नेहरू-गांधी घराण्याखेरीज देशाला वाली नाही?

विनय हर्डीकर ,लोकरंग,लोकसत्ता

 २०१४ च्या संसद निवडणुकीत राहुल गांधी हे कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार आहेत, हे मनमोहन सिंगही चांगलेच जाणून आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत राहुल गांधींना कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष वा अध्यक्ष बनवून सत्तांतराचा मार्ग प्रशस्त केला जाईल. आपल्याकडे गांधी-नेहरू घराण्याशिवाय देशाला नेतृत्व देऊ शकेल अशी एकही व्यक्ती या सव्वाशे कोटींच्या देशात निपजू नये? आपल्या मानसिक गुलामगिरीचेच हे द्योतक आहे. अर्थात कम्युनिस्ट पक्षाचा अपवाद वगळता विरोधी पक्षांसह सर्वच पक्षांमध्ये हीच घराणेशाही सुरू असल्याने कोण कुणाला याबद्दल जाब पुसणार?
जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले खरे, पण त्यांच्या मंत्रिमंडळात इंदिरा गांधी नभोवाणी मंत्री झाल्या. शास्त्रींच्या आकस्मिक निधनानंतर मोरारजींचा पराभव करून इंदिरा गांधी सलग अकरा वर्षे पंतप्रधानपदी होत्या. जनता पक्षाची अडीच वर्षे सोडली तर त्यानंतर पाच वर्षे पुन्हा इंदिराबाईच! त्यांच्या हत्येनंतर (संजय गांधी आधीच अपघातात गेला होता म्हणून) राजीव गांधी हे अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान बनले. मधली व्ही. पी. सिंग आणि चंद्रशेखर यांची नगण्य कारकीर्द वगळता राजीव गांधींचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्यानंतर सोनिया गांधी काँग्रेसची सूत्रे घ्यायला तयार नव्हत्या म्हणून आणि राहुल -प्रियंका वयाने लहान होते म्हणून नरसिंह राव (काँग्रेसचे असून काँग्रेसवाल्यांना नकोसे असलेले!) पंतप्रधान झाले. पुन्हा देवेगौडा, गुजराल, वाजपेयी यांची एकूण सात-आठ वर्षे वगळता सोनिया गांधींच्या कृपेने (पुन्हा एकदा काँग्रेसवाल्यांना नकोसे असलेले) मनमोहन सिंग आणि आता सोनियांना दुर्धर आजार झाला आहे म्हणून राहुल गांधी प्रथम काँग्रेस अध्यक्ष आणि २०१४ सालच्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा बहुमत मिळाले तर पंतप्रधान बनतील; आणि त्यांची थुंकी झेलणारा काँग्रेस अध्यक्ष होईल!
हे काय चालले आहे? शंभर कोटींच्या वर देशाची लोकसंख्या असताना गेली ७० वर्षे (नेहरू लाहोर काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर) देशाचे नेतृत्व अधलीमधली १०-१५ वर्षे वगळता एकाच कुटुंबाकडे कसे काय राहते? भारतमातेची कूस इतकी वांझ झाली आहे का, की दुसऱ्या कोणाकडेच देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता नाही? वस्तुनिष्ठपणे पाहिले तर नरसिंह राव, वाजपेयी, मनमोहन सिंग (निदान पहिली पाच वर्षे) यांची कामगिरी नगण्य नक्कीच नव्हती. पण हे तिघेही संपूर्ण देशातल्या जनतेला नेहरू, इंदिरा, राजीव यांच्याइतके आवडले नव्हते, हे स्पष्टच आहे. ते कशामुळे? भारतीय लोकशाही हा जगाने स्तिमित व्हावा असा राजकीय चमत्कार नक्कीच आहे; पण त्याचबरोबर लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाच कुटुंबाची मध्ययुगात शोभली असती अशी घराणेशाही हे आपल्या संसदीय लोकशाहीचे ढळढळीत अपयश नाही तर दुसरे काय आहे? आणि कोटय़वधी लोक ज्या पक्षाला मतदान करतात आणि लक्षावधी कार्यकर्ते ज्या पक्षात काम करतात, त्या काँग्रेसमध्ये हा प्रश्न कोणालाच पडत नसेल?
या प्रश्नांपैकी शेवटच्या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असे आहे. काँग्रेसवाल्यांना हा प्रश्न पडत नाही. आणि घराणेशाहीच्या काँग्रेस पॅटर्नप्रमाणे स्वत:च्या कुटुंबीयांना राजकारणात उभे करू पाहणाऱ्या इतर पक्षांतल्या नेत्यांनाही पडत नाही. म्हणून तर कोणतेही नेतृत्वगुण नसताना उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष होतात, तर त्यांचा संतप्त चुलत भाऊ राज वेगळा पक्ष काढतो. भाजपमध्येही तेच आहे आणि शेकापमध्येही तेच! इतर प्रादेशिक पक्षांचीही अवस्था यापेक्षा फारशी वेगळी नाही. अजूनपर्यंत फक्त कम्युनिस्ट पक्षाला तेवढी घराणेशाहीची बाधा फारशी झालेली दिसत नाही. (तरी डांगेकन्या रोझा देशपांडे एकदा खासदार झाल्या होत्याच.) परंतु पुढे काय होईल, हे सांगता येत नाही. कारण सोमनाथ चटर्जी प्रभृतींची पिढी जवळपास संपली आहे.
राजकीय विश्लेषण करणारी मंडळी सोडली तर सर्वसामान्य भारतीयांनी नेहरू घराण्याचे वर्चस्व मान्य केलेलेच आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींनी सातारा शहरात सभा घेतली. एखाद्या मंगल कार्याला यावे तसे लोक बहुसंख्येने पांढरेशुभ्र कपडे घालून त्या सभेला आले होते. कोणीही उदास, निराश, मळकट चेहऱ्याची व्यक्ती त्या गर्दीत नव्हती. उत्कंठा, अपेक्षा आणि आदर याच तीन भावना सगळय़ांच्या मनात होत्या. राजीव गांधींचे हेलिकॉप्टर दिसताच संपूर्ण जमाव उठून उभा राहिला. हेलिकॉप्टरमधून एक हात बाहेर येताच सर्वानी हात वर केले. व्यासपीठावर राजीव गांधी आणि त्यांची सिक्युरिटी सोडता सातारा व कराड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे फक्त दोन उमेदवार होते.
दहा-पंधरा मिनिटांचे भाषण संपवून हेलिकॉप्टर उडाले. पुन्हा सगळी सभा उठून उभी राहिली, तसेच हात वर झाले. सभेनंतर एका गटाला मी विचारले, ‘कसं काय वाटलं?’ उत्तर मिळाले ते असे- ‘राज्य करावं तर या घरातल्या लोकांनीच! आई मरून महिनासुद्धा झाला नाही, पण पोरगा घराबाहेर पडलाय. त्याच्या जिवाला धोका आहे, तरीही पडलाय. कारण आपल्या आज्यापासून चालत आलेलं, आपल्या आईनं केलेलं आपल्या घराण्याचं काम आपणपन करायचं, अशी त्याची जिद्द हाय.’ मी तिथूनच दिल्लीला अरुण शौरींना तार केली की, इंदिरा काँग्रेस दोन-तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत नक्की मिळवेल!
इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा नेहरूंची मुलगी ही एक ओळख सोडता त्यांच्यापाशी काहीही नव्हतं. समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा महत्त्वाचा निर्णय त्या काँग्रेस अध्यक्ष असताना झाला हे खरे; पण तो निर्णय नेहरूंच्या हयातीतच झाला होता. समजा- नेहरू आणि शास्त्री गेले, त्या वेळेला फिरोज गांधी हयात असते तरीही इंदिरा गांधीच पंतप्रधान झाल्या असत्या. सोनिया गांधींना पंतप्रधान होण्याची गळ घालण्यात आली होती, ती केवळ राहुल आणि प्रियंका पोरवयात होते म्हणूनच! राहुल गांधीचे अजून लग्न झालेले नाही. समजा- यापुढे ते झाले तरी तो पंतप्रधानपद सोडेल (समजा, ते त्याला मिळालेच तर!) तेव्हा त्याची मुले किरकोळ वयाचीच असणार. मग काँग्रेसवाले काय करतील? तेव्हा एक तर ते प्रियंकाला पुढे करतील, किंवा तोवर तिची मुले वयात आलेली असतील, किंवा भाजप सगळी लाजलज्जा गुंडाळून ठेवून वरुण गांधीला त्या पदावर बसवेल. नेहरू घराण्याचा भारतावर राज्य करण्याचा ‘डिव्हाइन राइट’ भारतीय जनतेला मान्य आहे. कारण आपल्यासारखे दिसणारे, वागणारे, खाणारे-पिणारे राज्यकर्ते भारतीयांनी गेल्या एक हजार वर्षांत पाहिलेले नाहीत. हिंदी धड न बोलता येणे हा एरव्ही दोष असतो; पण नेहरू घराण्यातल्या माणसांना तो माफ असतो. (अगदी मोतीलाल, जवाहरलालपासून) त्या घराण्याचे इंग्रजी वळण भारतीयांना पसंत असते! आपल्या अंगावर भिकार लक्तरे असली तरी जवाहरलाल नेहरूंचे कपडे पॅरिसच्या लाँड्रीत धुतले जायचे याचा भारतीयांना अभिमान वाटतो.
आपला नेता नुसती सक्षम असून उपयोगी नाही, तो ‘नेता दिसला पाहिजे’ हे काँग्रेसवाले ओळखून असतात. भाजप-समाजवाद्यांसारखे कार्यकर्त्यांच्या गळय़ात गळा घालून किंवा कम्युनिस्टांप्रमाणे शोषित जनतेपेक्षाही जास्त भणंग दिसून ते आपल्या लोकप्रियतेचे पुरावे देत नाहीत. काँग्रेसचा गावपातळीवरचा पुढारी बाहेर पडतो तेव्हा तो सर्वात पुढे, किंचित मागे अगदी जवळचे चमचे, त्यांच्यामागे सामान्य कार्यकर्ते व सर्वात मागे जनता हेच दृश्य असते. देशपातळीवर नेतृत्वाचे दर्शन घडवताना हीच उतरंड असते. त्यात नेता जवाहरलाल, राजीव, सोनिया, राहुल यांच्यासारख्या परदेशी चेहरेपट्टी आणि मॅनर्सचा असला तर ते काँग्रेसवाल्यांच्या पथ्यावरच पडते.
काँग्रेसजनांची तर ही संस्कृतीच आहे. परंतु सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करून वेगळी चूल मांडण्यापर्यंत मजल गाठणारे शरद पवारही ‘मुलगी की पुतण्या?’ या घोळात अडकले आहेतच. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत पुतण्याकडे चुलत्याची सर्व बरीवाईट गुणसंपदा जावी, हा एक विचित्र योगायोग! आंध्रात एन. टी. रामारावांचा जावई किंवा रेड्डींचा मुलगा वा पत्नी असेच समीकरण आहे. आणि हे आजचे नाही, तर पूर्वापार असेच चालत आलेले आहे.
‘जवाहर माझा राजकीय वारस आहे,’ असे गांधी म्हणाले होतेच. पण पंचविशीचे पोरसवदे जवाहर गांधींच्या इतक्या निकट पोहोचले तेव्हा ‘मोतीलाल नेहरूंचा होतकरू बॅरिस्टर मुलगा’ एवढीच त्यांची ओळख होती, हे दस्तुरखुद्द नेहरूंच्या आत्मचरित्रातच नमुद केलेले आहे. मोतीलाल नेहरूंची काँग्रेस नेमकी कोणाची होती? जमीनदार, इंग्रजांनी मोडीत काढलेले संस्थानिक, त्यांची कोर्टातली प्रकरणे हाताळणारे धनाढय़ वकील, नफेखोरी करणारे व्यापारी आणि काही मोजके सरकारधार्जिणे कारखानदार यांचाच तेव्हाच्या काँग्रेसवर पगडा होता. स्वत:चे पैसे घेऊन येणाऱ्यांच्या हातातच तिची सूत्रे होती.
अशा काँग्रेसकडे जनसमुदाय खेचून आणणारे टिळक आर्थिक बाबतीत कफल्लक होते. टिळकांचा वारसा घेऊन काँग्रेसला व्यापक चळवळीचे स्वरूप देणारे गांधीही तसेच कफल्लक होते. त्यामुळे त्यांची घराणेशाही निर्माण होणे शक्यच नव्हते. या देशातली श्रीमंत मंडळी तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेसवर पगडा ठेवून होती आणि आहेत. त्यांनाही नेहरू घराणेच जवळचे वाटते यात शंका नाही. अपवाद गेल्या १०-१५ वर्षांचा! या काळात नरसिंह राव, वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणाचा पाया घातला आणि उद्योजकांना नेहरू घराण्याचे अवास्तव महत्त्व वाटण्याचे प्रमाण घटले. तरीही गेल्या ४० वर्षांत सर्वाधिक आर्थिक उलाढाल करणारे अंबानी नेहरू घराण्याच्या कायम जवळचेच होते, हे सर्वाना माहीत आहे.
गंमत अशी की, एक संघ परिवार आणि भाजप वगळता (मुख्यत: देशाच्या फाळणीमुळे; घराणेशाहीचा तिटकारा असल्यामुळे नाही!) इतर राजकीय पक्षांनादेखील नेहरू घराण्याचेच अनावर आकर्षण आहे. नेहरू हे लोकशाही समाजवाद्यांचे (लोहियावाद्यांचा अपवाद!) आदर्श पुरुष होतेच. अगदी आचार्य अत्र्यांनीदेखील संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात नेहरूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून आगपाखड केली असली तरी नेहरू गेल्यानंतरच्या अग्रलेखांच्या मालिकेत त्यांचे नेहरूप्रेम ऊतू गेलेच होते. बाळासाहेब ठाकरे यांचा आणीबाणीला आणि इंदिरा गांधींना भक्कम पाठिंबाच होता. मूळ अविभाजित कम्युनिस्ट पक्षाची भूमिका ही नेहरू स्वीकाराचीच होती. एकीकडे ‘काँग्रेसने केलेली (की काँग्रेसच्या हातात अलगद पडलेली?) लोकशाही क्रांती ही भांडवलदारीच्या, सरंजामशाहीच्या पकडीतून मुक्त करून तिला जनक्रांतीचे स्वरूप देण्याची गरज आहे,’ असे बिनचूक विश्लेषण करूनही सर्व कम्युनिस्ट विचारवंत व विश्लेषक केवळ हिंदुत्ववादी पक्षांशी वैर घेतल्यामुळे त्यातल्या त्यात निदान पुरोगामी, समाजवादी भाषा बोलणाऱ्या नेहरूंकडे व नंतर इंदिरा गांधींकडे आशाळभूतपणे पाहत होते. डावे कम्युनिस्ट मात्र वेगळे आणि शहाणेही ठरले. कारण नेहरू घराण्याच्या बेगडी पुरोगामीपणाचे ओझे टाकून दिल्याखेरीज त्यांना पश्चिम बंगाल आणि केरळ या मुख्य राजकीय प्रवासापासून बहुतेक वेळा वेगळ्या पडलेल्या राज्यांमध्ये सत्ता हस्तगत करता आली नसती!
नेहमीच उपस्थित केल्या जाणाऱ्या पुढील प्रश्नाचे उत्तरही तेच आहे- ‘प्रत्येक राज्यातले बलदंड काँग्रेस पुढारी नेहरू घराण्याचे हे वर्चस्व झुगारून का देत नाहीत?’ यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय प्रवासाकडे नजर टाकली तरी याचा उलगडा होईल. १९६८-६९ ते १९७९ या काळात चव्हाणांनी हे वर्चस्व झुगारण्याचा आटोकाट प्रयत्न केला, हे मान्य! मात्र, तेही इंदिरा गांधींच्या यशस्वी पुनरागमनानंतर ‘देशाच्या जनतेने जर इंदिराजींना स्वीकारले आहे तर मला तो कौल मान्य केलाच पाहिजे,’ असे समर्थन करून स्वगृही परतले होते. तसाच भरघोस पाठिंबा राजीव गांधींना मिळाल्यानंतर १९८६ मध्ये शरद पवारही निमूटपणे ‘काँग्रेसवासी’ (अत्र्यांची शब्दयोजना!) झालेच. त्यानंतर पुन्हा एकदा वेगळी वाट धरून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावण्याचे महत्कार्य पार पाडले असले तरी सोनिया गांधींच्या खुर्चीला खुर्ची लावून दिल्लीत बसण्यात त्यांना धन्यताच वाटते!
नेहरू घराणे दिल्लीत आणि आम्ही आमच्या गल्लीत हे काँग्रेसमधल्या प्रादेशिक सुभेदारांचे यशस्वी सूत्र आहे. जनतेची भाषा न येणारा, प्रादेशिक राजकारणाची गुंतागुंत न कळणारा काँग्रेस नेता त्यांनाही हवा असतो. एकदा त्याची मर्जी सांभाळली म्हणजे आपल्या राज्यात/ मतदारसंघात (राजीव गांधींचे समव्यवसायी असल्यामुळे कलमाडी कुठून कुठे आणि आता कुठेतरीच किती वेगाने पोचले!) काय हवे ते करता येते. नेहरू-गांधी ही दिल्लीतली घराणेशाही उचलून धरली की आपल्या राज्यात, विभागात, मतदारसंघात, जिल्हय़ात, तालुक्यात, गावात नि:संकोचपणे आपल्या घराण्याचा  सर्वंकष (!) उत्कर्ष साधता येतो.
म्हणून तर भारत नेहरू- इंदिरा- राजीव- सोनिया यांचा असतो. महाराष्ट्र चव्हाण आणि पवारांचा; आणि पुणे विभाग वा जिल्हा अजितदादांचा. मात्र, त्यातल्या महिला सुप्रियाताईंच्या! ग्वाल्हेर शिंदे घराण्याचे असते. तर रेणापूर-बीड मुंडे घराण्याचे. मुंबई शिवसेनेची, पण नाशिक राज ठाकरेंचे! ही यादी वाढविण्यात अर्थ नाही.
त्यामुळे हे काय चालले आहे, हा प्रश्नच निरर्थक  कांगावा वाटू शकतो. उद्या राहुल आणि प्रियंका या दोघांनाही सत्तेची हाव सुटली तर ‘देशाचे विभाजन करा’ अशी मागणी करण्याइतकी निर्लज्ज सत्तालालसा काँग्रेसजनांनी दाखवली नाही तर देशाचे सुदैव म्हणावे लागेल!

1 comment:

सौ गीतांजली शेलार said...

प्रत्येक तरुणाने विचार तर करावाच पण हीच वेळ आहे त्याने पेटून उठण्याची आणि हि घराणेशाही बदलण्याची ! वीट आला आहे या राजकीय कोंडीचा ! आता बदल फक्त सुजान तरुण करू शकतो ! आता उठवू सारे रान!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...