळवळ
हात घेतलेल्या अभियानाचे थेट चळवळीत रूपांतर होण्याची अनुभूती "सकाळ'च्या खानदेश आवृत्तीने घेतली. उघड्याबोडक्या झालेल्या सातपुड्याला गतवैभव प्राप्त झाले, तर खानदेशाला त्याचे कसे लाभ होतील, हे सांगण्यासाठी "सकाळ'ने जानेवारीत "सातपुडा बचाव अभियान' हाती घेतले. जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांतही या विषयावर मोठी जागृती झाली. शाळा ते अगदी ग्रामपातळीपर्यंत वृक्षलागवडीचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जात आहेत. वृक्षतोडीला आवर घालण्यासाठी ग्रामस्थांत मोठी जागृती झाली आहे.
हत्ती वाचला, पोलिस सापडले!
वीस वर्षांपूर्वी पंढरपूरमध्ये गोपाळपूर रस्त्यावरील अरुंद पुलावर चेंगराचेंगरी होऊन नऊ वारकरी मृत्युमुखी पडले. पोलिसांनी या सगळ्याचे खापर संस्थानचा हत्ती आणि त्याच्या माहुतावर फोडले होते. प्रत्यक्षात अरुंद पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे वारकऱ्यांचे मृत्यू झाले होते. हत्ती पुलापासून लांब अंतरावर उभा होता. फक्त "सकाळ'ने या संदर्भात ही वस्तुस्थिती स्पष्ट करणारी बातमी दिली होती. पुलावर बंदोबस्तासाठी नेमलेले पोलिस वारीतल्या गर्दीत "माया' गोळा करण्यासाठी पंढरीत इतरत्र फिरत होते. ते लपवण्यासाठी पोलिसांनी हत्ती व माहुतावर खापर फोडले. पण "सकाळ'च्या बातमीमुळे चित्र स्पष्ट झाले आणि हत्ती व माहूत दोघेही बचावले!
No comments:
Post a Comment