‘अधलिखा दोस्ताबेज’

- मेघना ढोके,मंथन,लोकमत


Indira Goswami
इंदिरा गोस्वामी गेल्या.
तसं पाहता गेल्या सहा महिन्यांपासून त्या स्वत:तच गुंतल्या होत्या. आतल्या आत स्वत:शीच काहीतरी बोलत असाव्यात किंवा विचारत असाव्यात स्वत:लाच काही प्रश्न. माणसांच्या ‘अतार्किक’ वर्तनाविषयीचे आणि जगण्याविषयीचेही!.
त्यांचे हे शेवटचे सहा महिने ‘कोमात’च गेले. कायम जगण्याला भिडलेली, जगण्याची उलथापालथ वार झेलल्यासारखी हिमतीने झेलणारी ही बाई ‘शांतपणे’ निघून गेली. कुणाचा निरोप घेण्याची तसदीही घेऊ नये इतकी शांत इंदिरा उर्फ मामोनी रायसम गोस्वामी कधीच नव्हती.
ज्या अतार्किक मानवी जगण्याचा इंदिराबाई आयुष्यभर शोध घेत राहिल्या, मानवी वर्तन चांगलं-वाईट नसतं, ते परिस्थितीनुरूप बदलतं किंवा प्रतिक्रियात्मकच असतं, असं नेहमी सांगत आल्या. तसंच होतं त्यांचं आयुष्यभर वागणं आणि आता हे असं जगातून कायमचं निघून जाणंही!
-अतार्किक आणि गूढ!
इंदिरा गोस्वामी ही बाईच आयुष्यभर एक ‘गूढ’ बनून राहिली. तशीच जगली. म्हटलं तर इंदिराबाईंच्या भोवती कायम त्यांनी स्वत: उभारलेल्या दगडी भिंती होत्या. इतक्या बुलंद की त्याला ना झरोका ना खिडकी. बाहेरच्या कुणाला कधी कळूही नये की, बाईंच्या आत काय चाललंय! काय विचार चाललाय बाईंच्या डोक्यात हे कितीही प्रयत्न केला, कितीही डोकावून पाहिलं आत तरी काही कळू नये, असंच वागायच्या बाई! त्या तसं ‘ठरवून’ वागायच्या की त्या ‘तशाच’ होत्या हे तरी आजवर कुणाला कळलंय! बाईंच्या मोठय़ा काजळभरल्या डोळ्यांत एक विक्षिप्तपणाची झाक होती; पण तो विक्षिप्तपणा बाईंचा स्वत:चा की समोरच्या माणसांतला विक्षिप्तपणा, अतार्किकपणा शोधता शोधता ती नजर तशी झाली होती..?
- कुणास ठाऊक!
पण या सार्‍यांत एकच गोष्ट खरी की, इंदिराबाई अखंड प्रेमात होत्या स्वत:च्या! इतक्या प्रेमात की त्या प्रेमापोटीच त्या अखंड छळत असाव्यात धारदार प्रश्नांनी सोलून काढत स्वत:ला आणि त्या प्रश्नांची उकल होत गेली की, पुन:पुन्हा पडत असाव्यात प्रेमात स्वत:च्याच!
गुवाहाटीतल्या गांधी बस्तीत ‘गोस्वामी अँण्ड प्लेस’ नावाची छोटीशी बंगली आहे. (बंगलीच, बंगला नाही!) त्या ‘बंगली’च्या आवारात पाऊल ठेवल्या क्षणापासून एकच गोष्ट सतत जाणवायची, इंदिरा गोस्वामी नावाच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव! सर्वत्र त्यांचेच फोटो, काही मोठमोठे, तर काही पुरस्कार स्वीकारतानाचे! नजर जाईल तिथे एकच चेहरा!
ते पाहून प्रश्न पडतोच की, सतत माणसांशी बोलणारी, त्यांच्या जगण्यातले बारीकसारीक तपशील जाणून घ्यायला उत्सुक असणारी ही बाई स्वत:च्या घरात फक्त स्वत:नेच वेढलेली कशी? वयाची साठी उलटून गेली तरी बाईंना जगण्यात प्रचंड रस होता, सोळा वर्षाची मुलगी ज्या उत्साहाने जगते, तोच उत्साह बाईंच्या चेहर्‍यावर दिसायचा, जेव्हा त्या कुणाशी बोलायच्या! दोन-दोन/ तीन- तीन शब्दांचे लहानसे प्रश्न त्यांच्या अत्यंत हळू आवाजात, सावकाश विचारायच्या; पण तो संवाद संपला, माणसं पांगली की बाई पुन्हा तशाच ‘स्वत:’च स्वत:ला वेढलेल्या!
एक मात्र होतं, त्यांच्या दुमजली बंगलीच्या तळमजल्यावरच्या ‘रामायण रिसर्च सेंटर’मध्ये सर्वांना मुक्त प्रवेश असायचा. दोन खोल्यांचे ते रिसर्च सेंटर पुस्तकांनी भरलेलं. पण त्याला कधी टाळे लागत नसे. कायम दार उघडंच!
इंदिराबाईंशी रामायाणाविषयी चर्चा सुरू होती. ‘रामायण म्हणजे काय?’ असा छोटासा प्रश्न मला विचारून त्याच म्हणाल्या, ‘रामायण म्हणजे फक्त पुस्तक नव्हे. भारतातल्या किती बोलीभाषांत रामायण आहे. ते केवळ पुस्तक किंवा धर्मग्रंथ नव्हे! माणसं आपलं जगणं त्यात शोधतात. परिस्थितीशरण जगणार्‍या अनेक माणसांना रामायण दिलासा वाटतो. कारण त्यातली ‘सीता’! परिस्थितीवर तिच्याकडे काही उपाय नव्हता; पण तरी ‘सीते’नं कधी आपलं ‘स्वत्व’ सोडलं नाही. ‘ती’ कायम धीरानं जगली आणि जिथे विरोध करणं आवश्यक होतं तिथं रावणासारख्या बलाढय़ शक्तीपुढंही ठाम उभी राहिली. ती ‘संयत’ होती तितकीच कठोरही! बाईपणाचं दु:ख वाट्याला आलं तिच्या; पण बाईपणाची ‘ताकद’ही तिला माहिती होती! ‘संयत’ जगण्यातही ताकद असते, हेच रामायण सांगतं!’’
बाईपणाची हीच ताकद घेऊन इंदिरा गोस्वामी जन्मभर लिहीत राहिल्या; पण म्हणून त्यांचं लेखन फक्त ‘बायकांसाठी’चं नाही, केवळ स्त्रीवादी तर नाहीच नाही, ते मानवतावादी आहे, खरं तर ‘मानवी’ आहे!
चिनाबोर स्त्रोत (चिनाबचा स्त्रोत), निलकंठी ब्रजा, मामोरे ढोरा तलवार (गंज चढलेली तलवार), संस्कार, यातलं कुठलंही पुस्तक वाचा! वृदांवनातल्या विधवांच्या कहाण्या वाचा, त्यात कुठंही ओढूनताणून घेतलेली सामाजिक प्रश्न मांडण्याची ‘पोझ’ नाही. त्या फक्त ‘जगणं’ मांडत राहिल्या, जसं आहे तसं, तेही अत्यंत सोप्या शब्दांत आणि प्रवाही भाषेत! असमिया भाषाच नाही, तर आसाममधल्या अनेक बोलीभाषा, त्यातले शब्द इंदिराबाईंच्या लेखनात येतात! आणि येताना फक्त आसामीया जगणं नाही, तर सगळ्या मानवी जगण्याची सुख-दु:ख त्यात येतात. जगण्याचे उभे-आडवे ताणे-बाणे सगळे पडदे दूर सारत, लाज-संकोच आणि दुटप्पीपणाचे काच सैल करत ते येतात!
काळं-पांढरं, चांगलं-वाईट असं काही लेबल लावून त्यांच्या लेखनात पात्रं येत नाहीत. ती पात्रं सदैव ‘माणसांसारखी’ वागतात. प्रसंगी चांगली आणि प्रसंगी वाईटही! माणसांकडे ‘माणसांच्याच’ नजरेतून पहावं, असं बाई म्हणायच्या!
त्यांचं स्वत:बद्दलही काही वेगळं मत नसावं. त्यांचं आत्मचरित्रच असलेलं, स्वत:च्या आयुष्याकडेच तटस्थपणे पाहणारं ‘अधलिखा दोस्ताबेज’ (अर्धा दस्तावेज) हे पुस्तक. आपण फार ‘ग्रेट’ आहोत, आपण जगलो तेच बरोबर अशी ‘आत्मस्तुती’पर ‘पोझ’ बाई या पुस्तकातही घेत नाहीत. वाट्याला आलं तसं आणि त्याला प्रतिक्रिया देतच मी जगले, असं वाचकाला वाटावं असंच ते लेखन!
म्हणून तर इंदिराबाईंना कुणी कॅलक्युलेटिव्ह म्हणो किंवा आणखी काही!
बाईंनी लपवली नाही स्वत:ची महत्त्वाकांक्षा!
लोक म्हणतात, ‘तुम्ही ‘भारतरत्न’साठी करताहात उल्फाबरोबर मध्यस्थी?’ - मी विचारलं होतं त्यांना!
बाई हसत म्हणाल्या, ‘मिला तो क्या बुरा है?’
- ते अर्थात मिळालं नाहीच. उल्फाबरोबरची चर्चाही पुढे सरकली नाही. तो ‘दस्ताबेज’ही अधलिखाच राहिला!
काळजात अपार वेदना, लग्नानंतर १८ महिन्यांतच आलेलं वैधव्याचं दु:ख, एकटेपणाची अव्यक्त सल असं सारं मनाच्या आत दडपून आणि ज्ञानपीठ, साहित्य अकादमीसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार बाजूला ठेवून दु:ख मांडत राहिल्या, लिहीत राहिल्या. दिल्ली विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना शिकवतच राहिल्या!
त्यांच्या विद्यार्थ्यांची ‘बायदेव’ (म्हणजे मोठी बहीण) स्वत:शी संवाद साधत कायमची निघून गेली; पण त्या ‘बायदेव’ची ती विक्षिप्त, काळजापर्यंत जाणारी खोल धारदार नजर कोण विसरू शकेल?
meghanadhoke@lokmat.com

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...