औषधभान : औषधे :चिठ्ठीनेच अन् चिठ्ठीशिवाय ..


प्रा. मंजिरी घरत - शुक्रवार, १९ ऑगस्ट २०११,लोकसत्ता
symghar@yahoo.com
altaltतशी सर्वच औषधे रसायने. तुलनेने अधिक प्रभावी अन् गंभीर औषधे प्रिस्क्रिप्शन गटात असतात. यांची परिणामकारकता जास्त, पण दुष्परिणामांची शक्यताही जास्त, म्हणूनच याचा उपयोग आवश्यक असेल तेव्हाच व्हावा. यासाठी प्रिस्क्रिप्शनचे बंधन, जेणेकरून या औषधांचा दुरुपयोग होणार नाही.
‘त  र मग नाही देणार तू या गोळ्या?’ पेशंटने फार्मसिस्टला विचारले. त्यांनी मागितलेल्या औषधांपकी क्रोसिन गोळ्या फार्मसिस्टने तत्परतेने आणून दिल्या. पण दुसरे औषध मात्र तो देण्यास राजी नव्हता. ‘काका, तुम्ही मागताय ते अ‍ॅण्टिबायोटिक आहे. त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन हवे’ फार्मसिस्टने नम्रपणे पण ठाम स्वरात सांगितले. ‘ठीक आहे. पण काय रे, कसे समजणार कोणत्या औषधांसाठी  चिठ्ठी हवी, कोणत्या  नको? कुठे लिहिलेले असते का?’ पेशंटने अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारला होता.
आपणही आज नेमके हेच जाणून घेऊ या. कायद्यानुसार औषधांचे दोन मुख्य गट. ‘प्रिस्क्रिप्शनऔषधे’ आणि ‘नॉन-प्रिस्क्रिप्शन’औषधे. बहुसंख्य औषधे पहिल्या गटात मोडतात. ती विकत घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन हवे. या गटात सर्व अ‍ॅण्टिबायोटिक, स्टिरॉईडस, बरीचशी वेदनाशामके, अस्थमा, अल्सर, संधिवात, मनोविकार, हृद्रोग, मधुमेह, कर्करोग, थायरॉईडवरील औषधे  ‘श्येडयूल’ आहेत. दुसरा छोटा गट नॉन-प्रिस्क्रिप्शन औषधांचा. ही औषधे आपण स्वमनाने घेऊ शकतो. यांना Over the Counter (ओ.टी.सी.) औषधे असेही म्हटले जाते. पॅरासिटॅमॉल, अ‍ॅस्पिरीन,जीवनसत्त्वे, काही रेचके, अँटासीडस, क्रीम्स, लोशन्स, बाम वगरे औषधे ओंटीसी आहेत.
औषधांमध्ये ही वर्गवारी का? तशी सर्वच औषधे रसायने. तुलनेने अधिक प्रभावी अन् गंभीर औषधे प्रिस्क्रिप्शन गटात असतात. यांची परिणामकारकता जास्त, पण दुष्परिणामांची शक्यताही जास्त, म्हणूनच याचा उपयोग आवश्यक असेल तेव्हाच व्हावा, व हा निर्णय फक्त वैद्यकीय तज्ज्ञाचाच असावा, यासाठी प्रिस्क्रिप्शनचे बंधन, जेणेकरून या औषधांचा दुरुपयोग होणार नाही. कोणती औषधे, ‘प्रिस्क्रिप्शन औषधे’ कसे ओळखायचे? लेबलवर डाव्या बाजूला Rx ही खूण, व लाल रंगाची उभी रेघ असते. शिवाय चौकटीत Schedule H Drug Warning- फक्त रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या प्रिस्क्रिप्शननेच विक्री करणे असे लिहिलेले असते. झोपेच्या गोळ्या आणि तत्सम औषधावर NRx ही खूण असते.
तब्येतीच्या बारीकसारीक तक्रारींसाठी दवाखाना गाठणे दरवेळी शक्य नसते. ते खर्चिक आणि वेळखाऊही होऊ शकते. म्हणून किरकोळ आजारांसाठी काही औषधे सहज सर्वत्र उपलब्ध असावीत अन् त्वरित उपचार मिळावेत, या हेतूने ओ.टी.सी. गटाची निर्मिती केली गेली. वर्षांनुवर्षांच्या वापराने सुरक्षित सिद्ध झालेली, कमीत कमी धोकादायक औषधे या गटात मोडतात. यांची जाहिरात करण्यास परवानगी असते.
आपल्या लक्षात आले असेल की बहुतांशी औषधे ही वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यायची तर थोडीच स्वमनाने. वस्तुस्थिती मात्र वेगळीच दिसते. आपल्याकडे प्रिस्क्रिप्शन व आं२टीसी  असा  ‘फरक’ गांभीर्याने करताना कोणतेच घटक दिसत नाहीत. अर्थात अशी वर्गवारी, त्यामागील उद्देश माहीतही नसतो. त्यामुळे स्वतच निर्णय घेणारे ग्राहक व त्यात ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ अशी बरीचशी औषधविक्रीची स्थिती. यामुळे मागणी तसा पुरवठा होतो अन् प्रिस्क्रिप्शन औषधांचेही सेल्फ मेडिकेशन होते.
सेल्फ मेडिकेशनचे प्रकार अनेक. कोणे एके काळी डॉक्टरांनी थोडय़ा अवधीसाठी दिलेल्या औषधांनी बरे वाटले म्हणून वर्षांनुवर्ष तीच औषधे, फेरतपासणीस कधीही न जाता, घेत राहणारे रुग्ण असतात. यथावकाश ते दुष्परिणामांचे बळी ठरतात. मनोविकाराचे काही रुग्ण जुनेच प्रिस्क्रिप्शन दाखवून पुन्हा पुन्हा औषध घेऊन जातात. एकमेकांचे ऐकून दुसऱ्याची औषधे ट्राय करणारेही अनेक असतात. पूर्वी लागू पडलेले अ‍ॅण्टिबायोटिक  प्रत्येक किरकोळ तक्रारींसाठी वापरले जाते आणि मग अ‍ॅण्टिबायोटिक  रेसिस्टन्स (रोगजंतू बंडखोर होऊन औषधांना दाद देत नाहीत) होता. कॉम्बिफ्लाम, डायक्लोजन अशी आपल्याला अतिपरिचित वेदनाशामकेही प्रिस्क्रिप्शन गटात आहेत. आश्चर्य वाटले असेल तर लेबल जरूर तपासा. यांचा अतिवापर करून मूत्रिपड निकामी होणारे रुग्ण अनेक. ओमेझ, रॅनॅटक अशा औषधांसाठीही खरे तर प्रिस्क्रिप्शन हवे. सलमान खान होण्याच्या नादात स्टिराईड्स मागायला येणारा युवा वर्ग खूप असतो. मग हाडे पोकळ होतात, ह्रद्रोग होतो, साखर वाढते. शरीर मजबूत करण्याच्या फसव्या मार्गाने मग शरीर पोखरून निघते. कष्टाची कामे करणारी मंडळी (यात धुणं-भांडी करणारा महिला वर्गही) ताकदीसाठी अशी औषधे खातात. इथून तिथून ऐकून त्यांना ब्रँडस्ही बरोबर माहीत असतात. झोपेच्या गोळ्या, ग्लायकोडिनयुक्त खोकल्याची औषधे (नशा आणणारी), व्हायग्रा आणि तत्सम औषधांना मागणी कायम असते. गर्भपाताच्या गोळ्याही महिला सर्रास वापरतात.  ग्राहकांना अशा सेल्फ मेडिकेशनपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न काही फार्मसिस्ट करतात. त्यांचे ऐकणे तर दूरच राहिले, उलट अशा दुकानांकडे ही मंडळी पाठ फिरवतात. परदेशात कायद्याची अंमलबजावणी कडक आहे आणि प्रिस्क्रिप्शन औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणे दुरापास्त असते.
आता ओ.टी.सी. औषधांकडे वळू. इथे सेल्फ मेडिकेशन कायद्यानेच संमत. रुग्णच स्वत:चा डॉक्टर, त्यामुळे जबाबदारीही जास्त. आपल्याला होत असलेला तब्येतीचा त्रास आणि आपण मागत असलेले औषध याचा ताळमेळ लागतो ना, याची फार्मसिस्टशी बोलून खात्री करून घेणे महत्त्वाचे. दोन तीन दिवसात बरे वाटले नाही तर स्वत:वर प्रयोग करत न राहता डॉक्टरांकडे जाणे आवश्यक. ओ.टी.सी.औषधे तुलनेने सुरक्षित, पण योग्यपणे न वापरल्यास तीही घातकच. काही उदाहरणे बघू. पॅरासिटॅमॉल तसे सेफ औषध, पण जास्त डोस घेतल्यास ते यकृताचे काम बिघडवते. लेबलवर यकृत दुष्परिणाम (liver toxicity) लिहिणे अलीकडेच सक्तीचे झाले आहे. कावीळ किंवा यकृताचा इतर आजार असेल तर, तसेच दारू सेवनाची सवय असल्यासही पॅरासिटॅमॉल वापरताना डॉक्टरी सल्ला आवश्यक. अ‍ॅस्पिरीनमुळे पोटात अल्सर होऊ शकतात, रक्तस्त्रावही होऊ शकतो. लहान मुलांमध्ये व्हायरल तापात अ‍ॅस्पिरीन वापरायचे नसते. जीवनसत्त्वे घेतानाही तारतम्य हवे. कधी ती निरुपयोगी ठरतात तर कधी शरीरात साठून दुष्परिणाम करतात. इमर्जन्सी गर्भानिरोधके वारंवार वापरल्यास हार्मोनल संतुलन बिघडवतात. कधी कधी दोन तीन औषधांमध्ये एक औषध द्रव्य कॉमन असते. उदा. सर्दीसाठी सिनारेस्ट घेतले (प्रिस्क्रिप्शन औषध) आणि तापासाठी समजा क्रोसिन (ओ.टी.सी.) घेतले तर दोन्हीमध्ये पॅरासिटॅमॉल असल्याने ओव्हरडोस होऊ शकतो.
थोडक्यात, औषध ओ.टी.सी. असणे म्हणजे ते बिनधास्त वापरण्याचा परवाना नाही. तेथे हे सावधानता हवीच. त्यासाठी रुग्णाला औषधाची पूर्ण माहिती दिली गेली पाहिजे तरच औषधाची योग्य निवड आणि योग्य वापर केला जाऊ शकेल. ही माहिती देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे लेबल. अनेक देशात ओ.टी.सी. औषधाची सविस्तर माहिती लेबलवर लिहिणे बंधनकारक आहे. औषधाचा उपयोग, डोस, कधी वापरायचे/कधी नाही, दुष्परिणाम हे सर्व ओंटीसी लेबलवर अपेक्षित आहे. अमेरिकेत ओ.टी.सी. औषधांवर Drug Facts (www.fda.gov ) सहज वाचता येतील अशा लिहिलेल्या असतात.
या बाबतीत आपल्याला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. सर्व तपशील लेबलवर असला तरी अगदी माहीतगारालाही औषधांची लेबल वाचणे जिकिरीचे होते. चंदेरी/सोनेरी चकाकत्या स्ट्रिप्स, इंग्लिश अतिबारीक अक्षर यामुळे िभग लावूनही ते वाचणे कठीणच असते. सर्वच औषधांची लेबल ग्राहकाभिमुख (patient friendly) असलीच पाहिजेत, त्यातही ओ.टी.सी. औषधांबाबत हे अत्यावश्यक. यासाठी ग्राहकांनी अन ग्राहक संघटनानी आग्रही असावे. आज आपण प्रिस्क्रिप्शन अन ओ.टी.सी. हे औषधप्रकार, ते कसे ओळखायचे हे जाणले. औषधातील हा जातिभेद पाळणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यकच. थोडक्यात महत्त्वाचे
प्रिस्क्रिप्शन औषधे
* डॉक्टरांच्या चिठ्ठीनेच घेण्याची औषधे, सेल्फ मेडिकेशन टाळावे.
लेबलवर Rx ही खूण, लाल रंगाची रेघ
* Schedule H Drug  Warning :To be sold by retail on the prescription of a Registered Medical Practitioner  Only
 नॉन-प्रिस्क्रिप्शन (ओंटीसी) औषधे
* डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही.
* जबाबदारीने वापरणे आवश्यक
* लेबलवरील सूचना वाचणे व फार्मसिस्टशी सल्लामसलत आवश्यक
* दोन ते तीन दिवसात बरे वाटले नाही तर वैद्यकीय सल्ला घेणे उत्तम.  

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...