अंगणातले आभाळ

 प्रथम आम्ही गौडपादाचार्याच्या मठात राहत होतो. चांगल्या प्रशस्त तीन खोल्या होत्या. भाऊ गोरक्षण समितीचे काम पाहत. त्यामुळे ही जागा मिळाली. काही महिन्यांतच भाऊंचे व गोरक्षण समितीचे
खटकले. समितीने या तीन खोल्यांचे भाडे तीस रुपये भाऊंच्या माथी मारले. हे भाडे परवडेना. तीस रुपये नुसते भाडे भरले तर घरात खायचे काय, असा प्रश्न आई भाऊंना विचारी. कीर्तनाचे काय? एखादा महिना चांगला गेला तर गेला. नाहीतर एकादशी नि प्रदोष. एकादशी म्हणजे दिवसभर फाके पडणार. प्रदोष म्हणजे फक्त संध्याकाळी जेवायला मिळणार. यापेक्षा छोटय़ा छोटय़ा जागेत राहून संसार करू, असं आई नेहमी म्हणायची. हे सर्व म्हणताना तिच्या डोळ्यांत पाणी येई. आईने भाऊंना केवळ तीस रुपयांच्या अभावी मोठी जागा सोडायला लावली आणि गंगेजवळच्या यशवंतराव महाराज मंदिरातील दोन खोल्यांत संसार थाटला. या दोन खोल्या गंगा- गोदावरीच्या काठाशी होत्या. अगदी नदीच्या पात्रात आम्ही राहत होतो.
हा भोसेकरांचा वाडा. नृसिंहमंदिराच्या वर आम्हाला दोन खोल्या होत्या. मधला दगडी जिना ओलांडला की खाली प्रशस्त फरस होता. पाठीमागे यशवंत व्यायामशाळेच्या रिकाम्या झालेल्या जागेत मारुतीचे मंदिर होते. तो मंदिराचा गाभारा होता. तिथे गवत वाढायचे. ते आम्ही सर्व उपटायचो. गोदाकाठचे कौलारू घर होते टुमदार. घराच्या खिडकीतून सर्व देवांचे दर्शन व्हायचे. पहाटे पाचला आई उठली की खिडकी उघडून सर्व देवांना नमस्कार करी. खिडकीतून समोर रामकुंड, लक्ष्मणकुंड, डाव्या हाताला सुंदरनारायण- एकमुखी- दत्त- बापू भटजीमहाराजांचा मठ, निरंजन- रघुनाथ- मध्यमुनीश्वर यांची ध्यानाची जागा. समोर चतु:संप्रदाय आखाडा- त्याच्याजवळ गोदावरी मंदिर. वर उजव्या हाताला कपालेश्वर मंदिराचा कळस. तिथून थोडेसे मागे काळाराम मंदिराचा कळस, सांडव्यावरची देवी, पंचवटी, नारोशंकराची घंटा, शंकराचार्याचा मठ, बालाजी मंदिर असे सारे काही दिसे. व्हिक्टोरिया पुलापासून गाडगेमहाराजांच्या धर्मशाळेच्या टेकडीपर्यंतचा गोदावरीचा प्रवाह सर्व प्रकारच्या कुंडांमधून खळाळत जायचा. हजारो भाविक रामकुंडात स्नान करीत. दहाव्या-बाराव्याच्या धर्मशाळेतून गोवऱ्यांचा धूर दाटे. कणकेचे- भाताचे पिंड फटाफट फुटत. कावळ्यांची दाटी असे. कुणी गंगापूजन करीत. कुणी अस्थिविलयतीर्थात अस्थी टाकीत. कुणी महादेवाच्या पिंडीला पाणी घालीत. कुणी ओल्यासकट गंगेला एकशे आठ प्रदक्षिणा घालीत. या साऱ्या आवाजात भटजींच्या संकल्पविधीचा आवाज टणटणीत यायचा. गंगेपासून स्नान करून गावात जाणाऱ्या रस्त्याला लागूनच घर असल्याने तीर्थाच्या गजरानेच आम्ही जागे व्हायचो. आम्हाला वेगळा घडय़ाळाचा गजर लावायची गरज पडायची नाही. गंगेच्या गजरातून आम्ही उठायचो. आमच्या वाडय़ात हडपीणकाकू राहत. बाई बुढ्ढी पण वजनदार. भांडकुदळ. हडपीणकाकू दबत होत्या फक्त आईला. सार्वजनिक नळावर काकूंचा कायम पहिला नंबर. आईने एकदा मध्यरात्री उठून नळाला बादली लावून काकूंच्या दादागिरीला धक्का दिला. आईने वाडय़ातल्या प्रत्येक घराचा त्या त्या वारी पहिला नंबर ठरवून दिला. त्यामुळे सर्वाना पाणी मिळू लागले.
सकाळी सहाच्या पूर्वीच फरसावर झांजा-चिपळ्या वाजवीत वासुदेव यायचा. डोक्यावर मोरपिसाची टोपी. गळ्यात कवडय़ांच्या, रंगीबेरंगी मण्यांच्या माळा. डाव्या खांद्यावर दोन-तीन झोळ्या. काही बऱ्यापैकी, काहींची दशादशा झालेली. अंगात पांढरी बंडी, मळकट धोतर, कपाळी बुक्का. धारदार मिशा. काळासावळा. ठेंगणाठुसका. किलकिले डोळे. छोटेसे कपाळ. टणटणीत हात. उजव्या हातात दोऱ्या गुंडाळून असलेला खोलगट टाळ. डाव्या हातात लांबट पट्टय़ांच्या चिपळ्या. झांजेच्या लयीतून एका चिपळीच्या आघातातून तो इतकी छान गिरकी घ्यायचा की, त्याचा झगा घेरेदार व्हायचा; गरगरीत बाजरीच्या भाकरीसारखा. परत तो झगा पूर्वीसारखा झाला की, तो एक पुढे व एक पाय मागे करीत नाचायचा. खर्जातल्या गोड आवाजात आणि ‘हां हां हांऽऽ’च्या पालुपदात तो गायचा, नि म्हणायचा-
तुळस वंदावी वंदावी।
माऊली संताची सावलीऽऽ।।
मध्ये नुसती झांज-चिपळ्यांची लय गोलघुमटातल्या आवाजागत माझ्या कानात घुमायची. तिची आवर्तने काळजालाच भिडायची. त्याची टाळ नुसती ऐकत राहावी असे वाटे. तो जेव्हा म्हणायचा तेव्हा टाळ बारीक वाजवी. पण त्याचे कडवे संपले की तो मोठ्ठय़ाने वाजवी. एका पाठोपाठ एक गिरक्या घेई. त्यात त्याची मोरपिसे चमकायची कधी कधी त्याच्या डोळ्यात पाणी तरारे. कधी तो राम होऊन नाचायचा. कधी कृष्ण होऊन दुडक्या चालीने धावायचा. काही वेळाने वाडय़ातील बाई वासुदेवाला वाटीभर पीठ अन् एखादा तांब्याचा छोटा पैसा वा पाच पैसे घाली. तेवढय़ापुरता टाळाचा आवाज थांबे. वासुदेव मनभरून आशीर्वाद देई. लगेच दुसरी, तिसरी अशा क्रमाने बाया येऊन कुणी तांदूळ, कुणी  पीठ, कुणी पैसे देत. वासुदेव तोंडातल्या तोंडात पुटपुटत ‘आई, कल्यान असो.’ एवढे तो मोठ्ठय़ाने म्हणे. पुन्हा टाळ वाजवीत वाजवीत म्हणे-
दान पावलंऽऽ हाऽऽ हाऽऽ दान पावलंऽऽ।
पंढरीच्या इठोबाला, जेजुरीच्या खंडोबाला
नाशकाच्या रामाला, त्रिंबकच्या निवृत्तीला
दान पावलंऽऽ दान पावलंऽऽ वासुदेवाला दान पावलं।।
असे म्हणते सूर्याने हळूच ढगाआड लपावे तसा तो दुसऱ्या वाडय़ात शिरे.
मी भिंतीच्या कडेने फाटक्या कांबळ्यावर झोपलो होतो. माझ्या अंथरुणाजवळच्या खिडकीच्या फाटक्या फटीतून गार वारा येत होता. आईने त्या फटीवर आपले फाटके पातळ घातले. पातळ विरलेले नि गरिबीत हरवलेले. आई अंथरुणावर पडली. आईचे अंथरुण मजेशीर होते. एक जाडीभरडी पण दशा दशा झालेली निळीविटकी सतरंजी. त्यावर भाऊंना भेट मिळालेला विसविशीत सातू. त्यावर चौपदरी जुनेर धाबळी नि वर पातळ शाल. बस्स. पांघरुण आम्हाला लागत असल्याने आई पदराचे पांघरुण करून मुटकुळ्यातच झोपायची. कानाला गार वारा लागू नये यासाठी फाटके उपरणे बांधायची. झोपताना दोन्ही हात जोडून देवाकडे बघत म्हणायची, ‘अस्ती अस्ती काळभैरव असती.., हे प्रभो, कृपा कर.’ असे म्हणत मग झोपायची. त्या दिवशी मात्र आई काहीतरी पुटपुटतच होती. घराच्या कौलांच्या खाली जुने पत्रे होते. त्या पत्र्यांनाही फटी पडल्या होत्या. काही ठिकाणी घुबडाच्या डोळ्याएवढी भोके पडली होती. यातून धूळ मुलांच्या वक्तशीर रांगेसारखी बाहेर पडे. जाळीजळमटी नित्य येत. ती काढून काढून आई कंटाळलीही. अध्र्या भागापर्यंत पत्रे होते नि उरलेला अर्धा भाग मोकळा सोडला होता. या भागात रात्री उंदरांचे खेळ चालत. त्यांचा बारीक चिरचिरीत चेचलेला आवाज मला अस्वस्थ करी. मग मी डोक्यापासून पायापर्यंत पांघरुण गच्च लपेटून घ्यायचो. पांघरुण अपुरे पडले की पाय आखडून घेई. आई पदराआडून म्हणायची, ‘हाकऽऽ शुकऽऽ शुकऽऽ’ माझी चुळबूळ सुरू होताच आई म्हणायची, ‘नाना, झोप रे.’ उंदरांनी धान्याचे पुराणे डबे फळीवरून पाडू नये यासाठी आईने एका डब्यावर सहाण ठेवली. दुसऱ्यावर दगड, तिसऱ्यावर धान्य मोजायचे माप, चवथ्यावर छोटा पितळी खल, पाचव्यावर लोखंडी खल. असे ठेवून मग झोपायची. ही तिची नित्याची सवय झालेली होती. मध्येच एखादे मांजर आले की उंदीर तेवढय़ा काळापुरते गप्प बसत. मग मांजराने दबा धरला नि एखादा उंदीर तोंडात धरला की ते अंथरुणाच्या मधून पळे. त्याचे पळणेही भयानक दबाव आणी. माझे मन थरथरे. आई त्या मांजराला दाराची कडी काढून देई. ते निमूटपणे जाई.
त्या दिवशी आई माझी वाट बघत होती. कारण घरात दूधच नव्हते. बंडय़ाने कुस्करा खाल्ला. डब्यात गूळपापडी घेतली. बेबीचा स्कर्ट ओला होता. ती फाटक्या फ्रॉकवरच अभ्यास करीत होती. दुधाचा तांब्या येताच सगळ्यांचे चेहरे खुलले. भाऊ नुकतेच डोळे चोळीत उठले होते. अंगातली कोपरी सावरीत जानव्यातील दातकोरणे पाठीवरून कमरेवर घेत स्वयंपाकघरात आले. आईने आम्हाला दूध दिले. दूध थोडे उरल्याने आई-भाऊंनी कॉफीची वडी घेऊन कॉफी प्यायले. आम्ही कपातले दूध जे बशीत सांडले होते ते आई-भाऊंच्या कपांत घातले. आई आम्हाला दूध प्यायचा आग्रह करीत होती. आमच्या पोटात चहा-कॉफीऐवजी दूधच गेले पाहिजे हा आईचा आग्रह होता. ती कसे काय खर्चात बसवी ते तिलाच ठाऊक. पण दांडय़ा तुटलेल्या छोटय़ाशा जाड जाड कपांच्या काठातून गाईचे दूध पिताना मजा वाटे. त्यात भाऊंचे सांगणे असे की, गाईचे दूध मुळातच गोड असल्याने त्यात साखर घेण्याची गरज नाही. पण आम्हा भावंडांना ते पटत नसे. घरात साखर नसली तर आई बिनसाखरेची कॉफी-चहा यापैकी काहीतरी गुपचूप घेई. कधी तर नुस्ती शिळी भाकरी-गूळ, पाणी हेही तिला पुरेसे होई. मग पुन्हा घरकामाला ती तयार. आईने दूध शेगडीवर ठेवले. कोळसे पेटेनात. गोवरीचा धूर दाटला. पुठ्ठय़ाने वारा घालत घालत आईच्या डोळ्याला पाणी आले. मग बाटलीतून बेबीने थोडेसे रॉकेल गोवरीवर टाकले. गोवरीने झटक्यात पेट घेतला. धूर निवळला. शेजारच्या चुलीवर तांब्याचा गुंडा पाण्यासाठी तापत राहिला. मी लाकडे चुलीत सरकवीत होतो. थंडीत आम्ही सर्व भावंडे चुलीजवळ बसत असू. त्यामुळे गोदाकाठची कडाक्याची थंडी थोडीशी दूर पळे. भाऊ मात्र अशाही थंडीत गोदेच्या गार पाण्यात नाकतोंड दाबून बुडी मारीत. ओल्यासकट महादेवाला, मारुतीला पाणी घालीत. संध्या करीत. मग जवळच्या ओवरीत येत. पंचाने अंग पुसत. हात उंचावून सूर्यनमस्कार घालीत. सूर्यनमस्काराने अंगात उष्णता निर्माण होते. त्यामुळे थंडी पळ काढते, असे भाऊ नेहमी आम्हाला सांगत. आम्ही गरम पाण्याने स्नान करून घरच्या घरीच नमस्कार घालत असू पण ते आठाच्या सुमारास. त्या वेळीही खिडक्या बंद. फारच थंडीने काकडत असलो तर नमस्काराला सुट्टी. मात्र भाऊ घरी असले की नमस्कार व्हायलाच हवेत असा त्यांचा कडक दंडक. नमस्कार चुकवले तर लाखोली आणि फटके. भाऊ रोज बाभळीच्या शेंगांनी तोंड धूत. शेंगा पाण्यात धुऊन त्या बऱ्याच वेळ तोंडात ठेवून भाऊ त्याचा रस यथेच्छ चघळीत. त्यामुळे दात घट्ट होतात असा त्यांचा लगेच आयुर्वेदिक सल्ला असे. दातांचा कुठलाही विकार होत नाही असे म्हणत. कोणत्याही दंतमंजनापेक्षा बाभळीची शेंग उत्तम असल्याचे ते आम्हाला रोज सकाळी पटवून देत. आम्ही ऐकले नाही की संतापाने म्हणत, ‘बोंबला लेका हो! अशीच तुमी पाप्याची पितरं राहणार. दातांच्या फटय़ांच्या नावानं ओरडत राहणार. सगळं तुम्हाला पेटीबंद हवंय. जर पंचमहाभूतांच्या सान्निध्यात जा ना. निसर्गासारखं मुक्त जर जगला नाहीत तर तुमची आयुष्यं गोळ्यांच्या बाटल्यात जातील. आज पन्नास वर्षांत कधी औषध म्हणून माहीत नाही. आजारी पडूनही निसर्गावरच राहय़लो. आपोआप बंद झालं, नाहीतर तुमी. लेको हो, नुसती शिंक आली की धावलात डॉक्टरकडं.’
पहाटे पाचच्या भोंग्याला आईला नेहमीप्रमाणे जाग आली, मला अभ्यासाला उठवले. मी डोळे चोळीत पांघरुणातून बाहेर आलो, तो अंगात थंड वाऱ्याची लहर शिरशिरत गेली. परत अंगाभोवती पांघरुण गुंडाळले. पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात केली. आज अर्थशास्त्राची परीक्षा होती. यात पहिल्या येणाऱ्या मुलास बक्षीस होते. त्यामुळे मी इतर मुलांना ‘या परीक्षेत काहीही अर्थ नाही’ असे सांगत सुटे. आमच्या आर्टस्च्या वर्गात मेरिटमध्ये जास्तीत जास्त मुलींचे नंबर असत. या मेरिटात आपणही यावे असे मला वाटे. आईची पहाटेची खुडखुड चालू होती. मी मोठय़ाने वाचू लागलो की, आई हळू आवाजात प्रात:स्मरणाचे श्लोक म्हणायची. मी हळू आवाजात वाचू लागलो की, आईचा आवाज म्हणता म्हणता हळूहळू वर चढे. ती तन्मय होऊन जाई. दारिद्रय़ाचा नि याचा काहीही संबंध तिच्या लेखी नव्हता. शिळ्या भाकरीच्या पातेल्यात भाकरीचा कुस्करा करताना ती जेव्हा ‘तू खाय साखरलोणी माझिया बाळाऽऽ’ हे काकडारतीचे पद म्हणायची तेव्हा तो कुस्कराच साखरलोणी व्हायचा. फोडणीचा मनोहारा चवदार करीत करीत आई ‘राम सर्वागी सावळा।  हेम अलंकार पिवळा। नाना रत्नांचिया किळा। अलंकार शोभती।।’ ही रामाची भूपाळी म्हणायची, तेव्हा पहाट सुंदर होऊन जायची. परीक्षेचा निकाल लागला. मेरिट मिळाली. पहिला आलो. चार विषयांत डिस्टिंक्शन मिळाले. मित्रांनी अभिनंदन केले. मनाला एक समाधान हे की अभ्यासाचे चीज झाले. आई खनपटीला बसून रोज पहाटे उठवायची. झोपमोड होताना संताप यायचा. नको तो अभ्यास असे वाटे. पण या निकालाने हे सारे लोपले. घरी येताच आईला-देवाला नमस्कार करून ही बातमी सांगितली. आईने वाटीत साखर ठेवली. वाडाभर साखर वाटली. आई साखरभरल्या तोंडाने जो येईल त्याला माझ्या मेरिटविषयी सांगत सुटली. तिने सगळ्यांना साखर दिली. मी तिच्या तोंडात साखर घालता घालता म्हणाली, ‘असेच साखरयोग आणा..’
असे हे माझ्या अंगणातले आभाळ
हे आभाळ कधी निरभ्र..
कधी अभ्राच्छादित..
कधी इंद्रधनुष्याने नटलेले..
कधी कधी स्वत:च्या भाळावर स्वत:च लिहिणारे
आभाळाला आभाळाचे शापही असतात नि उ:शापही असतात..
या माझ्या घराच्या बेचाळीस पायऱ्या ओलांडल्या
की मी छोटय़ा अंगणात येतो. उभा राहतो.
मला माहीत आहे की हे अंगण मोठे नाही.
पण माझ्या अंगणातल्या आभाळाने
जे काय मला दिले ते जन्मोजन्मी पुरेल एवढे आहे.
माझ्या फाटक्या घरातले आभाळच मला आतापर्यंत
सोबत करीत आले आहे.
यातून मी माझ्या या छोटय़ाशा अंगणात जेव्हा येतो
तेव्हा मला ही सगळी आभाळगाथा आठवते.
ती आपल्याला सांगावीशी वाटते.
आभाळाने मला दिले;
यापेक्षाही आभाळाने माझ्यातला मीपणा
तूपणात विसर्जित करायला सांगितला.
आभाळाने सोशिकतेने कसे चालावे हे सांगितले.
आभाळाने जीवनाविषयी अजिबात तक्रारीस वाव दिला नाही.
सतत काहीतरी धडपडत राहण्यासाठीच
हा खडतर प्रवास आभाळाने आखला.
मात्र आभाळाएवढा मित्र आभाळच राहिला.
आता आभाळ बदलले. ते बऱ्यापैकीच्या घरात आले.
आभाळाला पान्हा सुटला.
ते दोन्ही हातांनी भरभरून देऊ लागले.
थोडीशी दु:खे त्याने आपल्याबरोबर नेली.
अंगण मात्र कायम राखले.
अंतरांची अंतराळे नाहीशी केली.
माणुसकीचा शब्द आभाळातल्या अंगणात गिरविला.
देवाचा शब्द आभाळाएवढा मानला.
म्हणून अपमानाची तप्त वाळवंटे सहजपणे तुडविली.
हे माझे, मला, माझ्यापुरते चुकीचे व बरोबर उमजलेले
अंगणातले आभाळ.  

(डॉ. यशवंत त्र्यंबक (गौतमबुवा) पाठक यांच्या ‘अंगणातले आभाळ’ या ग्रंथाली प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातून साभार)
प्रेषक - विश्वासराव सकपाळ
,वास्तुरंग 

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...