‘आ’बाळ दिन!

सौजन्य :लोकसत्ता,पंकज भोसले

altपिढीगणिक तीन पावले पुढे असलेली पिढी जन्माला येत असते. प्रतिगामी आणि पुरोगामी यांचे निकष या काळात अंतर्बाह्य बदलत असल्याने हा स्वाभाविक फरक येतो. पण एकेकाळची ‘फॉरवर्ड’ पिढी नव्या पिढीच्या नव्या ‘व्हर्जन्स’ला नावे ठेवण्यात आणि ‘आमच्या काळात असे नव्हते’च्या गुळगुळीत पाढय़ाला गुणगुणण्यात चुकत नाही. उपग्रह वाहिन्यांच्या आक्रमणानंतर एम.टीव्ही आणि नव्याने आलेल्या ‘चॅनल’ मायाजालात रांगत वाढलेली पिढी आणि इंटरनेट सुलभीकरणानंतर ऑरकूट-फेसबुकाला लगडत तयार झालेली अतिनवी पिढी या दोहोंमधील अंतर आज मोठे आहे. भविष्यातील नेतृत्त्व म्हणून आजच्या तरुणाईकडे पाहण्याच्या ढोबळ संकल्पनेत या दोन्ही पिढीला एकत्रित म्हणून पाहिले जाऊ शकेल.  मात्र एकाच काळातल्या पण विभिन्न प्रवाहांचे बरे-वाईट संस्कार पचवण्याच्या धडपडीत अडखडळणारी ही पिढी भयाण अशा तंत्र-सांस्कृतिक कोलाहलामध्ये अडकण्याची भीती आहे. ‘बालदिना’च्या निमित्ताने ‘दिन’ व ‘दीन’ यांच्या सरधोपट शब्दकसरतीऐवजी या पिढीच्या मानसिकतेवर वेगळ्या अंगाने क्ष-किरण टाकण्याचा प्रयत्न केलाय पंकज भोसले यांनी..

देशातील १९९० सालातील १० ते १५ वयोगटातील मुले आणि  २०१० मधील त्याच वयोगटाची मुले यांच्या बुद्धय़ांकामध्ये तफावत आढळेल. अर्थातच २०१०मधील मुले अधिक ‘स्मार्ट’, चाणाक्ष, अभ्यासू, जिद्दी, हट्टी दिसतील. १९९० सालातील या वयोगटाची मुले या सर्वात मागे असतील, पण त्यांचा आनंद निर्देशांक (हॅपीनेस इंडेक्स) हा २०१०तील मुलांहून अधिक असेल. बाह्यसंस्कार करणाऱ्या गोष्टींची पारंपरिक (कुटुंब, शाळा, भवताल, परिसर, समवयस्क स्नेही आदी) यादी सोडली  तर या दोन पिढय़ांच्या वयोगटावर प्रभाव पाडणाऱ्या मुख्य घटकांकडे पाहिले तर त्यावरून हा निष्कर्ष पटण्याची शक्यता अधिक होईल.
१९९० सालचे दूरदर्शन हे बालप्रेक्षकांना या ‘बॉक्स’पुढे ‘इडियट’ करण्याइतपत प्रभावी नव्हते. कृषिदर्शन, संतवाणीसारख्या कार्यक्रमांनी आणि रसाळशत्रू चर्चा परिसंवादांनी या पिढीची टीव्ही आकर्षणे शनिवार-रविवारीय सिनेमे, चित्रगीते यांच्यापर्यंत मर्यादित होती. रेडिओवर आकाशवाणी केंद्रांची जादू टिकून होती. अमीन सयानी रेडिओतील अमिताभ बच्चन होते आणि रेडिओ कार्यक्रमांद्वारे आगामी सिनेमांचे प्रोमोज ऐकून त्यावर चर्चा होई. दूरदर्शन-रेडिओव्यतिरिक्तचे जगही जबरदस्त बैठय़ा-मैदानी खेळांनी सुसज्ज होते. गोटय़ा, भोवरे, पतंग, बिल्ले मोसमागणीक येणाऱ्या सणासारखे होते. गल्ली क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, मैदानी क्रिकेटस्पर्धाही (दोघात दोन ते पाच व चेंडू या बोलीवर आज दोन संघात मॅच होतात की नाही, कळणे नाही.) शालेय सुटय़ांना शरीरमनाने समृद्ध करणाऱ्या होत्या. दर्जेदार साहित्यिक नियतकालिकांनी, किशोर, आनंद, ठकठक, चंपकसारख्या मासिकांनी ग्रंथालये तत्कालिन वाचनकिडय़ा बालकांची मौज होत होती. तेव्हाही बिघडणाऱ्या शालेय मुलांची संख्या कमी अधिक प्रमाणात आजसारखीच असेल, पण बिघडण्याचे निकष आजच्या पातळीत फारच साधे वाटू शकतील.
१९९२ सालानंतर दूरदर्शनची जागा उपग्रह वाहिनीने घेतली आणि मुलांवर चांगले बाह्यसंस्कार करणाऱ्या अनेक जागा एकेक करून कमी होऊ लागल्या. पहिला फटका पडला तो मैदानी खेळांपैकी पतंगींना. आज केवळ शहरांतल्या प्रमुख झोपडपट्टी, निम्नमध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये आणि मकर संक्रांतीच्या आगे-मागे पतंगी दिसतात. मात्र पूर्वी या खेळाला जे वैभव होते, ते लोप पावले आहे. तीच गत गोटय़ा, भोवरे यांच्याबाबतही झाली. क्रिकेटभोवतीचे वलय आज अधिक असल्याने हा खेळ शाबूत आहे, दुसरा सचिन तेंडुलकर मात्र तयार झाला नाही. उपग्रह वाहिन्यांचे केबलसर्प इमारतींना, मोकळ्या आकाशाला गिळंकृत करू लागले. मग चॅनल्सची मोठी खाण विशिष्ट विषयानुरूप समोर आली. डिस्कव्हरीवर ‘आज आपने क्या खोजा?’ करणारी व एटीएन, एमटीव्हीवरील सिनेमांचे प्रोमोज पाहण्यात रमणारी पिढी तयार झाली. रेडिओ प्रोग्रामची जागा या प्रोमोजनी घेतली. गाण्यासह आगामी सिनेमातील नेत्रखेचक घटना एटीएन नामक वाहिनीवर दिवसच्या दिवस पुन्हा पुन्हा पाहणारी पिढी खूप मोठय़ा प्रमाणावर होती. चार ते सहा वर्षांत केबलचे सार्वत्रिकीकरण झाले. १९९८ पर्यंत गावागावांतील बाळगोपाळांवर उपग्रह वाहिनीने कब्जा केला आणि ‘दूरदर्शन शाप की वरदान?’ या निबंधाला शालान्त परीक्षेत अंमळ अधिकच महत्त्व आले.
उपग्रह वाहिन्यांनी मैदानी खेळ हरवून बसलेली, टीव्हीच्या डेली सॉपच्या भयाण कौटुंबिक कहाण्यांवर पोसलेली पिढी नक्कीच संकरित स्मार्टपण घेऊन आलेली होती. त्यांच्या लैंगिक जाणीवा आधीच्या पिढीच्या दुप्पट होत्या. कारण येणारे चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इतकेच नव्हे तर जाहिरातींनीही त्यांची समज विस्तारण्यात मदत केली होती. ही पिढी अवांतर वाचन हरवून बसली होती, कारण अभ्यासानिमित्ताने स्पर्धा वाढल्याने अभ्यास पूर्ण करण्याची मारामार, शाळा, क्लासने खालेल्या वेळा, समज वाढल्याने भिन्नलिंगी आकर्षणांचे गुलामपण यातून अतिरिक्त वाचनाऐवजी टीव्ही, चित्रपट, वॉकमन, एफएम रेडिओ यांच्याकडे या पिढीचा कल वाढू लागला होता. स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी पारंपरिक आवडत्या शिक्षण शाखांमध्ये प्रवेश मिळविण्याऐवजी इंजिनीअरिंगच्या वाटेवर जाण्याची जोखीम पत्करण्याचे फॅड आले. या मानसिकतेतूनच ‘एटीकेटी’ संस्कृतीचा पसारा वाढत गेला, पण त्याहून भयंकर अशी गोष्ट घडली, ती ‘इंटरनेट सॅव्ही’ असलेल्या अतिनव्या पिढीच्या आगमनाने.
१९९९ ते २००३ हा सायबर कॅफेच्या भरभराटीचा काळ होता. जगाशी एकरूप होण्यासाठी, ज्ञानार्जनासाठी त्याचा वापर करणारे अल्पसंख्य होते, पण तासन्तास इंटरनेटवर जगातील भिन्न लिंगी व्यक्तींशी  ‘फेक चॅटिंग’ची हौस भागवणारी, ‘वाईट साइट्स’च्या पंढरीचे वारकरी बनत अकळत्या वयात फुलणारी पिढी इंटरनेटमुळे तयार झाली . इंटरनेटसोबत तंत्रज्ञानात झालेला अमूलाग्र बदल, जग जवळ आल्यामुळे फॅशनग्रस्ततेचा जागतिक प्रसार यामुळे मोबाइलवर चॅटिंग, टेक्स्टिंग (नंतर सेक्स्टिंग) करणारी, सोशल नेटवर्किंग साइट्ससारख्या आभासी जगात हजार मित्र बनवणारी पण प्रत्यक्षात एकांतग्रस्त बनलेली पिढी वाढू लागली.  ‘इंटरनेट शाप की वरदान?’ हा नवा विषय शालान्त परीक्षेत लोकप्रिय बनला.
कॅसेट प्लेयरची जागा एमपीथ्री सीडीने आणि नंतर आयपॉडने घेण्याचा बदल जसा नकळत चमत्कार झाल्यासारखा वेगाने घडला, तेवढय़ाच वेगाने या पिढीच्या मानसिकतेमध्ये फरक पडला. कुटुंबसंस्थांसोबत इतर सर्वच सामाजिक संस्थांना हायटेक युगाने व्यापल्यामुळे मानवी नातेसंबंधांमध्ये खोलवर बदल झाले. इंटरनेट आज घराघरांत सहजपणे उपलब्ध आहे. मोबाइल अ‍ॅप्लिकेशन, संगणकातील नवनवीन सॉफ्टवेअर्स, व्हिडीओ गेम्सच्या राशी यांमधून कामाची व रंजनाची अधिकाधिक साधने या पिढीसमोर आली. पण त्याच साधनांमुळे स्थूलत्वापासून इंटरनेट(internet), पोर्न, सोशल नेटवर्किंग(social networking) आदींच्या व्यसनाने या पिढीला अंतर्बाह्य पछाडले आहे. अस्वस्थता, चिडचिडेपणा, नकारात्मकता यांचा मारा पिढीची निकोप शरीरामनापासून आबाळ करीत आहे. मित्रांत आणि कुटुंबातही एकांतवास अनुभवण्याची इच्छा बाळगणारे, निद्रानाशाला कवटाळणारे व अस्तित्त्व हरवून बसणाऱ्या कोलाहलात रमणारे जीव या पिढीमध्ये निर्माण होत आहेत. प्रत्येक समाजात असेच सिनेमे बनतात, जे पचविण्याची समाजाची लायकी असते. आज आभासी जग समाजाशी इतके रुळले आहे की सुपर डय़ुपर हीट सिनेमा बनविण्यासाठीही रा.वनसारख्या चित्रपटात आभासी जगाच्या विषयाशी साटेलोटे झालेले दिसते.
१० ते १५ वयोगटातील मुलांच्या मनावर तंत्रज्ञानातील दररोज होणाऱ्या बदलाचे आघात इतके मोठे आहेत, की वरवर सामान्य दिसणाऱ्या व सामान्यपणे वावरणाऱ्या मुलाला इंटरनेट, व्हिडीओ गेम, मोबाइल टेक्स्टिंग, चॅटिंग यापैकी कोणत्या ना कोणत्या सवयींनी ग्रासले आहे. क्षुल्लक बाबींवरून आत्महत्येचा विचार डोकावणे, नशेच्या स्वाधीन होणे, एकाग्रता व मनस्वास्थ हरवून बसणे या समस्येच्या पुढल्या पायऱ्या आहेत. विविध इलेक्ट्रॉनिक गॅझेटची सवय इतकी खोलवर गेली आहे, की त्यांच्यात बदल होण्याची शक्यता नाही.   उलट पुढच्या काळात ती आणखी उग्ररूप धारण करणार आहे. अमेरिका, युरोप, चीन, तैवान, दक्षिण कोरिया या राष्ट्रांमध्ये इंटरनेट व मोबाइलच्या व्यसनातून लहान मुलांना सोडवण्यासाठी सुधारगृह उभारण्यात आली आहेत, पण त्याला तितकेसे यश आलेले नाही.  स्पर्धेत टिकण्यासाठी भल्या - बुऱ्या सर्व मार्गांचा अवलंब करणारी, अपयश, यश या दोहोंना पचविण्याची क्षमता हरवून बसणारी व बाह्यसंस्कारांच्या मूलभूत घटकांमधूनही पुरेसे मार्गदर्शन न मिळाल्याने हरवून गेलेली अशी ही पिढी चंचल बनली आहे. मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, शिक्षक, पालक यांच्यासाठी येणारा काळ सर्वात आव्हानाचा ठरणार आहे. या पिढीच्या समस्याच समजून घेतल्या नाही, तर तिच्या पुढच्या ‘व्हर्जन्स’ही समस्यांबाबत तीन पावले पुढे असतील. तेव्हा पुढच्या पिढीची निकोप शरीरमनापासून होणारी आबाळ टाळण्यासाठी आत्ताच मुलांना त्यांच्या कलेने समजून घेणे, विश्वासात घेणे आवश्यक आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या आंतरिक समस्येने पोखरत जाणाऱ्या व आबाळ दिनाचा उत्सव साजरा करणाऱ्या या पिढीसाठी तो खरा निकोप बालदिन असेल.

इंटरनेट प्रताप!
गेल्यावर्षी भारतातील प्रमुख दहा शहरांमध्ये ८ ते १८ वयोगटातील दीड हजार मुलांची पाहणी करण्यात आली. त्यात ८ ते ११ वर्षांची ५२ टक्के मुले पाच तासांहून अधिक काळ इंटरनेट वापरतात, तर १२ ते १५ वयोगटातील ५८ टक्के तर १६ ते १८ वयोगटातील ५६ altटक्के मुले इंटरनेट व्यसनांध झाल्याचे समोर आले. अभ्यासाव्यतिरिक्तचा वेळ ही मुले नेटवर चॅटिंग(chatting), इ-मेल(e-mail), सोशल नेटवर्किंगवर वापरत असल्याचे यात पुढे आले. सृजनशीलतेला वाव मिळणारे वाचन अथवा शरीराला व्यायाम देणारे मैदानी खेळ यांच्यापासून ही मूले कित्येक कोस दूर असल्याचे पाहणीत लक्षात आले. ही मुले अधिकाधिक भ्रामक विश्वात रमणारी असून जगापासून तुटत एकलकोंडी होण्याची क्षमता बाळगणारी असल्याची भीती पाहणीत व्यक्त करण्यात आली होती. घरातील व्यक्तींशी नातेसंबंध त्रोटक होत जाऊन त्यांची आभासी जगातील नात्यांची ओढ अधिक असल्याचे सत्य अहवालाने मांडले होते. सायबर गुन्ह्यांच्या समस्या आहेतच मात्र त्याहून अधिक समस्या  इंटरनेटने उभ्या केलेल्या विश्वाच्या आहेत. ‘ब्लँक’ होणे किंवा स्मरणशक्तीला चालना न मिळणे या समस्येच्या अगदी सुरुवातीच्या पायऱ्या आहेत. इंटरनेटचा अनावश्यक गोष्टींसाठी वापर करणे टाळल्यास या समस्या उग्र होऊ शकत नाहीत.

टीव्हीचा भुलभुलैया!
हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासकांनी यावर्षी अभ्यासाद्वारे सिद्ध केले की दररोज दोन तासांहून अधिक टीव्ही पाहिल्याने मधुमेह आणि हृद्यविकार निर्माण होऊ शकतो. टीव्ही केवळ शारीरिक हालचालीच कमी करीत नाही, तर त्यातील खाद्यपदार्थाच्या जाहिराती मुलांच्या altखाण्याच्या सवयी बिघडवू शकतात असा इशारा अ‍ॅकेडमी ऑफ पेडिअ‍ॅट्रिक्स काऊन्सिलने आपल्या अहवालातून दिला आहे. भारतात फास्ट फूड, जंकफूडच्या कंपन्या विस्तारल्या आणि दोन मिनिटांत शिजणाऱ्या सूप्स, नूडल्स, सॉस यांचे ठराविक ब्रॅण्ड्स वाणसामानाच्या यादीत अत्यावश्यक गटात मोडली गेली. अमेरिकेत लहान मुलांचे स्थूलत्त्व हा ज्वलंत प्रश्न बनला आहे. इंटरनेटसोबत टीव्हीवर तासन तास खर्च करणाऱ्या पिढीला निद्रानाश, दुस्वप्नांनी पछाडल्याचे अहवालात म्हटले आहे. उपग्रह वाहिन्यांनी भारतीय बाजारपेठांमध्ये शिरकाव केल्यानंतर लहान मुलांमध्ये िहसा, गुन्हेगारी प्रवृत्ती प्रबळ झाल्याचे अहवाल आहेत. फास्ट फूड कंपन्यांची उत्पादने घरोघरी पोहोचविण्यात टीव्हीच कारणीभूत ठरला असून, बालप्रेक्षकांमुळे कार्टून वाहिन्याही बलाढय़ झाल्या आहेत.

मोबाइल वेड!
१९९९ पर्यंत कुतूहलाची गोष्ट म्हणून पाहिला जाणारा मोबाईल २००९ मध्ये लहान मुलांच्या खेळण्यासमान परिचित आणि सार्वत्रिक झाला. घरात संभाषणशत्रू असलेली पिढी मोबाइलवेडाने झपाटली गेली, ती याच काळात. मोबाइलमधून निघणाऱ्या प्रारणांनी मेंदूवर altपरिणाम होतो, का होत नाही याबाबत उलट-सुलट शेकडो अहवाल आत्तापर्यंत दाखल झाले, पण मोबाइलवेड कमी झाले नाही. जटिल अ‍ॅप्लिकेशन सुलभपणे हाताळणाऱ्या या पिढीच्या शरीराचा मोबाइल हा एक घटक बनला आहे. निद्रानाश, तणाव, थकवा, चिडचिडेपणा, अशांत मानसिकता यांचे धनी बनविणाऱ्या मोबाइलला विकतचे व्यसन म्हणणे योग्य ठरेल. अनेक अहवालांनी मोबाइल वेडाला ड्रग्जच्या व्यसनाइतके कडवे असल्याचे म्हटले आहे. मोबाइलवर चॅटिंग, टेक्स्टिंग आणि गेम्स खेळण्यात मश्गुल होणाऱ्या पिढीची मानसिक दुर्बलता बदलता येणार नाही. इतका मोबाइल आज त्यांच्या आयुष्यावर व्यापला आहे.

सृजन दुर्बलता!
मोबाइल, इंटरनेट आणि टीव्हीमध्ये आयुष्याचा सगळा बहुमोल व्यतीत करणाऱ्या या पिढीला कल्पना शक्तीचे वावडे आहे. वाचनअभावामुळे किंवा पाठय़पुस्तकांपलीकडचे जग अपरिचित असल्यामुळे मुलांची सृजनक्षमता हळूहळू कमी होत चालली altअसल्याची चिंता जगभरातील समाजशास्त्रज्ञ आणि मानसतज्ज्ञांमध्ये निर्माण झाली आहे.  हवी असलेली सर्व माहिती इंटरनेटच्या एका क्लिकवर मिळत असल्याच्या भ्रमात गुगलॅक्चुअल बनलेली ही पिढी स्वतच्या कल्पना शक्तीला श्रम देण्याचे टाळतात. दूरध्वनी क्रमांक मोबाइलमध्ये सेव्ह असल्याने कुणाचा नंबर लक्षात ठेवण्यासाठी स्मरणशक्तीला थोडाही व्यायाम करावा लागत नाही. त्या व्यायामाअभावी स्मरणशक्ती क्षीण होत चालली आहे. मोकळ्या हवेत पतंग उडविण्यातून मिळणारा बहुमोल आनंदही या पिढीला घेता येऊ शकत नाही. मैदानी खेळ मर्यादित आहेत. याचा परिणाम पुढील काळात स्थूलत्त्व आणि अभिरूचीहीन समाजाच्या निर्मितीत पाहायला मिळणार आहे.
pankaj.bhosale@gmail.com

1 comment:

सौ गीतांजली शेलार said...

हे सत्य आहे पण आत्ताची पिढी जरी चंचल असली तरी हुशार मात्र आहे आणि माझ्या मुलाच्या अवलोकनावरून मला तो जास्त सृजनशील वाटतो कारण त्याला जे प्रश्न पडतात ते त्याच्या वयात मला कधी पडल्याचे आठवत नाहि माझी आई हेच सांगते.तो जे करतो ते मी कधीच त्याच्या वयात केल नाही अस आई सांगते . हो पण तो खूप हट्टी आहे या वयात ! छान विश्लेषण आहे . एक गोष्ट आहे प्रत्येक पिढी नवी पिढी कशी वाह्यात आहे हेच दाखवते मी लहानपणी हे खूप वेळा ऐकलंय ! जरी सचिन तेंडूलकर नसला तरी महेंद्र सिंग धोनी आहेच कि !

Related Posts Plugin for WordPress, Blogger...