अलविदा : जिंदगी क्या चीज है.. (Goodbye Jagjit singh,the famous singar)

मंगळवार, ११ ऑक्टोबर २०११
alt‘झुकी झुकी सी नजर’, ‘कागज की कश्ती’.. दर्दभऱ्या आवाजाने तमाम दुनियेला वेड लावणारा गज.लांचा शहेनशहा आज हरपला.. कोटय़वधी रसिकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे  जगजित सिंग ब्रेन हॅमरेजने गेल्याचे वृत्त सकाळी सकाळी येऊन थडकताच संगीताची दुनिया अक्षरश: स्तब्ध झाली.. सत्तरच्या दशकात संगीताच्या दुनियेला वेगळा आयाम देणारा जगजित सिंग यांचा आवाज बॉलिवूड जगतात वेगळे स्थान निर्माण करणारा ठरला. जगजीत सिंग यांच्या रेशमी मुलायम आवाजातील ‘दर्द’ भारतीय रसिकांच्या हृदयाला चटका लावत होते आणि त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस शिखराच्या दिशेने वाटचाल करत होती. ‘ये altजिंदगी किसी और की’, ‘मेरे नामका कोई और है’, ‘पत्ता पत्ता बुता बुता हाल हमारा जाने ना’, ‘होंठोंसे छु लो तुम’, ‘तुमको देखा तो ये खयाल आया’, ‘हजार बार रुके हम, हजार बार चले’, या गजलांनी संगीताची नवी चव भारतीय रसिकांना चाखवली. सत्तरचे दशक म्हणजे नूरजहाँ, मलिका पूखराज, बेगम अख्तर, तलत मेहमूद आणि मेहदी हसन या बडय़ा नावांनी संगीत क्षेत्र पादाक्रांत केले असतानाचा तो काळ होता. परंतु, आपल्या अनोख्या शैलीने  जगजित सिंग यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. जगजीत सिंग यांच्या गायनावर के.एल. सेहगल, तलत मेहमूद, अब्दुल करीम खाँ, गुलाम अली खाँ, बडे गुलाम अली खाँ आणि अमीर खाँ यांचा प्रभाव राहिला.
तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ काळ रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणाऱ्या  जगजित सिंग यांनी हजारो गज.ला गायिल्या आणि अजरामर केल्या. जगजीत सिंग यांचे ८० अल्बम संगीत जगतात विक्रम नोंदवणारे ठरले. संगीत अल्बम ही संकल्पनाच जगजीत सिंग आणि चित्रा सिंग या दांपत्याने भारतात पहिल्यांदा रुजवली. ‘गझल किंग’ म्हणून चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले जगजीत सिंग ८ फेब्रुवारी १९४१ रोजी राजस्थानात श्रीगंगानगर येथे अमरसिंग धीमन आणि बचन कौर यांच्या पोटी जन्मले. धीमन कुटुंब मोठे होते. चार बहिणी आणि दोन भावांसह राहणाऱ्या जगजित सिंगांना घरी जीत म्हणून टोपण नावाने बोलावत. शीख धर्मीय असलेल्या जगजित सिंगांचे जन्मनाव जगमोहन परंतु, वडिलांनी त्यांच्या गुरूच्या सांगण्यावरून जनमोहनचे नाव  जगजित म्हणून नोंदवले. वडिलांनीच मुलाचा संगीताकडे असलेला कल ओळखून पं. छगनलाल शर्मा या अंध संगीत शिक्षकाकडे जगजितला संगीताचे धडे घेण्यासाठी पाठवले. संगीताची एकेक पायरी चढत जगजित सिंग यांनी नंतर सैनिया घराण्याचे उस्ताद जमाल खान यांच्याकडे सहा वर्षे ख्याल, ठुमरी आणि ध्रुपद गायकीचे धडे घेतले.
संगीत हे प्रेरणा देण्यासाठी असते, स्पर्धा करण्यासाठी नव्हे, अशी जगजीत सिंग यांची धारणा होती. त्यामुळेच ज्या दिवशी संगीतात स्पर्धा निर्माण होते त्याचवेळी संगीताचा आत्मा हरवतो, असे जगजीत सिंग नेहमी सांगत. अलीकडेच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत जगजित सिंग यांनी संगीताच्या सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. संगीत क्षेत्रातून समर्पण भाव आणि सराव लोप पावत चालल्याची खंत होती. क्षणभंगूर प्रसिद्धीच्या मागे धावणाऱ्यांबद्दलही ते संतप्त भावनेतून बोलायचे. संगीत हा अत्यंत गहन आणि व्यापक विषय आहे. संगीतात गणित आणि व्याकरणसुद्धा आहे. ते समजून घेतल्याशिवाय कुणीही चांगला गायक होऊ शकत नाही, असे जगजित सिंग नव्या पिढीतील गायकांना नेहमी सांगत. गज.ल गायन करणाऱ्याने किमान १५ वर्षे संगीताचा अभ्यास केला पाहिजे, असेही त्यांचे सांगणे होते.
जगजित सिंग यांच्या अत्यंत संस्मरणीय गज.लांपैकी ‘तुम इतना जो मुस्करा रहे हो’, अपनी मर्जी से कहाँ अपने सफर के हम है, पहले हर चीज थी अपनी मगर अब लगता है अपने ही घर में किसी दुसरे घर के हम है.. या नजाकतदार गज.लांनी रसिकांच्या हृदयात कायम स्थान मिळवले आहे.
जगजित सिंग यांचा गुलाम अली यांच्यासमवेतचा शेवटचा कार्यक्रम गेल्या २३ सप्टेंबर रोजी मांटुंग्यातील षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. दुर्दैवाने त्याच दिवशी ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले. तेव्हापासून ते अंथरुणाला खिळून होते. तत्पूर्वी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात रसिकांनी जगजित सिंग आणि गुलाम अली यांची अप्रतिम जुगलबंदी अनुभवली होती.
डीएव्ही कॉलेजमध्ये शिकत असताना जगजित सिंग यांच्याकडे फी भरण्याएवढे पैसे नसायचे. त्यामुळे गुरुद्वारात पारंपरिक गाण्यांचे कार्यक्रम करून ते फी भरत असत. जालंदरच्या ऑल इंडिया रेडिओ केंद्रात व्यावसायिक गायक म्हणून पहिल्यांदा संधी मिळाल्यानंतर त्यांनी अत्यंत कमी मोबदल्यातही सहा लाईव्ह संगीत कार्यक्रम सादर केले. १९६१ साली तरणेबांड जगजित सिंग मुंबईत इतर कलाकारांप्रमाणे नशीब अजमावण्यासाठी आले. परंतु, तीन वर्षे काढल्यानंतर त्यांना जालंदरला परतावे लागले. तरीही ते खचले नाहीत. त्यांनी १९६५ साली पुन्हा एकदा मुंबई गाठली. स्वप्नांच्या दुनियेची सफर यावेळी यशस्वी ठरली. जगजित सिंग यांच्या दोन रेकॉर्ड एचएमव्हीने जारी केल्या. त्यावेळी जगजित सिंग यांनी पगडी आणि दाढी उतरवून नव्या रुपात स्वत:ला प्रोजेक्ट केले. त्यावेळी निघालेल्या दोन्ही रेकॉर्ड फारशा यशस्वी ठरल्या नाहीत. त्यामुळे पाश्र्वसंगीताच्या क्षेत्रात जगजित   यांना फारशी संधी मिळाली नाही.
अर्थार्जन करण्यासाठी जिंगल, अ‍ॅड फिल्म आणि डाक्युमेंटरी यासाठी गाणी/जिंगल कंपोज करून जगजित सिंग यांना धडपड करावी लागली. अशाच एका रेकॉर्डिगच्या वेळी त्यांची भेट चित्रा सिंग यांच्याशी झाली. प्रेमबंध जुळून आल्यानंतर १९७० साली दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. हाच जगजीत सिंग आणि चित्रा सिंग या दांपत्याच्या संगीत कारकिर्दीतील टर्निग पॉईंट ठरला. १९७५ साली एचएमव्ही कंपनीने जगजित सिंग यांना पहिला एलपी अल्बम बनवण्याची संधी दिली. जगजित सिंग यांच्या गझलांचा समावेश असलेला ‘द अनफर्गेटेबल्स’ हा अल्बम आगळावेगळा ठरला. ‘संगीत अल्बम’ रुजूवात येथूनच झाली. जगजीत सिंग यांनी गझल गायकीला वेगळा आयाम देण्यासाठी सारंगी आणि तबल्याचा वापर केला. नंतर आलेला पंजाबी ‘बिरहा दा सुलतान’ हा अल्बम लोकप्रिय झाला. शिवकुमार बतलवी यांच्या कवितांना जगजित सिंग यांनी स्वरसाज चढवला. हा अल्बम आजही तेवढाच लोकप्रिय आहे.
यानंतर जगजित-चित्रा सिंग यांचा पहिला ‘कम अलाईव्ह’ अल्बम नवा विक्रम नोंदवणारा होता. पाठोपाठ ‘लाईव्ह अ‍ॅट वेंम्बले’, ‘लाईव्ह अ‍ॅट रॉयल अल्बर्ट हॉल’ या रेकॉर्डेड काँन्सर्टने गझलच्या दुनियेला नवी दिशा आणि कोटय़वधी चाहते मिळवून दिले. यानंतर जगजित सिंग यांनी मागे वळून पाहिलेच नाही. १९७९ आणि १९८२ सालीही सिंग दांपत्याच्या अल्बमने लोकप्रियतेचे शिखर गाठले. ‘लाईव्ह काँन्सर्ट’ रेकॉर्ड करून जारी झालेले अल्बम लोकप्रिय होत गेले.
गज.लांची लोकप्रियता पाहिल्यानंतर जगजित सिंग यांना बॉलिवूडने नंतर चांगलीच साथ दिली. १९८० साली ‘साथ साथ’ चित्रपटातील जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या गाण्याला जगजीत सिंग यांनी मुलायम आवाजात स्वरसाज चढवला. जगजित यांच्या ‘तुम इतना जो मुस्करा रहे हो’ ने तर लोकप्रियतेचे सारे विक्रम तोडले. १९८७ साली जगजीत सिंग यांची ‘बियाँड टाईम’ ही पहिली डिजिटल सीडी संगीताच्या बाजारपेठेत अवतरली. भारतीय संगीतकाराने जारी केलेली ही पहिलीच डिजिटल सीडी होती. परंतु, आणखी एक मैलाचा दगड नोंदवला तो गुलजार यांच्या ‘मिर्झा गालिब’ टीव्ही मालिकेच्या निमित्ताने.
व्यावसायिक कारकिर्दीच्या अत्युच्च शिखरावर असतानाच जगजित-चित्रा सिंग दांपत्याच्या सुखी जीवनात एक अत्यंत दु:खद घटना घडली. त्यांचा १८ वर्षांचा एकुलता एक मुलगा विवेक याचा १९९० साली रस्ता अपघातात मृत्यू झाला. या घटनेचा प्रचंड मानसिक धक्का बसल्याने चित्रा सिंग यांचा आवाज हरपला. त्यांनी यानंतर कधीही गाणे गायले नाही. स्टेज आणि रेकॉर्डिग स्टुडिओकडे त्या पुन्हा वळल्या नाहीत. जगजीत सिंग यांनाही पुत्र गमावल्याचे दु:ख होते. परंतु, दु:खावर मात करत त्यांनी पुन्हा गाण्याकडे वळण्याचे ठरवले.
पुत्र निधनानंतर त्यांचा ‘मन जिते जगजित’ हा शीख परंपरेतील ‘गुरुबाणी’ हा पहिला अल्बम जारी झाला. जगजीत सिंग यांनी हळूहळू स्वत:ला मानसिक धक्क्य़ातून बाहेर काढले. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लिहिलेल्या कवितांना जगजित सिंग यांनी स्वरसाज चढवला ‘नयी दिशा’ हा अल्बम १९९९ साली आणि ‘समवेदना’ हा अल्बम २००२ साली मार्केटमध्ये आला. ‘मिर्झा गालिब’च्या यशानंतर गुलजार यांच्यासोबत नव्याने काहीतरी घडवण्याची जगजित सिंग यांची इच्छा होती. परंतु, ती आता अपूर्णच राहणार आहे. २००३ साली जगजित सिंग यांना भारत सरकारने पद्मभूषण देऊन सन्मानित केले.  गज.लाच्या युगात क्रांती घडवणाऱ्या जगजीत सिंगांची शास्त्रीय संगीतावरही भक्कम पकड होती.  गझलचे अत्यंत क्लिष्ट स्वरुप त्यांच्या जादुई आवाजातून रसिकांच्या कानांवर पडायचे तेव्हा सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट व्हायचा. गझल आणि गीत या दोन्ही प्रकारांवर त्यांची हुकुमत होती आणि यातूनच असंख्य नव नव्या अवीट
चालींच्या गज.लांची त्यांच्या चाहत्यांना वारंवार भेट मिळाली.  

तिहेरी दु:खाचा डोंगर
चित्रा सिंग यांच्यावर एकापाठोपाठ एक दु:खाचे डोंगर कोसळले. जगजीत सिंग यांना दिवाणखान्यातील गज.ल गायकीतून खुल्या व्यासपीठावर आणण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या त्यांच्या पत्नी चित्रा सिंग प्रख्यात गझल गायिका असल्यो त्यांना पुत्र आणि कन्येचे सुख फारकाळ लाभू शकले नाही, ही त्यांची शोकांतिका आहे. जगजीत सिंग-चित्रा सिंग यांचा  १८ वर्षीय पुत्र विवेक १९९० सालच्या रस्ता अपघातात मृत्युमुखी पडला होता. या दु:खातून चित्रा सिंग सावरूच शकल्या नाहीत. २००९ साली चित्रा सिंग यांना पहिल्या पतीपासून झालेली कन्या मोनिका चौधरी हिने बांद्रा येथील निवासस्थानी आत्महत्या केली होती. आता जगजीत सिंग यांचेही निधन झाले. त्यामुळे चित्रा सिंग आता एकाकी झाल्या आहेत.     

वक्त आएगा वही शख्स मसीहा होगा।।
गज.ल गायन ‘दरबारे खास’ मधून ‘दरबारे आम’मध्ये आणण्याचे मोलाचे काम जगजित सिंग यांनी केले. बंदिस्त गझल हवेच्या झुळकेप्रमाणे जनमानसात विरली. केवळ गझल गायनाने रसिकांच्या मनावर ५० वर्ष राज्य करणं, ही सोपी गोष्ट नव्हे. रसिकांना भावतील, सोबतच सामाजिक आशयाचा हुंकार असणाऱ्या गज.ल त्यांनी दिल्या. गज.लांची निवड हे त्यांचे खास वैशिष्टय़ होते. जीवनाचा संदेश नेमक्या व सोप्या शब्दात ते देत. त्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. कोणाचाही त्यावर ठसा नव्हता. त्यांचा शास्त्रीय गायनाचा अभ्यास होता, पण गज.ल प्रकाराला त्यांनी त्यात गुरफ टू दिले नाही. बात निकलेगी ही नज्म त्याचे प्रतीक ठरावी. हिंदी चित्रपट संगीतात मदनमोहन, खय्याज यांनी गज.ल आणली, पण जगजित सिंग यांची चित्रपटातील गझल वेगळी व प्रभावी ठरली. चित्रपटात गझल सजवायची हिंमत आज कोण करणार? कामचलाऊ गाण्यांमधेही गझलेला स्थान देतांनाच ती वेगळ्या उंचीवर ठेवण्याचे व लोकप्रिय करण्याचे काम त्यांनी केले. आपली त्यांच्यासोबत दोनदा भेट झाली, पण ती त्रोटकच होती. मराठी गज.लांच्या संदर्भात मला त्यांच्याशी चर्चा करायची होती, पण ते शक्य झाले नाही. त्यांच्या अनेक गज.ला मला मुखोद्गत आहेत. तुमने सुली पे लटकते जिसे देखा होता, वक्त आएगा वही शख्स मसीहा होगा, ही संदेशात्मक गज.ल मला खूप प्रिय आहे. कानावाटे काळजाचा ठाव घेणाऱ्या जगजित सिंग यांच्या गझल नेहमीसाठी अजरामर राहणार.
भीमराव पांचाळे
ज्येष्ठ गझल गायक


मेरा गीत अमर कर दो..
altसंपूर्ण विश्व म्हणजे अनंत गाणे असून माणसाचे जीवन म्हणजे त्या गाण्याची तान आहे, असे कविवर्य बोरकरांनी म्हटलेय. आपल्या आयुष्याचेच सुरेल गाणे करणारे आणि गाण्यासाठी आयुष्याचे सारे श्वास खर्ची टाकणारे थोर कलावंत आपण ऐकत आलो आहोत. आपल्या अत्यंत सुरेल अन् दर्दभरी आवाजाने तमाम गझल रसिकांना वेड लावणारे जगजित सिंग आपल्याला सोडून गेले.
बेगम अख्तर, मेहंदी हसन, गुलाम अली यांच्यासारख्या शास्त्रीय संगीतावर पूर्ण हुकमत असणाऱ्या गझल गायकांची माहिती रसिकमनावर बिंबलेली असताना जगजित सिंग यांनी मात्र गझल गायकीत सातत्याने नवनवीन प्रयोग करून रसिकमनावर आपल्या आगळ्या वेगळ्या गझल गायकीची छाप पाडली. ती गायकी रसिकप्रिय झाल्यामुळेच देशविदेशात त्यांना असंख्य चाहते लाभले. स्वत: उत्तम शायरीचे जाणकार असल्यामुळे जगजित सिंग गझल नव्हे तर गझलचा अर्थच गात होते. गझल हा काव्यप्रकार शब्दप्रधान गायकीत मोडतो. गझलच्या प्रत्येक शेरात जीवनाशय भरलेला असतो. व्यापक जीवनार्थ, जीवनानुभूती सांगणाऱ्या शब्दांना जगजित सिंग आपल्या उत्तम संगीतसाजात अन् मधुर स्वरात पेश करून रसिकांना आगळ्या वेगळ्या भावविश्वात घेऊन जात असत.
जगजित सिंग यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ साली राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये शीख कुटुंबात झाला. त्यांचे वडील सरदार अमरसिंह धीमन यांची अशी इच्छा होती, की आपल्या मुलाने उच्चशिक्षण घेऊन चांगल्या पदावर नोकरी करावी परंतु जगजित सिंग यांना संगीताची विलक्षण आवड, ओढ असल्यामुळे शिक्षणात त्यांचे मन रमेना, स्वारस्य वाटेना. शाळा, कॉलेजमधील तदनुषंगिक सांगीतिक कार्यक्रमांतून ते गात असत. एक चांगला गायक म्हणून लोक त्यांना ओळखू लागले. पंडित छगनलाल शर्मा यांच्याकडे त्यांनी प्रारंभीचे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यानंतर त्यांनी उस्ताद जमाल खान यांच्याकडे ख्याल, ध्रुपद व ठुमरीचे शिक्षण घेतले. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी जगजित सिंग यांच्याबद्दल एकदा सांगितले होते, की ‘ते शास्त्रीय संगीत उत्तम गाऊ शकतात. गझल गायकीत त्यांनी नवे प्रयोग करून प्रचंड लोकप्रियता मिळवली.’ आधुनिक वाद्यांचा वापर करून साध्यासोप्या स्वररचनांमधून सर्वसामान्यांपर्यंत त्यांनी गज.ल पोहोचवली. गझलेला लोकप्रियता तद्वत प्रतिष्ठाही मिळवून दिली.
आज, जगजित सिंग यांच्या नावावर ५० अल्बम्स आहेत. ‘दि अनफरगेटेबल’, माइल स्टोन, ‘मै और मेरी तनहाई’ या प्रारंभीच्या अल्बम्सनी त्यांना कीर्तिशिखरावर नेले. त्यांची धर्मपत्नी चित्रा सिंग याही उत्तम गायिका असल्यामुळे दोघांनीही आपला स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला. १९७९ मध्ये दोघांचे सांगीतिक वैवाहिक जीवन सुरू झाले. प्रसिद्ध शायर निदा फाजली, जावेद अख्तर, गुलजार आदी प्रतिभावानांबरोबर जगजित सिंग यांनी काम केले. त्यांच्या अनेक दर्जेदार रचना आपल्या सुमधुर आवाजाने लोकप्रिय केल्या. चित्रपटांमधून पाश्र्वगायन करण्याची इच्छा प्रत्येक गायकाला असते. तशी जगजित सिंग यांनाही ती होती पण इतर प्रस्थापित नामवंत गायकांमुळे त्यांना संधी मिळू शकली नाही म्हणूनच ते गज.ल गायनाकडे वळले अन् तिथे त्यांनी अफाट लोकप्रियता मिळवली.
आज त्यांच्या अनेक गज.ला, गीते मला आठवताहेत. १९८१ साली आलेल्या ‘साथ साथ’ या चित्रपटातील ‘तुमको देखा तो ये खयाल आया’, ‘प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’ ही जावेद अख्तरांनी लिहिलेली गीते आठवतायत. त्यांनी स्वत:च संगीत दिलेला ‘प्रेमगीत’ चित्रपट. त्यातील ‘आओ मिल जाए हम सुगंध और सुमन की तरह’, (गायक सुरेश वाडकर, अनुराधा) ‘देख लो आवाज देकर पास अपने पाओगे’ (अनुराधा) याच चित्रपटात जगजित सिंग यांनी स्वत:च गायलेले ‘होठोंसे छूकर तुम मेरा गीत अमर कर दो’ हे गीत तर माझ्याप्रमाणे अनेकांना विसरता येणे शक्यच नाही. ‘अर्थ’ या महेश भट दिग्दर्शित चित्रपटाला जगजित सिंग यांचेच संगीत आहे. त्यातील ‘कोई ये कैसे बताएँ की वो तनहा क्यू है,’ किंवा ‘झुकी झुकी सी नजर बेकरार है के नही’, ‘तुम इतना जो मुस्करा रहे हो’ इ. दर्जेदार गीते, गज.लांनी रसिकांना अक्षरश: वेड लावले.
याशिवाय त्यांची इतरही अनेक गाजलेली गीते, गझला आहेत, पण तूर्तास इथेच थांबतो. जगजित सिंग यांनी आपल्या गज.लांनी रसिकांच्या अंत:करणात आदराचे स्थान मिळवले. शब्दांची वेशभूषा ओलांडून आतला आशय पाहाण्यासाठी कलावंताजवळ एक संवेदनशील मन असावे लागते, ते त्यांच्यापाशी होते. आयुष्याचे अंतध्र्वनी मनगटाच्या नाडीवरून ऐकता येत नसतात. वर्षांमागून वर्षांचे, महिन्यांमागून महिन्यांचे गठ्ठे इतिहासाच्या कपाटात बंद केले तरीही अभिजात शब्द, प्रामाणिक सूर त्या कपाटाच्या फटीतून वर्तमानाच्या ओठावर येतच असतात. फॅनचे बटण बंद केल्यानंतरही काही काळ जशी फॅनची पाती फिरत राहातात तशी जगजित सिंग यांची गीते, गझला रसिकांच्या अंत:करणात रेंगाळत राहतील. त्यांनीच तर रसिकांना सांगितलेय ‘होठोंसे छूकर तुम मेरा गीत अमर कर दो’ परमेश्वर या महान गायकाच्या आत्म्याला चिरशांती देवो, ही विनम्र प्रार्थना!
रमण रणदिवे

श्रद्धांजली
० लता मंगेशकर

altजगजित यांच्या निधनाने संगीत विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. माझी त्यांच्याशी चांगली ओळख होती. कोमामधून ते बरे होतील असे वाटले होते. परंतु ईश्वराची इच्छा काही निराळीच होती. गज.लला संगीत क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. हृदयापासून गज.ल गाणारे जगजित यांनी आपल्या आवाजाने रसिकांना मोहवून टाकले.
० अमिताभ बच्चन
रेशमी मुलायम आवाज आता शांत झाला आहे, असे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले. जगजित सिंग यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्राला जबर धक्का पोहोचला असून ही हानी भरून न निघणारी आहे. संगीत आणि गझलच्या दुनियेतील ते महान गायक होते. मी व्यक्तिश: त्याचा चाहता आहे.
० आशा भोसले
त्यांच्या गज.ल गायनाने मनाला शांती मिळत असे. दैनंदिन ताणतणावातून मुक्त व्हायचे असेल तर त्यांचे गाणे ऐकावे असा त्यांचा आवाज होता. ‘सरकती जाये है रूख से नकाब आहिस्ता’ ही त्यांची गज.ल मला खूप आवडते. आधी मुलगा आणि आता जगजित यांच्या जाण्याने त्या एकटय़ा पडल्या आहेत.
० शुभा मुद्गल
शाळेत शिकत असताना ‘आयआयटी’ कानपूरमध्ये जगजित व चित्रा सिंह यांची गाणी मी ऐकली होती. ते दिग्गज गायक होते. चित्रा सिंग यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जगजित सिंग यांना कुणीच विसरू शकत नाही हेच खरे. त्यांच्या जाण्याने झालेल्या तीव्र दु:खाचा सामना करण्यासाठी चित्रा सिंह यांना ईश्वर पाठबळ देवो एवढीच माझी इच्छा आहे.
० उषा उत्थप
माझा विश्वासच बसत नाहीए. सर्वसामान्य रसिकांना गज.लचा आस्वाद घेता यावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यात ते यशस्वीही झाले. माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच त्यांच्यासोबत मला जिंगल्स करण्याची संधी मिळाली होती. गज.ल संगीतात १२ तारांच्या गिटारचा आणि बास गिटारचा वापर करणारे ते पहिले गायक आणि संगीतकार होते. अलीकडेच त्यांच्याशी माझे बोलणेही झाले होते. माणूस म्हणूनही ते खूप चांगले होते. त्यांच्या निधनाने मोठे नुकसान झाले आहे. गज.ल म्हणजे कठीण उर्दू शब्द हा समज खोटा ठरवून हिंदीतील शायरीला आवाज देऊन गज.ल प्रकार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले.
० महेश भट
‘अर्थ’ हा माझा चित्रपट केवळ त्यांच्या गज.लांमुळेच लोकांपर्यंत पोहोचू शकला.    

गाजलेले अल्बम
alt९ द अनफरगॉटेबल्स (१९७६)
बिरहा दा सुलतान (१९७८)
लाइव्ह इन पाकिस्तान (१९७९)
ए माइलस्टोन (१९८०)
मै और मेरी तनहाई (१९८१)
द लेटेस्ट (१९८२)
ऐ मेरे दिल ( १९८३)
लाइव्ह अ‍ॅट रॉयल अल्बर्ट हॉल (१९८३)
एक्स्टॅसिज् (१९८४)
ए साऊण्ड अफेअर (१९८५)
एकोज् (१९८६-८६)
बियॉण्ड टाइम (१९८७)
मिर्झा गालिब एकूण दोन भाग (१९८८) - गुलझार यांच्या मिर्झा गालिब मालिकेतील गाणी
पॅशन (१९८८)
गझल फ्रॉम फिल्म्स (१९८९)
मन जिते जगजित (१९९०)
मेमोरेबल गझल्स ऑफ जगजित अ‍ॅण्ड चित्रा (१९९०)
समवन समव्हेअर (१९९०)
होप (१९९०)
सजदा (लता मंगेशकर यांच्या सोबतचा अल्बम) (१९९१)
कहकशान एकूण दोन भाग (जलाल आगा यांच्या मालिकेतील गाणी) (१९९१-९२)
व्हिजन्स एकूण दोन भाग (१९९२)
इन सर्च (१९९२)
रेअर जेम्स (१९९२)
फेस टू फेस (१९९३)
युवर चॉईस (१९९३)
चिराग (१९९३)
डिझायर्स (१९९४)
इनसाईट (१९९४)
क्राय फॉर क्राय (१९९५)
मिराज
युनिक (१९९६)
कम अलाइव्ह इन ए कॉन्सर्ट  (१९९८)
लाइव्ह अ‍ॅट द वेम्ब्ले
लव्ह इज ब्लाइण्ड (१९९८)
सिलसिले (गीते - जावेद अख्तर) (१९९८)
मरासिम (गीते - गुलजार) (१९९९)
जाम उठा (१९९९)
सहर (२०००)
संवेदना (माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कविता) (२००२)
सोझ (गीते - जावेद अख्तर ) (२००२)
फरगॉट मी नॉट (२००२)
मुन्तजिर (२००४)
जीवन क्या है (२००५)
तुम तो नहीं हो (गीते- बशीर बद्र) (२००५)
लाइफ स्टोरी (२००६)
बेस्ट ऑफ जगजित अ‍ॅण्ड चित्रा सिंग
कोई बात चले (गीते - गुलजार)
जसबात (२००८)
इन्तेहा (२००९)
आईना (२००९)
वक्रतुंड महाकाय (२००९)
गझलसम्राट जगजित सिंग यांचे काही चित्रपट (यादी अपूर्ण आहे)
प्रेमगीत (१९८१)
अर्थ (१९८२)
साथ साथ (१९८२)
पिंजर
दुश्मन
सौजन्य: लोकसत्ता 

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...