- चंद्रशेखर कुलकर्णी, लोकमत
नागरी संस्कृतीशी संबंध नसलेल्या जारवांना आता माणसांनी दारूची दीक्षा दिली आहे.वडे-समोसे-गुटख्याची सवय लावली आहे.कपडे घालणार्या माणसांचीही ‘स्वार्थीसंगत’ आता जारवांच्या जिवावर उठलीआहे.निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या आदिमानवांचे उरलेसुरले समूह आणि तथाकथित संस्कृतिरक्षक यांच्यातील एक बखेडा नव्याने जगासमोर आला आहे. ‘द ऑब्झर्व्हर’ तसंच ‘द गार्डियन’ या ब्रिटिश माध्यमांच्या संकेतस्थळांवर अलीकडेच जारवांच्या अर्धनग्नावस्थेतील नृत्याची चित्रफीत झळकली. मुख्य म्हणजे पर्यटकांनी अन्नाची लालूच दाखवत त्या बदल्यात त्यांना नाचायला लावलं, असा अर्थ निघण्याजोगी दृश्य त्यात आहेत. त्यातून देशात एक नवं वादळ उठलं. जारवांसारख्या आदिम जमातींना संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे हाकारे नव्यानं सुरू झाले; पण या जमातींचं वैशिष्ट्य अन् आपण ज्याला नागर संस्कृती म्हणतो त्या प्रवाहाची मैली झालेली गंगा याचा वस्तुनिष्ठ आढावा घ्यायला कोणी तयार नाही. कारण तसा तो घेणं आपल्या सोयीचं नाही.
अंदमान-निकोबार बेटांवर तगून राहिलेल्या या जमातींविषयीची माहिती नीट समजून घेतली की, आज उठलेले तरंग आपोआप संस्कृतीच्या डोहात गडप होतील. अंदमान-निकोबारच्या पट्टय़ात आजही ओंगी, सेन्टेनलीज, ग्रेट अंदमानीज, शॉम्पेन आणि जारवा या आदिम मानवी प्रजाती टिकून आहेत. त्यांच्यापैकी जारवांची चर्चा अधिक होत राहिली. त्याचं एक कारण म्हणजे ही जमात नामशेष होण्याच्या उंबरठय़ावर उभी आहे. मंगोलियन वंशाचा प्रभाव असलेली ही जमात हजारो वर्षांपूर्वी केव्हातरी आफ्रिकेतून भारतात स्थलांतरित झाली, असं म्हणतात. त्यांचा काळा वर्ण, निबर तरीही नितळ कांती, दाट कुरळे केस, बेताची उंची आणि काटक शरीराचा मध्यम बांधा हे त्यांचं रूपही या तर्काला पुष्टी देतं. आजही धनुष्य-बाणानं शिकार करणारी ही जमात पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. आता जेमतेम ४0३ जारवा शिल्लक राहिलेत. तशी ही भटकी जमात. त्यातही हे सगळे एकत्र राहत नाहीत. ४0-५0च्या गटांमध्ये ते विखरून राहतात. जारवांसाठी अंदमानच्या जंगलातला अदमासे ६५0 चौरस किलोमीटरचा टापू संरक्षित केलेला आहे. हा टापू अन् त्या जंगलालगतचा देखणा समुद्र हेच या जारवांचं विश्व. जमीन त्यांचं अंथरूण अन् आकाशाचं पांघरूण. घराची संकल्पनाच नाही. पावसाच्या वेळी लागलाच तर आसरा म्हणून जागोजागी जारवांनी गवतानं शाकारलेल्या पण रांगतच आत शिरावं लागेल, अशी जमिनीलगतची छप्पर असलेल्या भूछत्रासारख्या कुटी उभारून ठेवल्यात. नग्नता हा यांचा स्थायीभाव. कपड्यांचं जारवांना तसं वावडंच आहे. नग्नतेकडून अर्धं अंग झाकण्यापर्यंत जारवांचा जो प्रवास झाला, त्यातच असंख्य प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत.
बदलाचा हा प्रवास तसा अलीकडचा, म्हणजे गेल्या ४0 वर्षांतला. साधारणत: १९७0 पर्यंत जारवा आपल्या संरक्षित विश्वात सुखात होते. नागर समाजाशी त्यांचा काडीचा संबंध नव्हता; पण सत्तरच्याच दशकात या जंगलातून जाणार्या महामार्गाचं काम सुरू झालं. हा अंदमान ट्रंक रोड अस्तित्वात आल्यानंतर ‘सुसंस्कृत’ म्हणवणार्या मुख्य प्रवाहातल्या माणसाची वक्रदृष्टी जारवांच्या संरक्षित साम्राज्यावर पडली नसती, तरच नवल. अनंत हस्ते देणारा निसर्ग देताना भेदभाव करत नाही. घेणार्यांची हावरट वृत्ती अन् गरजेपेक्षा कितीतरी जास्त लुटण्याची विकृती यातून फरक पडतो. जारवा जे काही गोळा करतात, ते गरजेपुरतं. साठवण हा विषयच नाही. त्यामुळं या संरक्षित टापूत वनसंपदा सुरक्षित आहे. भरभरून वाढली आहे. सागरी संपत्तीचंही तसंच आहे. या टापूत प्रचंड मोठय़ा आकाराचे खेकडे दिसतात. चिंबोरीच फस्त करायची ठरवली तर खेकडे दिसणार कसे? पण सुसंस्कृत म्हणवणार्या समाजाला तिथला लुटीयोग्य खजिना दिसला आणि बदलाच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलं. सुरुवातीला जारवांच्या जवळपास जायचीही आपली हिंमत नव्हती. सेंटेनलीजसारखे तेही थेट जिवावर उठले, तर या कल्पनेनंच थरकाप व्हायचा. पण विसावं शतक मावळताना या संरक्षित टापूवर अतिक्रमण करण्याच्या आसक्तीला आशेचा किरण दिसला.
जारवा हे स्वयंपूर्ण जगत असले, तरी धातूसाठी त्यांना त्यांच्या जगाच्या बाहेर डोकवावं लागलं. चोरी म्हणजे काय, याचा गंध नसलेला एक जारवा रात्री भांड्यांची चोरी करताना नागर समाजाच्या हाती लागला. खरं तर अपघातानंच. कारण घरातल्या लोकांच्या आरडाओरड्यानं बावचळलेला हा जारवा पळून जाताना धडपडला. पाय मोडून घरामागच्या नाल्यात पडला. रात्री कुणाच्या लक्षात आलं नाही; पण सकाळी तो दिसलाच. मग त्याची वरात निघाली. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. परस्परांच्या भाषेचा गंधही नसल्यानं संवाद हा पेच होता. आदिवासी कल्याण विभागातल्या काही अधिकार्यांनी हरप्रकारे प्रयत्न करून त्याला निदान उपचारांसाठी राजी केलं. काही महिने तो दवाखान्यात होता. तेव्हा हा अजूबा माणूस बघायला रोज ही गर्दी लोटायची. अखेर तो बरा झाला. त्याची रवानगी पुन्हा त्याच्या माणसांमध्ये करताना अधिकार्यांच्या मनात धाकधूक होती. अनेक प्रश्न फेर धरून नाचत होते.. त्याची माणसं त्याला पुन्हा स्वीकारतील की ठार करतील? तो आपल्याविषयी जारवांना जाऊन काय सांगेल? नागर संस्कृतीविषयी काय स्मृती त्याच्या मनावर कोरल्या गेल्या असतील?.. एक ना अनेक प्रश्न. या सगळ्य़ा प्रश्नांची उत्तरं ट्रंक रोडवरच्या एका जेट्टीवर अवचित मिळाली. बरा होऊन गेलेला जारवा आणखी १५-२0 जारवांसह त्या अधिकार्यांच्या भेटीला आला होता. जणू कृतज्ञता व्यक्त करायला! तिथून संपर्क सुरू झाला. जारवांना त्यांच्या जगापलीकडच्या माणसांविषयी भरवसा वाटू लागला. मग हे जारवा त्यांच्या टापूतून जाणार्या बसच्या टपांवरनं विनातिकीट प्रवास करायला लागले. कपड्यातल्या माणसांबद्दलची त्यांची भीड चेपली. तिथून अधोगतीची सुरुवात झाली. कपड्यातली माणसं त्यांच्या टापूत शिरली. तिथं यथेच्छ लुबाडणूक करता यावी, यासाठी आपण जारवांना दारूची दीक्षा दिली. गुटख्याची सवय अन् वडा-सामोश्यासारख्या जंक फूडची चटक लावली. जे पूर्वी ग्रेट अंदमानीजच्या बाबतीत घडलं तेच जारवांच्या बाबतीतही होऊ लागलं. कपड्यांतल्या माणसाच्या सान्निध्यात आल्यावर यांनाही रोग जडले. पोटं बिघडली. दवा-दारू नशिबी आली.
या प्रकारांची चाहूल लागल्यावर सर्वोच्च न्यायालयानं प्रा. शेखर सिंग यांचा एक सदस्यीय आयोग नेमला. त्यांनी केलेल्या शिफारशी कुठे गेल्या? त्या अहवालाच्या आधारे ट्रंक रोड पर्यटकांसाठी बंद करण्याचा आदेश निघाला होता. त्याची अंमलबजावणी कुठे होतेय? पण हे सगळं बाजूला ठेवून आम्हाला जारवांना करमणुकीसाठी नाचवायचंय. हे शोषण डान्सबारपेक्षा भयानक आहे.
६0 हजार वर्षांचा प्रदीर्घ इतिहास लाभलेल्या जारवांमध्ये जन्माचा आनंद नाही, लग्नाचा जल्लोष नाही की मृत्यूबद्दलचा आक्रोश नाही. अन्न आणि शरीर यांची सांगड घालणारी त्यांची चयापचय क्रिया आपल्यापेक्षा भक्कम अन् वेगळी आहे. म्हणूनच पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असलेल्या अन् औषधांच्या वार्यालाही न फिरकलेल्या जारवांचं सरासरी आयुर्मान ५२-५३ वर्षांचं आहे. त्यांची दुनिया या गूढ निबिड अरण्यात दडून राहिलेली आहे. टूथब्रश-मिनरल वॉटरपासून दारू-गुटख्यापर्यंत ऐसपैस पसरलेल्या नागरी संस्कृतीपासून त्यांचं रक्षण करायचं की, त्यांना या गर्तेत लोटायचं हा खरा प्रश्न आहे. सहा वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीच्या अजस्त्र लाटांनी नागरी संस्कृतीने बहरलेल्या बेटांचा घास घेतला. पण निसर्गाच्या रौद्र रूपाची चाहूल इतर प्राण्यांप्रमाणे जारवांनाही लागली. त्सुनामी येऊन आदळली तेव्हा सगळे जारवा आधीच सुरक्षित टेकाडांवर गेलेले होते. विज्ञान-तंत्रज्ञानाचा आधार असून आपल्याला जे कळलं नाही, त्याचा सुगावा जारवांना लागला.
आदिमानवापासून गुहेतल्या वास्तव्यापर्यंतचा टप्पा पार पडल्यावर उत्क्रांतीचे अवशेष म्हणून काही जमाती मागेच त्याच अवस्थेत ठेवून माणूस दोन पायांवर चालायला लागला. त्यानंतर अत्यंत वेगानं प्रगती झाली; पण त्याच टप्प्यावर मागे रेंगाळलेल्या प्रजाती या पर्यटकांसाठी जणू ज्युरासिक पार्कच ठरल्या आहेत. या संस्कृतीचे आपणच खरे शत्रू आहोत, असं आज ना उद्या मानववंशशास्त्र सांगितल्याखेरीज राहणार नाही. डेसमंड मॉरिससारखा मानव निरीक्षक संशोधकही मोनोगामी (एकपत्नी व्रत) ही बहुष: नागरीकरणाची देणगी आहे, असं मानतो. पण त्यालाही या जारवांनी तडा दिलाय. विवस्त्रावस्थेतील जारवा मोनोगामीचं कठोर आचरण करतात. बापजाद्यांनी हरीण मारायला शिकवलेलं नसल्यानं हरणांची शिकार करत नाहीत. तरीही त्यांच्यापेक्षा आम्ही सुसंस्कृत असा टेंभा मिरवत आम्ही जारवांना संस्कृतीच्या प्रवाहात आणायची भाषा करतोय. त्याचवेळी मानवभक्षक समजल्या जाणार्या सेंटिनलिजच्या वाट्याला जायची आमची हिंमत नाही. माणूस हा उत्क्रांतीसाठी सर्वांत जास्त सक्षम आहे, हे सिद्ध करणार्या प्रजातीचा ज्युरासिक पार्कसारखा म्युझियम करण्याची आपली इच्छा कुणी तपासायची?
जारवांपुरतं बोलायचं तर शब्दांपेक्षा ज्यांना शांतताच अधिक प्रिय आहे, त्यांचं वर्णन शब्दांत काय करणार?
No comments:
Post a Comment