स्वास्थ्य समाजाचे.!

लेख: बल्लव,दै.लोकमत(मंथन)


‘र. धों.’ ही दोन आद्याक्षरे केवळ उच्चारली, तर आज कोणाच्याही मनात अथवा मेंदूत काहीही प्रकाश पडणार नाही. ‘र. धों. कर्वे’ असे नाव सांगितले तरीही चित्र फारसे बदलणार नाही.
‘समाजस्वास्थ्य’कार र. धों. कर्वे, असा खुलासा केला, तरीही फारसा उलगडा होण्याची आशा नाही. ‘रघुनाथ धोंडो कर्वे’ असे या व्यक्तीचे संपूर्ण नाव सांगितले तर, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या नात्यातील हे गृहस्थ असावेत, असा संशय म्हणा वा अंदाज येण्याची शक्यता तरी आहे. ‘‘कुटुंबनियोजनाची संकल्पना आणि संस्कृती आपल्या देशात रुजावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा आद्यसुधारक,’’ अशी ओळख करून दिली तर, लोकसंख्याशास्त्राच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना निदान रघुनाथराव कर्वे परिचयाचे तरी वाटतील!
‘र. धों.’ ऊर्फ रघुनाथराव कर्व्यांना आज आपण इतके विसरून गेलेलो आहोत. हयात होते तोवर रघुनाथराव उपेक्षित राहिले. आणि १९५३ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर ते पूर्णपणे विस्मृतीतच गेले आहेत. लोकोत्तर व्यक्तिमत्त्व असणार्‍या समाजपुरुषाने समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी समाजाच्या पुढेच चालणे अपेक्षित असते. परंतु, ‘समाजाच्या पुढे’ म्हणजे ‘किती पुढे?’ हा प्रश्न खरोखरच कळीचा ठरतो. कारण, असाधारण कर्तृत्व असणारा समाजमनस्क समाजाच्या फार पुढे असेल, तर त्याच्या कार्यकर्तृत्वाचा आणि विचारांचा वेग सर्वसामान्य  मनुष्याला  झेपतच नाही. त्या व्यक्तीच्या विचारांबरोबर धावणे सोडाच, त्या विचारांबरोबर साधे चालता येणेही सर्वसामान्यांना दुष्कर होऊन बसते! रघुनाथरावांच्या बाबतीत नेमके हेच घडले. कामविज्ञानासारख्या एका मानवी अस्तित्वाशी थेटपणे जुळलेल्या, अनादी आणि मूलभूत विज्ञानासारख्या ज्ञानशाखेचा सांगोपांग परिचय सर्वसामान्य मराठी माणसाला मराठी भाषेमधून घडविण्यासाठी या असाधारण व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिभावंताने १९२७ मध्ये ‘समाजस्वास्थ्य’ नावाचे मासिक काढावे ही गोष्टच तत्कालीन समाजाला सहजासहजी पटणारी नव्हती. कारण, लैंगिकतेचा संबंध थेट अश्लीलतेशी जोडण्याचा आपला परिपाठ प्राचीन आहे. ‘काम’ ही एक आदिम, निसर्गसिद्ध आणि तितकीच मूलभूत प्रेरणा आहे, हे आम्हाला मान्य असते. वात्सायनासारख्या लोकव्यवहार शास्त्रज्ञाने कामशास्त्रावरचा प्रगल्भ ग्रंथ या भूमीतच सिद्ध केला, याचाही आम्हाला विलक्षण अभिमान वाटतो. परंतु, त्याच कामविज्ञानाची, कामशास्त्राशी संबंधित शास्त्रीय पैलूंची, जीवनाच्या या प्रांतातील समस्यांची शास्त्रीय चर्चा मोकळेपणाने करण्याची प्रगल्भ संस्कृती मात्र आपल्या लोकव्यवहारात आजही नाही. लैंगिकतेशी संबंधित बाबींची भडक, उत्तान, विवेकाला चालना देण्यापेक्षा विकारांनाच चाळवणारी चावटी करण्याकडेच आपला कल अधिक असतो.

त्यामुळेच, कामविज्ञानाच्या प्रांताबद्दल आजही आपल्याला समाजाच्या विविध स्तरांत प्रचंड अज्ञान, अशास्त्रीय समजुती, गैरसमज, अंधश्रद्धा यांची जाळ्या-जळमटे आढळून येतात. साध्या स्वत:च्या शारीरिक स्वच्छतेपासून ते थेट सर्व पातळ्यांवरील स्त्री-पुरुष संबंधापर्यंत    या विज्ञानाच्या कक्षा विस्तारलेल्या आहेत, याचे सम्यक भान आपल्या समाजात अभावानेच आढळते. हे चित्र आजचे, म्हणजे २१ व्या शतकातील आहे. मग १00 वर्षांपूर्वीची  परिस्थिती काय असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी! कामविज्ञानाबाबतची सांगोपांग, शास्त्रीय, साधार माहिती व ज्ञान मिळणे, ही समाजाची एक मूलभूत गरज आहे, हे ओळखून रघुनाथराव कर्वे आणि त्यांची सहधर्मचारिणी मालतीबाई या दोघांनीही कामविज्ञानाच्या प्रसाराला आपले आयुष्य वाहून घेतले. ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाचा जन्म त्यासाठीच झाला.
स्त्रीशिक्षणाच्या कार्याला वाहून घेणार्‍या धोंडो केशव कर्वे यांचे रघुनाथराव हे थोरले अपत्य. रघुनाथराव शाळकरी वयात असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. पुढे अण्णासाहेब कर्वे यांनी दुसरा विवाह केला. बालपणीच झालेला आईचा वियोग, वडिलांचा दुसरा विवाह आणि १९ वे शतक सरत असतानाच तो एकंदरच काळ यातून रघुनाथरावांचे आंतरिक व्यक्तिमत्त्व घडत गेले. मुळात, ते स्वभावत:च एकलकोंडे व अबोल होते. त्यातच, कॉलेजच्या शिक्षणासाठी रघुनाथराव फर्ग्युसन कॉलेजच्या वसतिगृहात राहिले. पौगंडावस्थेतील त्यांच्या सहाध्यायींचे कामविज्ञानाबाबतचे अज्ञान आणि त्या अवस्थेत त्यांचा होणारा एकूणच कोंडमारा पाहणार्‍या रघुनाथरावांच्या मनात त्या शास्त्राच्या अध्ययन-लेखन- प्रसाराच्या विचाराचे बीजारोपण महाविद्यालयीन वयातच झाले. ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक म्हणजे त्याच बिजाचे वृक्षरूप.

‘समाजस्वास्थ्य’ नावाचे कामविज्ञानाशी सलंग्न विविध बाबींची मोकळी चर्चा करणारे मासिक हीच त्या काळातील एक मोठी (समाजाच्या लेखी) स्फोटक गोष्ट होती. त्या मासिकासाठी रघुनाथरावांनी निवडलेले विषय, रघुनाथरावांची प्रचंड तर्कशुद्ध, धारदार विचारसरणी, रोखठोक लेखनशैली, शरीरशास्त्र, समागम, संततीनियमन यांसारख्या विषयांसंदर्भातील शास्त्रीय चर्चा.. यापैकी काहीच तत्कालीन समाजातील प्रस्थापित कल्पनांना पचणारे नव्हते. त्या काळातील सनातनी रघुनाथरावांवर प्रचंड रागावले. ‘समाजस्वास्थ्य’ मासिकातील लेखनाबाबत रघुनाथरावांवर खटलेही भरले गेले.

सत्य कटूच असते. म्हणूनच ते पटत नाही आणि पचतही नाही. १९ व्या शतकात सुधारकांनी ज्याप्रमाणे धर्मसंस्थेची निर्मम चिकित्सा आरंभली, त्याच धर्तीवर रघुनाथरावांनी हिंदू समाजातील प्राचीन अशा विवाहसंस्थेची झाडाझडती घेतली. आपली विवाहसंस्था एकप्रकारे पिळवणुकीला आणि अन्यायाला जन्म देते, असे रघुनाथरावांचे विश्लेषण होते. विवाहसंबंधात अडकलेल्या पती-पत्नींना काही कारणांमुळे ते बंधन असह्य भासू लागले, तर त्यातून बाहेर पडण्याची सहज मुभा ही व्यवस्था देत नाही, असा रघुनाथरावांचा विवाहसंस्थेवरील मुख्य आक्षेप. या संदर्भात, १९३३ च्या डिसेंबर महिन्यात लिहिलेल्या लेखात रघुनाथराव म्हणतात,
‘आजची विवाहसंस्था म्हणजे उंदरांचा सापळा आहे. आत शिरायला सोपा; पण बाहेर पडणे अशक्य. काही देशांत आणि हिंदुस्थानातही काही जातींत घटस्फोटाची सोय आहे खरी; पण ती असावी तशी नाही. आपले पटत नाही हे ओळखून दोन समंजस माणसांना आपले लग्न मोडायचे असेल, तर ते रशियाखेरीज कोणत्याही देशात मोडता येत नाही.. घटस्फोटाचा कायदा असा पाहिजे, की दोघांच्या संमतीने तर तो मिळालाच पाहिजे; पण एकाच्या अर्जावरूनही मिळाला पाहिजे. कारण, कोणालाही एखाद्या व्यक्तीशी मर्जीविरुद्ध शारीरिक संबंध ठेवावयास लागावा, हा भयंकर जुलूम आहे आणि कोणावरही असा जुलूम करण्याचा हक्क समाजाला पोहोचत नाही.’

विवाहसंस्थेमध्ये स्त्रीचा निर्णयअधिकार आणि स्वातंत्र्य अबाधित राहणे हे समाजाचे स्वास्थ्य शाबूत असल्याचे लक्षण मानावयास हवे. लक्षात घ्या, हे विचार आहेत १९३३ मधील! हे विचार पचवण्याइतपत आपल्या समाजाची पचनशक्ती २0३३
मध्ये तरी सुदृढ बनलेली असेल का?

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...