जगाच्या व्यासपीठावर अण्णांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
पुणे: जनलोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावरून उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन जगभरच्या माध्यमांमध्येही चर्चेचा विषय बनलेय. बहुतांशी माध्यमे या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टीने बघतायेत तर काही माध्यमांमध्ये या आंदोलनाच्या नकारात्मक परिणामांकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिसतो.

'नवीन 'गांधी' भारताला हलवतोय' या या शीर्षकाखाली इंग्लंडच्या 'टेलिग्राफ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये पाश्चात्त्य वाचकांना अण्णांची ओळख करून देत त्यांच्या आंदोलनाचे थोडक्यात विश्लेषण केलंय. 'भारताची अर्थव्यवस्था जोमात असली तरी राजकीय व प्रशासकीय भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांध्ये असलेला रोष अण्णा हजारेंच्या उपोषणामुळे बाहेर पडत आहे.

'गांधींचा प्रतिध्वनी भारतीयांना कृतिशील करतोय' या 'न्यूयॉर्क टाईम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटलंय, 'संपत्ती, स्थान यांना मान देणाऱ्या आणि बहुतेकदा क्रिकेटपटू नि बॉलिवूड तारेतारकांना आदर्शवत मानणाऱ्या 'नव' भारतामध्ये सध्या अण्णा हजारे या तुलनेने जुन्या काळातील व्यक्तिमत्त्वाकडे.. भारतातील जनतेच्या चळवळीचं नेतृत्त्व अनपेक्षितपणे आलंय.'


पाकिस्तानातील 'डॉन' या वृत्तपत्राने त्यांच्या संकेतस्थळावर अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधा आंदोलनांसंबंधी प्रसिद्ध केलेल्या 'फोटो फिचर'चे शीर्षकच आहे 'गांधीगिरी लिव्ह्ज ऑन'.


जगातल्या सगळ्यांत मोठ्या लोकशाहीला एका कार्यकर्त्याने गुडघे टेकायला लावल्याचं टाईम मॅगझिनच्या संकेतस्थळावरील एका ब्लॉगमध्ये म्हटलंय. लोकांचा राग आणि लोकपाल विधेयक यांचा खूपच कमी संबंध असून या आंदोलनातूल राजकीय नेतृत्त्वावरील नागरिकांचा रोष जास्तीकरून दिसून येतोय, असं या ब्लॉगमध्ये म्हटलंय.

इंग्लंडमधल्या 'गार्डियन'ने म्हटलंय की, भ्रष्टाचारविरोधात कारवाई करणारी एक सक्षम केंद्रीय संस्था असावी अशी अण्णा हजारेंची साधी मागणी आहे. त्यांनी महात्मा गांधींची शैली व तंत्र जरूर घेतलेय, पण त्यातून ते ज्या मुद्द्यावर जोर देतायेत तो भारताच्या भल्याचा असेल असे वाटते.

'भारत माता की जय...'अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. हजारे जेलमधून बाहेर आल्यानंतर "भारत माता की जय...' ने परिसर दुमदुमून गेला. भ्रष्टाचाराच्या विरोधात हजारे 15 दिवसांचे उपोषण करणार असून, पुढे काय होणार हा प्रश्‍न उपस्थित होत असल्याचे "बीबीसी'ने म्हटले आहे.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...