अपशकुनीचा कान्हा

मूल नसणं हे आजही एखाद्या स्त्रीसाठी दु:स्वप्न असू शकतं, ही मानवी नात्याची शोकांतिका म्हणावी का? या जीवघेण्या अनुभवातून प्रत्यक्ष गेलेल्या स्त्रीची ही व्यथा..
सकाळी सुनू स्वयंपाकघरात डबा बनवत होती. सासूबाई-सासऱ्यांचं बाहेरच्या खोलीत बोलणं चालू होतं. नणंदबाईचं डोहाळ जेवण महिन्यावर आलेलं, पण बेत आतापासूनच चालू झालेले. मोठय़ा कौतुकाची नणंदबाई. लग्नानंतर आठ वर्षांनी दिवस राहिलेले. किती डॉक्टर, किती उपाय, किती नवससायास, गंडेदोरे आणि काय काय. नणंद किती तरी वेळा सुनूच्या गळ्यात पडून रडलेली, मूल नाही म्हणून सासूची बोलणी ऐकवत. ‘‘चला, एकदा नीट बाळंतपण झालं म्हणजे बरं,’’ सुनूने भाजी परतताना एक उसासा सोडला. तिची स्वत:ची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. लग्नाच्या दीड वर्षांत दोनदा दिवस गेलेले, अर्धवट अवस्थेत गळलेले. त्यांचं दु:खं अजून उरात सलत असलेलं, झाकून ठेवलेलं.  तिचा बाहेर उल्लेख झाला म्हणून ती एकदम दचकली.
‘सुनूचं काय करायचं?’ सासरे विचारीत होते. तिला नवल वाटलं कामं कोण करणार? ‘तिला अपशकुनीला नको त्या कार्यक्रमाला पोरखाई मेली, माझ्या पोरीला तिची नजर नको लागायला.’ सासूबाई म्हणाल्या, सुनू जागच्या जागी दगड झाली. बधीर अवस्थेतच स्टेशनला गेली. अचानक खूप आरडाओरडा ऐकू आला. कुणीतरी तिला खचकन मागे ओढलं. भानावर येऊन तिने पाहिलं तर ती रूळ ओलांडायला जात होती आणि त्याच फलाटावरून गाडी सुटत होती. पियूने- तिच्या मैत्रिणीने तिला मागे ओढलं होतं. सुनू खिन्न हसली. डोळे न कळत गळतच होते. ‘अगं, पियू, आजकाल हे रूळ, लोकल पाहिली ना की खूप आत्मीयता वाटते बघ. असं वाटतं की, ते मला बोलावताहेत.’
‘‘अगं सुनू, वेडी की काय तू. संप्रेरकांच्या तीव्र उतारचढावामुळे आलेलं मिसकॅरेजनंतरचं नैराश्य आहे ते. आयुष्य काय इतकं स्वस्त आहे का?’
‘मला अपशकुनी म्हणतात गं घरात.’ सुनू हुंदक्यांवर हुंदके देऊ लागली. पियूचेही डोळे झरू लागलेले.
पियूही समदु:खीच. सुनूला डॉक्टरकडे भेटलेली. ‘तुला निदान दिवस तरी राहतात गं. मला तेच राहत नाहीयेत. माझी सासू तर वांझोटीच म्हणते मला. पाहुण्यांसमोर मी गेले की म्हणते, आली अवदसा. कुठलं दु:ख सुसह्य़? दिवसच न राहणं की, राहून हाती काही न लागणं?’
‘‘काय गं ही माणसं? खात्यापित्या घरातली, सुसंस्कृत माणसं ना गं ही. शिकल्या-सवरलेल्या मुली पारखून पारखून केल्या यांनी. आता असं कसं बोलू शकतात?’’ सुनूचा अगदी भडका उडालेला.
पियू-सुनूने जोडीजोडीने किती डॉक्टर बदललेले. कुठल्याही नवीन डॉक्टरकडे गेलं की, तो सगळ्या टेस्ट परत करायला सांगे. डॉक्टरांशी वाद घालून कसं चालेल? रक्तातील साखरेची पातळी ते हॉर्मोन्सचे प्रमाण ते सुनूच्या न जन्मलेल्या बाळाचेही जेनेटिक मॅपिंग. काही काही राहिलं नाही. सर्व डॉक्टर म्हणणार, काही मेजर प्रॉब्लेम दिसत नाही. थोडय़ाशा ट्रिटमेंटने होईल ठिक. काळजी करू नका. थिंक पॉझिटिव्ह. आनंदी राहा. थोडीशी ट्रिटमेंट म्हणजे अजून भारी हॉर्मोन्स, महागडी इंजेकशन्स, दर दोन दिवसांनी केल्या जाणाऱ्या ब्लड टेस्ट, सोनोग्राफी. पाण्यासारखा पैसा वाहत होता. नवरा बिचारा जमेल तेव्हा डॉक्टरकडे यायचा. घरच्या आघाडीवर लढायचा, पण कधी कधी त्याचं फ्रस्टेशन सुनूवर निघायचं. उदासवाल्या चेहऱ्याने सुनू घरादारात वावरत राही. आईला म्हणे, ‘अगं, नातवंडं खेळवायची फार हौस आहे त्या दोघांना. पूर्ण होत नाही म्हणून चिडचिडली आहेत ती दोघे. एक पोर झालं म्हणजे होईल सर्व व्यवस्थित. तू नको जीवाला लावून घेऊ.’
नणंदेचे डोहाळे जेवण सुनूशिवाय झालं. आता सुनूच्या पोटातही कळी उमलत होती. नवरा म्हणाला, ‘फार फुलून जाऊ नकोस. आधीच्या दोन वेळीही सर्व रिपोर्टस् नॉर्मल होते. सासू म्हणाली, ‘आता तरी आनंदी राहा. सर्व नीट पार पडलं म्हणजे मिळवलं.’ नणंदेच्या कपाळावर आठी चढली, ‘आता ही पण खाटल्यात. म्हणजे माझ्या बाळंतपणाचं सर्व काम आईवर पडणार. जरा हिने विचार करायला नको?’ नणंदबाईंची इच्छा फळाला आली. तिच्या बाळंतपणाच्या आठच दिवस आधी सुनूची कळी अकाली कोमेजली. डॉक्टरीणबाईही कोडय़ात पडल्या. काही उपाय कमी ठेवले नाहीत. रिपोर्टसही व्यवस्थित होते. अचानक दोन-तीन दिवसांत हे असं कसं व्हावं? डॉक्टरीणबाईं म्हणाल्या,  ‘तू काळजी करू नकोस. कधी कधी असं का होतं याचं शास्त्रालाही उत्तर देता येत नाही. तू नाऊमेद होऊ नकोस. प्रयत्न करीत राहा. अगं, माझ्या एका पेशंटला अकरा मिसकॅरेजनंतर बाळ झालं.’’
 ‘‘मी हाडामासाचं माणूस आहे हो. मलाही मन आहे. फक्त मुलं तयार करणारं मशीन नाही मी. प्रत्येक वेळी त्या बाळाबरोबर मीही मरते हो. माझ्या मनाचा कुणीतरी विचार करा हो.’’ सुनू मूकपणे आक्रंदत होती.
नवरा गप्प गप्प राहू लागला. दोघांतला संवादच संपुष्टात आला. सासूही लेकीच्या बाळंतपणाच्या भीतीने धास्तावली. थोडय़ा दिवसांनी नणंद बाळंत झाली. छोटं बाळ घरी आलं. त्याच्या हास्याने घरातले सगळे आनंदले. आपला शोक मनात ठेवून सुनूही त्याच्या बाळलिलांत गुंतून गेली. शरीर साथ  देत नव्हतं. सगळ्या औषधांनी आणि आघातांनी खिळखिळं करून टाकलेलं. १०० तक्रारी सुरू झालेल्या, पण लक्ष कोण देणार? हिची नेहमीचीच नाटकं, असं म्हणून सोडून देणार. थरथरत्या पायांनी आणि कापऱ्या हातांनी सुनू परत कामाला भिडली.
अशीच दोन वर्षे गेली. कूस अजून एकदा रिकामी झाली. शरीर औषधांनाही दाद देईना.  पूर्वी विनासायास होणारी गर्भधारणाही होईना. दर महिन्याला होणाऱ्या आशा-निराशेच्या हिंदोळ्यांनी तिचे मन पुरते कातर होऊन गेले. पियूच्या दु:खाची आर्तता तिला समजू लागली. अजून स्ट्राँग, अजून स्ट्राँग औषधे देऊन डॉक्टरांनी प्रयोग चालवलेले. या सगळ्यांतून गेलेली आणि आता अनेक गंभीर आजारांचा सामना करणारी ज्येष्ठ मैत्रीण कळवळून म्हणाली, ‘‘नको गं सुनू, शरीरावर असे प्रयोग करू. एक पोर होईलही, पण शरीराचं पोतेरं होईल. माझ्यासारखं एक मूल दत्तक घे. तुझी मातृत्वाची आस पूर्ण कर. आपल्या कुशीत झोपतं ते आपलं मूल. आपण जन्म देणं नाही तर संगोपन करणं महत्त्वाचं आहे.’’
पण तिचा हा सल्ला कोण ऐकणार?
‘‘दत्तक मूल म्हणे. कुठलं कोणाचं ते. आपल्या घरी वाढवायचं?’’ सासूबाई फणकारल्या. सुनूला परत जोमाने नवस, उपवास, गंडेदोरे, ज्योतिषी करायला लावलं. नवरा दुखावलेला. ‘‘माझ्या सर्व मित्रांना मुलं झाली. हिच्यामुळे मला मूल नाही,’’ असा त्रागा सुनूवर काढू लागला. रडणारं हृदय कुणाला दिसू नये म्हणून चेहऱ्यावर हसू चिकटवून ती वावरत होती.
परत एकदा कुठल्याशा डॉक्टरांच्या उपचारांना यश आलं. घरदार आनंदलं. सहा महिने झाले. तिनेही नि:श्वास सोडला. सगळं व्यवस्थित चाललेलं. डॉक्टरही खूप काळजी घेत होते. लाखमोलाचं बाळ होतं ते. थोडंसं अस्वस्थ वाटतं म्हणून सुनू डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी अ‍ॅडमिटच करून घेतलं. नवरा तिला सोडून ऑफिसला गेला. सोनोग्राफीने धोक्याचा इशारा दिला. संध्याकाळपर्यंत सुनूची कूस दु:खी अन् मोकळी झाली. दोन दिवसांनी सुनू परत घरी निघाली.
 ‘‘एकटीच चाललीस?’’ पाणावलेल्या डोळ्यांनी डॉक्टरांनी अपराधीपणाने विचारले. अपयशाला कुणी वाली नसतो. सुनू विषण्ण हसली. पियू पाठी उभी होती. बाकी कुणालाच काही कळवलं नव्हतं.
घराचं दार थोडं उघडं होतं. तापलेले आवाज बाहेर येत होते. बरेचजण आलेले दिसतात.
‘‘मग तू काय ठरवलंय?’’ सासूबाईंचा करडा आवाज.
 ‘‘काय ठरवणार आणि काय करणार? आपल्या काही हातात नाही.’’ नवऱ्याचा हताश स्वर.
‘‘अरे, तिलाच नको असणार म्हणून मुद्दामहून ती करतेय असं.’’ मावससासूबाईंनी तारे तोडले.
‘‘मीही आठ वर्षे किती सर्व उपचारांचा त्रास काढला, पण मनात तीव्र इच्छा होती ना म्हणून बाळ झालं. हिला मनापासून प्रयत्नच करायला नकोत.’’ तरी म्हटलं अजून नणंदबाई कशा बोलल्या नाहीत.
सुनू-पियूची चाहूल सगळ्यांना लागली. आत आल्या दोघीजणी. ‘‘काय ठरवलंयस तू आता? विचार कर म्हणजे पुढचं ठरवायला बरं पडेल?’’ नवरा तिची नजर चुकवत म्हणाला. फाशीची शिक्षा ऐकणाऱ्या कैद्यासारखी ती खुर्चीवर ठार बसून राहिली. ‘‘हिच्या आई-वडिलांनी फसवलं बघ आपल्याला. त्यांना आधीच माहीत होतं हिला मुलं होणार नाहीत म्हणून. कसे गुपचूप बसून आहेत.’’ सासूबाई तावातावाने म्हणाल्या.
‘‘अगं, आपल्या गावाकडे त्या अमकीअमकीला परत पाठवलं ना तिच्या सासरच्यांनी. असंच आई-बापाने फसवून गळ्यात मारलेली.’’ चुलतसासूबाई त्यांची सून वेगळी झाली तो राग तिच्या संसारात माती कालवून काढत होत्या.
‘‘आई-बाबांना कित्ती हौस नातवंडांची, पण हिलाच नको. मग गावभर भटकायला कसं मिळेल?’’ नणंदबाई म्हणाल्या. माणूस आपले दु:खाचे दिवस किती चटकन विसरतो. सासूची बोलणी ऐकून सुनूच्या गळ्यात पडून रडायची ही. पण आत्ता?
‘‘सगळ्यांनी मिळून काय तो निर्णय घ्या. सह्य़ाबिह्य़ा करून घ्या.’’ मूल नाही म्हणून बायकोला छळणाऱ्या सासऱ्यांना सुनेला बोलायला काहीच वाईट वाटण्याची गरज नव्हती.
सह्य़ाबिह्य़ा म्हटल्यावर सुनूच्या बधिर झालेल्या डोक्यात परत संवेदना आली. यांचं आधीच सर्व ठरवून झालंय. मला सांगण्यासाठी फक्त ही न्यायसभा. बाईला- त्यातही मूल नसलेल्या बाईला मन नसतं. ती फक्त वंश चालवायला आणि अमुकअमुक दुसरी काम करायला आणलेलं मशीन असते. मशीन काम बरोबर करत नाही. मग ते परतच पाठवायला हवे. सुशिक्षित-अशिक्षित सर्व सारखाच विचार करणार. छोटासा सुखी संसार मांडण्याचं स्वप्न होतं. वाटलेलं, आयुष्यात मुलं, संसार सर्वचजण करतात. आपण त्यापेक्षा काही तरी वेगळं करू. क्षितिजापलीकडचा अज्ञात प्रदेश तिला साद घालत होता. तर हे वेगळं नशिबात होतं. सर्व हलाहल शंकरासारखं पचवलं तिने. त्या अतीव दु:खाच्या विषाने तिची म्लान मुद्रा उजळून निघाली. शांतपणाने, स्थिरचित्ताने ती म्हणाली, ‘‘हो, काय सह्य़ाबिह्य़ा हव्यात त्या घेऊन टाका. सीता रामाबरोबर वनवासात गेली. रामाने तिचा दुसऱ्यांचं ऐकून त्याग केला. राम नाही तिच्याबरोबर वनवासात गेला. याचं दुसरं लग्न लावून द्याल तेव्हा फसू नका. नीट पारखून घ्या. नाही तर असं करा ना, एक पोर सहीसलामत झाल्यावरच मग लग्न करा. मी जाते. एका असाहाय्य देवकीने सोडलेला कान्हा, राधिका माझी वाट पाहताहेत. मला शोधायचं त्यांना.’’
पियूचा हात घट्ट पकडून ती चालू लागली. तिचं आयुष्य फार महत्त्वाचं होतं. पाठून दुडूदुडू धावणाऱ्या पावलांचा आवाज येत होता. धापा टाकत येऊन त्याने तिचा दुसरा हात पकडला..
* * *
वंध्यत्वावर उपचार करणारे माननीय डॉक्टर,
माझ्यासारख्या मुलं नसणाऱ्या अनेक स्त्रिया तुमच्याकडे येत असतील. त्यांना घरीदारी, समाजात अपशकुनी समजतात, हे तुम्हाला माहीत असेल-नसेल. त्यांना हा लेख जरूर वाचायला द्या. आपल्यासारख्याच असंख्यजणी अजून आहेत हे कळल्यावर त्यांच्या अंतरीचा सल थोडा उणावेल. काहीही कारण नसताना, कितीही उपचार केले तरी १०-१५ टक्के जोडप्यांना मुलं होत नाहीत, हे तुम्हाला माहीत आहे. अशांना मूल दत्तक घ्यायचा पर्याय सुचवा. त्यांना खोटी आशा दाखवू नका. आमच्या उमेदीच्या काळात एका बाळाला मोठं करायचं सुख आम्हाला उपभोगायचं आहे. सुदैवाने दुसरं स्वत:चं बाळ झालं तर दोन बाळांना आम्ही आनंदाने वाढवू. कधी कधी बाळं पाठविताना देव पत्ता चुकतो. अशा चुकामूक झालेल्या मायलेकरांची- कृष्ण-यशोदेची गाठभेट घालून द्या. त्यांना बहरू द्या. तीन अश्राप, तळमळणाऱ्या जीवांचा दुवा मिळेल तुम्हाला.
जरूर विचार करावा.
आपली स्नेहांकित
(कान्हा-राधिकेची यशोदामाऊली)
(गुप्ततेच्या कारणास्तव लेखातील व्यक्तींची नावे बदलली   आहेत.)
संदर्भ:चतुरंग (लोकसत्ता)

1 comment:

सौ गीतांजली शेलार said...

मन विषण्ण झालं ! माझ्या नंदेने या यातना भोगल्या आहेत ! शेवटी १० वर्षांनी त्याचं स्वप्न पूर्ण झालं !
माझ्या मावशीला असंच होत असे पण अनेकांनी सुचउनही आजीने (मावशीची सासू)त्या लोकांना ठणकावून सांगितलं ,यांच्या नशिबी असेल तर हिलाच होईल नसेल तर दुसऱ्या दहा केल्या तरी होणार नाही . असे अनेक लोक असतात त्यामुळे निराश न होता परीस्थिती सामंजस्याने हाताळणे गरजेचे !

Related Posts Plugin for WordPress, Blogger...